शुक्रवार, 23 अगस्त 2013

तुळजाकुमारीचे रूप



तुळजा कुमारी चे रूप | अथवा बायकांचे रूप |
नाना प्रकारी स्वरूप भक्तालागी दावितो || १ ||
भक्ता प्रसंन्नचि होतो | अथवा ख्यानाची लावितो
प्रचीत रोकडी दावितो | भक्तीभावे सारिखी || २ ||
दास म्हणे चुको नये | देवापाशी उणे काये |
 तूते आपाये उपाये | दोनी सित्ध असती || ३  ||
तुळजा कुमारी स्वत:चे रूप कुमारी रूपात किंवा बायकांच्या रूपात दाखवते . अनेक रूपात ती  भक्तांना भेटते .भक्तांना प्रसन्न होते आणि अभक्तांची ,तिच्यावर विश्वास  नसणा-या अभक्तांची हानी करते ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचीती येते .समर्थ रामदास स्वामी म्हणतात की देवीची भक्ती करण्यास चुकू नये .कारण देवाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते .देवीची कृपा आणी तिची अवकृपा दोन्ही सिध्दच आहे .






तुकाई यमाई  नमूं चेडाबाई
जाखाई जोखाई सखाई ते ||१||
सखाई जगदंबा आदिशक्ती अंबा |
तुम्ही त्या स्वयंभा दाखवावे || २ ||
दाखवावे तुम्हां सर्वां पैलीकडे |
देखतांच घडे मोक्षपद || ३ ||
मोक्षपद घडे मोक्षासी पाहतां |
तद्रूपचि होता दास म्हणे || ४ ||
तुकाई यमाई चंडी जाखाई जोखाई सखाई जगदंबा आदिशक्ती अंबा या सर्व एकाच शक्तीची अनेक रूपे ,ती स्वयंभू रूपे मला दाखवावी असे समर्थ म्हणतात .तुमच्या पलीकडे ही असलेले स्वस्वरूप मला दाखवा अशी समर्थ विनंती करतात .स्वस्वरूप दर्शनाने मोक्षपद मिळेल. मोक्षपद मिळण्यासाठी त्या स्वस्वरुपाशी एकरूप मात्र व्हावे लागते ,तरच मोक्ष मिळतो त्यासाठी भक्ती करावी लागते .भक्ती अशी की कोणत्याही कारणाने भक्त विभक्त होणार नाही .