सोमवार, 5 जनवरी 2015

चतु:समासी [समास १ ]



चतु:समासी दासबोध [ धुळे बाड ]
समास १
ॐ नमो जी गुरुनाथा | मोक्ष लक्ष्मीवंता समर्था |
देसी अर्थाचीया अर्था | शरणागत || १ ||
या समासाच्या प्रारंभी समर्थ प्रथम गुरुनाथांना म्हणजे श्रीराम प्रभूंना वंदन करतात . गुरु मोक्ष देणारे ,मोक्ष श्री मिळवून देणारे ,आहेत .समर्थ येथे श्रीरामांना समर्थ म्हणतात .तेच शब्दाचे अंतर फोडून सांगतात ,अर्थाला अर्थ देतात असे समर्थ म्हणतात .हे गुरुनाथा ,मी आपलयाला शरण आलो आहे .
जो शरणागत सद्गुरूमहिंद्रा | शुध्द भावे अक्षई मुद्रा |
प्राप्त होय जन्मदरिद्रा | पासूनि सुटे || २ ||
सद्गुरुंचा राजा [महिंद्र ] आहे ,ज्या सद्गुरू चरणी शिष्य लीन आहे ,शरणागत आहे , शरणागत सुध्दा शुध्द भावाने ,भक्तीने आहे ,त्या शिष्याला शुध्द भाव वं अक्षय शान्ती मिळते ,त्याची जन्म दारिद्र्या पासून सुटका होते .
सुटले जन्मदारिद्र | कोंवसा जोडला रामचंद्र |
देऊनी आपुले भद्र | अक्षै केले || ३ ||
समर्थ म्हणतात की माझे दारिद्र्य सुटले कारण मी श्रीराम चंद्रांचा आधार शोधला आहे . श्रीराम चंद्रांनी आपले भद्र [शुभ आशीर्वाद ] देऊन अक्षयी ,निरंतर केले .
होता मानवी कनिष्ठ |मी हा नव्हे कळले पष्ट |
येणे विचार वरिष्ठ | नि:संग पणे || ४ ||
अक्षयी केला गेलेला मी अत्यंत कनिष्ठ होतो .श्रीरामांच्या आधाराने अक्षयी ,निरंतर झालेला मी मुळचा मी नाही हे मला स्पष्ट कळले होते .पण आता मी अलिप्त ,संगरहित झालो .
नि:संगपणाचेनी योगे  | मीपण आले पाठीलागे |
ते निवारिले संतसंगे | स्वानुभवे करुनी || ५ ||
आता समर्थ संत संगाचा अनुभव सांगत आहेत . संत संगामुळे अलिप्तपणा आला जे मीपण माझ्या मध्ये होते ,ते संतांच्या सहवासाने निवारण झाले ,याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला .
बोलता न बोलता येकचि लाभ | हाणी न ये सुखा स्वयंभ |
हे सद्भाविकासी सुलभ |होये संत संगे || ६ ||
संतांच्या सहवासात बोलले ,नाही बोलले तरी एकच लाभ होतो ,हानी [हाणी ] होत नाही .सुखच प्राप्त होते .
भाविक प्रेमळ उदास | सदृढ वचनी विश्वास |
भगवंता परते जयास | अनुमात्र नावडे || ७ ||
भाव शब्द भू धातू पासून होतो भू म्हणजे होणे  किंवा असणे भाव म्हणजे अस्तित्व .भाविक म्हणजे ज्याला ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते . ज्याच्या मनात भाव असतो तो भाविक असतो .आणि भाव असून प्रेम असते तो भक्त असतो .तो प्रेमळ असतो .शुध्द अंत:करणाचा असतो त्यामुळे त्याला दुस-याच्या परिस्थिती शी दया येते ,प्रेमळ असतो .वचनाला तो पक्का असतो दिलेले वचन तो मोडत नाही .भगवंताशिवाय त्याला दुसरे काही आवडत नाही .
दु:ख होता प्रपंच संगे | क्षणक्षणा मानस भंगे |
तंव तंव अधिक रंगे | प्रेमा ईश्वरी || ८ ||
प्रपंचात राहून सतत सुख दु:खाचे प्रसंग अनुभवायला लागतात .क्षणक्षणा मानभंगाचे  प्रसंग येतात .अशा अनेक प्रसंगांना जेव्हा तोंड द्यावे लागते तेव्हा ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते आणि जास्तीत जास्त ते ईश्वराबाद्दल्चे प्रेम गहिरे होत जाते . गाढ विश्वास ईश्वरा बद्दल निर्माण होतो .
