शुक्रवार, 18 मार्च 2011

अंतर्भाव

अंतर्भाव

समास २

ऐक शिष्या सावधान | सिद्ध असता निजबोध |

माईक हा देहसमंध | तुज बाधी ||१||

बद्धके कर्मे केली | ते पाहिजे भोगिली |

देह बुद्धी दृढ झाली |म्हणोनिया ||२||

मागे जे जे संचित केले |ते ते पाहिजे भोगिले |

शूद्रे सेत जरी टाकिले | तरी बाकी सुटेना ||३||

हा तो देहबुद्धीचा भाव | स्वस्वरूपी समूळ वाव |

परंतु प्राप्तीचा उपाव | सुचला पाहिजे ||४ ||

स्वरूप लंकापुरी | हेम इटा दुरीच्या दुरी |

देहबुद्धीचा सागरी | तरले पाहिजे ||५ ||

विषयमोळ्या बाहो सांडी | मग त्यास म्हणे कोण काबाडी |

तैसी पदार्थाची गोडी |सांडीत आत्मा || ६ ||

देहबुद्धीचे लक्षण | दिसेंदिस होता क्षीण |

तदुपरी बाणे खूण | आत्मयाची ||७||

सर्व आत्मा ऐसे बोलता |अंगी बाणे सर्वथा |

साधनेवीण ज्ञानवार्ता |बोलोची नये ||८||

दस-याचे सोने लुटले | तेणे काय हातासी आले |

कि राय विनोदे आणिले |सुखासन ||९||

तैसे शब्दी ब्रह्मज्ञान |बोलतां नव्हे समाधान |

म्हणोनिया आधी साधन |केले पाहिजे ||१० ||

शब्दी जेविता तृप्ती जाली |हे तो वार्ता नाही ऐकिली |

पाक निष्पत्ती पाहिजे केली |साक्षपे स्वयें ||११||

कांहीतरी येक कारण | कैसे घडे प्रेत्नेवीण |

मा हे ब्रह्मज्ञान परम कठीण | साधनेवीण केवी ||१२ ||

शिष्य म्हणे सद्गुरू |साधन तरी काय करू |

जेणे पाविजे पारू |माहा दु:खांचा ||१३||

आता पुढिलीये समासी | स्वामी सागती साधनासी |

सावध श्रोती कथेसी |अवधान द्यावे ||१४||

हे शिष्या ,सावधान होउन ऐक .अरे ,तू सिद्ध आहेस .तुला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे .तुला निजबोध झाला आहे .मग तुझी अशी अवस्था कशामुळे झाली आहे ? अरे ,मायिक असलेला असा तुझा देह्संग तुला बाधतो आहे .देह तर नश्वर आहेच .पण तोच तू खरा मानून चालला आहेस .तो तुला बाधतो आहे .तुझी देहबुद्धी दृढ झाली आहे त्यामुळे तू केलेल्या कर्माची फळे तुला भोगावी लागणार आहेत .कारण ती कर्मे मी केली अशा अहंकाराने केली आहेस .कर्ता मी आहे ,असा अहंकार तुझ्याजवळ आहे म्हणून तुला त्या कर्माची फळे तुला भोगावी लागणार आहेत

मागे तू केलेली कर्मे संचित रूपात फळे द्यायला तयार आहेत .

ही तुझी देहबुद्धी आहे .स्वस्वरूप प्राप्त करण्याच्या आड ही देहबुद्धी येते आहे .असे असले तरी स्वस्वरूपा पर्यंत पोहोचण्या साठी काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे .सोन्याच्या विटा असलेली लंका दूर असते तसे स्वस्वरूप ही खूप पल्याड आहे ..ते स्वस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी देहबुद्धीचा हा सागर पार करून जावाच लागेल .

विषयांच्या मोळ्या जो हातातून सांडून टाकतो , मग त्याला काबाडी ,कष्ट करणारा असे कोण म्हणेल ? तसा आत्मा पदार्थांची गोडी आत्मा काढून टाकतो .

जे जे देहबुद्धीचे लक्षण आहे ते ते दिवसेंदिवस क्षीण होत जाते .आणि आत्म्याची खूण मनाला पटत जाते .मनाला समाधान होते .सगळ्यामध्ये एकच आत्मा असे आपण नुसते बोलतो .पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आलेला नसतो .त्यामुळे साधना करणे खूप जरूरी असते .साधने शिवाय काहीही बोलणे योग्य नाही .

जसे दसयाचे सोने आपण लुटतो पण ते खरे सोने नसल्यामुळे आपल्याला खरे समाधान मिळत नाही .तसे शब्दाने नुसते आत्मज्ञान बोलले तरी त्याचा काही उपयोग नाही .त्याने समाधानाची प्राप्ती होत नाही .समाधानासाठी साधना करायलाच हवी .

