सोमवार, 7 मई 2012

समर्थ कल्याण संवाद



                                                                   
समर्थ कल्याण संवाद




सांग बा कल्याणा तुझी स्थिती मज आता |
कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा ||धृ ||
उपदेशिले ज्ञान ते तुझे अंतरी आले |
भेदबुद्धी सर्वही गेली संशय मावळले |
देहे स्मृतीचा लोप जाला कोण मी कळले |
ऐसा प्रत्यय जाला की नाही ते सांग ये वेळे ||१||
स्वप्न अवस्था निरसुनि बोध जागृत जाले की |
भजनमुद्रा भक्ती कळा निज वोळखिले की |
सद्गुरू महिमा ऐसे जाणूनी सुरती भोगिले की |
मोहो जाउनी निजस्मृती प्रतीती बाणली की ||२||
वृत्ती निश्चळ होती किंवा चंचळ हे जाली |
पाहुनी स्वरुपालागी तटस्थ होऊनि का इतुक्या |
माजी येक प्रत्यय सांग ये वेळी ||३||
ते देह की आत्मा होय कोण मज सांग |
बध्द मुक्त कोण कोणा वासनेचा भोग |
कैशी स्थिती पाहुनी सेविसी श्रीरंग |
रामदासी प्रश्न केला निज अभंग ||४||


समर्थ कल्याणाला विचारतात ,कल्याणा ,तुझी स्थिती आता कशी आहे ते तू मला सांग .तू रघुनाथा बरोबर कोणत्या योगाने ,कोणत्या मार्गाने ऐक्य साधलेस ?
तुला ज्या ज्ञानाचा उपदेश केला ,ते तुझ्या अंतरात साठले का ?
मी तू हा तुझ्यातला भेद नाहीसा झाला का ? तुझे सगळे संशय मावळले का ? तुझी देहबुद्धी नाहीशी होऊन तुझ्या देहबुद्धीचा म्हणजे मी देह आहे या बुद्धीचा लोप झाला का ? मी कोण हे तुझे तुला कळले का ? मी म्हणजे चैतन्य ,मी म्हणजे आत्मा आसा तुला प्रत्यय आला का ? मला सांग तुला प्रत्यय आला का ? .
स्वप्न अवस्था म्हणजे अज्ञानावस्था निरसन होऊन तुझा बोध जागृत झाला का ?भजन मुद्रा ,भक्ती या सगळ्या गोष्टी तू ओळखल्यास का ?तू सद्गुरुंचा महिमा जाणलास का ? तुझा मोह नाहीसा होऊन तुझी निजस्मृती म्हणजे तुझी स्वरूपस्थिती तुझ्या मनात बाणली का ?
तू स्वरूपाला तटस्थ होऊन पाहिलस तेव्हाचा एक तरी अनुभव मला सांग .मला सांग की तू देह आहेस की आत्मा तू बध्द आहेस की मुक्त ,की तुझ्या वासनेचा भोग आहे ?तू कशा स्थितीत ,बध्द ,मुक्त की वासना युक्त स्थितीने श्रीरंग भगवंत पाहिलेस ? असा प्रश्न समर्थ रामदास कल्याण स्वामींना विचारतात
















समर्थ कल्याण संवाद

                                                     
                                                             समर्थ कल्याण संवाद



ऐक बा कल्याणा हित उपदेश |
प्राप्त जाहले रहस्य जे कां तूज ||१ ||
तेथे राही सदा न करी तत्वबोधा |
जनाचिया वादा न प्रवर्ते || 2||
श्रद्धावान पात्र जे भेटती तुज |
त्यांसी सांग गुज श्रीरामाची ||3||
देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी |
तयाचिये कानी स्वप्नी नको ||4||
नको त्या दुष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी |
पडेल तुझी तुटी श्रीरामाशी ||5||
श्रीरामाशी तुज न हो वेगळीक |
मानावे स्वसुख योगस्थिती ||6||
योगस्थिती आता गुप्त आहे बापा |
नको सांगू अल्पा देह्बुध्दिते ||7||
देहबुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी |
वाया हे वैखरी वेचूं नको ||8||
निमिष्यभरी होउं नको स्वरुपावेगळा |
अंतरशील रामाला जनायोगे ||9||
अनुभवी संताशी करी बा संवाद |
रामदासी बोधू कल्याणाते ||10||

समर्थ कल्याणाला सांगतात की ,कल्याणा ,मी तुझ्या हिताचा उपदेश करतो आहे ,तो ऐक .तुला जे रहस्य माहिती झाले आहे तेथेच तू रहा .लोकांच्या वादामध्ये तू पडू नकोस .


समर्थांनी कल्याण स्वामींना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता .त्यासाठी पुढील ओवीमध्ये समर्थ सूचना करतात : जो श्रध्दावान आहे ,त्याला श्रीरामांचे गुप्त रहस्य सांग .


पण ज्यांची देहबुद्धी वाढलेली असेल पण ज्यांना शब्दज्ञान आहे ,त्यांना काहीही सांगू नकोस कारण त्यांच्यावर खर्च केलेला वेळ वाया जाणारा आहे .तुझा श्रीरामांशी असलेला संपर्क तुटेल ..


श्रीरामाशी तुझी वेगळीक झाली नसताना तुला जे सुख मिळेल ते तू घालवू नकोस .ते तुझ्या साठी योगस्थिती असेल .योग म्हणजे एकत्र येणे .तू आणि श्रीराम यांच्यात जर ऐक्य झाले तर ती स्थिती तुझ्यासाठी असामान्य असेल ,अलौकिक असेल .ही योगस्थिती कोणाला सांगू नको ,कारण ती गुप्त आहे ,कोणाला न कळणारी आहे .सामान्यांना त्यांचा अनुभव न येणारी आहे .म्हणून देहबुद्धीच्या प्राण्यांशी तू बोलू ही नकोस .तुझे बोलणे वाया घालवू नकोस .


एक क्षणभर सुध्दा तू स्वरूपावेगळा होऊ नकोस .सतत सद्वस्तु च्या अनुसंधानात रहा .सद्वस्तूचाच निदिध्यास ठेव . त्याच्या विषयीच श्रवण कर ,त्याचेच मनन कर .असे केले नाहीस तर श्रीरामाला अंतरशील .त्याच्यासाठी काय कर ते तुला सांगतो ,


अनुभवी संताबरोबर संवाद कर सत्संग धरलास वासनांचा क्षय होईल .तू मोक्षाचा अधिकारी होशील .सत्संगाने तुझ्यात भाव भक्ती जागी होईल .सत्संगाने जे श्रवण करशील ते कृतीत आण .सर्वात हितकारी संवाद आहे उगमाचा उगम म्हणजे ब्रह्म ! परब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेचा उगम होतो .मायेचा प्रांत ओलांडून परब्रह्मा पर्यंत पोचायचे असते . हा ब्रह्मविचार गुरु शिष्य ,मुमुक्षु आणि अनुभवी संत यांच्यातच होतो ,ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे


मग तया बोधाचेनि माजे
नाचती संवादसुखाची भोजे
आता एकमेकां घेणे दीजे
बोधचि परी


असे हे गुरुशिष्य ,मुमुक्षु संत हे सर्व एकमेकांना फक्त ज्ञान च देतात ,त्यात दंभ ,अहंकार ,नसतो .तो वादविवादा पासून अलिप्त असतो .म्हणून हे कल्याणा ,तू फक्त संतांशीच संवाद कर .