सोमवार, 3 सितंबर 2012

नाम महिमा


नाम महिमा


नाम साराचेही सार | जपाताती थोर थोर |
व्यासादिक मुनेश्वर | नामें तरले भवसिंधू || १ ||
नाम चोखट चोखट | नामे तरले खटनट |
आणि नं लगे खटपट | वेदशास्त्र घोकावे || २ ||
नाम सोलीव सोलीव | जपूं इच्छिताती देव |
मृत्युलोकी जन्म व्हावे | तेणे तरुं भवसिंधू ||३||
नाम उत्तम उत्तम | नामे हरे भवभ्रम |
नामें तरले अधम | उच्चारिता वाचेसी ||४||
नाम ओंकाराचे मूळ |ऐसे कळाले समूळ |
म्हणोनिया सर्वकाळ | रामदास जपतसे ||५||


नाम अमोल्य अमोल्य | नामें नये दुजे तुल्य |
नाम कैवल्य कैवल्य | देव माल उत्धारीले || १||
नाम अगम्य अगोचर | नाम वेदासी आधार |
नाम जपे महेश्वर | ॠषी सुरवरादि करून ||२||
नाम गगनाहूनि वाड | नाम अमृताहूनी गोड |
नामें पुरे सर्व कोड | भवसांकडे दूर होय | |३||
नाम पृथ्वी परीस स्थूळ | खोली पुरे न पाताळ |
नाम ढिसाळ ढिसाळ | मेरू भासे ठेंगणा || ४ ||
नाम निर्मळ निर्मळ |नाम सोज्वळ सोज्वळ |
नाम केवळ केवळ | रामदास ध्यातसे || ५ || 



नाम साराचेही सार आहे .म्हणजे सर्व साधना पध्दतीत  सर्व सामान्यांना सहज शक्य असणारी साधना पध्दती म्हणजे नाम आहे नामाला एक नाम घेण्याशिवाय कोणतेही कष्ट पडत नाहीत .शारीरिक ,मानसिक ,पैशाने कोणत्याच प्रकारे कष्ट न पडता मोक्षाप्रत नाम नेते .या नामाचा महिमा मोठा आहे थोर थोर लोक ,धृव ,अजामेळ ,मीराबाई ,गोपी सर्व नामाने उद्धरून गेले .व्यासांसारखे मुनी सुध्दा नामाने हा संसार रूपी सागर तरून गेले .
नाम चोखट आहे.खरे आहे . त्या नामाने खटनट असलेले अज्ञानासारखे भक्त तरून गेले नाम घेतले की दुसरे काहीच करावे लागत नाही ,वेदशास्त्रांचा अभ्यासही करावा लागत नाही , विद्वत्ता लागत नाही .फक्त भक्तीभावाने नाम घ्यावे लागते .
नाम सोलीव आहे ,पवित्र आहे .ते देवांनाही जपावेसे वाटते .विश्वमाता पार्वतीला सुध्दा श्रीशंकर रामनामाचा महिमा सांगतात .मृत्युलोकी जन्म घेऊन नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा ,असे देवानाही वाटते .
नाम उत्तमच आहे कारण नामाने भवभ्रम नाहीसा होतो .भवभ्रम म्हणजे संसाराचा भ्रम ,मी देह हा भ्रम ,माझी मुले ,माझा व्यवसाय ,माझे घर हा सर्व भ्रम माणसाला असतो तो नाहीसा होतो .नामाने जसे भक्त तारून जातात ,तसे अधम ,दुष्ट सुध्दा तरून जातात .रावण रामाचा द्वेष करत होता  ,पण ध्यानी मनी त्याला रामच दिसत होता .कंसानेही भगवान श्रीकृष्णांची अशीच विरोधी भक्ती केली .तोही उद्धारून गेला .
नाम ओंकाराचे मूळ आहे .प्रथम ब्रह्माला अहं अशी स्फूर्ती झाली .त्या स्फुर्तीला आदिसंकल्प म्हणतात .हा आदिसंकल्प ज्ञानमय ,शक्तीमय ,आनंदमय अमूर्त ,नादमय असतो .त्यालाच उपनिषदे ओंकार किंवा प्रणव म्हणतात .त्यालाच साधूसंत नाम म्हणतात .म्हणून नाम ओंकाराचे मूळ आहे असे समर्थ म्हणतात .म्हणूनच समर्थ ते नाम सदा सर्व काळ जपत असतात .

नाम अमूल्य आहे त्याच्याशी दुस-या कोणत्याही साधनेची तुलना होऊ शकत नाही .ते कैवल्य आहे कैवल्य म्हणजे शुध्द परब्रह्म ! कारण नाम म्हणजे जो ब्रह्माचा आदिसंकल्प आहे ,त्यालाच संत नाम म्हणतात .त्यानेच मला उध्दारले आहे असे समर्थ म्हणतात
.नाम अगम्य आहे ,न कळण्यासारखे आहे .जे गोचर होण्यासारखे नाही ,ईंद्रीयांना कळण्यासारखे नाही .ते वेदांना आधार आहे .महेश्वर ,म्हणजेच शंकर नाम जपतात .ॠशी सूर [देव ] .नाम गगना पेक्षा मोठे आहे .नाम अमृताहून गोड आहे नामाने सर्व कोड पुरवले जाते भक्ताला हवे ते मिळते .परमेश्वर भक्तासाठी काहीही करायला तयार होतो .एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रुपाने पाणी भरतो ,,कबीरा घराचे शेले विणतो ,जनीचे दळण दळतो .नाम पृथ्वी प्रमाणे स्थूळ आहे पण ते इतके सूक्ष्म आहे की त्याची खोली पाताळापेक्षा ही खोल आहे .नाम ढिसूळ आहे मेरू पर्वतही  त्याच्या पुढे ठेंगणा वाटतो .नाम इतके निर्मळ आहे ,स्वच्छ आहे की ते नाम घेतले की चित्ताची मलीनता नाहीशी होते .मन शुध्द होते ,पवित्र होते ..त्यामुळेच समर्थांनी नामाला सोज्वळ म्हटले आहे .म्हणूनच केवळ नामच समर्थ रामदास ध्यानी घेतात .