सोमवार, 23 जून 2014

आदिशक्ती

आदिशक्ती
कुमारी शारदा देवी | सुंदरा गायनी कळा |
हंसासनी चतुर्भुजा | वीणा पुस्तक नेटके || १ ||
ब्रह्मी जाली जगजोती | ब्रह्मसुता म्हणोनिया |
ब्रह्मसुता वेदमाता | वेद तेथून जाहाले || २ ||
जाणीव म्हणजे देव्या | जाणता देव बोलिजे |
सीवशक्ती रत्नजोती | वेगळी करितां न ये || ३ ||
सीवशक्ती बहुरूपा | नामरूपी विलासते |
दिसते नासते काया | माया ते अंतरी वसे || ४ ||
ब्रह्मांडीची मूळमाया | पींडीची जाणिजे परा |
परा ते मूळमाया ते | वेदमाता म्हणोनिया ||  ५ ||

कुमारी शारदा देवीची गायनी कळा आहे . हंसावर आरूढ असलेली चतुर्भुज असणारी नेटके पणे वीणा पुस्तक धारण करणारी शारदा आहे ब्रह्मा मध्ये एको हं बहुस्याम हे झालेले प्रथम स्फुरण म्हणजे मूळमाया .ह्या मूळमायेची दोन अंगे .एक शक्ती रूप वं एक जाणीव रूप .शारदा शक्तिरूप आहे ,म्हणजेच जगज्जोती आहे .ती ब्रह्मा पासून झालेली म्हणून ब्रह्मसुता आहे .वेद तिच्यापासून निर्माण झाले म्हणून वेदमाता आहे .जाणीव म्हणजे देवता आहे,शारदा आहे .जाणीव रूप म्हणजे जाणता देव आहे म्हणजे गणेश आहे .
आपले सगळे देव शक्ती वं जाणीव रूपातच असतात .शिव आणि शक्ती रत्न आणि ज्योती हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही .शिव शक्ती अनेक रूपात ,अनेक नामात दिसते .काया शरीर दिसते ,नाश पावते .माया मात्र मनात असते .ब्रह्मांडात जशी मूळमाया ,तशी पिंडात परा वाणी .परा वाणी आणि मूळमाया एकच ! कारण ती वेदमाता आहे .



२८ आदिशक्ती
मायची माय तीची हि | जन्ननी मात्रु जन्ननी |
माता माता तीची माता | वोली हे लांबली बहू || १ ||
माया माया बहु माया | मूळमाया मुळी असे |
जगाची मुळीची माता | जगन्माता म्हणोनिया || २ ||
त्रैलोकी समस्तां माता | आंडजारजादिका |
सर्वांच्या लांबल्या वोळी | पाहो जातां मुळाकडे || ३ ||
जगन्माता जगत्पिता | सीवशक्तीच जाणिजे |
शक्ती ते शक्ती जाणावी | सीवशक्ती सदा वसे || ४ ||
शक्ती दोहीकडे आहे | सामर्थ्य याच कारणे |
त्रैलोकी सर्वही देहे | शक्तीवीण अशक्त ते || ५ ||
सर्वांची पाळिली कुळे | कुळदेव्या म्हणोनिया |
दासांची शक्ती दासाला | बोलिली कृपाळू पणे || ६ ||


तुळजा भवानी आईची आई आहे .जननी आहे .माता आहे .ही यादी खोप वाढेल .माया आहे मूळ माया सर्वात आधी आहे .ती जगाची खरोखरच माता आहे .ती जगन्माता आहे .अंडज ,जारज यांची ती माता आहे .आपण जर मूळ पहायला गेलो तर असे लक्षात येते की तीच जगन्माता ,जगत्पिता आहे .तीच शिवशक्ती आहे .त्या शक्तीला ओळखायला हवे .सामर्थ्य या शक्ती मुळेच मिळते . त्रेलोक्यातले सर्व देह शक्ती शिवाय अशक्त होतात .त्यासाठी भवानी ला ओळखायला हवे .तिने सर्व कुळांना कुलदेवी म्हणून सांभाळले आहे .दासांची शक्ती आहे .असे कृपाळू पणे बोलवते .




