रविवार, 11 मई 2014

रामवरदायिनी भवानी स्तुती



रामवरदायिनी |भवानी स्तुती
रामवरदायिनी | कामानादायनी |
त्रैलोक्यपालनी | विश्वमाता || १ ||
आदिशक्ती भली |वैभवे शोभली |
दुर्जना क्षोभली | काळरात्री || २ ||
काळ कात्यायनी | दैत्यसंव्हारणी |
संकटी चाचणी | होत आहे ||  ३ ||
चंचळा दामिनी | त्रैलोक्यकामिनी |
अंतरी गामिनी | गुप्त गंगा || ४ ||
गुप्त नानापरी | रूप नाना  धरी |
क्षोभली अंतरी |ठाणमाने || ५ ||
ते ठाण नेटके |  त्रिशूळ खेटके |
अंतरी अंतके | वस्ती केली || ६ ||
राक्षेस मारिले | दैत्य संहारिले |
दुर्जन मारिले | सर्प जैसे || ७ ||
खांडके नायटे | दूत चौताळती |
भिकेसी लाविती | चुको नये || ८ ||
कितेक मातले | कोढ पैसावले |
कितेक कावले |जीव देती || ९ ||
माव कामा नये | भाव भक्ती जये |
उदंड विनये |होत जातो || १० ||
कुळदेव्या वरी | भाळीता अंतरी |
रंक राजा करी | सीघ्र काळे || ११ ||
रंक राजा करी | राव रंका करी |
कल्पना दुसरी | आडळेना || १२ ||
ज्यां जसी भावना | त्यां तसी कामना |
वैभवा कांचना | आणि नाही ||१३ ||
न घडते टे घडे | गैव ते सापडे |
ब्रहम ठाई ठाई पडे | प्रत्ययाने || १४ ||
बाळ सांभाळिले | कुळचि पाळिले |
दुख निर्दाळिले | सकळ काही || १५ ||
उदयो उदयो | आनंद आनंद |
सत्य नित्यानंद | वोहटेना || १६ ||
भडस पुरे बरी |ब्रह्मांड विवरी |
निश्चयो थावरी | निश्चयाचा || १७ ||
वैराग्ययोगिणी | शक्ती अगी भरे |
अतृप्ती वोसरे | सर्व काही || १८ ||
उदंड धारणा | देत साधारणा |
सर्वही कारणा | मूळमाया || १९ ||
दयाळू मयाळू | सर्व चिंता करी |
भक्त हाती धरी | राघवाचा || २० ||
राघवाच्या वरे | रामवरदायिनी |
होय ऐसे मनी | साक्ष आली || २१ ||
साक्ष आली मनी | चित्त लांचावले |
सुमन धाडिले | चंपकाचे  || २२ ||
चंपकाचे पुष्प | देऊनी उत्तीर्ण |
रामदासे चरण | वंदियेले || २३ ||
उत्तीर्ण मी काये | ,मी काये मी काये |
भक्ती हे नवमी | रामदासी || २४ ||

