सोमवार, 28 अप्रैल 2014

बेदादी बेकैद सेना | कारबारीच चोरटे |
धन्यासी राखणे राजी |कदा काळी घडेचिना ||  ३५ ||
चोरटी होरटी तुंदे |नासके लाच इच्छिती |
लोंढीचे दूरी घालावे | मारावे राजकारणे || ३६ ||
सेवकां आवरू नेणे | तो राजा मूर्ख जाणिजे |
मूर्खाचे  राज्य राहेना | कोणाचे कोण ऐकतो || ३७ ||
लोकासी राखणे राजी | ते राज्य प्रबळे बळे |
बंद बेबंद जाणावे | ताबे ताबे परोपरी || ३८ ||
खर्लखोचर काढावे | तंदुळासारिखे खडे |
खरे ते आदरे घ्यावे | खोटे सर्वत्र टाकिते || ३९  ||
सगट सारिखे जेथे | तेथे होते बराबरी |
सारगार कळेना की | जाणते नेणते जनी || ४० ||
कांही येक परिक्षावे | शोधावे बहुतांपरी |
नेटके कार्य साधावे | रोधावे कुटीलाजना || ४१ ||
असो हे बोलणे जाले | युक्तीवीण कामा नये |
युक्तीला पाहिजे शक्ती | तस्मात शक्ती प्रमाण हे || ४२ ||
मुक्त केल्या देवकोडी | सर्वही शक्तीच्या बळे |
समर्थ भवानी माता | समर्था वरू दिधला || ४३ ||
मला तो प्रत्ययो नाही | मानेना याच कारणे |
मानेना अनुमानेना | काय कैसे कळेचिना || ४४ ||
अंतरी कल्पना केली | येकांती बोलिलो बहु |
रक्षिता देव देवांचा | त्यांचा उछाव इच्छिला || ४५ ||
इच्छा पूर्ण करी माता | वाढवी बहुतांपरी |
दयाळू मयाळू माता | स्वभावे जाणती माता || ४६ ||
जीवीचा पुरला हेतू | कामना मनकामना |
घमंड जाहाले मोठे | घबाड साधले बळे || ४७ ||
रामवरदायिनी माता | दासे धुंडून काढली |
वोळखी पादिता ठाई | भिन्न भेद असेचिना || ४८ ||
तुझा मी मी तुझा माते | ऐसे हे बोलणे नव्हे |
तुझी तुं तू तुझी माता |जगज्योती कृपाळूवे || ४९ ||
उदो उदो तुझा माता | जाहला सचराचरी |
गोंधळू घातला देवी | ब्रह्मा विष्णू महेश्वरी || ५० ||
सख्य हे जाहले मोठे | आवडी सांगता न ये |
असो हे जीवीचे जीवी | सुखानंद चहुंकडे || ५१ ||
बोलता भवानी माता | महिंद्र दास्य इच्छिती |
बोलणे हे प्रचीतीचे | अन्यता वाउगे नव्हे || ५२ ||
भक्त ते पावती खुणे | माता सर्वांस वाढवी |
वाढवी आपल्या लोभे | मायाजाळे परोपरी || ५३ ||
मुलांची लाज मातेला | सिकवी सरसे करी |
लोभे लोभेची श्रुंघारी | आपुली भूषणे तया || ५४ ||
जीव त्या बाळकापासी | अखंड लाविला असे |
स्वहित कळेना त्याला | सीकावते बहु बहु || ५५ ||
मातेसी काय चोरावे | सर्वही ठाउके तिला |
उतीर्ण व्हावया नाही | तेचि ते सचराचरी || ५६ ||
बोलणे चालणे तिचे देखणे चाखणे सदा |
आखंड खेळते आंगी | प्राणीमात्राचीये पाहां || ५७ ||

