मंगलवार, 12 अक्तूबर 2010

शिवथर घळीची सवायी

काय वानू शिवथर ग्रामी । जेथे पातले समर्थ स्वामी ।
स्फुरणा लागी योग्य भूमी । देखोनिया स्थिरावले । । १
सवे लेखकू योगिराज । मायभूमीला चढला साज ।
निर्माण झाले ग्रंथराज । शोभे नामे दासबोध । । २
मनालागी केला बोध । आपला आपण घ्यावा शोध ।
आवरावा काम क्रोध । दीक्षा महान बोलले । । ३
गुरु कृपेचिने जाणे । पुण्य भूमीचे दर्शने ।
उल्हासिल्या अंत :करणे । सीता वंदी पुन : पुन : । । ४
या शिवथर घळीचे महत्त्व काय वर्णन करू ?इथे समर्थ रामदास येऊन राहिले .दासबोध हा ग्रंथ लिहिण्यासाठी स्फुरण होण्यासाठी निवांत ,सुंदर ,निसर्ग सौंदर्याने युक्त अशी योग्य भूमी त्यांना मीळाली .तेथे दासबोध ग्रंथाची रचना करण्याचे निश्चित केले .त्यांच्या बरोबर लेखनिक म्हणून कल्याण स्वामी दौत ,लेखणी घेऊन ग्रंथ लिहिण्यास तत्पर होते ।
दासबोध ग्रंथात समर्थांनी साधकांना मनाला बोध करायला सांगितले आहे .मी कोण आहे याचा शोध घेणे हे मानवी जन्माचे उत्तम ध्येय आहे .ते कसे साधायाचे तेही समर्थांनी या ग्रंथात सांगितले आहे .त्याची दीक्षाच समर्थांनी या ग्रंथात दिली आहे .कवयित्री सीता म्हणते की या पुण्य भूमीच्या दर्शनाने माझे अंत :करण आनंदित झाले आहे .मी पुन्हा पुन्हा या स्थानाला वंदन करते .

गुरुवार, 30 सितंबर 2010

शुक्रवार ची सवायी

जय जगदंब सौख्यदानी । लक्ष्मीमाय जगज्जननी ।
जय करवीरवासिनी । नारायणी भगवती । । १
मूळमाया वैष्णवी । अनंत ब्रह्मांडे नाचवी ।
नाना नाटके लाघवी । परब्रह्मशक्ती २
शास्त्रे पुराणे वेद्स्मृती । अखंड जियेचे स्तवन करिती ।
अव्यक्त पुरुषाची व्यक्ती । चिद्रूपिणी । । ३
विस्तारे वाढली इच्छाशक्ती । चराचरी जियेची व्याप्ती ।
प्राणी मात्रांची ज्ञानज्योती । जगन्माता । । ४
रामदासाचा किंकर । सदा झाडी महाद्वार ।
रामनाम अलंकार । कंठी हर्षे नाचतो । । ५
जगदंबेची सवायी करताना समर्थ जगदंबेला सौख्यदायी म्हणजे सौख्यदेणारी म्हणतात .ती लक्ष्मी आहे ,सर्वांची माता आहे ,जगताची माता आहे , करवीर म्हणजे कोल्हापूरला राहणारी आहे .नारायणी ,भगवान नारायणांची पत्नी आहे .ती मूळमाया आहे ,म्हणजे परब्रह्माचा मूळ संकल्प आहे .विष्णू पत्नी वैष्णवी आहे .ती परब्रह्माची ईश्वराची शक्ती असल्यामुळे ती अनंत ब्रह्मांडे निर्माण करते ,त्यांचा नाश करते .अनेक नाटके ती रचते.तीचे स्वरुप न समजण्यासारखे असल्या मुळे तिचे वर्णन शास्त्रे ,पुराणे ,वेद ,स्मृती करतात .कारण ती अव्यक्त पुरुषाची म्हणजे परब्रह्माची छाया असते ,जी शेवटी परब्रह्मात विलीन होते .तिच्या इच्छेने ती या दृश्य विश्वाचा विस्तार करते ,सांभाळ करते आणि नाशही करते .प्राणी मात्रांना ज्ञान देणारी ती जगन्माता आहे .म्हणून समर्थ म्हणतात की रामाचा दास तिचे महाद्वार झाडतो आहे .आणि रामनाम कंठात घेऊन नाचतो आहे .

