शनिवार, 30 जून 2012

समर्थ वेण्णाबाई संवाद


समर्थ वेण्णाबाई संवाद
नमू वागेश्वरी शारदा सुंदरी |
श्रोता प्रश्न करी वक्तयासी ||१||
वक्तयासी पुसे जीव हा कवण |
शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||२||
सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |
बोलिजे अनात्मा तपो कवण ||३||
कवण प्रपंच कोणे केला संच |
मागुता विसंच कोण करी ||४||
कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या |
कैसे आहे आद्याचे स्वरूप ||५||
स्वरूप ते माय कैची मूळमाया |
ईस चाळावया कोण आहे ||६||
आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |
समाधान अन्य ते कवण ||७||
कवण जन्मला कोणा मृत्यू आला |
बध्द जाला तो कवण ||८||
कवण जाणता कोणाची ही सत्ता |
मोक्ष हा तत्वता कोण सांगा ||९||
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |
पंचवीस  प्रेष्ण ऐसे केले ||१०||
वरील २५ प्रश्न वेण्णाबाईंनी समर्थांना विचारले व त्यांची उत्तरे समर्थांनी दिली टी अशी :
नमू वेदमाता नामू त्या अनंता  |
प्रश्न सांगो आता श्रोतयाचे ||१||
श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान |
जया सर्व ज्ञान तोचि शिव  ||२||
शिवपार आत्मा त्यापर परमात्मा  |
बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य ||३||
वाच्य हा प्रपंच माईक जाणावा |
घडामोडी देवापासूनिया ||४||




विषय अविद्या त्यालावी ते त्या विद्या |
निर्विकल्प आद्याचे स्वरूप ||५||
कल्पना हे माया तत्व मूळमाया |
यासी चाळाया चैतन्यापरी ||६||
नकार ते शून्य व्यापक चैतन्य |
ईश्वर अनन्य समाधान ||७||
जीव हा जन्मला जीवा मृत्यू  आला |
बद्धमुक्त झाला तोचि जीव ||८||
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता |
मोक्ष हा तत्वता ईश्वरची ||९||
ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण |
हेची ब्रह्मखूण दास म्हणे ||१०|||
दास म्हणे सर्व मायेचे करणे |
मिथ्यारूपे जाणे अनुभवे||११||
सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षू नको गुणवंता अनंता |रघुनायका मागणे हेची आता ||
धीरगंभीर आवाज कानावर पडला आणि वेण्णाबाईला वाटल प्रत्यक्ष मारुतीराय आले आहेत .तिला त्यांची शेपटी दिसली होती .तुंबा भरून दूध मागणा-या समर्थांना दूध मिळाले नाही . दुस-या दिवशी समर्थ पून्हा भिक्षा  मागायला आले ,तेव्हा वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत होत्या .समर्थांनी विचारले ,काय वाचतेस बाळ ? वेण्णा बाई म्हणाल्या ,महाराज एकनाथी भागवत वाचते . समर्थांनी विचारले ,जे वाचतेस ते कळते का ? वेण्णाबाई म्हणाल्या महाराज ,मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात ,पण कोणाला विचारू ?समर्थ म्हणाले ,तुला असलेल्या शंका मला विचार असे समर्थांनी सांगितल्यावर वेण्णाबाईंनी १० कडव्यात २५ प्रश्न विचारले .त्यांचे प्रश्न असे होते .१ जीव कोण ? २ शिवाचे लक्षण कोणते ? ३ आत्मा कसा असतो ? ४ परमात्मा कोण ?५  अनात्मा म्हणजे कोण ? ६ प्रपंच म्हणजे काय ? त्याचे स्वरूप कसे? ७ सृष्टी कोणी केली ? ८ विद्या म्हणजे काय ? ९ अविद्या म्हणजे काय ? १० परब्रह्माचे स्वरूप कसे आहे ? ११ माया कोणती ? १२ समाधानाचे स्वरूप कोणते ?कोण जन्म घेतो ? १३ मृत्यू कोणाला येतो ? १४ बध्द कोण ?१५ मुक्त कोण ? १६ ज्ञानी कोण ? १७ या जगात कोणाची सत्ता चालते ? १८ मोक्ष म्हणजे काय ? १९ सगुण ब्रह्म म्हणजे काय ? २० निर्गुण ब्रह्म म्हणजे काय ? २१ मूळमाया कशी असते ? २२तिच्यावर कोणाचे नियंत्रण कोणाचे  ? २३ शून्य कसे असते ? २४ चैतन्य कसे असते ? २५ समाधान कोणते ?