करितां सकळ संसार | ईश्वरी जयाचा भार |
जयासी ईश्वरची आधार | विश्वास बळे || ९ ||
प्रपंच करताना माणूस मी कर्ता मानतो त्यामुळे मनासारख्या न घडलेल्या गोष्टींमुळे दु: खी होतो .पण ज्याचा ईश्वरावर भार असतो ,म्हणजे ईश्वर करेल ते आपल्या हिताचेच आहे असा विश्वास ज्याचा असतो ,तो मनापासून ईश्वर आपला आधार आहे असे मानतो .ईश्वर आपले हिताचेच घडवून आणेल असे मानतो . तसा त्यांचा विश्वास असतो .
संसारी घातले जेणे | तयावीण कांहीच न नेणे |
संकटी ही वात पहाणे |एकां सर्वोत्तमाची || १० ||
ज्याने या संसारात आणले आहे ,या पृथ्वीतलावर जन्माला घातले आहे तोच सर्वत्र भरून आहे ,तयावीण रिता ठाव नाही अशी पक्की खात्री पटते ,तेव्हा संकट आले तर तो प्रयत्न करतो पण ते सुध्दा सर्वोत्तमाचे अधिष्ठान ठेवून जसे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी प्राणांची बाजी लावली पण भगवंतांचे अधिष्ठान होते .हे स्वराज्य व्हावे ही श्रीं  ची ईच्छा आहे असे म्हटले जात होते .तसा भगवंताचा भक्त असतो .
भगवंती जयाचा भाव | आघाती नुपजे अभाव |
तया भाविका देवराव |संकटी सांभाळी || ११ ||
ज्याचा भगवंतावर भाव असतो ,त्यांचा भाव थोड्याशा संकटांनी कमी होत नाही .तेव्हा तो भक्त म्हणतो की भगवंत माझी परीक्षा पाहतो आहे .आणि मग त्या भक्ताला भगवंत सांभाळतो .
समयो पडताही कठीण | पालटेना सत्वगुण |
तया भाविकाचा सीण | भगवंत वारी || १२ ||
कठीण काळ आला तर भगवंत मला मदत करत नाही असे म्हणून भगवंता वरची निष्ठा ज्याची कमी होत नाही ,त्यांचा सत्व गुण कमी होत नाही .त्या भाविकाचा ,भक्ताचा शीण भगवंत नाहीसा करतो .
कर्ता ईश्वर जाणती | विवेके तळमळ न करिती |
भार टाकीला भगवंती | सकलांचा देही || १३ ||
भगवंत अशा भक्ताचा पाठीराखा असतो कारण हा भक्त कर्ता ईश्वराला मानतो .सर्व काही ईश्वरच करणारा आहे असे मानतो .या विचाराने ,विवेकाने त्याची तळमळ होत नाही .त्याला चिंता वाटत नाही . कारण त्याने त्यांचा सर्व भार भगवंतावर टाकलेला असतो .तो त्यासाठी प्रयत्न जरूर करतो पण फलाची अपेक्षा करत नाही .
ऐसे भगवंती अनन्य | आणि अनंत जन्मीचे पुण्य |
उभे ठाके तरी धन्य | होईजे सत्संगे || १४ ||
असा तो भगवंताशी अनन्य असतो .अनन्य म्हणजे न अन्य भगवंत आणि तो एकरूपच झालेले असतात .त्यासाठी अनेक जन्माचे पुण्य कामी येते .सत्संगाने तो धन्य होतो .
सत्संगती आणि सत्शिष्य | तयासी न जोडे जगदीश |
सद्गुरू वचन पियुष | सेविती विश्वासे || १५ ||
सत्संगती मिळाली ,तो स्वत : सत्शिष्य असला तरी त्याला जगदीश्वर भेटत नाही .कारण त्याने सद्गुरू वचनाचे पियुष विश्वासाने प्यायलेले नसते .जेव्हा तो सद्गुरू वचन मनापासून ऐकतो ,
जो संसार दु:खे दुखावला |जो त्रिविध तापे पोळला |
तोचि येक अधिकारी जाला | परमार्थ विषयी || १६ ||
जो संसारात अध्यात्मिक ,आधिभौतिक आणि आधिदैविक तापामुळे दु :खी होतो ,तो परमार्थाचा अधिकारी होतो .
बहु दु:खे भोगिले जेणे | तयासीच परमार्थ जाणे |
संसारदु:खे धरणे | ईश्वरी घेतले || १७ ||
ज्याने पुष्कळ दु:ख भोगले त्याला या सृष्टीतील नश्वरता कळते ,मग तो परमार्थाचा अधिकारी होतो .संसारातील दु:खां मुळे ईश्वरा कडे मन लागते आणि संसारात दु:खी असणारा ईश्वर प्राप्तीची ईच्छा करतो कारण त्याची वाटचाल मुमुक्षुत्वा कडे जाते .एकदा ईश्वराकडे जाण्याची वाटचाल सुरु केली की आता हा संसार आता बास झाला असे वाटू लागते .
