मंगलवार, 31 मार्च 2015

समास २



समास २
जय जय सद्गुरू निर्विकल्पा | जय जय सद्गुरू अरूपा |
आलिंगीता सुखस्वरुपा | पदवी लाभे || १ ||
समर्थ सद्गुरुंचा जयजयकार करत आहेत .ते म्हणतात सद्गुरू निर्विकल्प आहेत .संशय रहित आहेत .अरूप आहेत .सुखस्वरूप आहेत सद्गुरूंच्या भेटीने फक्त सुखाचीच प्राप्ती होते .
जो सर्वां लाभांचा शेवट | किं विश्रांतीचे मूळपीठ |
ज्ञानचर्चेस खटपट | निवांत जेथे || २ ||
सर्व लाभ एकत्र केले आणि सद्गुरुंचा लाभ बघितला तर तो सर्व लाभांच्या पेक्षा जास्त आहे कोणताही लाभ सद्गुरू लाभापेक्षा जास्त नाही .हा लाभ विश्रांतीचे मूळ पीठ आहे .सद्गुरुंजवळ आल्यावर संपूर्ण विश्रांती मिळते .ज्ञानाच्या चर्चांना तेथे विश्रांती मिळते कारण सद्गुरू सर्व संशयाचे निरसन करतात .
जें पूर्वीचे ही पूर्व | जे आदि मध्य भरीव |
अवसान त्रिपुटी सर्व | आपणचि असे || ३ ||
कारण सद्गुरू पूर्वी ही होते ,आदी मध्य भरीव आहे म्हणजे जे पूर्वी होते ,आता आहे ,नंतर ही असणार आहे ,सर्व त्रिपुटी सद्गुरुच आहेत .सर्व काही तेच आहेत .
जे असेना नसे वर्म | जे कळेना न कळे  भ्रम |
गेलीयाने अंतर्याम | ठाउके पडे || ४ ||


जे कळत नाही ,जो भ्रम नाही ,जे प्रत्यक्ष दिसत नाही ,पण आहे ,त्याचे ते नक्की कसे समजेल याचे वर्म काय आहे ते कळत नाही .पण अंतर्यामी गेले की ठाऊक होते असे समर्थ म्हणतात .अंतर्यामी कसे जायचे ? ते कळत नाही ,आणि अंतर्यामी जायचे म्हणजे काय ते कळत नाही .
जे येक ना अनेक | जे तर्के ना अतर्क्य |
अनिर्वाच्य येकयेक | गुह्य गुज || ५ ||
जे एक नाही ,अनेकही नाही ,ज्याचा तर्क करता येत नाही ,जे अतर्क्य ही नाही ,ज्याचे वर्णन ही करता येत नाही असे ते गुह्य म्हणजे गुप्त आहे .गुप्त गोष्ट आहे .
असो ऐसिया सद्गुरू | वर्णू नेणे काय करू |
स्तुती करता विसरू | माझा मज पडे || ६ ||
अशा सद्गुरू चे वर्णन मी कसे करू ? मी त्याची स्तुती करायला गेलो माझा मलाच विसर पडतो .
आपुलेन विसरलेपणे | विसरल्याचेनि विस्मरणे |
तेणे गुणे हे बोलणे | अबध्द माझे || ७ ||
आपल्या विसरले पणाची भावना ही विसरून जाते .कारण माझा मी राहतच नाही .मी सद्गुरुंशी एकरूप होतो त्यामुळे माझे बोलणेही माझे रहात नाही .
असो आता पूर्वीचे समासी | स्वप्न पडिले अजन्मासी |
तये निरुपणे रिघायासी | मार्ग फुटेना || ८ ||
आधीच्या समासात अजन्माला स्वप्न पाडले होते ,त्यांचा अर्थ काय हे समजत नाही .त्याचे निरुपण कसे करायचे ते समजत नाही
म्हणोनि ते निरुपण | केले चि करावे श्रवण |
तेथील जे कां खूण | ते सांगिजो जी स्वामी || ९ ||
म्हणून स्वामी आपण ते निरुपण केले होते तरी ते पून्हा करावे .ते पून्हा आम्ही श्रवण करावे .त्याची खूण आम्हास पून्हा सांगावी. 
