शनिवार, 13 जुलाई 2013

tulajaabhavaanee



आदिशक्तीचा लागला लो


लो लो लागला लो | आदिशक्तीचा लागला लो |
अंतरी लो बाहेरी लो | जिकडे तिकडे लागला लो || १ ||
अंडज लो जारज लो | स्वेदज लो उद्भिज लो |
देवा लो दानवा लो | सिद्ध साधका लागला लो || २ ||
दास म्हणे तोचि जाणे | सद्गुरू वचने सुख बाणे || ३||

लो म्हणजे लळा लागला आदिशक्तीचा लळा लागला . आदिशक्ती म्हणजे परब्रह्माची शक्ती .परब्रह्माच्या ठिकाणी जो संकल्प उठला एको हं बहुस्याम | मी एक आहे अनेक व्हावे .तो संकल्प दोन शक्तीनी प्रकट होतो ज्ञान शक्ती व क्रियाशक्ती ती क्रियाशक्ती म्हणजेच आदिशक्ती .अंतरात ,बाहेरील गोष्टीत लळा लागाला . अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणारे , जन्माला येणारे , घामातून निर्माण होणारे ,या सर्व प्रकारच्या प्राण्यांना लळा लागला . देवांना ,दानवांना ,सिद्ध साधक सर्वांना लळा लागला .दास म्हणजे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सद्गुरू वचनांनी सुख मिळते .



ब्रह्मकुमारी शारदा वरदा | ब्रह्मकुमारी शारदा ||धृ ||
साधकाचे अभ्यंतरी | चतुर्विद्या वागेश्वरी || १ ||
स्फुर्तीरूपे प्रकाशली | वाचारूप अनुवादली || २ ||
रामदासी कार्यसिद्धी | चित्ती सहज समाधी || ३ ||

शारदा ब्रह्माच्या स्फुरणाचे म्हणजे मूळमायेचे शक्ती रूप अंग .ती वेदांची आई ,ब्रह्मदेवाची कन्या ,नादाचे जन्मस्थान ,वाणींची स्वामिनी ,वागेश्वरी म्हणजे परा ,पश्यंती ,मध्यमा व वैखरी या चारही वाणींची उगमस्थान असलेली आहे ती स्फूर्ती रुपाने माझ्यामध्ये प्रकाशली ,माझ्यामध्ये वाचेला स्फुरण चढले आणि माझ्याकडून लिहून घेतला गेला . रामदासाचे कार्य सिद्धी ला जाईल रामदास स्वामीनीं हाती घेतलेले जनजागृतीचे ,धर्मसंरक्षण करण्याचे कार्य सिद्धीस गेले .चित्तात सहजसमाधी चे समाधान प्राप्त झाले .सहज समाधी म्हणजे काय ते सांगताना समर्थ म्हणतात :
वस्तू जे का निरोधावी | तेचि सहजसमाधी | जेणे तुटे आधीव्याधी | भवदु:खाची ||  ७-४-४५ ||
असोन माईक उपाधी | तेचि सहजसमाधी | श्रवणे वळावी बुद्धी | निश्चयाची || ११-१-४४ ||
उपाधी शून्य सद्वस्तु स्वत: बनणे म्हणजे सहजसमाधी .या समाधीची प्राप्ती झाली की संसारातील दु:ख देणा-या सर्व आधिव्याधी गळून पडतात .मायामय दृश्याची उपाधी भोवती असूनही निर्गुणाशी अनन्यता टिकून राहिली की सहजसमाधी म्हणतात .अशी सहजसमाधी समर्थांना साधली होती .