विकल्पाचा डाग पडे |तेणे गुणे विश्वास मोडे |
अविश्वासे प्राणी बुडे | माहा आवर्ती || १८ ||
जेव्हा ईश्वरावरचा विश्वास डळमळीत होतो ,म्हणजेच मनात विकल्प येतो ,तेव्हा ईश्वरावरचा विश्वास नाहीसा होतो मग ती व्यक्ती अविश्वासाने महा आवर्तनात बुडते .आवर्तने असतात जन्म मृत्युची .
जेथे सुदृढ विश्वास | तोचि जाणावा सत्शिष्य |
मोक्षाधिकारी विशेष | अग्रगण्य || १९ ||
ज्याचा ईश्वरावर दृढ विश्वास आहे , तोच सत्शिष्य असतो .सत्शिष्य मोक्षाधिकारी असतो .तो सत्शिष्य सर्वात अग्रगण्य म्हणजे सर्वात पुढे असतो .
अपार जन्मांतरीचे पुण्य | तरीच सत्शिष्य अग्रगण्य |
तया शरणांगता शरण | श्रीराम माझा ||२० ||
सत्शिष्य होणे हे अनंत जन्माचे पुण्य असते . असा शरणागत असणा-या सत्शिश्याला माझा श्रीराम शरण असतो .त्याच्या साठी श्रीराम काहीही करायला तयार असतात .कबीराचे शेले श्रीराम विणत .संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या च्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत काम करत .
जो कोंवसा निजभक्तांचा | साह्याकारी सुरवरांचा |
अजन्म अवतरोन भूमीचा | भार फेडिला || २१ ||
जो स्वत:च्या भक्तांचा कोंवसा म्हणजे आधार असतो . सुर वरांचा तो सहाय्यकारी असतो .रावणाने सर्व देवांना बंदिवान केले होते .त्यांना श्रीरामांनी सोडवले .अजन्म असणा-या श्रीरामांनी अनेक राक्षसांचा नाश करून या भूमीचा भार कमी केला .
नामे पाषाण तारिले | वाल्मिका ऐसे उद्धरीले |
मननसीळ केले | जीवन्मुक्त || २२ ||
नामाने पाषाण तरतात .प्रत्येक पाषाणावर श्रीराम हे नाव लिहून तो पाण्यात टाकल्यावर तो तरला .वाल्मिकी ज्याने अनंत पापे केली ,त्याला राम ,राम असे म्हणता येत नव्हते ,त्याने मरा मरा असा जप सुरु केला आणि मरा चे राम राम झाले .आणि त्यांचा उध्दार श्रीरामानी केला .जे मननसीळ होते त्यांना जीवन्मुक्त केले . 
रावणादि पराक्रमी | प्रतापी दंडोनी संग्रामी |
मुक्त करोनी स्वर्गधामी | अमर स्थापिले || २४ ||
रावणा सारख्या पराक्रमी प्रतापी वीराला शासन केले ,त्याला मरण दिले .स्वर्ग प्राप्ती करून दिली .
विकल्प सांडूनी अनन्यता | देखोनी होय प्रसन्नता |
म्हणोनि सत्संगती तत्वता | भावे वोळगावा || २५ ||
विकल्प सोडून अनन्यता आपल्या उपास्या वर श्रध्दा ठेउन ,उपास्याला पाहून प्रसन्नता ठेवली, भावाने उपास्य दैवत मिळवावे .त्यासाठी सत्संगती महत्वाची असते
जन्मा आलिया स्वहित | जे नामस्मरणी रंगले चित्त |
सद्गुरू भक्ती विकल्परहित | आचरे भावे || २६ ||
मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक करायचे असेल तर नामस्मरणात चित्त रंगून गेले पाहिजे सद्गुरुंवर कोणत्याही विकाल्पाशिवाय भक्ती करायला हवी जशी कल्याण स्वामींनी समर्थांच्यावर केली .फांदी तोडताना आपण विहिरीत पडणार आहोत हे माहीत असूनही समर्थांनी जसे बसून फांदी तोडायला सांगितली तशी तोडली .कल्याणा छाटी म्हटल्यावर विचार न करता सज्जन गडावरील एकां दरीत उडी मारली .
कर्म उपासना ज्ञान | सारासार करी मथन |
आत्मारामी अनुसंधान | विवेके लावी || २७ ||
कर्म ,उपासना आणि ज्ञान  या तीनही उपासना पद्धतीने सारासार विचारांचे मंथन करतो ,विवेक विचार करतो ,आत्मारामाशी अनुसंधान करतो .
इति श्री रामदास |पुढे विनवी श्रोतयास |
कर्ता दाशरथी सायास | कांहीच नाही || २८ ||
श्री समर्थ रामदास श्रोत्यांना विनवतात की या संपूर्ण सृष्टीत सर्व कर्मांचा कर्ता प्रभू श्रीराम आहेत असे समजून उपासना केली तर सगळा कर्ता श्रीरामच आहेत हे लक्षात येते मग कोणतेच कष्ट घ्यावे लागत नाहीत ,