अजन्मा तो  सांग कवण | तेणे कैसे देखिले स्वप्न |
तेथे कैसे समाधान | ते प्रगट कीजो जी || १० ||
अजन्मा कोण आहे ? त्याने कोणते स्वप्न पाहिले ? ते कळल्याने कोणते समाधान मिळणार आहे ते कृपा करून सांगा .
जाणोनी शिष्याचा आदर | स्वामी बोलती प्रत्योत्तर |
तेचि आता अति तत्पर | श्रोते येथे परिसावे || ११ ||
शिष्याचा गुरु प्रति असलेला आदर पाहून स्वामी उत्तर देते झाले ते आता तत्परते श्रवण करावे .
ऐक गा शिष्या सावधान | अजन्मा तो तू तूचि जाण |
तुवां देखिले स्वप्नी स्वप्न | ते मी आता सांगेन || १२ ||


हे शिष्या सावधान होऊन ऐक . अजन्मा तूच आहेस .तूच स्वप्नात स्वप्न पाहिले आहेस .ते आता मी तुला सांगतो .
स्वप्नी स्वप्नाचा विचार | तो तू जाण हा संसार |
येथे तुवा सारासार  | विचार केला || १३ ||
स्वप्नात स्वप्नाचा विचार म्हणजे हा संसार आहे .तू येथे सारासार विचार केला आहेस .
रिघूनी सद्गुरुसी शरण | काढूनी शुध्द निरुपण |
याची करिसी उण खूण | प्रत्यक्ष आता || १४ ||
सारासार विचार असा केला आहेस की तू सद्गुरुंना शरण आला आहेस .तू ऐकलेल्या या शुध्द निरुपणातून तू तुझी खूण पटवून घे .
याचा घेता अनुभव | बोलणे तितुके होते वाव |
निवांत विश्रांतीचा ठाव | हे तू जाण जागृती || १५ ||.
या शुध्द निरूपणात सांगितलेल्या गोष्टींचा तू अनुभव घेशील तर तुझे बोलणे खुंटून जाईल .तू विश्रांती चे सुख अनुभवशील .सुख समाधानाचा अनुभव घेशील .तीच तुझी जागृती आहे असे समज .
ज्ञानगोष्टींचा गलबला | सरोनी अर्थ प्रगटला |
त्यांचा विचार घेता आला | अंतरी अनुभव || १६ ||
हे सुख तू कसे अनुभवशील ? तुझ्या मनात आत्ता पर्यंत अनेक शंका होत्या ,त्या शंका फिटतील आणि खरे शुध्द ज्ञान तुझ्यात प्रगट होईल आणि मग तुला सुखाचा अनुभव घेता येईल .
तुज वाटे हे जागृती | मज आली अनुभवाप्रती |
या नाव स्वप्न भ्रांती | फिटलीच नाही || १७ ||
मग तुला वाटेल मला जागृती आली .मला अनुभव आला .पण हा स्वप्नातला भ्रम आहे .हा भ्रम अजून संपला नाही .
अनुभव अनुभवी विराला | अनुभवेवीण अनुभव आला |
हा हि स्वप्नाचा चेईला | नाहीसा बापा || १८ ||
अनुभव अनुभवात विरून गेला .मग अनुभवाशिवाय अनुभव आला .स्वप्नातून जागा झालास .स्वप्न नाहीसे झाले .
जागृती या पैलीकडे | ते सांगणे केवी घडे |
जेथे हे सकळ मोडे | मोडलेपणेसी || १९ ||
स्वप्न नाहीसे झाले .तू जागा झालास .जागृती या पलीकडे आहे हे सांगायचे केव्हा होईल ? जेव्हा सगळे मोडेल तेव्हा म्हणजे तुझे सर्व अनुभव विरतील तेव्हा
जागा जालिया स्वप्नउर्मी | स्वप्न म्हणसी अजन्मा तो मी |
ते उर्मी गेलिया वर्मी | वर्मची अवघे || २० ||


स्वप्नाच्या उर्मीतून जागा झाला .स्वप्नात म्हणत होता मी अजन्मा आहे .स्वप्नाची उर्मी म्हणजे उमाळा गेला की सर्व वर्म म्हणजे रहस्य च तुला कळेल .