आदिशक्ती

आदिशक्ती
वसे मुख्य नेत्री तथा शब्द श्रोत्री |
सदा सर्व गात्री दिसे प्राणीमात्री ||
पहा एकतंत्री फिरे देह्यत्री |
जगज्योती हिंडे कुपात्री सुपात्री || १ ||
पहा तर्कशास्त्री पहा न्यायशास्त्री |
पहा शिल्पीशास्त्री पहा सर्व शास्त्री |
पहा मंत्रयंत्री पहा सूत्रमात्री |
पहा मूळमंत्री अरत्री परत्री || २ ||
पहा वेदशास्त्री पहा शास्त्रमात्री |
पहा कीर्तिमात्री पहा काव्यमात्री ||
पहा ग्रंथमात्री पहा लोकमात्री |
पहा शब्दमात्री सुचीत्री विचीत्री || ३ ||
कुवर्नी सुवर्णी पहा वर्णवर्णी |
आकर्णि विकार्नी च कर्णोपकर्णी |
कितीयेक धरणी किती वृक्षपर्णी |
बहु जीव ते दाटले व्योमतरणी || ४ ||
समस्तांसी कर्णे समस्तांसी धरणे |
समस्तांसी हर्णे समस्तां विवर्णे |
जगज्जोतीने राखिले आपणासी |
म्हणे दास हे सौख्यरासी विलासी || ५ ||
आदिशक्तीच डोळ्यात राहून आपल्याला दृष्टी देते .कानात राहून ऐकू येते .प्रत्येक प्राण्याच्या प्रत्येक गात्रात तीच असते .प्रत्येक प्राणीमात्रात तीच असते .ती तिच्या इच्छेने सर्वत्र संचार करते .सर्व देहांमध्ये फिरते .ही जगज्जोती सर्वत्र आहे .
ती तर्कशास्त्रात आहे ,न्यायशास्त्रात आहे .शिल्पशास्त्रात आहे ,सर्व शास्त्रात आहे .तुम्ही तिला मंत्रात यंत्रात ,सूत्रात मूळ मंत्रात अरत्र इहलोकात परलोकात पहा .वेद्शास्त्रात शास्त्रात कीर्तित काव्यात ग्रंथात लोकात शब्दात सुचीत्रात पहा .चित्र विचित्र शब्दात पहा .सुवर्णात कुवर्नात पहा .वेगवेगळ्या वर्णात तिला पहा .कानापर्यंत कानापलीकडे जमिनीवर वृक्षाकडे पहा असंख्य जीव या अंतराळात धरतीवर आहेत . सगळ्यांना कान आहेत सगळ्यांना धारण करते सगळ्यांना विवरण करते ,जगज्जोती स्वत:ला राखते दास म्हणतात म्हणजे समर्थ म्हणतात की हा दास सौख्य राशीत आनंदात आहे .