रविवार, 7 जुलाई 2013

आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे



आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे
आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे |
सर्व काही हे तुझी करणी रे |
कळो आली तत्व विवरणी रे |
त्रिगुणी हे अवतार मांडणी र्रे |
शक्तिवीण कोणाची काया चाले रे |
शक्तिवीण शरीर कैसे हाले रे |
शक्तिवीण वाचन कोण बोले रे |
शक्तिवीण सकळ थोर जाले रे || १ ||
परा पश्यंती मध्यमा वैखरी रे |
जयाचेनी उठती वाचा चारी रे |
शक्तिवीण बापुडा देहधारी रे |
शक्तिवीण तो कांहीच न करी रे || २ ||
मुळारंभी तयेचा उदो जाला रे |
संत साधू विचारी प्रवर्तली रे |
रात्रंदिवस मायेचा ळो लागला रे |
सदानंदी आनंद मोठा जाला रे || ३  ||
सर्व शक्ती आहे विस्तारली रे |
देव दैत्य उदंड ख्याती जाली रे |
संत साधू विचारी प्रवर्तली रे |
मूलाकडे पाहतां गुप्त जाली रे || ४||
दास म्हणे हे तिचे चि करणे रे |
काही येक चालेना तिजवीण रे |
प्रचीतीने पाहावे निरुपण रे |
लोक व्यर्थ बुडताती मीपणे रे ||५||
हे आदिशक्ती ,तू त्या परब्रह्मा तून उत्पन्न झालेल्या मूळ संकल्पाचे शक्तीमय रूप आहेस ,तूच या सृष्टीची निर्माती ,पालनकर्ती ,संहारककर्ती आहेस .तूच नारायणी ,परमेश्वरी आहेस .तुझ्यातूनच त्रिगुण [सत्व ,रज ,तम ]निर्माण झाले .त्या त्रिगुणांचे स्वामी विष्णू ,ब्रह्मा ,आणि महेश निर्माण केलेस . रजो गुणाचे स्वामी ब्रह्मदेव ,त्यांच्याकडून तू सृष्टी रचना घडवून घेतलीस . भगवान विष्णू जे सत्व गुणांचे स्वामी आहेत ते या सृष्टीचे पालन करतात .महेश म्हणजे शिव प्रलय काळी या सृष्टीचा संहार करतात . तूच तत्वांची स्वामिनी आहेस तुझ्या कृपेनेच तत्व विवरण करता येते साधक तत्वांचा निरास करून शेवटी परम वस्तूची प्राप्ती करवून घेतात .
तू शक्तिरूप आहेस तुझ्यामुळेच ही काया ,हे शरीर चालते ,अनेक क्रिया करते ,तूच या देहाला बोलण्याची शक्ती देतेस ,शक्ती असेल ,म्हणजेच तू असशील तर या देहाचे सार्थक होते .ध्येय गाठता येते .
तूच परा ,पश्यंती ,मध्यमा आणि वैखरी या चार वाचांच्या रूपात या शरीरात वास करतेस .पण तू नसलीस तर हा देह बापुडा ,हीन दीन होतो .तो काहीही करू शकत नाही .त्याला दैन्यवाणे ,पराधीन जिणे जगावे लागते .
परब्र्ह्मात उत्पन्न झालेला मूळ संकल्प म्हणजे मूळमाया .त्या मूळमायेची दोन अंगे ज्ञानरूप व शक्तिरूप .तू शक्तिरूप अंग .तुझ्यातूनच सत्व ,रज तम हे त्रिगुण निर्माण झाले तामोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते व त्रिगुण या अष्टधा प्रकृतीतून  सृष्टी ची निर्मिती झाली .रात्रंदिवस तुझा ,या शक्तीचा ,मायेचा लळा लागला .तुझे स्वरूप कळल्यामुळे मोठा आनंद झाला .
सर्वत्र तूच विस्तारिली आहेस .तूच सर्व करते आहेस .देव ,दैत्य ,सर्व तुझेच गुणगान गातात .तुलाच मिळवण्याचा प्रयत्न करतात .संत साधूंना तू विचाराने भेटतेस ,पण ते जेव्हा ते मूळ स्वरूपा कडे लीन होतात तेव्हा तू गुप्त झालेली असतेस तू त्या परब्रह्मात विलीन झालेली असतेस .
समर्थ म्हणतात हे सर्व तिचेच करणे आहे .तिच्याशिवाय कोणाचे ही काहीही चालत नाही .तीच सर्व घडवते ,तीच मोडते ,तीच संहार करते .तीच आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी आपल्या कडून घडवते .पण माणसाला मी कर्ता असा अभिमान असतो ,अहंकार असतो .त्यामुळे माणूस वाया जातो