मंगलवार, 21 सितंबर 2010

दत्तांची सवायी

सारासार नीति न्याय । मुख्य भक्तीचा उपाय ।
संतसंगेवीण काय । वाया जाय सर्वही । । १
आधी कर्माचा प्रसंग । शुध्द उपासना मार्ग ।
ज्ञाने उध्दरती जन । येथे संदेह नाही । । २
देहे निरसन करावे । महावाक्य विवरावे ।
तेणे संसारी तरावे । काळ नासतो आहे । । ३
ज्यास नाही येणे जाणे । नाही जन्म ना मरणे ।
सदय पाविजे श्रवणे । दास म्हणे हे सही । । ४
म्हणावा जयजय राम !
दिसेल ते नासेल । आणि येईल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२
जे दिसेल ते नासते ,जे येते ते जाते ते असार असते .त्याउलट जे कायम असतेच ते सार असते ,असे जाणणे म्हणजे सारासार विचार आहे .हा सारासार विचार करणे , नीतिने ,न्यायाने वागणे ,हे भक्तीने वागणे असते .असे केले तरी संत्संग हवाच .सत्संगाशिवाय सर्व वाया जाते .कर्म करत असताना शुध्द कर्मे केली पाहिजेत .शुध्द उपासनेचा मार्ग धरला पाहिजे ,जो संत संगतीनेच मिळतो .त्यातूनच भक्ती वाढत जाते ,ज्ञान वाढते ,ज्ञानाने उध्दार होतो .याविषयी शंका रहात नाही ।
ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रथम देहाचे निरसन करायला समर्थ सांगतात .देहाचे निरसन करायचे म्हणजे देहातील प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे ओळखायचे .असे करता करता हा देह म्हणजे मी नाही हे ओळखायचे .महावाक्यांचे विवरण करायचे .तेव्हा हा देह म्हणजे मी नाही हे मनावर ठसते .मग संसारातून आपण तरून जातो .ज्याला जाणे व येणे अशा येरझारा घालायच्या नसतील ,जन्म मृत्यु नको असेल तर आता तुम्ही श्रवण करा असे समर्थ सांगतात .

सोमवार, 20 सितंबर 2010

विठ्ठलाची सवायी

नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।
गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला । । १
चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।
दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला । । २
तेथे येता रामदास । दृढ़ श्रीरामी विश्वास ।
रूप पालटोनी त्यास । रामरूपी भेटला । । ३
पुन्हा विठ्ठल रूप । राम विठ्ठल येकरूप ।
पूर्व पुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
विठ्ठल ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन गुणांच्या स्वामींचा सुंदर मिलाफ आहे .तुकाराम महाराज म्हणतात :
तो हा उभा विटेवरी ,शंखचक्र गदा पद्म सहित हरी असे वर्णन केले आहे .विठ्ठल विष्णूचे रूप आहे .त्याच्या मस्तकावर शिवशंकर आहेत .अशा गुणातीत ,गुणांच्या पलिकडे असणा-या ,निर्विकार अशा विठ्ठलाचे वर्णन शुक मुनींनी केले आहे .चन्द्रभागेच्या रम्य तीरावर कमरेवर हात ठेवून आई वडीलांची सेवा करणा-या पुंडलिकाची वाट बघत विटेवर उभा आहे .त्याच्या दर्शनाला येणा-या भक्तांची वाट तो एकादशीला पहात असतो .आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तेथे खूप मोठी यात्रा भरते तेव्हा दिंड्या येतात .भक्तीरसाचा डोंब उसळतो .भक्त भक्तीरसात चिंब भिजतात ।
समर्थ रामदास तेथे आले तेव्हा त्यांनी विठ्ठलात रामरूप बघितले .तेव्हा समर्थ म्हणतात :

येथे उभा का श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।
काय केली सीताबाई । येथे राही रखुमाबाई ।
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ।
काय केली शरयु गंगा । येथे आली चंद्रभागा ।
काय केले वानरदळ । येथे जमविले गोपाळ ।
श्रीपंढरीनाथ ही रामरूप । दिसले ।
विठ्ठल रामरूपात दिसले ,पुन्हा विठ्ठल रूपात दिसले असे सर्व देव एकच हा संदेश श्री समर्थांनी दिला .