या २५ प्रश्नांची समर्थांनी उत्तरे दिली 
जीव  म्हणजे अज्ञान ,[जीव देहात रहातो ,तोच चैतन्य ,तेच प्राणतत्व ,तोच परब्रह्माचा अंश रुपाने देहात राहणारा असतो .तो देहबुद्धीने म्हणजे मी देह आहे या बुद्धीने बांधलेला असतो ,त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे भान नसते ,अज्ञानी अवस्थेत असतो ]
शिव म्हणजे शंकर. अविद्यागुणे बोलिजे जीव | माया गुणे बोलिजे शिव | प्रत्येक देहात असणारा आत्मा म्हणजे जीव .तोच आत्मा जेव्हा ब्रह्मांडाला व्यापतो तेव्हा त्याला शिव म्हणतात .जाणीव ,जगज्जोती या नावांनी सुध्दा तो ओळखता येतो त्याला सर्व ज्ञान असते . शिव म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारा ईश्वर ! एकच एक आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलेले आहे असे जाणणे ,अनुभवणे म्हणजे सर्वद्न्यानी होणे ,शिव होणे .
आत्मा परमात्म वस्तूचा विचार करत असताना समर्थ तीन पाय-या सांगतात १ आपल्या देहात वास करणारा आत्मा २ सर्व विश्वात ,चराचरात वास करणारा अंतरात्मा  ३ विश्वाला पुरून उरणारा परमात्मा . तो स्वयंप्रकाशी असतो,शुध्द ,मुक्त असतो .आनंदस्वरूप असतो ,सर्वव्यापी असतो .शरीराला जिवंत ठेवणारी ,ईंद्रीयांना चेतना देणारी , मनोव्यापारांना प्रेरणा देणारी ,बुद्धीला विचार करायला लावणारी ,जीवपणे सुख दु:खे भोगणारी सतरावी जीवनकळा म्हणजे आत्मा .तोच देहात जीव व ब्रह्मांडात शिव म्हणून रहातो .तो साक्षीभावाने रहातो ,सर्व पहातो .
परमात्मा विश्वाला पुरून उरणारा ,विश्व ,ब्रह्मांड पिंड या सर्वांना व्यापून उरणारा ,त्यापलीकडे असणारा तो परमात्मा .तो आदि ,अनंत ,शाश्वत असतो .तेच आपले मूळ स्वरूप .तो निर्विकार ,निरावयव ,निर्गुण असतो .तेथपर्यंत पोहोचणे हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे
अनात्मा हा शब्द येथे परब्रह्म या अर्थाने आला आहे .म्हणून अनात्मा म्हणजे अनिर्वाच्य म्हटले आहे .माया अनादी आहे म्हणजे अनुर्वाच्य आहे .
प्रपंच म्हणजे पाचांच्या समुदायाचे नियंत्रण पंचज्ञानेंद्रीये ,पंचकर्मेंद्रिये ,पंच प्राण पांच विषय ,पांच तन्मात्रा ,अंत;करण पंचक या सर्वांचा समूह ,त्यांचे  केलेले नियंत्रण . हा प्रपंच ही खरा नसतो .तसेच आपण आपल्या कुटुंबाची जी देखभाल करतो , आपले कुटुंब ,व्यवसाय ,घर ,संपत्ती  यालाही आपण प्रपंच म्हणतो . हा प्रपंच माईक असतो ,म्हणजे अशाश्वत असतो .मायेनेच निर्माण होतो .मायेनेच नष्ट होतो .मायाच आपल्याला प्रपंच भोव-यात अडकवते .
सृष्टी कोणी केली ? परब्रह्माला जे स्फुरण झाले ,त्यातून मूळमाया झाली ,त्यातून गुण उत्पन्न झाले ,पंचमहाभूते निर्माण झाली .अष्टधा प्रकृती निर्माण जाहली .सृष्टी निर्माण झाली .

