समास ६
शिष्या परम गुह्य ज्ञान | जेणे घडे समाधान |
ऐसे मागे निवेदन | तुज केले ||१ ||
तेचि निरुपण |अभ्यांतरी क्लुप्त होता |
आशंकेसी सर्वथा | उरी नाही ||२ ||
आता असो प्रस्तुत | देहास मांडला अंत |
तेव्हा साधके निवांत |काय धरावे || ३ ||
निरावलंबी चित्त न्यावे | तरी ते राहीना स्वभावे |
आणि ऐक्याच्या नावे | शून्य जाले ||४ ||
निरावलंबीचे साधन | देह असला सावधान |
केले पाहिजे समाधान | संत संगे विवेके ||५ ||
अनुसंधान अंतकाळी | कैसे राहेल ते निर्मळी |
अनुसंधान्मिसे जवळी | मीपण उठे ||६ ||
एवं स्वरूपानुसंधान |अंतकाळी न घडे जाण |
आता करावे ध्यान | सगुण मूर्तीचे ||७ ||
ध्यानासी कारण चित्त | ते चित्त होय दुश्चित्त |
कैसे घडे सावचित्त |ध्यान अंती ||८ ||
आता करावे रामचिंतन | तरी वासना धरी पंचध्यान|
प्रपंची गुंतले मन | ते सुटले पाहिजे ||९ ||
पाडोनी कूपा भीतरी | प्राणी नाना विचार करी ||१० ||
तैसे मन हे गुंतले | वासना विषयी नेले |
वरि वरि नाम स्मरले | त्याचे कोण काज ||११ ||
तरी आता काय करावे |कोण्या उपावे तारावे |
ते चि आता स्वभावे |सांगिजेल ||१२ ||
दीनदयाळ गुरुराव | पूर्वीच सूचला उपाव |
अंती चळे अंतर्भाव | म्हणोनिया ||१३ ||
तरी त्या उपावाची खूण | केली पाहिजे श्रवण |
उपाव रचिला कोण |सद्गुरुनाथे ||१४ ||
ऐका उपायाचे वर्म |दृढ लाविला नित्यनेम |
हाची उपाय परम | अंतसमई ||१५ ||
शिष्या ,तुला मी गुह्य ज्ञान दिले ,तुला समाधान दिले .आता तुझा असा प्रश्न आहे की अंतसमयी साधकाने काय करावे ?ते आता सांगतो
समर्थ म्हणतात निरावलंबी चित्त न्यावे म्हणजे अवलंबन नसणारे जे परम गुह्य परब्रह्म त्याच्याकडे चित्त ठेवावे ..पण ते चित्त तेथे रहात नाही .चित्ताचे वस्तूशी ऐक्य रहात नाही .त्यासाठी देह सावधान असला पाहिजे .संत संग केला पाहिजे .संत संगातून ,श्रवणातून आशंका फिटतात .मन शांत होते ,चित्त समाधान पावते .
पून्हा शिष्य विचारतो ,’अंतकाळी निर्मळी ,म्हणजे परब्र्ह्माशी अनुसंधान कसे राहील ? कारण अनुसंधान करण्याच्या निमित्ताने मी पण वाढते .मग स्वरूपानुसंधान अंतकाळी घडत नाही मग आता काय करावे ? सगुण मूर्तीचे ध्यान करावे .सगुण मूर्तीचे भजन केले तर परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होते .सगुण भजनातून देहबुद्धी आपोआप क्षीण होते .मीपणाचा ,देहबुद्धीचा विसर पडतो .सगुणाच्या निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते .ध्यानाची पराकाष्ठा झाली दिव्य प्रेम निर्माण होते प्रेमाने संपूर्ण आत्मनिवेदन होते .व भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो .
पण ध्यान चित्ताने घडते .चित्त दु:श्चीत्त होते मग ते चित्त सावधान कसे होईल ?
जर रामचिंतन करावे म्हटले तर वासना ध्यानाचा ताबा घेतात .प्रपंचात गुंतलेले मन आता कसे सोडायचे विहिरीमध्ये पडलेला जीव काही विचार केल्याशिवाय ,प्रयत्न केल्याशिवाय बाहेर कसा पडेल ? आता कोणता उपाय सुचला ते समर्थ सांगतात .
त्या उपायाचे एकच वर्म आहे तो म्हणजे नित्यनेम .