शिष्या अंती मति सा गती |ऐसे सर्वत्र बोलती |
तुझा अंती तुझी प्राप्ती | तुज चि जाली || २१ ||
शिष्या असे सर्वत्र म्हणतात की शरीर त्यागण्याच्या वेळेस जेथे वासना असते ती गती प्राप्त होते जसे जड भारताला मृत्यूसमयी हरीण बालकाची काळजी होती त्यामुळे त्याला पुढचा जन्म त्याला हरिणाचा मिळाला ..तुला तू मिळालास म्हणजे तुझे आत्मस्वरूप तुला प्राप्त झाले .
जो चवदेहाचा अंत |जन्म मुळाचा प्रांत |
अंतप्रान्तासी अलिप्त | तो तू आत्मा || २२ ||
चार देहांचा अंत झाला .स्थूळ ,सूक्ष्म कारण आणि महाकारण या माणसाच्या देहाच्या चार अवस्था असतात .या चार देहांचा अंत झाला .जन्म आणि मृत्यू या दोनही गोष्टी मानवी देहासाठी अपरिहार्य आहेत .जेव्हा साधकाला शुध्द ज्ञान होते ,मी म्हणजे शरीर नाही तर मी म्हणजे आत्मा आहे याचा अनुभव येतो तेव्हा जन्म मृत्यू च्या फे-यातून त्याची सुटका होते .कारण मी म्हणजे आत्मा आहे असा बोध होतो आणि आत्म्याला जन्म मृत्यूचे बंधन नसते .
जयासी ऐसी आहे मती | तयासी अंती आत्मगती |
गती आणि अवगती |वेगळाची तो || २३ ||
मी आत्मा आहे असा बोध होतो तेव्हा तो आत्मस्वरूप होऊन जातो .गती आणि अवगती असणारा आत्मा वेगळाच असतो
मति खुंटली वेदाची | तेथे गती आणि अवगती कैची |
येणे विवेके प्राणीयाची | भ्रांती फिटे श्रवणे || २४ ||
मग ती अवस्था वेद ही वर्णन करू शकत नाहीत .त्या अवस्थेत गती आणि अवगती दोन्ही नसते . मग अशा वेळेस प्राण्याची म्हणजे साधकाची श्रवणाने भ्रांती म्हणजे भ्रम नाहीसा होतो .
मिथ्या जीवित्व या नाव भ्रांती | भ्रांति फिटता आत्मप्रचीती |
प्राणी पावला उत्तम गती | सद्गुरू बोधे || २५ ||
येथे समर्थांनी भ्रांतीची व्याख्या केली आहे .ते म्हणतात की सामान्य माणसे जी अज्ञानात जीवन जगात असतात ,देहबुद्धीने जीवन जगात असतात ती भ्रांती म्हणजे भ्रम असतो .तो भ्रम नाहीसा झाला की आत्मप्रचीती येते .आत्मप्रचीती सद्गुरू बोध करतात आणि येते .मग त्या प्राण्याला उत्तम गती मिळाली असे म्हटले जाते .
सद्गुरू बोध जेव्हा जाला | चौदेहाचा अंत जाला |
तेणे निजध्यास लागला | स्वस्वरुपी || २६ || 


सद्गुरू बोध होतो ,सद्गुरू अनुग्रह देतात ,उपदेश करतात ,शिष्य तयारी चा असेल तर स्थूळ ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण या चार ही देहांचा अंत होतो .देहबुद्धी चा नाश होतो .मग स्वस्वरूपाचा निदिध्यास लागतो .सतत स्वस्वरुपाचेच चिंतन चालू राहते .
तेणे निजध्यासे प्राणी | ध्येय चि जाला निर्वाणी |
सायोज्य मुक्तीचा धणी | होऊन बैसला ||  २७ ||
स्वस्वरूपाचा निदिध्यास लागला की सायोज्यमुक्ती जे त्याचे ध्येय आहे ते ध्येय तो प्राप्त करून घेतो .सायोज्य मुक्ती ही चौथी मुक्ती आहे .स्वलोकता , समीपता  सरूपता , आणि सायोज्यता अशा चार मुक्ती आहेत .पहिल्या तीन मुक्ती नाशिवंत ,न टिकणा-या आहेत पण सायोज्यता मात्र टिकणारी आहे .शाश्वत आहे .अशा शाश्वत मुक्तीचा धणी साधक होतो .
