शुक्रवार, 27 मई 2011

अंतर्भाव समास ५


अंतर्भाव

समास ५

ऐक शिष्या सावधान | येकाग्र करुनिया मन |

तुवां पुसिले अनुसंधान \ अंत समयीचे ||१||

तरी अंत कोणासी आला | कोण मृत्याते पावला |

हा तुवां विचार केला |पाहिजे आता ||२||

अंत आत्म्याच्या माथा | हे तो न घडे सर्वथा |

सस्वरूपी मरणाची वार्ता | बोलोंचि नये | |३||

स्वरूपी तो अंत नाही | येथे पाहणे न लगे काही |

मृगजळाच्या डोही | बुडो चि नको ||४ ||

आतां मृत्य देहासी घडे | तरी ते अचेतन बापुडे |

शवास मृत्यू न घडे | कदा कल्पांती ||५||

आता मृत्य कोठे आहे | बरे शोधूनि पाहे |

शिष्य विस्मित होऊनि राहे | क्षण येक निवांत ||६||

मग पाहे स्वामीकडे | म्हणे हा देह कैसा पडे |

चालविता कोणीकडे | निघोनी गेला ||७ ||

देह चालवितो कोण | हे मज सांगावी खूण |

येरू म्हणे हा प्राण | पंचकरूप ||८||

प्राणास कोणाची सत्ता | येरू म्हणे स्वरूप सत्ता |

सत्ता रूपे तत्वता | माया जाण ||९||

मायेची माईक स्थिती | ऐसे सर्वत्र बोलती |

माया पाहातां आदी अंती | कोठेची नाही ||१०||

अज्ञानासी भ्रांति आली |तेणे दृष्टी तरळली |

तेणे गुणे आडळली | नस्ती च माया ||११||

शिष्या होई सावचित्त | मायेचा जो शुध्द प्रांत |

तोचि चौदेहाचा अंत | सद्गुरू बोधे ||१२||

चत्वार देहाच्या अंती | उरली शुध्द स्वरूप स्थिती |

तेणे गुणे तुझी प्राप्ती |तुजसी झाली ||१३||

जन्मला चि नाही अनंत | तयास कैचा येईल अंत |

आदि अंती निवांत | तो चि तू आप घा ||१४ ||

स्वामी म्हणती शिष्यासी |आता संदेह धरिसी |

तरी श्रीमुखावरी खासी | निश्चयेसी ||१५ ||

देह्बुध्दिचेनी बळे |शुध्द ज्ञान ते झांकोळे |

भ्रांती हृदयी प्रबळे | संदेह रूप ||१६ ||

म्हणोनि देहातीत ते सुख | त्याचा करावा विवेक |

तेणे गुणे अविवेक |बाधू न शके ||१७ ||

तुटले संशयाचे मूळ |फिटले भ्रांतीचे पडळ |

तयास अंत केवळ | मूर्खपणे भ्रांती ||१८ ||

जे जन्मलेची नाही |त्यासी मृत्यू चिंतीसी कायी |

मृगजळाचा डोही |बुडोची नको ||१९||

मनाचा करूनी जयो |याचा करावा निश्चयो |

दृढ निश्चये अंत समयो |होऊनि गेला ||२० ||

आदि करूनी देहबुद्धी | देह टाकीला प्रारब्धी |

आपण देहाचा संबंधी | मुळीच नाही ||२१ ||

अस्ते करुनी वाव |नस्त्याचा पुसूनी ठाव |

देहातीत अंतर्भाव |अस्ते खुणेने असावे ||२२ ||

हे समाधान उत्तम | अस्तेपणाचे जे वर्म |

देहबुद्धीचे कर्म |तुटो जाणे ||२३ ||

आता तुटली आशंका | मार्ग फुटला विवेका |

अद्वैत बोधे रंका राज्यपद ||२४||

तंव शिष्ये आक्षेपिले |आता स्वामी दृढ झाले |

तरी हे ऐसे चि बाणले |पाहिजे की ||२५ ||

निरूपणी वृत्ती गळे |शुध्द ज्ञान प्रबळे |

उठोनी जाता स्वयेची मावळे | वृत्ती मागुती ||२६ ||

सांगा यासी काय करू | मज सर्वथा न धरे धीरू |

ऐका सावध विचारू | पुढिलीये समासी ||२७ ||

शिष्याने समर्थांना करुणेने प्रश्न विचारला की मी कोणाचे अनुसंधान अंतसमयी

ठेवू ?अंतसमयी मी माझे समाधान कसे टिकवू ?

समर्थ उत्तर देतात :

हे शिष्या ,एकाग्रतेने ऐक .अंतसमयी अनुसंधान कसे ठेवू असे तू विचारतो आहेस .तू

विचार कर अंत कोणाचा झाला ? मृत्यू कोण पावला ? तुला आत्म्याचा अंत वाटत

असेल तर अरे ,आत्म्याचा अंत होत नसतो आत्मा स्वरूप रूप असतो त्याचा कधीच

अंत होत नाही .स्वरूपाचा अंत ही कल्पना करणे म्हणजे मृगजळाच्या मागे लागण्या

सारखे आहे .,खोटी आहे .

