शुक्रवार, 17 सितंबर 2010

सोमवार ची सवायी

धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १
वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २
कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३
भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
शंकरांचे वसतिस्थान जेथे आहे त्या शिखराला कैलास असे म्हणतात .ते पांढ-या स्फटिकांचे शिखर आहे .तेथे शंकर श्रीरामांचे ध्यान करत असतात .सिंहासनावर बसून अत्यंत प्रेमाने गणपतीचे नृत्य पहातात .जो कोणी शंकरांचे नाम घेत असतो ,त्याला शंकर महा वर देऊन पातकांचा संहार करतात .सिंहासनावर बसलेले असताना गिरिजा म्हणजे पार्वती त्यांच्या अंकावर म्हणजे मांडीवर बसलेली शोभून दिसते .कृष्णा ,गोदा आणि भागीरथी या नद्या शंकरांच्या जटेतून निघून पृथ्वी वर लोकांसाठी ,लोकांची तहान भागवण्या साठी आल्या आहेत ,पृथ्वी वरील लोकांना पावन करण्या साठी आल्या आहेत .शंकरांचे भैरवादी समुदाय सतत राम नामाचे नित्य गायन करतात .त्याने सर्व भ्रम नाहीसे होतात .शंकरांच्या पायावर लक्ष ठेवले तर सगळे भ्रम नाहीसे होतात .