[बेकादी ,बेकैद] शिस्त नसलेली सेना ,चोरटे कारभारी, [हारटी] हटवादी ,[तंदे ] गर्विष्ठ ,जे नासके आहेत ,वाईट त्यांना लाच हवी असते .अशा दासांना दूर करावे ,राजकारणात ठेऊ नका .असे राजकारण करणा-या लोकांना समर्थांनी प्रबोधन केले आहे .जो  राजा सेवकांना आवरू शकत नाही असा राजा मूर्ख असतो . अशा मूर्ख राजाचे कोणी ऐकत नाही ,मग त्याचे राज्य राहत नाही .जो राजा सर्व लोकांना राजी राखतो ,[बंद बेबंद ]बेशिस्त आणि स्वैराचारी लोकांना हळू हळू ताब्यात आणावे. जसे आपण  तांदुळातले खडे आपण काढून टाकतो तसे [ खर्ल ] दोष ,[खोचर] दुष्ट लोकांना काढून टाकावे .खरे जे आहे त्यांचा आदराने स्वीकार करावा ,तर खोटे आहे टे टाकून टाकावे .जे सारखे असतात ,ते [ सगट ] एकत्र असतात .परंतु [सारगार ] चांगले वाईट कळत नाही कारण जगात सर्वप्रकारचे [जाणते ,नेणते ] लोक असतात . लोकांची परीक्षा घ्यावी ,आपल्याला हवे तसे लोक शोधावे ,कार्य नीट नेटके पार पाडावे ,[कुटील ]दुष्ट लोकांना [रोधावे] रोखावे .हे सर्व नुसते बोलणे झाले .पण युक्तीशिवाय सगळे व्यर्थ आहे .पण युक्तीला शक्तीची जोड लागते ,म्हणून शक्ती तेव्हडीच महत्वाची असते .सर्व देवांना श्रीरामांनी शक्तीने रावणाचा पराभव करून मुक्त केले .सामर्थ्यशाली असणा-या भवानी मातेने सामर्थ्य शाली असणा-या रघुपतींना वर दिला .
मला तर याचा प्रत्यय नाही .त्यामुळे हे मानायला मन तयार नाही .नेमके काय आणि कसे ते कळत नाही .मनात खूप कल्पना केली स्वत:शीच खूप बोललो .मग लक्षात आले श्रीराम देवाचेही रक्षण करणारा आहे .त्यांचा उत्सव करावा अशी इच्छा केली .ह्या इच्छेची पूर्णता मातेने केली .ही तुळजाभवानी दयाळू ,मायाळू आहे .स्वभावाने टी जाणतई आहे ,ज्ञानी आहे .मनीचा हेतू पूर्ण झाला .श्रीरामांचा उत्सव करण्याची इच्छा पूर्ण झाली .[घमंड ] आनंद झाला .खूप मोठे घबाड मिळाल्याचा आनंद झाला .रामवरदायिनी माता रामदासांनी शोधून काढली .तिला ओळखली .मग लक्षात आले की रामवरदायिनी वं तुळजाभवानीयांच्यात कोणताही भेद नाही .तुझा मी ,मी तुझा माते हे बोलणे बरोबर नाही .तुझी तू ,तू माझी माता असे म्हणायाला हवे .तूच जगज्जोती आहेस कृपा कर .सगळ्यांनी तुझा उदो उदो केला .ब्रह्मा विष्णू महेशांनी तुझा गोंधळ घातला .हे सख्य झाले ,सर्वांना तुळजाभवानीबद्दल प्रेम वाटू लागले .ती या जीवाची जीवी म्हणजे स्वामिनी आहे .तिची कृपा झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद आहे .भवानी माता बोलल्यावर महिंद्र येथे शिवराय दास्य करावे अशी इच्छा प्रगट करू लागले .    
भक्तांना त्यांच्या भक्तीच्या खुणा मिळतात .माता सर्वांनाच वाढवते आपल्या मायाजाळा त लोभाने 
अडकवते पण मुलांची मातेला लाज असते. ती शिकवते ,मोठे करते आपल्या भूषणाने भक्ताला शृंगारते 
.त्या बाळकाजवळ आपला जीव अखंड लावते .बालकाला स्वहित कळत नसते ,म्हणून त्याला खूप 
शिकवते ,शहाणे करते .तशी ही तुळजाभवानी माता आहे . ह्या मातेपासून काय लपून राहणार ? तिला 
सर्व समजते .ती सर्व चराचरात भरून आहे .तीच बोलवते ,चालवते ,बघते ,चाखते . प्रत्येक प्राणीमात्रात 
अंगी अखंड खेळते .