नुसत्या शब्दाने पोट भरले असे होत नाही .त्यासाठी स्वत: स्वयंपाक करावाच लागतो .कोणतीही गोष्ट प्रयत्नांशिवाय प्राप्त होत नाही .ब्रह्मज्ञान तर सर्वात कठीण आहे . ब्रह्मज्ञान साधनेशिवाय कसे प्राप्त होणार ?

शिष्य गुरुंना विचारतो ,स्वामी ,मी साधना तरी कोणती करू ? ज्यामुळे हा भवसागर पार करून जाईन .

पुढच्या समासात गुरु साधना कोणती करायची ते सांगतात .



अंतर्भाव

समास १

जय जय सद्गुरू समर्था | जय जया पूर्ण मनोरथा |

चरणी ठेउनिया माथा | प्रार्थितसे ||१ ||

मी येक संसारी गुंतला | स्वामीपदी वियोग जाला |

तेणे गुणे आळ आला |मज मीपणाचा ||२||

इच्छाबंधने गुंतलो | तेणे गुणे अंतरलो |

आता तेथूनि सोडविलो | पाहिजे दातारे ||३ ||

प्रपंच संसार उद्वेगे |क्षणक्षण मानस भंगे |

कुळाभिमान म्हणे उगे | सामाधानासी ||४ ||

तेणे समाधान चळे | विवेक उडोनिया पळे |

बळेची वृत्ती ढांसाळे | संगदोषे ||५ ||

स्वामी प्रपंचाचे नि गुणे | परमार्थासी आले उणे |

ईश्वर आज्ञेप्रमाणे | क्रिया न घडे || ६ ||

याचिया दु:खे झोंका आदळे चित्ती | समाधान राखणे किती |

विक्षेप होता चितोवृत्ती | दंडळू लागे ||७||

प्रपंचे केले कासावीस | होउ नेदी उमस |

तेणे गुणे उपजे त्रास | सर्वत्राचा ||८ ||

आता असो हा संसार | जाले दु:खाचे डोंगर |

स्वामी अंतसार्क्ष विचार | सर्व हि जाणती ||९ ||

तरी आता काय जी करावे | कोण्या समाधाने असावे |

हे मज दातारे सांगावे | कृपा करावी ||१०||

ऐसी शिष्याची करुणा | ऐकोनी बोले गुरुराणा |

केली पाहिजे विचारणा | पुढिलीये समासी ||११||

शिष्य सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आहे की हे सद्गुरू नाथा आपण पूर्ण मनोरथ आहात ..मी आपल्या चरणी माथा ठेवून प्रार्थना करतो आहे की मी एक संसारी गुंतलेला बध्द आहे .त्यामुळे मला स्वामी चरणांचा वियोग सहन करावा लागतो आहे ..स्वामी चरणांपासून दूर झाल्या मुळे माझ्यामध्ये देहबुद्धी वाढली आहे .मीपणा ,अहंकार वाढला आहे .माझ्यामध्ये मीपणा वाढल्या मुळे माझ्या मध्ये वासना ,कामना ,कल्पना या सर्व गोष्टी वाढू लागल्या मुळे षडरिपू माझ्या मागे लागले . सत्व गुण मागे मागे हटू लागला ..पण मला यातून सुटायचे आहे .

प्रपंच संसार यांचा आता उद्वेग आला आहे .आता बास झाला संसार असे वाटते आहे क्षणक्षणाला असे वाटते आहे मनाचा निश्चय भग पावतो आहे .कुंळाभिमानाने माझे समाधान नाहीसे झाले आहे .माझ्यातला मी पणा वाढला आहे . विवेक नाहीसा झाला आहे .संगदोषाने वृत्ती ढांसाळली आहे .संग आहे विषयांचा , त्यामुळे समाधान नाहीसे झाले आहे .

स्वामी प्रपंचात रमल्यामुळे परमार्थ हातून होत नाही .नामस्मरण होत नाही ,अर्चन पूजन होत नाही .कांहीच होत नाही .ईश्वराची आज्ञा आहे त्याप्रमाणे कांहीच होत नाही .मन सहाजिकच सुख दु:खाच्या झोक्याबरोबर झुलत रहाते .मग समाधान तरी कसे राखणार ? काही मनाविरुध्द झाले की चित्त वृत्ती डळमळीत होउ लागतात ..

प्रपंचाने मला कासावीस केले आहे मला तुम्ही नाराज करू नका ,कारण त्यामुळे सगळी कडे त्रासच वाढेल .असो असा हा संसार म्हणजे दु:खाचा डोंगर झाला आहे .स्वामी अंतरसाक्षी आहेत .ते सर्व जाणतात ।

आता मी काय करावे ? मला समाधानाने कसे जगता येईल? हे स्वामींनी कृपा करून सांगावे.

अशी शिष्याची करुणापूर्ण वाचणे ऐकून गुरुराणा काय म्हणतात ते पुढच्या समासात पाहू .