२६ आदिशक्ती

जगदात्मा जगदेश्वरी | परमात्मा परमेश्वरी |
उमा लक्ष्मी गाईत्री | सावित्री ते ईंद्रायीणी ||१ ||
अहिल्या द्रौपदी सीता | तारा मंदोदरी दरी |
दमंती दुसरी तारा | गंगा भागीरथी उखा || २ ||
नाना प्रकृतीची नामे | पुलोमा रेणुका उखा |
स्वर्गस्ता किनारी कोपी | गन्धर्वी गायनी कळा || ३ ||
देव रुसी मुनी योगी | ज्ञानीभक्त बहुविधा |
नारदू तुंबरादिक | धृव प्रल्हाद आंबॠषी || ४ ||
उपमन्या अन्य नामे | भक्त मुक्त माहां तपी |
सर्व संग परीत्यागी | आगमी अघोरी हटी || ५ ||
दंडधारी जटाधारी | आघारी भस्मलेपनी |
विलेपने सुगंधे नाना | अष्टभोग विलासती|| ६ ||
सारंग नौरंग नाना | मानामाने स्वरास्वरे |
ताळ प्रबंदाचे गाणे | नाचणे वाद्य सर्वही || ७ ||
सिद्धची सर्वही आहे | उमा रमा विलसती|
पूजिती तुळजामाता | सदा आनंद गोंधळी || ८ ||
त्रैलोक्य पुजनासाठी | वाढती मोडती किती|
राम वर्दायीनी माता | हे माझी कुलस्वामिनी || ९ ||
पाळितो सर्वही क्षेत्रे | बंधू तो क्षेत्रपाल हा |
विखार चीर्डीले सर्वै | कालसर्प परोपरी || १० ||
आदिशक्ती जगाची आत्मा ,ती जगदेश्वरी आहे ,या जगाची ईश्वरी ,जगाला सांभाळणारी आहे .शंकराची पत्नी उमा ,विष्णू पत्नी लक्ष्मी ,गायत्री ,ब्रहमदेवांची पत्नी सावित्री ,ते ईंद्राची पत्नी ईंद्राणी ही सर्व आदिशाक्तीचीच नावे .
अहिल्या ,द्रौपदी सीता ,तारा मंदोदरी ,गंगा ,भागीरथी ,उखा [उषा ] जी श्रीकृष्णाची नातसून आहे ती सुध्दा आदिशक्तीचीच रूपे आहेत .प्रकृतीची अनेक नावे आहेत .पुलोमा ,रेणुका ,उषा ,स्वर्गातील गंधर्व ,किन्नर ,गायनी कला ,हे सर्व ही आदिशक्तीचीच रूपे आहेत .अनेक देव ऋषी मुनी योगी ज्ञानी भक्त नारद ,तुंबर धृव प्रल्हाद आंबऋषी उपमन्यू अशी अनेक नामे भक्त मुक्त महा तपस्वी ,सर्व संग परित्याग करणारे ,शाक्तपंथीय विद्या ,अघोरी विद्या हट्टी आग्रही दंडधारी ,जटाधारी ,भयंकर दिसणारे ,भस्म विलेपन करणारे ,अनेक सुगंधांनी विलेपन करणारे ,अष्टभोग भोगणारे सर्वच आदिशाक्तीचीच रूपे आहेत . सारंग [संगीतातील एक राग ] नवरंग ,मान माने स्वर ,संगीतातील ताल [ताळ ] ,गीत प्रकार [प्रबंद ] त्याचे गाणे ,नाचणे ,वाद्य ,हे सर्व आदिशाक्तीचेच रूप आहे .सिद्ध सर्व आहे ,उमा ,रमा शोभून दिसतात .ही सर्व आदिशाक्तीचीच रूपे आहेत .हे सर्व तुळजा मातेची पूजा करतात .गोंधळी तर तुळजा मातेचा महिमा सांगताना गोंधळी तर आनंद च वाटतात .त्रैलोक्य पूजनासाठी कितीतरी ब्रह्मांडे वाढतात ,मोडतात .ही माझी रामवरदायिनी माता आहे .ही माझी कुलस्वामिनी आहे .या कुलस्वामिनी चा बंधू जो क्षेत्रपाल आहे ,तो सर्व क्षेत्रांचे पालन करतो .[विखार ] विष ,जे कालसर्प सोडतो त्या विषापासून सर्वांचे रक्षण करते .