देवीची सवायी

धन्य तुळजापूर सुंदर । माता नांदे घरोघर ।
तेहेतीस कोटी सुरवर । उभे असती त्या ठाया । । १
यात्रा येतसे अपार । उदो बोलाचा गजर ।
गोंधळ पोत निरंतर । चमत्कार पावती । । २
तेथे येता रामदास । श्रीराम चरणी दृढ़ विश्वास ।
अंतरी धरोनी आस । रामध्यान करीतसे । । ३
रामरूपी देवी जाली । शिवशक्ती आकारली ।
नामे अंतरी निवाली । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
तुळजापुर नगर खरोखरच सुंदर आहे कारण तेथे तुळजाभवानीचा वास आहे .तीच सर्वत्र नांदते आहे .तिच्या ठिकाणी तेहेतीस कोटी देव गण आहेत अशी कल्पना केली आहे .तुळजापुरच्या यात्रेत देवीचा,तुळजापुरच्या भवानी चा उदो चाललेला असतो ,एकच गोंधळ ,तिचा पोत नाचवणे ,चालू असते ।
समर्थ रामदास जेव्हा तुळजापूर ला आले ,तेव्हा त्यांना तेथे ही रामरायांचे दर्शन हवे होते .तीच इच्छा मनात धरून त्यांनी राम रायांचे ध्यान केले .आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रामराय तेथे प्रगट झाले .देवी रामरूपी झाली .जणू काही शिव आणि शक्तीचा एकत्र संगम झाला .तिच्या पायाशी लक्ष दिल्यावर तिचे ध्यान करून देवी अंतरातून निवाली .शांत झाली .

शुक्रवार, 17 सितंबर 2010

सोमवार ची सवायी

धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १
वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २
कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३
भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
शंकरांचे वसतिस्थान जेथे आहे त्या शिखराला कैलास असे म्हणतात .ते पांढ-या स्फटिकांचे शिखर आहे .तेथे शंकर श्रीरामांचे ध्यान करत असतात .सिंहासनावर बसून अत्यंत प्रेमाने गणपतीचे नृत्य पहातात .जो कोणी शंकरांचे नाम घेत असतो ,त्याला शंकर महा वर देऊन पातकांचा संहार करतात .सिंहासनावर बसलेले असताना गिरिजा म्हणजे पार्वती त्यांच्या अंकावर म्हणजे मांडीवर बसलेली शोभून दिसते .कृष्णा ,गोदा आणि भागीरथी या नद्या शंकरांच्या जटेतून निघून पृथ्वी वर लोकांसाठी ,लोकांची तहान भागवण्या साठी आल्या आहेत ,पृथ्वी वरील लोकांना पावन करण्या साठी आल्या आहेत .शंकरांचे भैरवादी समुदाय सतत राम नामाचे नित्य गायन करतात .त्याने सर्व भ्रम नाहीसे होतात .शंकरांच्या पायावर लक्ष ठेवले तर सगळे भ्रम नाहीसे होतात .

