शुक्रवार, 21 जून 2013

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||
स्नान संध्या टीळे माळा | अंतर्निष्ठ उपासना |
नित्यानित्य विवेकाने |धन्य संसार होतसे || १ ||
मर्यादा न्यायनीतीची | अन्याय न घडे कदा |
सन्मार्ग योग देवाचा | धन्य संसार होतसे || २ ||
देवालये सिखरे रम्ये | धर्मशाळा परोपरी |
परत्र साधकां लोकां | धन्य संसार होतसे || ३ ||
आन्नोदक वस्त्रे दाने | धन्य धन्य ब्राह्मणी भजे |
उदास वृत्तीने लोकी | धन्य संसार होतसे || ४ ||
बावी सरोवरे टांकी | मठ वृक्ष परोपरी |
उपकार समस्ती लोका | धन्य संसार होतसे || ५ ||
पराचे जीवीचे जाणे | अस्ती नास्ति विचारणा |
आत्यंत सर्व भूतांसी | धन्य संसार होतसे || ६ ||
होम याग पुरश्चरणे | निरुपणे हरिकथा |
ब्रहम संतर्पणे यात्रा | धन्य संसार होतसे || ७ ||
वेद पारायणे चर्चा | पुराणे माहात्मे शुभे |
नित्य उछाव देवाचा | धन्य संसार होतसे ||८ ||
नवविधा भक्ती देवाची | मुख्य कोण विचारणे |
आध्यात्म शोधिता सर्वे | धन्य संसार होतसे || ९ ||
पंचीकरणे माहांवाक्ये | श्रवणे मनने सदा |
सत्संगे निसंग होता | धन्य संसार होतसे || १० ||
दासाचे बोलणे ऐसे | सर्वज्ञ जाणते तुम्ही |
आह्मी तुम्ही विचारावे | धन्य संसार होतसे || ११ ||
शब्देची लाभती रत्ने | शब्द रत्ने आमोल्यकी |
कोंदणामाजी ते सोने | तैसा  अर्थ प्रचितीचा || १२ ||

स्नान संध्या केली ,टीळे लावले माळा घालून फक्त उपयोगी नाही तर आंतर्निष्ठा पाहिजे आंतर्निष्ठा म्हणजे ज्याच्या मनात कोणाविषयी मत्सर नाही ,सज्जनांना आवडतो ,ईश्वरानुभावाची पूर्ण निष्ठा असते .असा भक्त तो नित्यानित्य विवेकाने वागतो म्हणजे नेहमीच आहेच ते नित्य आणि जे कायम न टिकणारे आहे ते अनित्य हे जो समजतो तो तो नित्या नित्य विवेक करतो .म्हणजे आत्मा नित्य आहे ,देह अनित्य म्हणजे नाशिवंत आहे असे जो जाणतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो न्याय नीतीने वागतो ,न्याय आणि अन्यायाची मर्यादा जो जाणतो ,त्याच्याकडून अन्याय होत नाही ,जो सन्मार्ग धरतो ,देवाचा योग ज्याच्याबरोबर जोडला गेलेला असतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो सुंदर देवालये ,शिखरे ,देवालयाचे कळस बांधतो ,साधकांसाठी रहायला धर्मशाला बांधतो ,त्यांचा 
संसार धन्य होतो .
जो अन्नदान करतो ,वस्त्रे दान देतो ,ब्राम्हणांचे पूजन ,भजन करतो ,आणि मी करतो असा अभिमान न बाळगता उदासीन वृत्तीने राहतो त्याचे जीवन धन्य असते .
बावी म्हणजे विहीरी सरोवरे ,टाक्या ,बांधतो ,मठ बांधतो ,वेगवेगळे वृक्ष लावतो व हवा शुध्द ठेवायला हातभार लावतो ,अशी समाज उपयोगी कामे करून लोकांवर उपकार करतो तो धन्य होतो .
जो दुस-याच्या मनाचे जाणतो ,हवे नको ते विचारतो ,सर्व भूतांसी म्हणजे सर्व सजीव प्राण्यांची काळजी घेतो ,सर्वांवर प्रेम करतो जसे संत करतात .त्यांचा संसार धन्य होतो .जो होम याग करतो , पुरश्चरणे करतो ,हरिकथा करतो ,निरुपणे करतो ,यात्रा करतो ,ब्रहमपद मिळविण्यासाठी प्रयत्न साधना ,सत्संग ,गुरुपदेश घेतो ,गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळतो ,अशाचा संसार धन्य होतो .
जो वेदपठण करतो ,पुराणांचे महात्म्य समजतो व नित्य त्याचे पठण करतो ,शुभ असलेल्या पुराणांचे श्रवण करतो ,देवांचे उत्सव करतो ,त्यांचा संसार धन्य होतो .नवविधा भक्ती पैकी कोणती भक्ती श्रेष्ठ ते विचारतो .अध्यात्म म्हणजे काय ते समजावून घेऊन तसे वागतो .त्यांचा संसार धन्य होतो .
पंचमहाभूतांचे कर्दम म्हणजे एकत्र मिसळणे ,म्हणजे पंचीकरण समाजावून घेतो ,चार वेदांची चार महावाक्यांचे गुरुमुखातून श्रवण ,त्यांचे मनन करतो ,सत्संगात राहून होणा-या श्रवणाने जो नि:संग होतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
हे दासाचे म्हणजे श्रीरामांच्या दासाचे ,समर्थ रामदास स्वामींचे बोलणे आहे आपण सर्व सर्वज्ञ आहात .आपल्या सर्वज्ञपणाचा सर्वांना लाभ देतो त्यांचा संसार धन्य होतो .
शब्द हेच जणू रत्ने ,ही रत्ने अतिशय अमूल्य आहेत .ही शब्द रत्ने जणू कोंदणा मधिल जणू सोनेच .तीच प्रचीती .!