अंतर्भाव
समास ४
सिद्ध होउनि बैसला | दृष्टी नाणी साधनाला |
सादर अशन शयानाला | अत्यादरे करुनी ||१||
ऐसा जो विषयासक्त | अत्यंत विषई आसक्त |
सिद्धपणे आपुला घात |तेणे केला ||२||
जो सिध्दांचा मस्तकमणी |माहांतापासी शूळपाणी |
तो हि आसक्त श्रवणी | जपध्यान पूजेसी ||३||
अखंड वाचे रामनाम |अनुष्ठाता हि परम |
ज्ञान वैराग्य संपन्न |सामर्थ्य सिंधू ||४||
तो हि म्हणे मी साधक | तेथे मानव बापुडे रंक |
सिद्धपणाचे कौतुक |केवीं घडे ||५||
म्हणौनी साधनेसी जो सिद्ध |तोचि ज्ञाता परम शुध्द |
येर ते जाणावे अबध्द | अप्रमाण ||६||
साधनेवीण बाष्कळता |ते चि जाणावी बद्धता |
तेणे घडे अनर्गळता | आसक्ती रूपे ||७||
मन सुखावले जिकडे | आंग टाकले तिकडे |
साधन उपाय नावडे | अंतरापासूनि ||८||
चित्ती विषयाची आस |साधन म्हणता उपजे त्रास |
नेम धरिता कासावीस |परम वाटे ||९||
दृढ देहाची आसक्ती |तेथे कैची पां विरक्ती |
विरक्ती वीण भक्ती | केवी घडे ||१०||
ऐक गा शिष्या टिळकां | नेम नाही ज्या साधका |
तयासी अंती धोका |नेमस्त आहे ||११||
तवं शिष्ये केली विनंती |अंशी मती तेचि गती |
ऐसे सर्वत्र बोलती |तरी मी काये करू ||१२ ||
अंती कोण अनुसंधान |कोठे ठेवावे हे मन |
कैसे राहे समाधान |तये समयी ||१३ ||
अंत समयो येईल कैसा | हा तो न कळे भर्वसा |
प्राप्त होईल कोण दशा | हे तो श्रुत नाही ||१४||
ऐसी आशंका घेतली मने | शिष्य बोले करुणा वचने |
याचे उत्तर श्रोते जाने | सावध परिसावे ||१५||
एक जण सिद्ध झाला पण त्याने साधन करायचे असते या कडे दुर्लक्ष केले .अत्यंत आवडीने त्याने झोप आणि खाणे पिणे करायला सुरुवात केली .असा तो विषयासक्त झाला .सिद्ध असूनही साधन न केल्यामुळे त्याने घात करवून घेतला .
जो सिध्दांचा मुकुट मणी आहे,,महा तप करणा-या मध्ये श्रेष्ठ असणारे शंकर ,त्यांनाही श्रवण करण्यात आसक्ती आहे .,जप ध्यान करण्यात आसक्ती आहे .
ते अखंड राम नामाचा जप करतात .सतत अनुष्ठाने करतात .ज्ञान ,वैराग्य ,सामर्थ्याने युक्त असलेले शंकर ही स्वत:ला साधक म्हणवतात .मग आपण तर क्षुद्र मानव ! आपल्या सिद्धपणाचे कौतुक कोणाला सांगणार ?
म्हणून साधना करण्याची ज्याची तयारी असते तोच खरा शुध्द असतो .बाकीचे सगळे अबध्द म्हणजे बध्द असतात .साधने शिवाय जे राहू शकतात ते बद्धच असतात .बद्ध्तेने आसक्ती येते आणि अध:पतन होते .बध्दतेने मनाला ,शरीराला जिकडे सुख वाटेल ,तिकडे अंग टाकले जाते म्हणजे मन वैषयिक गोष्टींकडे आकर्षिले जाते . मना पासून साधन आवडत नाही .चित्तात विषयांची ईच्छा असते .साधन करायला आवडत नाही .कोणताही नेम नित्यनेमाने करता येत नाही नित्य नेम करण्यास कासाविशी होते .याचे कारण देहाची दृढ आसक्ती असते .त्यामुळे त्याच्या जवळ विरक्ती सुध्दा रहात नाही .विरक्ती नाही म्हणजे भक्ती पण रहात नाही
म्हणून हे शिष्या ऐक .ज्याच्या कडे नित्य नेम नाही ,त्याला अंती धोका असतो .
असे सांगितल्यावर शिष्य म्हणतो जशी मती तशी गती असे सगळे म्हणतात तर मग मी काय करू ?शेवटी कोणाचे अनुसंधान ठेवू ? हे मन कोठे लावावे ? अंतकाळी मनाचे समाधान राहण्यासाठी काय करू ? अंतकाळ कसा येईल ?हे कळत नाही .कोणती दशा प्राप्त होईल ते कळत नाही
अशी शंका श्रोत्याने घेतली शिष्याने करुणेने प्रश्न विचारला .त्याचे गुरु उत्तर देत आहेत .ते सावध चित्ताने ऐकावे .