मृत्यू देहाला आहे असे मानावे तर ते गरीब बिचारे अचेतन आहे .त्यामुळे शवाला मृत्यू

झाला असे मानणे योग्य होणार नाही .मग आता मृत्यू कोणाला होतो ,तो कोठे असतो

ते शोधून पहा . हे ऐकल्यावर शिष्य आश्चर्य चकित होऊन एक क्षण पहात राहिला

.मग समर्थांना विचारतो ,आत्म्याला मृत्यू नाही ,देहाला मृत्यू नाही ,मग हा देह का

पडतो ? त्याला चालवणारा कोठे निघून जातो ? हा देह कोण चालवतो तो कसा

असतो ?त्याची खूण कृपा करून महाराज ,मला सांगावी .

एक जण म्हणतो ,हा प्राण पंचक रूप आहे शरीरात पंचप्राण आहेत .या प्राणांवर

कोणाची सत्ता असते ? एक जण म्हणतो स्वरूप सत्ता स्वरूपाची सत्ता म्हणजे

मायेची सत्ता .माया स्वरूपाची शक्ती .तिचीच सत्ता सर्वत्र चालते .तिच्या सत्तेनेच हे

विश्व चालते .परंतु माया मायिक आहे असे सर्व म्हणतात .कारण ती आपल्याला

दिसत नाही .पण तिचे परिणाम मात्र दिसतात .

अज्ञानी माणसाला भ्रम होतो .त्याची दृष्टी तरळते ,तिला योग्य दिसत नाही त्यामुळे

तिला नसलेली माया आढळते .

परब्रह्माला जे पहिले स्फुरण झाले ,मी एक आहे ,अनेक व्हावे तीच शुध्द माया .ही

माया जशी माणसाला अज्ञानात भरकट ठेवते ,तसे त्याला शुध्द आत्मस्वरूपाकडे ही

नेते .

हे शिष्या ,सावध हो ,तू मायेचे शुध्द स्वरूप स्थिती पाहिलीस तर तुला या चार देहाचा

निरास करता येईल जेव्हा तू या चारही देहांच्या पलीकडे जाशील तेव्हा तू स्वरूप

स्थितीला जाशील .तेव्हा तुला तुझी प्राप्ती होईल .म्हणजे स्वरूप स्थिती हेच तुझे खरे

रूप आहे .हे सर्व तुला सद्गुरूंच्या बोधामृतानेच कळणे शक्य होईल .

तू स्वरूपात लीन होशील .तुला तुझी स्थिती प्राप्त होईल आणि मग तू अनादी अनंत

अजन्मा असे स्वस्वरूप होशील .मग तुला जन्म आणि मृत्यू कसा असेल ? तो

विश्वाच्या आधीही होता ,नंतरही असणार आहे त्यामुळे त्याला अंत नाही तू

स्वस्वरूपात विलीन झाल्यामुळे तूही स्वस्वरूपच होशील मग तुला अंत कसा ? तुला

जन्म कसा ? तू अजन्माच आहेस .तू अनादी अनंत आहेस .आता तुला काही शंका

आहे का ? आता तू शंका घेतलीस तर मात्र थोबाडीत मारून घेण्याची अवस्था तुझी

होईल .

सदेह ,शंका घेतलीस तर तुझी देहबुद्धी वाढेल .तू स्वस्वरूप आहेस हे तुला झालेले

शुध्द ज्ञान झाकोळून जाईल .तुझ्या मनात भ्रम उत्पन्न होईल .तुझ्या स्वस्वरूपाच्या

ज्ञानाला अज्ञानाने झाकून टाकायला नको असेल तर तू विवेक कर .देहबुद्धी सोडून

देहातीत होण्यात जे सूख आहे त्याचा विवेक कर .तसे केलेस तर अविवेक तुझ्यावर

काही परिणाम करू शकणार नाही .

देहातीत म्हणजे मी देह आहे हा विचार न करता मी आत्मा आहे ,मला सुख दु:ख

नाही ,मला राग लोभ नाही ,असा विवेक केला तर तुला कोणतेही दु:ख ,कोणतीही

भावना बाधू शकणार नाही .कोणताही संशय तुला बाहू शकणार नाही .तुझा सगळा

भ्रम नाहीसा होईल .तुझ्या स्वस्वरूपाला अंत आहे हा भ्रम नाहीसा होईल .

त्यामुळे हे शिष्या ,तू अनादी अनंत अजन्मा असल्यामुळे तुला जन्मही नाही ,मृत्युही

नाही .तू तुझ्या जन्म मृत्युची खुळी कल्पना करू नकोस .मृगजळाच्या मागे धावू

नकोस .

मनाशी हे पक्के ठरवं ,की तू स्वस्वरूपच आहेस .दृढ निश्चय कर की तुला जन्म

मृत्यू नाही .देहबुद्धी सोड ,या स्थूल देहाला प्रारब्धावर सोडून दे .तुझा आणि या स्थूल

देहाचा काही संबध नाही याचा दृढ निश्चय कर .मी आत्मा आहे या आहे पणाचा भाव

वाढवं आणि मी देह नाही हा नाही पणाचा भाव वाढवं .असे केलेस तर तुझे समाधान

तुला देहबुद्धी वाढवू देणार नाही .

आता तुझी शंका फिटली .विवेक अंगी रुजला .या अद्वैत बोधाने भिका-याला ही

राजपद मिळते .

यावर शिष्य म्हणतो ,महाराज ,मला अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली पण हे ज्ञान अंगी

बाणले पाहिजे ..निरुपण ऐकताना वृत्ती पसरत नाहीत .ताब्यात असतात .शुध्द

ज्ञानाचा अंमल असतो .पण निरुपण संपले की पून्हा ये रे माझ्या मागल्या अशी गत

होते .,याला काय करू ? महाराज ,मला आता धीर निघत नाही .कृपा करून मला

मार्गदर्शन करा .