रविवार, 21 जुलाई 2013

जगज्जोती जगदेश्वरी | धन्य लीला परमेश्वरी || धृ ||



जगज्जोती जगदेश्वरी | धन्य लीला परमेश्वरी || धृ ||
गावत नाचत बिकट बीराजत | बाज्जत गाज्जत धमक चाले |
सुरत पाख गुनी गन पाख | अकल पाख भली ||२ ||
परब्र्ह्मात जे स्फुरण झाले ,तीच मूळमाया .परब्रह्माच्या निश्चळ स्वरूपातील हालचाल म्हणजे वायू .वायूतील शुध्द जाणीव म्हणजे जगज्योती . वायू ,जाणीव ,जगज्योती यांच्या मेळ्याला मूळमाया म्हणतात .पुरुष आणि प्रकृती ही मूळमायेची नावे .वायूला प्रकृती आणि जगज्योती ला म्हणतात पुरुष .जाणीवेने म्हणजेच जगज्योतीने सजीव देहाचे रक्षण करतात .आपल्यावरचे संकट ओळखतात .आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात . म्हणूनच तिला जगदेश्वरी म्हणतात .त्या परमेश्वरीची लीळा अगाध आहे . अशा ह्या जगज्योतीला ह्या परमेश्वरीला वाजत गाजत घेऊन चला सुंदर अशा पाळण्यात तिला बसवा .





वोळली जगन्माता | काय उणे रे आता |
वैभव जात जाता | भक्त हाणती लाता || धृ ||
बोलले भूमंडळ | परिपूर्ण पाहतां |
राम आणि वरदायिनी | दोन्ही एकची पाहतां || १ ||
मनामाजी कळो आले | तेणे तुटली चिंता |
रामरूप त्रिभुवनी | चाले सर्वही सत्ता || २ ||
रामदास म्हणे माझे | जीणे सार्थक जाले |
देवोदेवी ओळखीता | रूप प्रत्यया आले || ३ ||
जगन्माता प्रसन्न झाली मग आता काय कमी आहे ? वैभव नाहीसे झाले ,इतरांनी ठोकरले ,तरी आता जगन्माता प्रसन्न झाल्यावर काय कमी ? सर्व भूमंडळातील लोक सर्व दृष्टीने विचार करून म्हणतात की राम आणि वरदायिनी एकच आहेत पुरुष आणि प्रकृती एकाच मूळमायेची दोन अंगे आहेत त्यांनाच गणेश आणि शारदा म्हणतात .गणेश ज्ञानमय तर शारदा शक्तिरूप आहे पण शेवटी ती परमेश्वराचीच शक्ती आहे . वरदायिनी त्या आदिमायेचेच रूप  आहे .म्हणूनच राम आणि वरदायिनी एकरूपच आहेत .  ईश्वर आणि शक्ती एकच असल्याचे ज्ञान झाले ,शंका नाहीशा झाल्या . मग आता कोणतीही रुखरुख .शंका नाही .हे सर्व मनाला पटले आहे त्यामुळे सर्व चिंता संपली आहे . त्या राम रुपाचीच सर्व सत्ता आहे या त्रिभुवनात श्रीरामांचीच सत्ता आहे .
श्री समर्थ रामदास म्हणतात माझ्या जीवनाचे सार्थक झाले .देव देवी यांचे स्वरूप ओळखताना पटले की दोन्ही एकच आहेत त्यांचे खरे स्वरूप प्रत्ययाला आले आहे नि:संदेह ज्ञान झाले .रामवरदायिनी ने माझ्यावर कृपा केल्याने माझा जन्म सार्थकी लागला असे समर्थ म्हणतात .

कथा कथनी वंदिली सरस्वती |



कथा कथनी वंदिली सरस्वती |
कथा कथनी वंदिली ||धृ ||
हंसवदनी वेदमाता |
चातुरानानाची दुहिता || १ ||
शब्दब्रह्माची निजलता |
कल्पतरू वाग्देवता || २ ||
ब्रह्मविद्येची निजाखाणी |
रामदासाची जननी || ३ ||
कथा सांगताना सरस्वतीला वंदन केले कारण सरस्वतीचे कृपा आशीर्वादाने मुकाही बोलायला लागतो ,माणसाच्या अंत:करणात परा ,पश्यंती ,मध्यमा या तीन वाणींनि जे स्फुरते ते प्रत्यक्ष शब्दात वैखरीने प्रगट होते . तीच शब्दांचे अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करून सांगते .शब्दांनेचे कथा सांगता येते म्हणून सगळे कर्तुत्व शारदेचे म्हणजे सरस्वतीचे असते .शारदा चतुराननाची कन्या म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या आहे ती वेदांची जननी आहे शारदा ही परमार्थाचे मूळ आहे .ती केवळ आत्मविद्या आहे ,ईश्वराची निवांत ,निर्मळ निश्चळ अवस्था आहे .
श्री समर्थांनी वर्णन केलेल्या चौदा ब्रह्मापैकी शब्द ब्रहम शारदा आहे परमात्म रुपाला मी आहे अशी जी शुध्द जाणीव झाली ती शारदा आहे .
शारदेचे स्वरूप  आकलन झाले की निर्गुणाची ओळखण होते व स्वस्वरूपाचा अनुभव येतो भगवंताच्या भक्तांची भक्ती ,अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणा-या ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिती ,जीवन मुक्तांची सायुज्यमुक्ती शारदा आहे म्हणून ती ब्रहमविद्येची निजाखाणी आहे .
अशी ही शारदा श्रीसमर्थांनी स्वत:ची जननी आहे असे म्हटले आहे .




तुळजामाता येऊ पाहते घरा
तुळजामाता येऊ पाहते घरा |
चौक भरा मोते फुलोरा |
शुध्द भावे दंडवत करा || धृ  ||
जाई जुई चंपक अंबई नाना पुष्पे ढीग ठाई ठाई |
सिंहासनी सुंदर तुकाई | | १ ||
केशर कस्तुरी चुवा चंदन |
गव्हेले कचोरे अगर बावन |
उद् गुलाल नरव रातांजन || २ ||
नाड्या पुड्या कुंकुम अबीर | जवादी पांच शुध्द कर्पूर |
सिलारस उदबत्या थोर || ३ ||
पाने फुले सुगंध तेले |
गर्द माजे एकत्र आले |
सुवास घेता चित्त निवाले || ४ ||
दवणा मोरुवा कुसुंबा कुंवा |
पूजिली अंबा अंबा जगदंबा |
पुष्प माला लंबा कदंबा || ५ ||
सांगोपांगे यंग उपांग |
चटक्या चंग चंग मृदांग |
माज रंग रंग सुरंग || ६ ||
आंतर्येक शरीर दोनी |
दास म्हणे धन्य भोवानी |
निजपद देते भक्तालागून || ७ ||
तुळजामाता घरी येत आहे .तिचं स्वागत करा .घराच्या अंगणात रांगोळ्या काढा [चौक भरा ] मोत्यांनी ,फुलांनी त्या रांगोळ्या सजवा ,फुलांच्या हारांनी सर्व सुशोभित करा .शुध्द भावांनी दंडवत घाला ,नमस्कार करा .जाई ,जुई ,चाफा ,अंबई [एक फुल ] या फुलांनी तिचं सिंहासन सजवा .सिंहासनी तुकाई विराजमान करा
केशर ,कस्तुरी ,चुवा [चंदनाच्या लाकडापासून केलेला सुगंधी पदार्थ ] ,चंदन अशा सुगंधी द्रव्यांचा लेप तिला द्या .गव्हले ,कचोरे ,अगर [सुगंधी पदार्थ ] , बावन [उत्तम चंदन ] उद् ,गुलाल ,सुगंधी पदार्थ लावा .
नाड्या [अबीर ,गुलाल ,बुक्का ई . ची रंगीत दो-याने बांधलेली पुडी ],पांच धान्ये ,शुध्द कापूर ,सिलारस [एक औषधी पदार्थ ] ,उदबत्या ,पाने ,फुले ,सुगंधी तेले ,ह्या सगळ्याचा एकत्र सुवास आला .सुवास घेतल्यावर मन निवते .
दवणा ,मोरुवा ,कुसुंबा [सुगंधी वनस्पती ], कुंवा [एक सुगंधी वृक्ष ] या सर्व सुगंधी पदार्थांनी वातावरण सुगंधी होऊन जाईल .अशा सुगंधी अवस्थेत अंबेला ,जगदंबेला पूजले पुष्पमाळा लावल्या कदंबाच्या फांद्या लावल्या
समग्र तयारी केली .चटक्या [चंग वाद्य वाजवणारा ], चंग [बासरी सारखे वाद्य ] ,मृदुंग वाद्य वाजवली की खूप आनंद मिळतो .दोन्ही शरीरे ,माझे ,देवीचे जरी भिन्न असली तरी अंतरे एकच आहेत ,समर्थ म्हणतात भवानी धन्य आहे .भक्ताला निजपद देते .भवानी मला तिच्या जवळ जागा देते .