अध्यात्मसार २

व्रुक्षारूढे सुमित्राने | लंका ती देखिली पुढे |
झळकले कळस लंकेचे | हारीने गोपुरे किती || १८ ||
झरोके उंच माड्याचे झर्झार नभ रेखिले |
मार्तंडमंडळा ऐसी | दैदिप्ये देखिली पुढे || १९ ||
झापडी पडिली नेत्री | उदो उदो म्हणे फणी |
रामराजा माहाराजा | वरू हा दिधला तया || २०  ||
जन्ननी रामवरदानी | तधीपासुनी बोलिजे |
उदंड ऐकिले होते | प्रचीत मजला असे || २१ ||
प्रतापगिरीचे ठाई | आदिशक्ती विराजते |
कामना पुरते तेथे | प्रचीती रोकड्या जनी || २२ ||
तुळजापुरीची माता | प्रतापेची प्रगटली |
आदिशक्ती माहामाया | कुळीची कुलस्वामिनी || २३ ||
कुळची पाळिले आम्हां | रक्षिले बहुतांपरी |
बाळकू काय मातेचे | उत्तीर्ण होऊ पाहते || २४ ||
तैसा मी किंकरू तीचा | विचारे ठावही नाही |
तिची ती वैष्णवी माया | तारीते मारिते जनी || २५ ||
शक्तीने  पावती  सुखे | शक्ती नस्तां विटंबना |
शक्तीने नेटका प्राणी | वैभवे भोगतां दिसे || २६ ||
कोण पुसे अशक्ताला | रोगीसे बराडी दिसे |
कळा नाही कांती नाही | युक्ती बुद्धी दुरावली || २७ ||
साजिरी शक्ती तो काया | काया मायाची वाढवी |
शक्ती तो सर्वही सुखे | शक्ती आनंद भोगवी || २८ ||
सार संसार  शक्तीने | शक्तीने शक्ती भोगिजे |
शकत तो सर्व ही भोगी | शक्तीवीन दरिद्रता || २९ ||
शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |
शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती || ३० ||
युक्ती ते  जाड  कळा | विशक्तीसी तुळणा नसे |
अचूक चुकेना  कोठे | त्याची राज्ये समस्तही || ३१ ||
युक्तीने चालती सेना |युक्तीने युक्ती वाढवी |
संकटी आपणा रक्षी |रक्षी सेना परोपरी || ३२ ||
उदंड स्वस्तीची कामे | मर्द मारुनी जातसे |
नामर्द काय तो लंडी | सदा दुश्चित्त लालची || ३३ ||
फिताव्याने बुडती राज्ये | खबरदारी असेचिना |
युक्ती ना शक्ती ना बेगी | लोक राजी असेचिना || ३४ ||

व्रुक्षावर बसलेल्या सौमित्राने ,लक्ष्मणाने लंका समोर पाहिली त्याने लंकेचे झळकणारे कळस पाहिले .रांगेने असलेली गोपुरे पाहिली .उंच माड्यांच्या खिडक्या पाहिल्या .झरझर वाणारे नभ पाहिले .डोळ्यांवर झापडी पडली फणी [शेष ]म्हणजेच लक्ष्मण उदो उदोचा गजर करू लागला .महाराज श्रीराम म्हणू लागले हा वर तू दिलास खरा ! मग ह्या जननीला तुळजामातेला तेव्हा पासून रामवरदायिनी म्हणतात .मी तिच्याविषयी खूप ऐकले होते पण तिची प्रचीती मला आली नव्हती .प्रताप गडावर जी आदिशक्ती विराजमान आहे तेथे भक्तांच्या ईच्छा पूर्ण होतात अशी रोकडी [प्रत्यक्ष ]प्रचीती लोकांना येते .तुळजापूरची माता प्रतापगडावर प्रगट झाली आहे .ती आदिशक्ती महामाया आहे ,शिवरायांच्या कुलाची कुलस्वामिनी आहे. बालकाला [शिवरायांना ] या स्वामिनी ने पाळले आहे .