श्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी

श्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी

सदा आनंदभरित | रंगसाहित्य संगीत || १ ||
जगदात्मा जगदेश्वरी | जगज्जोती जगदोध्दारी || २ ||
जिच्या वैभवाचे लोक | हरिहर ब्रह्मादिक || ३ ||
बहु राजे राजेश्वर | सर्व तुझेची किंकर ||  ४ ||
वसे आकाशी पाताळी | सर्वकाळी तिन्हीताळी || ५ ||
सर्व देह हालविते |  चालविते बोलविते || ६ ||
मूळमाया विस्तारली | सिद्धसाधकांची बोली || ७ ||
शक्ति सर्वांगे व्यापिली | शक्ती गेली काया मेली || ८ ||
होते कोठून उत्पत्ति | भगवति भगवति || ९ ||
सुख तीवाचूनि नाही | न लगे अनुमान काही || १० ||
जाली माता मायराणी | भोग नाही ती वाचुनि || ११ ||
भूमंडळींच्या वनिता | बाळ तारुण्य समस्ता || १२ ||
जगजीवनी मनमोहिनी | जिवलगाची त्रिभुवनी || १३ ||
रूप एकाहुनी एक | रम्य लावण्य नाटक || १४ ||
पाहा एकाची अवयव | भुलविले सकळ जीव || १५ ||
मन नयन चालवी | भगवती जग हालवी || १६ ||
भोग देते भूमंडळी | परि आपण वेगळी || १७ ||
योगी मुनिजन ध्यानी | सर्व लागले चिंतनी || १८ ||
भक्ती मुक्ती युक्ती दाती | आदिशक्ती सहज स्थिती || १९ ||
सतरावी जीवनकळा | सर्व जीवांचा जिव्हाळा || २० ||
मुळी रामवरदायिनी | रामदास ध्यातो मनी || २१ ||

नेहमी आनंदमय असणारी ,आनंद निर्माण करणारे साहित्य निर्माण करणारी ,परमेश्वरी जगाची ईश्वरी असणारी ,जगज्जोती आहे म्हणजे जगाला चालवणारी ,जगाला प्रकाश देणारी आहे .मूळमायेतील विकार म्हणजे जगज्जोती .ती मोठी विलक्षण आहे .सर्व जीवांच्या अंतर्यामी राहून सर्वांना चालवणारी आहे .तिला शुध्द सत्वगुण किंवा ज्ञानकला म्हणतात .ती जगाचा उध्दार करणारी आहे .मूळमायेत विकार होतो आणि त्रिगुण निर्माण होतात .त्या त्रिगुणांचे स्वामी ब्रह्मा ,विष्णू ,महेश निर्माण होतात म्हणजेच जगज्जोतीच हरी हरांना निर्माण करते .अनेक राजे राजेश्वर हे तिचीच निर्मिती आहेत .कारण जगज्जोती म्हणजेच अंतरात्मा आहे .अंतरात्मा स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये आहे .जली स्थळी काष्ठी पाषाणी आहे .सर्व काळी आहे .तीनही काळी म्हणजे भूतकाळ ,वर्तमानकाळ ,भविष्यकाळात ही आहे .तीच भवानी आहे .तीच सर्व देहांना चालवते ,बोलावते ,हालवते .मूळमाया विकारते ,विस्तार पावते ,तेव्हा शारदेच्या रुपाने सिद्ध साधकांची ती बोली होते .ती प्रत्येकात शक्ती रुपाने प्रत्येकात असते .देहातील शक्ती संपली की तो देह पडतो ,मृत्यू पावतो .या भगवती ची उत्पत्ती कोठून होते कोण जाणे ,पण तिच्या शिवाय सुख मिळत नाही .भवानीच मायाराणी आहे .तिच्या शिवाय भोग भोगता येत नाही .या पृथ्वी वरील स्त्रिया लहान ,तरूण आणि सर्व स्त्रिया या तिचीच रूपे आहेत .जगजीवनात या त्रिभुवनात ती जिवलगाची मनमोहिनी आहे . या स्त्रिया एकाहून एक रूपात ,लावण्यात सरस आहेत नाटकी आहेत .त्यांचे एकेक अवयव पाहून सगळे जीव हालवले जातात ,विचलीत होतात डोळ्याच्या मोहक हालचाली करून जशी स्त्री भुलवते त्याप्रमाणे भगवती नयन हालवते वं जग हालवते .या भूमंडळावर ती सुख दु:ख देते पण सर्वांपासून ती वेगळी राहते , योगी ,मुनी सर्व जण ध्यानात तिचेच ध्यान करतात .भक्ती ,मुक्ती ,ज्ञाती तीच आहे .आदिशक्तीची ही सहजस्थिती आहे .ती सतरावी जीवन कला आहे .पांच कर्मेंद्रिय ,५ ज्ञानेंद्रिय पंच प्राण ,मन ही जीवनविषयक १६ कला आहेत .त्यांच्या सहाय्याने आपण जीवन जगत असतो .तशी भवानी माता म्हणजेच शारदा सत्रावी जीवनकळा मानली आहे ..ती सर्व जीवांची जिव्हाळा आहे .तीच राम वरदायिनी आहे .तिचेच रामदास ध्यान करतो                                                              