दृश्य पदार्थ वोसरता | अवघा आत्माची तत्वता |
नेहटून विचारे पाहतां | दृश्य मुळीच नाही || २८ ||
दृश्य म्हणजे दिसणारे पदार्थ मिथ्या आहेत ,नाशिवंत आहेत ,परिवर्तनशील आहेत हे मनापासून पटले की सर्वत्र आत्मरूपच भरून राहिले आहे असे प्रत्ययाला येते .जसे गोपींना सर्वत्र कृष्णच दिसत होता .दृश्य विश्व खरे नाही हे प्रत्ययाला येते .
मिथ्या मिथ्यत्वे पाहिले | मिथ्यापणे अनुभवा आले |
श्रोती पाहिजे ऐकिले | या नाव मोक्ष || २९ ||
दृश्य विश्व जे मिथ्या आहे खोटे आहे ,ते मिथ्यत्वाने पाहिले म्हणजे साक्षित्वाने पाहिले ,त्यांचा अनुभव घेतला तेव्हा त्याला मोक्ष असे म्हणतात असे श्रोत्यांनी ऐकावे असे समर्थ सांगतात .
सद्गुरूवचन हृदयी धरी | तो चि मोक्षाचा अधिकारी |
श्रवणमनन केलेची करी | अत्यादरे || ३० ||
जो सद्गुरू वचन हृदयाशी धरून ठेवतो म्हणजे सद्गुरू वचनावर पूर्ण विश्वास ठेवतो ,सद्गुरुंची आज्ञा तंतोतंत पाळतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो .पण त्याला अतिशय आदराने श्रवण मनन करावे लागते श्रवण मनन पून्हा पून्हा कर असे समर्थ सांगत आहेत .
जेथे आटले दोनी पक्ष | तेथे ल्क्ष ना अलक्ष |
या नाव जाणिजे मोक्ष | नेमस्त श्रोती || ३१ ||
जेथे दोन्ही पक्ष आटतात म्हणजे जेथे पूर्वपक्ष मी देह हा असतो ,आणि मी आत्मा आहे हा उत्तर पक्ष असतो तेव्हा मी देह आहे हा पूर्व पक्ष नाहीसा होतो ,पुढे जाऊन मी आत्मा आहे स्वस्वरूप आहे हा सुध्दा पक्ष मावळतो ,मीपणा संपूर्ण संपतो आणि मी पणा स्वस्वरुपात लीन होतो तेव्हा मोक्ष प्राप्ती होते ही गोष्ट श्रोत्यांनी लक्षात घ्यावी .
जेथे ध्यानधारणा सरे | तेथे मनाची हाव पुरे |
अवघा रामची उरे | आनंदरूप || ३२ ||


मोक्षप्राप्ती झाली की ध्यान धारणेची गरज उरत नाही .मनाला कोणतीही हाव उरत नाही .मग फक्त आनंदरूप असणारा रामच उरतो .
भवमृगजळ आटले | लटिके बंधन तुटले |
अजन्म्यासी मुक्त केले | जन्मदु:खापासूनि || ३३ ||
संसार रुपी मृगजळ आटले .जशी सूर्य किरणांच्या प्रखरते मुळे जमिनीवर पाण्याचा भास होतो त्याप्रमाणे हे दृश्य विश्व आणि त्यामध्ये वावरणारे सर्व प्राणी हे भास आहेत ,खोटे आहेत हे कळते ,आपण ज्या मुले ,बायको ,घर ,संसार या सर्व खोट्या बंधनात बांधलेले असतो त्यातून सुटतो . मग जो अजन्मा आहे त्याला जन्म दु:खां पासून मुक्त केले जाते म्हणजे जन्म मृत्युची येरझारा संपते .
लटीकेची परी दृढ होते | भयं फिटले अद्वैत मते |
काळें ग्रासिली पंचभूते | आपणेसीं || ३४ ||
काळ पंचभूतांना ग्रासतो ,खाऊन टाकतो ,त्यांचा नाश  करतो पण या लटक्या गोष्टींचे पंच महाभूतांचे भयं नाहीसे होते .सर्वत्र परब्रह्म भरून आहे ,त्याच्या शिवाय एकाही ठिकाणी अशी एकही जागा नाही की जेथे परब्रह्म नाही मोक्ष प्राप्ती नंतर साधकाला अनुभव येतो की तोच सर्वत्र भरलेला आहे ,मग कोणाचे भयं वाटणार ? 