त्याचे रक्षण केले आहे . अफझलखाना पासून शिवरायांचे रक्षण केले आहे .मग तीची उतराई कशी करता येणार ? मी [समर्थ रामदास ]तिचा किंकर [दास] आहे .मी काही विचारही करू शकत नाही .आई तुळजाभवानीची वैष्णवी माया लोकांना तारते तशी मारते सुध्दा .चांगली शक्ती असणारे शरीर सुख मिळवते तर शक्ती नसली तर विटंबना होते .शक्तीने युक्त असलेला मानव वैभव भोगताना दिसतो .अशक्त माणसाला कोण विचारतो ? रोगी ,अशक्त ,अशा माणसाला कांती नाही ,तो कळाहीन असतो त्याच्यापासून युक्ती आणि बुद्धी दोन्ही हिरावली जाते .चांगली शक्ती असणारे शरीर मायाच वाढवते .शक्तीने सर्व सुखे मिळतात .शक्तीने आनंद मिळतो .शक्तीने राज्य मिळतात .युक्तीने प्रयत्न होतात .शक्ती आणि युक्तीने श्रीमंती धावते . युक्तीने पांडित्य असते ज्याच्याकडे शक्ती नाही ,जो विषाक्त आहे ,त्याची लोनाशीच तुळणा होत नाही .जो अचूक असतो ,जो चुकत नाही ,त्याचे राज्य असते .युक्तीने राज्याची सेना चालवावी लागते .युक्तीने  युक्ती वाढते .आपल्याला संकटात रक्षण करता येते .स्वास्थ्यासाठी अनेक कामे मर्द करून जातात .नामर्द काय करणार ? तो सदा दुश्चित्त ,लालची असतो .फितुरीने राज्य बुडतात .कारण तेथे कोणतीही खबरदारी घेतली जात नाही या [बेगी] वेळेस शक्ती युक्ती कामास येत नाही .||३४ ||


अध्यात्म सार

अध्यात्मसार
दुखदारिद्र उद्वेगे | लोक सर्वत्र पीडिले |
मुळीची कुळदेव्या हे | संकटी रक्षिते बळे || १ ||
राम उपासना माझी | त्रैलोक्य सुख पावले |
सोडिले देव ईंद्रादी | तोडिली बंधने बळे || २ ||
कीर्तीसी तुळणा नाही | प्रतापे आगळा बहु |
न्याय नेमस्त हे लीळा | ण भूतो ण भविष्यती || ३ ||
उन्मत्त रावणे येणे | त्रैलोक्य पीडिले बळे |
देव ते घातले बंदी | कैपक्षी राम  पावला || ४ ||
रावणे चोरिली सीता | मावकापट्य साधिले |
धुंडिता धुंडिता सीता |शुद्धी कोठे न संपडे || ५ ||
रामसौमित्र हे बंधू | उदास धाकुटे वये |
श्रीमंत लक्षणे मोठी | दिसती मुख्य देवसे || ६ ||
मूर्ख ते नेणती चिन्ह | जाणत्या वेधू लागला |
दिसती थोर सामर्थ्ये | श्रीहरी भगवान ते || ७ ||
फिरती थोर अरण्ये | कर्कशे गिरीकंदरे |
कपाटे विवरे झाडी | झोतावे दर्कुटे कडे || ८ ||
आरण्य हिंडता तेथे | कुमारी देखिली वनी |
कुमारी बाळलीळा ते | दिसे त्रैलोक्य जननी || ९ ||
रूप ते नेटकी बाळा | लावण्य बाणले असे |
दैदिप्य खेचरी लीळा | पार्वती लक्षुमी जशी || १० ||
यक्षिणी अप्सरा देव्या | शेषगधर्वकुमरी |
काय की कोण की आहे | काही केल्या कळेचिना || ११ ||
चंचळा चमके नेटे | मोहनी मनमोहनी |
ते सूर्यवंशीचे राजे | विख्यात भुवनत्रयी || १२ ||
नेमस्त न्याय नीतीचे | करिती धर्मस्थापना |
परस्त्री नेणती दृष्टी | ब्रह्मचारी फणीवरू || १३ ||
येकांती त्या वनामध्ये | देखिले त्या कुमारीने |
