पूर्वी पडला जो अभ्यास | तोचि अंती निजध्यास |
म्हणोनिया सावकास | नित्यनेम करावा ||१६ ||
जयास ठाईचे न सवे | तयासी न लगे सांगावे |
म्हणोनिया नित्यनेम जीवे | विसंबू नये ||१७ ||
नित्यनेम पूर्वी कथिला | पून्हा पाहिजे सांगितला |
जो मागे निरोपिला | तोचि आता ||१८||
येकाग्र करोनिया मन | अंतरी करावे ध्यान |
सर्व सांग पूजाविधान | प्रत्यही करावे ||१९||
नित्य नेमिला जो जप | त्रिकाळ दर्शनी जो साक्षेप |
आदित्य मारुतीचे रूप | अवलोकावे ||२० ||
हरिकथा निरुपण |प्रत्ययी करावे श्रवण |
हे चि जाणावी खूण |नित्यनेमाची ||२१ ||
अशक्त होऊन प्राणी पडे | तेव्हा नित्य नेम न घडे |
तेणे बळेची नेमाकडे |चित्त द्यावे ||२२ ||
नित्य नेमाचा अभ्यास | नेम चुकता कासावीस |
तोचि लागे निजध्यास |अंतसमई ||२३ ||
अहा देव जप राहिला | मारुती नाही देखिला |
प्राणी योगभ्रष्ट जाला |निजध्यासे ||२४ ||
ऐसा नित्यनेम कैवाडे | मन लागे देवाकडे |
अंतकाळी बळेची घडे |निजध्यास ||२५ ||
वाचा खुंटता अंतर पडे | म्हणोनि अंतरीच जप घडे |
स्वामी आधीच सांकडे | फेडीत गेले ||२६ ||
जे वाल्मीकासी आधार |जे शतकोटीचे सार |
उमेसाहित शंकर |जपे जया ||२७||
जेणे धन्य कासीपुरी | प्राणीमात्रासी उद्धरी |
अंतकाळी पृथ्वीवरी |उच्चार ज्याचा ||२८ ||
तेचि अंतरी धरावे | तेणे चि संकटी तरावे |
कैळासनाथे सदाशिवे | उपाव केला ||२९||
तिस-या समासात समर्थांनी नित्यानेमात मानसपूजा ,जप ,ध्यान ,मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन ,हरिकथेचे श्रवण असे प्रकार सांगितले .नित्यनेम करताना सुरवातीला त्यांचा अभ्यास करावा लागतो .अभ्यास करता करता तो निजध्यास होतो .निजध्यासाची पुढची पायरी आहे आत्मसाक्षात्कार ! म्हणून समर्थ सांगतात की नित्यनेम कधीही मोडू नये .
येथे शिष्यांनी पून्हा नित्यनेमा बद्दल विचारले म्हणून समर्थ पून्हा नित्य नेमाबद्दल सांगतात .ते लक्ष देउन ऐका असे सांगतात .
एकाग्र मन करून अंतरात ध्यान करावे .यथासांग पूजा करावी .ज्या जपाचा नेहमीचा नियम आहे तो नेमाने करावा .मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन घ्यावे .हरिकथा निरुपण नेहमी श्रवण करावे .ह्या सर्व गोष्टी नित्य नेमात येतात असे समर्थ सांगतात .
जेव्हा माणूस अशक्त होऊन अंथरुणाला खीळतो ,तेव्हा नित्यनेम होत नाही .तेव्हा नित्यनेमाकडे बळेने लक्ष द्यावे .म्हणजे मानसपूजा करावी ,मनाने सूर्य व मारुतीचे त्रिकाळ दर्शन घ्यावे , जप तोंडाने करता आला नाही ,तर अंतरी जप करावा .म्हणजे नित्य नेम झाला नाही म्हणून कासाविसी येणार नाही .स्वामींच्या कृपेने ह्या सर्व संकटातून साधक पार पडेल .
जे नाम वाल्मिकींचे सार होते ,जे शतकोटी श्लोक असलेल्या रामायणाचे सार होते ,त्या रामनामाचा शंकर सुध्दा उमेसाहित जप करतात .त्याच रामनामाचा जप अंत काळी शंकर काशीक्षेत्रात माणसाच्या कानात सांगून त्यांचा उध्दार करतात .तेच रामनाम समर्थ अंतरी धरायला सांगतात ,कारण तेच रामनाम संकटातून तरून नेते .म्हणून कैलासपती शंकरांनी नाम काशीत मृत्यूमुखी पडणा-या माणसाच्या कानात सांगण्याचा उपाय केला .