गुरुवार, 2 सितंबर 2010

रविवारची सवायी

नाम जेजुरीगड सुंदर । तेथे नांदे म्हाळसावर ।
संगे भैरवगण अपार । पूर्ण अवतार शिवाचा । । १
पीत अश्वावरी स्वार । हाती घेऊनी तलवार ।
करी मणिमल्ल संहार । करी उध्दार जगाचा । । २
चंपाषश्ठीचा उत्सव थोर । यात्रा मिळती अपार ।
येळकोट नामाचा गजर । भक्त आनंदे करिताती । । ३
दास म्हणे रामराव । राम तोचि खंडेराव ।
जेथे भाव तेथे देव । लक्ष पायी जडलिया । । ४
म्हणावा जयजय राम !
सुंदर जेजुरी गडावर म्हाळसापति खंडेराव नांदतो आहे .तो शिवाचा अवतार असल्यामुळे शिव शंकरांचे भैरव गण ही बरोबर आहेत .पिवळ्या घोड्यावर स्वार होउन ,हातात तलवार घेऊन मणिमल्लाचा राक्षसाचा संहार करून त्याच्या पासून लोकांचे रक्षण केले .जगाचा उध्दार केला ।
कृत युगात दैत्य उन्मत्त झाले .त्यांनी मुनींवर हल्ले चढवले .सर्व देवांनी शंकरांकडे धाव घेतली .महादेवांनी मल्हारी मार्तंडाचे अक्राळ विक्राळ रूप घेतले .मणी दैत्या बरोबर युध्द पुकारले .मणीच्या छातीवर त्रिशूलाचा प्रहार केला .तो मूर्छित पडला ,सावध झाला व पुन्हा युध्द करू लागला .महादेवांनी शक्तिशाली ब्रह्मास्त्र फेकून त्याला मूर्छित केले। त्रिशूल फेकले आणि भूमीवर पाडले .मणी दैत्य शरण आला .आणि मला जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे .मला मुक्ती दे । असा वर मागुन घेतला .देवाने तथास्तु म्हटले .मणीचा पुतळा आजही खंडेरायाच्या मूळ देवळा समोर हात जोडून उभा आहे .मणी चा भाऊ मल्लासूर भावाच्या वधाच्या सूडाने पेटला .त्याने जोरात युध्दाला सुरुवात केली .मार्तंडाने त्रिशूल फेकून त्याला धरणीवर पाडले .मल्लासूर नतमस्तक झाला .त्याने प्रभूंना विनंती केली - तुमच्या आधी माझे नाव यावे .देव तथास्तु म्हणाले .तेव्हा पासून मार्तंडाला मल्हारी मार्तंड म्हणतात ।
चंपाषष्ठी चा खूप मोठा उत्सव जेजुरी गडावर भरतो ,खुप मोठी यात्रा भरते .येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर होतो .समर्थ रामदास म्हणतात की श्रीराम म्हणजेच खंडेराव आहे .समर्थांना सर्वत्र श्रीराम च दिसत असल्यामुळे खंडोबा ठिकाणी श्रीरामच आहेत असे समर्थ म्हणतात .जेव्हा दैवताच्या ठिकाणी मन जड़लेले असते तेव्हा जो भाव असतो तसा देव आपल्याला भेटतो .

शुक्रवार, 27 अगस्त 2010

शनिवारची सवायी

हरी गिरीपरी ठाण । बळे चालिले फुराण ।
वरी घेतले किराण । अंतराळ जातसे । । १
कपी लागवेगे धावे । मागे लांगुळ हेलावे ।
वैरसमंध आठवे । वज्र दाढा खातसे । । २
मनोवेगे झेंपावाला । द्रोणागिरीस पावला ।
हात घाली औषधीला । आटघाट होतसे । । ३
गिरी उत्पाटिला बळे । सळे बांधिला लांगुळे ।
मागे फिरे अंतराळे । लंकेवरी येतसे । । ४
म्हणावा जयजय राम !
लंकेवर श्रीराम जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा रावणाच्या बाणाने लक्ष्मण बेशुध्द पडला तेव्हा द्रोणागिरी वरील औषधी आणण्याला सांगितले तेव्हा हनुमंताने ते काम हाताशी धरले .अंतराळातून मनोवेगाने द्रोणागिरी पर्वताकडे जाण्यास निघाला .त्याची शेपुट मागे हलत होती .रावणाने लक्ष्मणाला बेशुध्द पाडले हे आठवून हनुमंताने दातओठ खाल्ले आणि औषधी आणायला मनाच्या वेगाने निघाला .द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला .त्या पर्वतावर अनेक औषधी होत्या .कोणती घ्यावी अशी त्याला खात्री नव्हती .म्हणून त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला .औषधी घेतल्यावर पुन्हा परत तेथे नेऊन ठेवला .पुन्हा लंकेवर आला .