रामवरदायिनी श्रीरामांना वर देणारी ,कामना इच्छा पूर्ण करणारी ,त्रैलोक्याचे पालन करणारी अशी विश्वमाता ,आई प्रमाणे विश्वाचे पालन करणारी तुळजाभवानी आहे . ही आदिशक्ती आहे ,तिचे वैभव तिला शोभून दिसणारे आहे .दुष्ट दुर्जनांवर रागावणारी अशी की दुर्जनांना काळरात्री प्रमाणे भासणारी आहे .ती दुर्जनांना मृत्युची देवता वाटते .तीच कात्यायनी आहे ,दैत्यांचा संहार करणारी आहे .संकटा मध्ये ती जणू परीक्षा घेत असते .ती विजेसारखी [दामिनी ] चंचळ आहे .ती त्रैलोक्यकामिनी म्हणजे तीनही लोकांची इच्छा पूर्ण करणारी आहे .ती गुप्त गंगा आहे .ती अंतरी गामिनी आहे .ती आपल्या अंतरातून जाणारी म्हणजे मनामध्ये वास करणारी आहे .ती अनेक प्रकारे गुप्तपणे राहते .अनेक रूपे घेते .ती एकां जागी,म्हणजे मनामध्ये ठाणपणे वास करून मनाला सुशोभित करते ,तिचे रूप मनात ठसते .तिच्या हातात [खेटक] भाला ,त्रिशूळ असतो . आपल्या अंतरात [अंतके] वास करणारा अंतरात्म्यात ती वस्ती करते तेव्हा ती मनात ठसते.
ती राक्षस मारते ,दैत्यांचा संहार  करते ,सर्पाला जसे ठेचून मारतात तसे दुर्जनांचा ती  नाश करते . ती रागावली तर गळू ,नायटे होतात .तिचे दूत [सेवक ] रागावतात ,तिला केलेला नवस चुकला तर चांगल्या परिस्थितीत असलेला माणूस भिकेला लागतो म्हणून तिला केलेला नवस चुकू नये . नवस चुकवला तर ,तिने केलेली कृपा विसरले तर अंगावर सर्वत्र कोड पसरते .कितीतरी इतके त्रासतात की जीव देतात .म्हणून माव [ढोंग ] असता कामा नये .जर भाव आणि भक्ती असेल तरच जय होतो ,एखाद्या गोष्टीत यश मिळते .
कुलदेवी जर एखाद्यावर प्रसन्न झाली तर [रंक] गरीब सुध्दा राजा होतो .जर तिची अवकृपा झाली तर [रावाचा] श्रीमंताचा रंक होतो .जशी ज्याची भावना असते ,तशी त्याची [कामना ] इच्छा असते. मग वैभवाला ,[कांचनाला] सोन्याचांदीला कमतरता नाही .तिच्या सामर्थ्याने जे घडत नाही ते घडते ,जे गुप्त आहे ते सापडते ,प्रत्यक्ष ब्रह्माचा प्रत्यय येतो .मग [बाळाला] भक्ताला सांभाळते ,म्हणजे त्याच्या कुलाचे रक्षण करते  .सर्व दु:खाचा [निर्दालन] नाश करते असे झाले की आनंदाचा उदय होतो .सर्वत्र आनंद होतो . सत्य असणारा ,नित्य असणारा आनंद [वोहटत] नाही कमी होत नाही .
देवीच्या  पायाशी जाऊन इच्छा मागणे पुरे कर .ब्रह्मांडाचा विचार कर .ब्रह्मांडाच्या मुळापर्यंत जाण्याचा निश्चय कर . पक्का निश्चय कर .कारण तुळजाभवानी उदंड [धारणा] बुद्धी ,स्मरणशक्ती देते साधारण माणसाला ही देते .याला कारण मूळमाया आहे .परब्र्ह्मात झालेले प्रथम स्फुरण म्हणजे मूळमाया .ती शक्तिरूप आणि जाणीवरूप आहे .त्यामुळे ती शक्ती देते तशीच बुद्धी ही देते .ती दयाळू आहे तशी मायाळू ही आहे .तिला सर्वांची चिंता आहे .राघवाचा भक्त जो आहे त्या प्रत्येक भक्ताला ती हाताला धरून चालवते .तीने राघवाला श्रीरामांना सीतेच्या शोधात सीता सापडेल असा वर दिला .म्हणून तिला रामवरदायिनी असे ही म्हणतात .तीच ही तुळजाभवानी आहे अशी मनाने साक्ष दिली .मनाने अशी साक्ष दिल्याने मन [लांचावले ] म्हणजे मनाला लोभ सुटला .चाफ्याचे फुल समर्थ रामदासांनी तिला अर्पण केले आणि तिला वन्दन केले .तिच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो .उत्तीर्ण झालो म्हणजे काय तर मी नववी भक्ती आत्मनिवेदन भक्ती साधली .