रविवार, 22 जून 2014

भवानी स्तुती

व्याघ्र चोर भुजंगाचे | भय अत्यंत वाटते | 
संकटी पावते माता | भवानी भयनाशिनी || १ ||
भूतप्रेत समंधादी | देवतें बहुतांपरी |
अंतरी चिंतिते माता | भवानी भयनाशिनी || २ ||
गुप्त उद्वेग चिंतेचा | अंतरी कातरा |
ते काळी आठवावी ते | भवानी भयनाशिनी || ३ ||
संसारी वर्तता धोके | वाटती बहुतांपरी |
दयाळू आठवा ध्यानी | भवानी भयनाशिनी || ४ ||
दयेने पुर्विले सर्वे | दासाची मनकामना |
प्रचीती रोकडी आतां | भवानी भयनाशिनी ||  ४ ||

वाघ ,चोर आणि सापाचे अत्यंत भय वाटते ..या भयापासून सुटका होण्यासाठी, संकटातून सुटका होण्यासाठी भवानी मदत करते .संकटांचा नाश करते .भूत ,प्रेत संमंध अशा अनेक देवता आहेत .मनात मातेचे चिंतन केले तर भवानी भयाचा नाश करते .गुप्त चिंता उद्वेग मनात कातरा येतो .भयं वाटते .अशा वेळेस भवानी आठवली तर भयाचा नाश भवानी करते .संसारात धोके खूप असतात तेव्हा दयाळू असणा-या भवानीला आठवा .कारण भवानी भयाचा नाश करते .भवानी दयाळू आहे म्हणून तिने  या दासाची ,म्हणजे समर्थ रामदासांची मनकामना पुरवली आहे .याची रोकडी प्रचीती आली आहे .



भवानी स्तवन

भवानी स्तवन
माय तू बाप तू बंधू | गणगोत समस्तही |
तुजवीण मजला नाही | भवानी भक्त वछले || १ ||
विदेशी येकला आहे | तुजवीण निराश्रयो |
दयेने सर्व सांभाळी | भवानी भक्त वछले || २ ||
संकटे वारिली नाना | वाढविले परोपरी |
नेणतां चुकलो तुला | भवानी भक्तवछले || ३ ||
इछिले पुर्विले सर्वै | कामना मनकामना |
संकटी रक्षिले माते | भवानी भक्तवछले || ४ ||
वास मी पाहतो तुझी | दास मी कष्टलो बहू |
आनंदी नांव राखावे | भवानी भक्तवंछळे || ५ ||

तू माझी आई ,माझे वडील ,माझे सगेसोयरे आहेस.तुझ्याशिवाय मला कोणीही नाही .मी दूरदेशात एकटा आहे .तुझ्या शिवाय मला कोणाचाही आश्रय ,आधार नाही .डू माझ्यावर दया कर आणि भक्त वत्सले ,माझा सांभाळ कर .तू माझ्यावर आलेली अनेक संकटांचा नाश केलास .मी तुला न जाणल्या मुळे मला तू समजली नाहीस .तू मला हव्या असणा-या सर्व गोष्टी मला दिल्यास .संकटात माझे रक्षण केलेस .मी तुझी वाट पाहतो .श्रीरामांचा मी दास आहे .मला खूप कष्ट झाले .आनंदी हे नाव तू राखावेस .हे भवानी तू भक्त वत्सल आहेस .माझी मनोकामना पूर्ण कर