बुधवार, 26 मार्च 2014

तुळजाभवानी स्तोत्र

बाळका वाढवी माता | जेथे तेथे परोपरी |
स्वभावे जीवीचे जाणे | अंतरी विवरे सदा || १ ||
बाळका बोलता येना | हित तेही कळेचिना |
हेकांड बावळे वेडे | मातेला प्रिय होतसे ||  २ ||
अन्याई अवगुणी खोडी | कुश्चीळ रडते सदा |
अतस्ते माय लोभाळू | लोभे गुणास वाढवी || ३ ||
नागीवे उघडे लोळे | हागे वोके आव्हास्वहा |
तैसाच नेटके दावी | लेववी नेसवी सदा || ४ ||
मातेचा कळवळा मोठा | लोभासी तुळणा नसे |
आळसेना विसंभेना | कंटाळेना कदापि ही || ५ ||
त्रैलोक्य बाळका पाळी | वाढवी शहाणी करी |
कुळेची पाळिली कीर्ती | कुळदेव्या म्हणोनिया || ६ ||
त्रिलोकी पुरली आहे |त्रैलोक्यजननी पहा |
तेचि हे तुळजामाता | भक्तांसी पाळिते सदा || ७ ||
वोळखी सांडिले बाळे | तिला तो सांडिता नये |
लोभेची पाळणे लागे | नाना देही भरोनिया || ८ ||
मात्रकुळ पित्रकुळ | सर्वांसी पाळिते सदा |
आद्यंत ठाउके आहे | कुळमुळाग्र सर्वही || ९ ||
उपजली वाढली कोठे | हिंडली फिरली किती |
भाग्यांचे करंटे जाले | मूर्ख वित्पन्न सर्वही || १० ||
विश्वाची साक्षिणी माता | विश्वमाता म्हणोनिया |
श्रीमंत करंटे तीने | रक्षिले पाळिले किती || ११ ||
तिचा लो लागला आहे | ज्ञाते हो समजा बरे |
शक्तीने चालतो देहो | शक्ती नस्ता देह पडे || १२ ||
जीणे तो लागले आहे | ज्ञाते हो समजा बरे |
शक्तीने चालतो देहो | शक्ती नस्ता देह पडे ||१३ ||
शक्ती ते सर्व शक्तीते | आदिशक्ती पुरातना |
दासासी पालटे लिला | ध्यानमूर्ती थासावली || १४ ||


सर्वत्र माता आपल्या बालकाला वाढवते .नुसतीच वाढवत नाही तर त्याच्या कल्याणासाठी अपरंपार कष्ट करते .त्याच्या हिताचे काय आहे याचाच विचार माता आपल्या मुलाबद्दल करत असते .
बालकाला बोलता येत नसते .त्याचे त्याला हित कशात आहे हे त्याला कळत नाही .हट्टी ,हेकेखोर असले ,बावळे असले तरी ते मातेला प्रियच असते .
ते बालक जरी अन्यायी ,अवगुणी ,खोडकर असले ,कुश्चीळ म्हणजे रोगट असले तरी तरी आई त्याचे सर्व दोष पोटात घेते .नागवे ,उघडे लोळले ,हागले ,ओकले ,तरी लोकांपुढे नेताना ती त्याला व्यवस्थितच नेते .मातेचा कळवळा वेगळाच असतो .तिच्या बालकाविषयीचा प्रेमाची तुलनाच नसते .तिला आळस नसतो ,ती दुस-या कोणावरही आपल्या बालकासाठी अवलंबून रहात नाही .ती त्या बालकाला कधीही कंटाळत नाही .
तसेच तुळजाभवानी चे आहे .त्रैलोक्य रुपी बालकाचे ती पालन करते .
त्यामुळेच अनेक कुलांची ती कुळदेवता आहे .ही त्रैलोक्य जननी त्रिलोकात भरून आहे ,ती सर्वांचे पालन करते आहे . तशीच ही तुळजामाता सर्वांचे पालन करते .
ज्याप्रमाणे मूल आईला विसरले तरी आई मुलाला विसरत नाही ,त्याप्रमाणे तुळजामाता आपल्या भक्तांना विसरत नाही .ती सर्वांचे प्रेमाने पालन करते .त्या भक्ताचे मातृकुल आणि पितृ कुळ सर्वांना उद्धरते . मातृकुळ पितृकूळ या सर्वांचे रक्षण करते .पितृ ,मातृ कुलातील सर्व लोक कोठे जन्मले ,कुठे वाढले ते तिला माहीत आहे .कुठे हिंडले आहेत ते तिला माहीत आहे .तीच  भाग्यवंतांना करंटे करते ,तर मूर्खांना विद्वानही बनवते .
ती विश्वमाता आहे .विश्वाकडे साक्षी भावाने पाहणारी माता आहे .तिचा लळा लागला आहे .हे ज्ञानी लोकांनो ही गोष्ट नीट समजून घ्या.
जन्म झाला म्हणजे जीवन जगावेच लागते पण ते जीवन जगण्यासाठी शक्ती लागते .ती शक्ती आदिशक्ती तुळजा माता आहे ती पुरातन आहे . ती अनेक प्रकारे तिच्या दासाला पाळते .ध्यानमूर्ती च्या रूपात समर्थ म्हणतात की तूळजा भवानी माझ्या मनात ठसली आहे .