शनिवार, 14 अगस्त 2010

श्रीरामांची सवायी

नाम श्रीराम सुंदर । ध्याती उमामहेश्वर ।
सिंहासनी रघुवीर । अंकी सीता शोभली । । १
लक्ष्मण महावीर । भरत शत्रुघ्न धीर ।
हनुमंत जोड़ी कर । देवर्षी गायिला । । २
ज्याचे ध्यानी रामदास । तेच ध्यान कल्याणास ।
बंधू दत्तात्रयास । रामप्रेमा लाधला । । ३
वर्णू राघवाचे यश । श्रीगुरुचा नामघोष ।
पूर्वपुण्य हे विशेष । लक्ष पायी ठेविला । । ४
श्रीराम हे सुंदर नाम आहे .श्रीरामांचे ध्यान उमा महेश्वर करतात .कारण समुद्र मंथनात निर्माण झालेले विष शंकरांनी प्राशन केले .त्याचा दाह गंगेला मस्तकावर धारण करून ,चंद्राला मस्तकावर धारण करून ,नाग गळयावर धारण करूनही थांबला नाही .तो श्रीरामांचा नामस्मरण करून दाह थांबला.रघुवीर सिंहासनावर बसले असताना त्यांच्या मांडीवर सीता शोभून दिसते .लक्ष्मण महावीर आहे .भरत शत्रुघ्न हे दोन्ही धीराचे आहे .भारताने १४ वर्ष श्रीरामांची वाट पाहिली .हनुमंत रामांच्या समोर हात जोडून उभा आहे .त्या हनुमंताचे वर्णन देवर्षी नारदांनी केले आहे .ज्या कल्याणाला रामदासांचे ध्यान आहे ,त्या रामदास स्वामींना श्रीरामांचे ध्यान आहे .समर्थ रामदासांच्या बंधू दत्तात्रयांना रामाचे प्रेम लाभले आहे .राघवाचे यश वर्णन करायचे तर श्रीगुरुंचा म्हणजे श्रीरामांचे नामाचा नामघोष करायला हवा ,पूर्व पुण्य असेल तरच श्रीरामांचे नाम स्मरण करण्याची ,इच्छा होते .

शुक्रवार, 13 अगस्त 2010

मारुतीची सवायी

नयनी पाहता हनुमंत । ज्यासी वर्णिती महंत ।
ज्याचा महिमा अनंत । मुख्य प्राण रामाचा । । १
स्वामी रामाचे वहन । केले लंकेचे दहन ।
त्याची कीर्ती गहन । बलभीम नामाचा । । २
सदा बांधुनिया माज । करी रामाचे निजकाज ।
ज्याचे शिरी रघुराज । सेवक पूर्णकामाचा । । ३
सर्व देवांचा वरिष्ठ । वारी दासाचे अरिष्ट ।
रामदास एकनिष्ठ । मारुती हा नेमाचा । । ४
म्हणावा जयजय राम !
डोळ्यांनी हनुमंताला पाहताना हनुमंताचे वर्णन महंत करतात .हनुमंत महाबली आहे .प्राण दाता आहे .सौख्यकारी आहे ,दुःखहारी आहे ,भीमरूपी आहे म्हणजे महाभयंकराचा नाश करणारा आहे .त्याचा महिमा वर्णन करता न येणारा आहे .तो रामाचा जणू प्राणच आहे .सीता माईंना शोधायला आल्यावर त्याने लंकेचे दहन केले .रावण वधानंतर श्रीराम लक्ष्मण व सीतेसह अयोध्येला जायला निघाले तेव्हा मारूतीने त्यांना वाहून नेले .अशा मारुती रायाची कीर्ती खूप मोठी आहे .तो नावाप्रमाणे बलभीम आहे .त्याने द्रोणागिरी पर्वत औषधी साठी उचलून आणला आणि काम झाल्यावर पुन्हा नेऊन ठेवला .तो नेहमी रामाचेच काम करण्यात दंग असतो . तो सर्व देवांमध्ये वरिष्ठ आहे कारण सूर्याला पकड़ण्यासाठी जेव्हा उडी सर्व देवांनी त्याला अस्त्र भेट दिली .तो रामाच्या दासावरील संकट दूर करतो .समर्थ रामदास त्याचे एकनिष्ठ भक्त होते .