कुमारी देखिली त्यांनी | बोलती ते परस्परे || १४ ||


कैची तू कोण तू काई | नाम ते कोण ते तुझे |
म्हणे रे मीच तुकाई | जा तुम्हा वरू दिधला || १५ ||
मनाच्या कामना होती | सीता शुधी करा तुम्ही |
सूर्यवौंशी माहाराजे | बोलती ते कुमारीसी || १६ ||
वरू त्वां दिधला आम्हां | सत्य कैसेनि जाणिजे |
येथून दाविसी लंका | तरीच वरू हा खरा || १७ ||


या काव्यात समर्थांनी त्या काळाची परिस्थिती सांगितली आहे .सर्वत्र लोक दु:खाने वं दारिद्र्याने त्रासले होते .पण तुळजाभवानी जी कुळदेवता आहे ती सर्वांचे संकटात रक्षण करते .समर्थ म्हणतात की टे राम उपासना करतात .त्या उपासनेने त्रैलोक्याचे सुख त्यांना मिळाले .कारण या श्रीरामांनीच ईंद्रादी देव ,ज्यांना रावणाने बंदी करून ठेवले होते त्यांना सोडवले .त्या श्रीरामांच्या कीर्तीला तुळणा  होत नाही .त्यांचा पराक्रम ही आगळा वेगळा आहे .त्यांनी केलेला न्याय सुध्दा न भूतो न भविष्यती आहे .लोक रंजनासाठी प्रत्यक्ष अग्निदिव्य केलेल्या शुध्द पत्नीचा त्याग केला .उन्मत्त रावणाने त्रैलोक्याला त्रास दिला ,देव ,ब्राम्हण सर्व सामान्य जनता कोणीच सुटले नाहीत त्याच्या त्रासापासून ! त्यांची त्रासातून सुटका करण्यासाठी श्रीराम धावून आला .रावणाने कपट करून ,साधूचे सोंग घेऊन [माव सोंग ] देवी सीतेचे हरण केले .श्रीराम वं लक्ष्मण तिला शोधत हिंडत होते पण सीतेचा शुधी [शोध ] लागत नव्हता .राम वं सौमित्र [लक्ष्मण] हे लहान वयाचे भाऊ हिंडत होते .वय लहान पण कीर्ती महान असते ना तसे ते देवतां प्रमाणे दिसत होते .मूर्खांना त्यांची सुचिन्ह दिसली नाहीत पण जे जाणते होते ते त्यांचे सामर्थ्य ओळखून होते .ते मोठ्या मोठ्या अरण्यात घोर पर्वंतातील गीरीकंदरात [गुहा ],त्यांनी सीतेला सर्वत्र शोधले डोंगरातील गुहा ,द-या कडे सर्वत्र शोधले .अरण्यात हिंडत असताना एक दिवस त्यांनी एक कुमारी बघितली .ती खरे तर त्रैलोक्य जननी होती .ती तिची बाळ लीलाच होती .तिचे रूप नेटके ,लावण्यवती  होती .ती खेचरीलीळा [आकाशात उडणा-या पक्ष्याच्या लीला ]करत  होती .ती पार्वती लक्ष्मी प्रमाणे भासत होती .ती यक्षिणी ,अप्सरा ,गंधर्व कुमारी ती कोण होती ते दोघा बंधूंना कळत नव्हते .ती चंचळ ,चमकणारी ,मोहिनी ,मनमोहिनी होती ,ते दोघे सूर्य वंशाचे राजे होते .सुर्यवंश त्रिभुवनात प्रख्यात होता .या वंशातील राजे न्याय नीति पाळणारे होते .परस्त्री दृष्टीला पडताच ते तिच्याकडे पहात नसत .त्या वनात एकांतात त्या कुमारीने त्यांच्याकडे पाहिले ,त्या दोघांनी ती कुमारी पाहिली .दोघे तिच्याशी बोलू लागले ,तू कोण आहेस तू इथे काय करतेस ? तुझे नाव काय आहे ? ती कुमारी म्हणते अरे मीच तुकाई .मी तुम्हाला वर देते .तुमच्या मनातील ईच्छा पूर्ण होतील .सीतेचा शोध घ्या .सूर्यवंशाचे राजे तिला म्हणतात तू आम्हाला वर दिलास ,पण तो खरा आहे की नाही ते कसे कळणार ? तू ईथून आम्हाला लंका दाखव .तर तुझा वर खरा असे आम्ही समजू .|| १७ ||