प्रारब्धी टाकला देहो | बोधे फिटला संदेहो |
आताचि पडो अथवा राहो |मिथ्या कलेवर || ३५ ||
गुरुबोध झालेला असा भयं रहित ,निर्भय झालेला ,मोक्ष मिळवलेला साधक देहाच्या बाबतीत उदासीन होतो .देह आत्ता पडला काय की नंतर पडला काय कारण हे कलेवर म्हणजे देह मिथ्याच खोटाच ,नश्वर .तो केव्हातरी पडणारच मग केव्हाही पडो. प्रारब्ध असेल तितके दिवस राहील असा विचार करतो .
ज्ञानीयाचे जे शरीर | ते मिथ्यत्वे निर्विकार |
म्हणोनि जेथे पडे तेचि सार | पुण्यभूमी || ३६ ||
ज्ञानी माणसाचे शरीरा बद्दल ज्ञानी माणसाला आसक्ती नसते ,ते शरीरा बद्दल निर्विकार असतात .देहबुद्धी संपूर्ण नाहीशी झालेली असल्यामुळे त्यांचे शरीर कोठेही पडले तरी त्यांना त्याची पर्वा नसते .जसे संत कबीर काशीत असून ते मृत्यू समयी मगहर ला  गेले .
साधुदर्शने पावन तीर्थ | पुरती त्याचे मनोरथ |
साधू न येता जिणे व्यर्थ | तया पुण्यक्षेत्राचे || ३७ ||
साधू चे दर्शन झाले की पवित्र तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेण्याचे पुण्य मिळते .साधू दर्शनाने मनोरथ पूर्ण होतात .जर एखाद्या तीर्थक्षेत्रावर साधू आला नाही तर त्या पुण्य क्षेत्री जाऊनही फायदा नाही .
पुण्य नदीचे जे तीर | तेथे पडावे शरीर |
हा इतरांचा विचार | साधू तो नित्यमुक्त || ३८ ||
उत्तरायण ते उत्तम | दक्षिणायंन ते अधम |
हा संदेही वसे भ्रम | साधू तो नि:संदेही || ३९ ||
देह्याचा अंत भला झाला | देहो सुखरूप गेला |
त्यासी म्हणती महा भला | पुण्यपुरुष || ४० ||
सामान्य माणसाच्या दृष्टीने कोणता मृत्यू चांगला आणि कोणता वाईट याचे सुंदर विवेचन समर्थांनी दासबोधात दशक ७ समास दहा देहांत निरुपण या समासात केले आहे .त्यातील काही ओव्या येथे घेतल्या आहेत .पुण्य नदीच्या काठी ,उत्तरायण शुक्ल पक्ष ,घरात दिवा जळत असताना मरण आले तर चांगले ,दक्षिणायनात ,वद्य पक्षात मरण आले तर ते वाईट असा समाज आहे . साधूं च्या मनात अशा शंका कधी येत नाहीत कारण साधू नित्य मुक्त असतो .देहाला फारसे कष्ट न होता मृत्यू आला तर तो भला माणूस पुण्यवान माणूस समजला जातो .पण साधूची गोष्टच वेगळी असते .त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झालेली असल्याने देह कुठेही कसाही पडला तरी त्याला फारसा फरक पडत नाही .
पुढे हे चि निरुपण | देह अहंभाव खंडन |
जीवन्मुक्ताची खूण | निरोपिजेल || ४१ ||
इति श्री रामदास ग्रंथ |पुढे वोगरिल परमार्थ |
साधूदर्शनाचा पुण्यार्थ | परिसोत श्रोते || ४२ ||
आता पुढे हेच निरुपण चालू राहील .देहाचा अहंभाव कसा नाहीसा करायचा ते सांगेन .जीवन्मुक्त कसा ओळखायचा ते ही सांगेन .रामदासांनी लिहिलेला हा ग्रंथ पुढे परमार्थ सांगेल .साधू दर्शनाचे पुण्य घेण्या साठी श्रोत्यांनी हा ग्रंथ ऐकावा .