विद्या म्हणजे काय ? अविद्या म्हणजे अज्ञान ,अविद्येनेच पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला खरे वाटते ,म्हणजेच देहबुद्धी .मी म्हणजे देह असे वाटते .पण संत संगतीने जीवाची अविद्या कमी होते .
विद्या म्हणजे ज्ञान .ज्ञान असते आपल्या भोवती असलेल्या सृष्टीचे ,शाश्वत अशाश्वताचे ,जेथे नित्यानित्य विवेक असतो ,सारासार विचार असतो .
प्रपंचात पोट भरण्यासाठी जे ज्ञान उपयोगी पडते त्याला विद्या म्हणतात .
परब्रह्माचे स्वरूप निर्विकल्प असते .तेथे कल्पना पोहोचू शकत  नाही .
माया कोणती ? मूळमाया म्हणजे काय ? तिला कोण चालवते ?
आपल्या मनाला वाटणारे सुख दु:ख ,आपल्या मनात येणारे विचार ,आपल्याला होणारा आनंद ही सगळी माया असते .आपल्या मनात उत्पन्न होणारा काम ,क्रोध ,द्वेष, मत्सर ही सगळी मायेचीच रूपे आहेत .ती शाश्वत नसते .तिचा म्हणजे अज्ञानाचा पडदा असतो .तो रामभक्तीने दूर करता येतो .
मूळमाया म्हणजे परब्र्ह्माचीच शक्ती ती परब्रह्माशीच संलग्न असते .ती वायूरूप असते .तिच्यातूनच त्रिगुण ,पंचमहाभूते निर्माण होतात .अष्टधा प्रकृती निर्माण होते .तीच या विश्वाची उत्पत्ती करते .विश्वाची स्थिती व लय ही तिच्यामुळेच होते .
शून्यावस्था म्हणजे मायेचा निरास .माया खरी नाही हे कळते तेव्हा कांहीच उरत नाही  एखादी गोष्ट झाली की आपल्याला सामाधान होते ,पण ते सांगता येत नाही .जशी साखरेची गोडी सांगता येत नाही ,ती अनुभवावी लागते समाधान अनुभवावे लागते .
समाधान तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली देहबुद्धी सोडून ,मी पणा सोडून देउ ,ईश्वराशी अनन्य होऊ ,तेव्हाच समाधान मिळेल .
जन्म घेणे लागे वासनेच्या अंगी जन्म वासना घेते .जेव्हा माणूस मृत्यू पावतो तेव्हा माणसातली प्राणशक्ती देह सोडते ,त्याबरोबर सूक्ष्म देह शरीर सोडतो .तेव्हा वासना वायुरूपात शरीर सोडते व योग्य वेळेला नवीन शरीर धारण करते
प्रत्येक सगुण ,जे जन्माला आले,निर्माण झाले ते मृत्यू पावते .जो दारा व कांचन यांचा विचार करतो ,देहबुद्धीचा असतो तो बध्द असतो जो देहबुद्धी विसरून मी परमात्मस्वरूप आहे असे जाणतो तो मुक्त असतो .ज्ञानी असतो मुख्यत: श्रीगणेश ,जो त्या श्रीगणेशाशी अनन्य होतो ,त्याच्याशी एकरूप होतो तो ज्ञानी .
या जगात सत्ता चालते ती त्या परब्रह्माची ,म्हणजेच श्रीगणेशाची ,त्याच्या शक्तीची म्हणजे शारदेची .
जन्ममृत्यू पासूनि सुटला |या नाव जाणिजे मोक्ष जाला ||
जेची क्षणी अनुग्रह केला |तेचि क्षणी मोक्ष जाला ||
ज्याची जन्म मृत्यू पासून सुटका होते त्याला मोक्ष मिळाला असे म्हणता येते .ज्या क्षणी सद्गुरू सदशिष्याला अनुग्रह देतात त्या क्षणी मोक्ष मिळतो .
सगुण ब्रह्म म्हणजे श्रीराम ,श्रीकृष्ण या सारख्या देवतांच्या मूर्ती .त्यांच्यामध्ये आपण प्रत्यक्ष देवता शक्तीरूपाने अआहे असे मानतो तेव्हा ते सगुण ब्रह्म आहे अशी आपली भावना असते .पंढरीचा विठोबा आपण सगुण ब्रह्माच्या रूपात मानतो .त्या सगुणाच्या आधारि आपल्याला निर्गुण ब्रह्म प्राप्त करून घ्यायचे असते .निर्गुण जे निर्विकार ,निरावयव आहे ,निराकार आहे कल्पनातीत आहे ..या कल्पनातीतात मिळून जायचे असेल सद्गुरुसेवा ,बुद्धी आत्मबुद्धी कडे वळवणे ,मी कर्ता म्हणण्या ऐवजी राम कर्ता असा निश्चय करणे या गोष्टी कराव्या लागतात