जगदिश जगदात्मा | जाणता जगजीवनू |
जुनाट कुमारी माता | अर्धनारी नटेश्वरू || १ ||
प्रकृती पुरुषे दोघे | अनादी येकरूप ती |
परात्पर परमात्मा | परेश परमेश्वरी || २ ||
मुळीची स्फुर्ती जे सत्ता | अहंता गुणक्षोभिणी |
देवत्रयांसी जे माता | ती नांव गुणक्षोभिणी || ३ ||
सत्वरज तमो गुणी | विष्णू ब्रह्मा महेश्वरु |
तयांचे अंगीची शक्ती | लक्ष्मु  सावित्री उमा || ४ ||
गणेश सीधी बुत्धी त्या | शारदा मुख्य कुमरी |
रागरंगी तानमाने | गीत नृत्य करी सदा || ५ ||
स्वर्गीचे देव ईंद्रादी | येम धर्म बृहस्पती |
नारद तुंबरुदिक | भक्तराज माहांभले || ६ ||
देवरुसी मुनी योगी | साधू सीध भले भले |
येक्ष किन्नर गन्धर्वी | विधाधरश्च चारणे || ७ ||
नाना गुणी लोक चौदा | गुहको अष्टनायका |
रंभा उर्वसी मुख्या | तीलोत्तमाची मेणीका || ८ ||
नाना स्वर्गस्ते कुटुंबे | आधीकारेंची राहिले |
त्रैलोक्य निर्मिले देवी | ब्रह्मा विष्णू महेश्वरी ||९ ||
स्वर्स्त मृत्य ये लोकी | सर्व येउनी राहिले |
हरीचे अंश हे नाना | सीवशक्ती बहुविधा || १० ||
दश आवतार  विष्णुचे | प्रगटे ठाउके जनी |
मार्तंड भैरवो देवो | तुळजा आष्टभैरवो || ११ ||
नौ चंडी काळिका काळी | कामाक्षा बनशंकरी |
चंडिका रेणुका माता | जाखमाता जोगेश्वरी || १२ ||
सीवशक्ती बहुरूपी |आनपूर्णा माहेश्वरी |
सर्वत्र देव तो देव्या | देवदास आनन्य तो || १३ ||
भक्त ते भक्तीने ध्याती |अभक्त वेगळे सदा |
आपलाली क्रीयासिद्धी याद्भावम् तद भविष्यती || १४ ||

 परब्रह्म परमात्मा जो  निर्गुण निराकार आहे ,त्यामध्ये जे प्रथम स्फुरण झाले ,एको हं बहुस्याम ,मी एकटा आहे ,बहु व्हावे ,तेव्हा त्या स्फुरणाला मूळमाया म्हणतात .समर्थ द ८ स ३ मध्ये म्हणतात ,
मूळमाया तोचि मूळपुरुष | तोचि सर्वांचा ईश | अनंतनामी जगदीश | तयासीची बोलिजे || ८-३-२० ||
मूळमाया आणि मूळपुरुष एकच आहेत तोच सर्वांचा नियंता आणि स्वामी ईश्वर आहे .मूळमाया म्हणजेच गणेश आणि शारदा यांचे रूप .गणेश आणि शारदा ,शिव आणि शक्ती ,प्रकृती आणि पुरुष ही सगळी एकच .मुल्मायेत जाणीव व वायू किवा ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती असे सूक्ष्म भेद आहेत यातील जाणीव म्हणजे गणेश आणि वायू म्हणजे शारदा .गणेश शारदेलाच प्रकृती पुरुष ,शिव शक्ती ,अर्धनारी नटेश्वर जगज्जोती अंतरात्मा परमेश्वर अशी नावे आहेत .तोच जगदीश आहे
आत्म्याचे चार प्रकार सांगितले आहेत .देहात राहणारा जीवात्मा ,जगात राहणारा जगदात्मा ,विश्वाच्या अंतर्यामी राहणारा विश्वात्मा ,सर्वात्मा किंवा अंतरात्मा जो अनेक रूपे घेऊन सर्वांना चालवतो .