मंगलवार, 10 अगस्त 2010

मारुतीची सवायी

रामदूत वायूसूत भीमगर्भ जुत्पती ।
जो नरात वानरात । भक्तीप्रेम वित्पती ।। १
दासदक्ष स्वामीपक्ष नीजकाज सारथी
वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती । । २
मारुती श्रीरामांचे दूत होते .रावणाकडे श्रीरामांचे दूत म्हणून मारुतीच गेले होते .सीतामाता शोधताना सापडल्यावर श्रीरामांनी दिलेली खुणेची अंगठी रामदूत या रूपातच सीता मातांना दिली .श्रीरामांच्या विजयाचा शुभ सन्देश सीतामातांना देण्यासाठी दूत म्हणून मारुती रायच आले होते ।
मारुती मरुत म्हणजे वायूचा पुत्र .मरुत म्हणजे वायूच्या औरस वीर्यापासून उत्पन्न झालेला म्हणून मारुती !
भीमरूपी स्तोत्रात मारुतीला भीमरूपी म्हटले आहे .भीम म्हणजे भयंकर ! मारुतीला भयंकर या अर्थाने न म्हणता महाभयंकरापासून रक्षण करणारे म्हणून म्हटले आहे .अंजनी मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मारुती राय होते म्हणून भीमगर्भ जुत्पत्ती !
ते दासदक्ष आहेत .श्रीरामांच्या दासांचे ते रक्षण करतात .श्री समर्थ रामदास स्वामींचे त्यांनी नेहमीच रक्षण केले .श्रीराम मारुती रायांचे स्वामी !श्रीरामांशिवाय अन्य कोणताही विचार त्यांच्या मनात नसे .ज्यात श्रीराम नाहीत ते काहीही त्यांना आवडत नसे .म्हणून रामांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस दिलेली मोत्याची माळ त्यांनी फोडून टाकली .कारण त्यात श्रीराम त्यांना दिसले नाहीत ।
मारुती राय बलशाली होते .त्यांनी सीतामाईंचा शोध वायूवेगाने शत योजने सागर ओलांडून लावला .हजारो योजने दूर असलेला द्रोणागिरी पर्वत घेउन आले .औषधी दिल्यावर पुन्हा पर्वत उचलून जागेवर ठेवला व मारुती हे नाव सार्थ केले .

मंगलवार, 3 अगस्त 2010

गणपती ची सवाई

वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १
राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २
अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३
धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४
म्हणावा जयजय राम !
गजवदन म्हणजे गणपती ,जो संकट नाशक आहे .सुखाचे घर आहे .ज्याने मदनही जाळला अशा शिवशंकराला नेहमी मनात ठेवा .त्याचे स्मरण ठेवा .कारण शिवशंकर स्वत : श्रीरामांचे स्मरण करतात ।
श्रीराम सज्जन लोकांचे विश्रांति चे स्थान आहे .साधकांचे निजधाम आहे .श्रीरामांचे सतत स्मरण करून आपले हित करून घ्या .अखंडित ध्यान करण्याचा अभ्यास करा .भागवातात व्यास मुनी हरिभजन करून हा भवसागर तरून जा असे सांगतात .कारण हरी ,श्रीराम यांचे गुण शंकर जाणतात .श्रीराम वरदायक आहेत .त्यांनी देवांना रावणाच्या तावडीतून सोडवले आहे .

सवाया

सवाया हा एक काव्य प्रकार जो समर्थांनी नव्याने आणला .त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते .तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत .आपल्या धर्माची ओळख करून देत .सवाया खूप आवेशाने म्हटल्या जातात .ज्यामुळे लोकांमध्ये धर्म ,देश यासर्वांच्या विषयी प्रेम निर्माण होत असेल .सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते .ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते .समर्थ म्हणतात :
तुझा भाट मी वर्णितो रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया ।
महाराज दे अंगीचे वस्त्र आता । बहु जीर्ण झाली देहेबुध्दी कंथा । ।
समर्थ म्हणतात ,की रामराया मी तुझा भाट आहे .मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे .नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे .लोकांना धर्माची ,देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे .

मंगलवार, 27 जुलाई 2010

शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे या चरणात समर्थांची तुलना शुक मुनीँबरोबर केली आहे कारण शुक मुनी वैराग्याचे सागर होते .त्यांची एकदा जनक राजाची पत्नी सुनयना हिने परीक्षा घेण्याचे ठरवले .एकदा नारद मुनी व शुक मुनी जनक राजाच्या घरी झोपाळयावर बसलेले असताना सुनयना नटून थटून तेथे आली व दोघांच्या मध्ये बसली .नारद मुनींची चलबिचल झाली पण शुक मुनी मात्र शांत होते .म्हणून समर्थांना शुक मुनींची उपमा दिली आहे ।
समर्थांना वसिष्ठ मुनींच्या ज्ञानाची उपमा दिली जाते .समर्थांचे ज्ञान वसिष्ठांसारखे आहे असे म्हटले जाते .वसिष्ठ ब्रह्मर्षी होते .ज्ञानी होते ।
वाल्मिकी रामायणाची एका महाकाव्याची रचना करणारे महाकवी होते .तसेच श्री समर्थांचे प्रचंड साहित्य उपलब्ध्द आहे .म्हणून वाल्मिकी कवीं सारखे श्री समर्थ आहेत असे मानले जाते ।
श्री समर्थांना राघवाचा म्हणजे श्रीरामांचा उपदेश प्राप्त झाला होता .समर्थ त्यांच्या वडील बंधूंना म्हणजे गंगाधर पंतांकडे अनुग्रह द्या अशी मागणी करत होते ,पण त्यांनी दिला नाही .म्हणून ते गावातल्या मारुती मंदीरात जाऊन बसले .त्यांची निष्ठा बघून मारुतीरायांनी श्रीरामांना समर्थांना अनुग्रह द्यायला सांगितला .त्यावेळेस समर्थांच्या हातात बाण, जपासाठी माळ, हुर्मुजी रंगाचे वस्त्र ,रामनामाँकित पत्र व त्रयोदशाक्षरी मंत्र दिला व आज्ञा केली की धर्मस्थापना करावी .ही घटना जांब मध्ये शके १५३८ मध्ये घडली ।
साधनेच्या कालात समर्थांनी अनेक ग्रंथांचे श्रवण ,वाचन केले .त्यांचा उल्लेख समर्थांनी दासबोधाच्या दशक १ समास १ मध्ये केला आहे नारदा सारखे ते कीर्तन करायचे ।
कदर्यु नावाचा एक सदाचारी संपन्न ब्राह्मण .तो आल्या गेल्याचे व्यवस्थित स्वागत करत असे .त्याच्या कड़े सतत पैपाहुणे असत .तो खर्चाकडे न बघता खर्च करीत असे .असे करता करता तो कफल्लक झाला .त्याला लोक अपमानाने वागवू लागले .बायको मुले अपमान करू लागली .पण त्याची शांती नाहीशी झाली नाही .तो शांत असे .समर्थांना साधकावस्थेत खूप त्रास सोसावा लागला .पण त्यांनी त्यांची शांती कायम राखली ।
नामस्मरणात ते शंकरान सारखे होते किंवा प्रल्हादा सारखे होते .शंकर सदैव श्रीरामांचे स्मरण करतात .प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा विरोध असूनही नारायणाचे नाम सतत घेत असे व आपल्या मित्रांना घ्यायला सांगत असे .तसे समर्थ सतत नामात असत .त्यांचे अर्चन ,भजन पृथु राजा सारखे होते .चकोर जसा चंद्राची वाट पहात असतो तसे समर्थ प्रभू रामांच्या दर्शनासाठी वाट पहात होते ।
अशा सद्गुरु समर्थांना माझा नमस्कार असो .हाती घेतलेले हे काम त्यांनी माझ्याकडून तडीस न्यावे हीच प्रार्थना !

शनिवार, 26 जून 2010

सद्गुरु समर्थ रामदास


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे ।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
उपदेश ज्याला असे राघवाचा श्रवणी जसा गूण परिक्षितीचा
विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
करी कीर्तने नारदासारखाची कदर्यूपरी शांती ज्याचे सुखाची
जया वाटते कांचनू केर जैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद चकोरापरी आठवी रामचंद्र
रमा सेवी पादांबुजे जाण तैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ४।
पृथुसारिखा अर्चनी वाटताहे खरा अक्रुराच्यासम वंदिताहे
नसे गर्व काही अणुमात्र ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा