शनिवार, 12 फ़रवरी 2011

आनंदवन भुवनी समर्थांचे पूर्ण झालेले स्वप्न

भक्तांसी रक्षिले मागे | आतां ही रक्षिते पहा |

भक्तांसी दिधले सर्वै | आनंदवनभुवनी ||४३ ||

आरोग्य जाहाली काया | वैभवे सांडिली सीमा |

सार सर्वस्व देवाचे | आनंदवनभुवनी ||४४ ||

देव सर्वस्व भक्तांचा | देव भक्त दुजे नसे |

संदेह तुटला मोठा | आनंदवनभुवनी ||४५ ||

देव भक्त येक जाले |मिळाले सर्व जीव ही |

संतोष पावले तेथे | आनंदवनभुवनी ||४६ ||

सामर्थ्ये यशकीर्तीची | प्रतापे सांडिली सीमा |

ब्रीदेंची दिधली सर्वे | आनंदवनभुवनी ||४७ ||

राम कर्ता राम भोक्ता | रामराज्य भूमंडळी |

सर्वस्व मीच देवांचा |माझा देव कसा म्हणों || ४८ ||

हेंच शोधूनी पहावे |राहावे निश्चळी सदा |

सार्थक श्रवणे होते | आनंदवनभुवनी ||४९ ||

वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |

कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

गीत सगीत सामर्थ्ये | वाद्य कल्लोळ उठिला |

मिळाले सर्व अर्थार्थी | आनंदवनभुवनी ||५१ ||

वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |

आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |

कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती |

सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |

ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |

पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |

काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी |

विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |

वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

जय जय रघुवीर समर्थ !

आदीमाया आदिशक्ती भक्तांचे सतत रक्षण करते तसे ती आताही करेल असा विश्वास समर्थांना वाटतो .शक्तीच्या उपासनेने शारीरिक आरोग्य तर मिळतेच ,त्याबरोबर वैभवही मिळते .आदिमाया आदिशक्ती देवाचे सार सर्वस्व आहे कारण तिच्यामुळेच हे प्रचंड विश्व उभारता आले .

देव भक्तांचा सर्वस्व असतो कारण देव आणि भक्त एकच असतात .त्यांच्या मध्ये भिन्नत्व नसतेच .देवांचे सामर्थ्य ,वैभव भक्तांना मिळते .त्यांच्या एकत्वाविषयी संशय नसतो .

जसे देव भक्तात ऐक्य असते तसे भक्त भक्तात ही ऐक्य असते .एकाच देवाची भक्ती करणा-या भक्तांत ही ऐक्य असते .आपले जिवलग भेटल्याचा आनंद वाटतो .

भक्ता भाक्तांतील ऐक्यात सामर्थ्य निर्माण होते .जीवाला जीव देणारे भक्त असतात .त्यामुळे ते संतुष्ट होतात

देव भक्त आणि भक्त भक्त यांच्या ऐक्यामुळे सामर्थ्य ,यश ,कीर्ती ,प्रताप निर्माण होतो .आणि मग अवर्णनीय पराक्रम निर्माण होतो .भक्त यश कीर्ती पराक्रम प्राप्त करून घेतात ,त्या ऐक्यातून महाशक्ती निर्माण होते व देव कार्य समर्थ पणे चालू राहते .

भगवंत षडगुणैश्वर्य संपन्न आहे कारण त्याला दुष्टांचा विनाश ,सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना ही तीन कार्य करायची असतात .

तीन कार्य करणाराही तोच आहे आणि त्या कार्याचे फळ भोगणारा ही तोच आहे .देव ,भक्त ,भक्त आणि भक्त हे सर्व एकरूप झाले की रामराज्य येते अशी समर्थांची कल्पना होती .असे रामराज्य शिवराय देतील अशी त्यांना खात्री होती .कारण लोकसंग्रह शिवरायांनी केला .अठरा पगड जातींमधून माणसे गोळा केली आणि स्वराज्य स्थापनेची ईर्षा त्यांनी निर्माण केली .देव देश आणि धर्म याविषयी अभिमान लोकांमध्ये निर्माण केला .

पूजा अर्चा फक्त करणे ,कर्मठपणे वागणे ही भक्ती नाही हां विचार समर्थांनी मांडला .निश्चल अविनाशी रामाच्या ठिकाणी मन निश्चल ठेवणे म्हणजे भक्ती असे समर्थ सांगतात .