हा जगदात्मा जाणता आहे म्हणजे त्याच्याजवळ जाणीव आहे ,ज्ञान आहे तो सर्वांना सांभाळणारा असल्याने तो जगजीवनू आहे .तुळजाभवानी जुनी पुराणी कुमारी माता आहे .तीच अर्धनारी नटेश्वर आहे. निर्गुण परब्रह्मात जो संकल्परूप गुणविकार निर्माण होतो त्यालाच षड्गुणैश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर म्हणतात .त्यांनाच प्रकृती पुरुष ही म्हणतात .म्हणजेच मूळमायेचीच ही सर्व नावे आहेत
पंचमहाभूते व त्रिगुण मिळून प्रकृती तयार होते .मूळमायेतील जाणीव म्हणजे पुरुष हे दोन्ही एकरूपच असतात .प्रकृती व पुरुष परात्पर परमात्मा आहेत .मुळीची स्फूर्ती म्हणजे मूळमाया तीच तुळजाभवानी तीच गुण क्षोभिणी आहे तीच तीन गुण निर्माण करते .तीन गुण आहेत सत्व ,रज ,तमोगुण . मग त्या त्रिगुणांचे स्वामी ब्रह्मा ,विष्णू ,महेश निर्माण होतात .त्या  तिघांबरोबर त्यांच्या शक्ती लक्ष्मी ,सावित्री ,उमा असतात.गणेश ,शारदा ताना धरतात व गणेश नेहमी नृत्य करतो .
स्वर्गातले सगळे देव ,यम धर्म ,बृहस्पती ,नारद ,तुंबर [स्वर्गातले गायक ],मुनी ,योगी ,साधू ,सिद्ध सगळे भले यक्ष ,किन्नर ,गंधर्व ,चौदा लोकातले ,निरनिराळ्या गुणांचे ,अति मानवी योनीतले ,अष्टनायका ,रंभा ,उर्वशी ,तिलोत्तमा ,मेनका ,अनेक स्वर्गात राहणारी कुटुंबे अधिकाराने  राहिले . ब्रह्मा विष्णू ,महेश्वरांनी त्रैलोक्य निर्माण केले .
 स्वर्गात राहणारे या मृत्युलोकावर येऊन राहिले ,हे सगळे हरीचे अंश आहेत .ते शिवशक्ती आहेत .विष्णूचे दहा अवतार लोकांमध्ये प्रगत झालेले आहेत .मार्तंड ,भैरव ,तुळजा ,अष्टभैरव ,तुळजा ,तिचे अष्टभैरव हे सगळे प्रगट झाले .नव चंडी ,कालीला काळी आहे ,कामाक्षा ,बनशंकरी ,चंडिका ,रेणुका माता जाखमाता ,जोगेश्वरी ,आहेत ती तुळजामाता शिवशक्ती अनेक रूपात आहे .अन्नपूर्णा ,माहेश्वरी या सगळ्या देव्यांमध्ये देव असतातच .या सगळ्यांना मानणारा देवदास अनन्य असतो .

भक्त नेहमी अनन्यतेने भक्ती करतो .अभक्त म्हणजे भक्त नाहीत ते नेहमी देवापासून वेगळे असतात .जसा भाव तसा देव असतो त्याप्रमाणे भक्त आपापाली कार्यसिद्धी प्राप्त करून घेतात .