मंगलवार, 21 सितंबर 2010

दत्तांची सवायी

सारासार नीति न्याय । मुख्य भक्तीचा उपाय ।
संतसंगेवीण काय । वाया जाय सर्वही । । १
आधी कर्माचा प्रसंग । शुध्द उपासना मार्ग ।
ज्ञाने उध्दरती जन । येथे संदेह नाही । । २
देहे निरसन करावे । महावाक्य विवरावे ।
तेणे संसारी तरावे । काळ नासतो आहे । । ३
ज्यास नाही येणे जाणे । नाही जन्म ना मरणे ।
सदय पाविजे श्रवणे । दास म्हणे हे सही । । ४
म्हणावा जयजय राम !
दिसेल ते नासेल । आणि येईल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२
जे दिसेल ते नासते ,जे येते ते जाते ते असार असते .त्याउलट जे कायम असतेच ते सार असते ,असे जाणणे म्हणजे सारासार विचार आहे .हा सारासार विचार करणे , नीतिने ,न्यायाने वागणे ,हे भक्तीने वागणे असते .असे केले तरी संत्संग हवाच .सत्संगाशिवाय सर्व वाया जाते .कर्म करत असताना शुध्द कर्मे केली पाहिजेत .शुध्द उपासनेचा मार्ग धरला पाहिजे ,जो संत संगतीनेच मिळतो .त्यातूनच भक्ती वाढत जाते ,ज्ञान वाढते ,ज्ञानाने उध्दार होतो .याविषयी शंका रहात नाही ।
ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रथम देहाचे निरसन करायला समर्थ सांगतात .देहाचे निरसन करायचे म्हणजे देहातील प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे ओळखायचे .असे करता करता हा देह म्हणजे मी नाही हे ओळखायचे .महावाक्यांचे विवरण करायचे .तेव्हा हा देह म्हणजे मी नाही हे मनावर ठसते .मग संसारातून आपण तरून जातो .ज्याला जाणे व येणे अशा येरझारा घालायच्या नसतील ,जन्म मृत्यु नको असेल तर आता तुम्ही श्रवण करा असे समर्थ सांगतात .

सोमवार, 20 सितंबर 2010

विठ्ठलाची सवायी

नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।
गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला । । १
चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।
दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला । । २
तेथे येता रामदास । दृढ़ श्रीरामी विश्वास ।
रूप पालटोनी त्यास । रामरूपी भेटला । । ३
पुन्हा विठ्ठल रूप । राम विठ्ठल येकरूप ।
पूर्व पुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
विठ्ठल ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन गुणांच्या स्वामींचा सुंदर मिलाफ आहे .तुकाराम महाराज म्हणतात :
तो हा उभा विटेवरी ,शंखचक्र गदा पद्म सहित हरी असे वर्णन केले आहे .विठ्ठल विष्णूचे रूप आहे .त्याच्या मस्तकावर शिवशंकर आहेत .अशा गुणातीत ,गुणांच्या पलिकडे असणा-या ,निर्विकार अशा विठ्ठलाचे वर्णन शुक मुनींनी केले आहे .चन्द्रभागेच्या रम्य तीरावर कमरेवर हात ठेवून आई वडीलांची सेवा करणा-या पुंडलिकाची वाट बघत विटेवर उभा आहे .त्याच्या दर्शनाला येणा-या भक्तांची वाट तो एकादशीला पहात असतो .आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तेथे खूप मोठी यात्रा भरते तेव्हा दिंड्या येतात .भक्तीरसाचा डोंब उसळतो .भक्त भक्तीरसात चिंब भिजतात ।
समर्थ रामदास तेथे आले तेव्हा त्यांनी विठ्ठलात रामरूप बघितले .तेव्हा समर्थ म्हणतात :

येथे उभा का श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।
काय केली सीताबाई । येथे राही रखुमाबाई ।
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ।
काय केली शरयु गंगा । येथे आली चंद्रभागा ।
काय केले वानरदळ । येथे जमविले गोपाळ ।
श्रीपंढरीनाथ ही रामरूप । दिसले ।
विठ्ठल रामरूपात दिसले ,पुन्हा विठ्ठल रूपात दिसले असे सर्व देव एकच हा संदेश श्री समर्थांनी दिला .

देवीची सवायी

धन्य तुळजापूर सुंदर । माता नांदे घरोघर ।
तेहेतीस कोटी सुरवर । उभे असती त्या ठाया । । १
यात्रा येतसे अपार । उदो बोलाचा गजर ।
गोंधळ पोत निरंतर । चमत्कार पावती । । २
तेथे येता रामदास । श्रीराम चरणी दृढ़ विश्वास ।
अंतरी धरोनी आस । रामध्यान करीतसे । । ३
रामरूपी देवी जाली । शिवशक्ती आकारली ।
नामे अंतरी निवाली । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
तुळजापुर नगर खरोखरच सुंदर आहे कारण तेथे तुळजाभवानीचा वास आहे .तीच सर्वत्र नांदते आहे .तिच्या ठिकाणी तेहेतीस कोटी देव गण आहेत अशी कल्पना केली आहे .तुळजापुरच्या यात्रेत देवीचा,तुळजापुरच्या भवानी चा उदो चाललेला असतो ,एकच गोंधळ ,तिचा पोत नाचवणे ,चालू असते ।
समर्थ रामदास जेव्हा तुळजापूर ला आले ,तेव्हा त्यांना तेथे ही रामरायांचे दर्शन हवे होते .तीच इच्छा मनात धरून त्यांनी राम रायांचे ध्यान केले .आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रामराय तेथे प्रगट झाले .देवी रामरूपी झाली .जणू काही शिव आणि शक्तीचा एकत्र संगम झाला .तिच्या पायाशी लक्ष दिल्यावर तिचे ध्यान करून देवी अंतरातून निवाली .शांत झाली .