मंगलवार, 4 फ़रवरी 2014

तुळजा भवानी स्तोत्र







देखिली तुळजामाता | निवालो अंतरी सुखे |
तुटली सर्वही चिंता | थोर आधार वाटला || १ ||
संसार पाहता मागे | पाळिले सर्वही कुळा |
प्रस्तुत प्रत्ययो आला | रक्षिते बहुतापरी || २ ||
पुर्विती कामना सर्वे | इच्छा पूर्ण मनोगते |
धन्य हा देव लोभाळू | सांभाळ करितो सदा || ३ ||
आघात संकटे वारी | निवारी दुष्ट दुर्जना |
संकटी भर्वसा मोठा | तत्काळ काम होतसे || ४ ||
लालची चुकती वेडे | कृपाळू जननी खरी |
लक्ष की कोटी अन्याये | बहुत क्षमिले खरे || ५ ||
वन्ही हो सर्प हो विंचू | बाळकू घेतसे बरे |
सर्वही चुकावी माता | पोर लाबाड नेणते || ६ ||
लोभाळू बायका माया | त्यामध्ये  मुख्य जन्ननी |
बाळका वाढवी माता | मातेला मुख्य जन्ननी || ७ ||
सर्वही बाळके जीची | त्रैलोक्य जननी पहा |
साक्षणी सर्व लोभाळू | मर्यादा कोण रे करी || ८ ||
अनंतरूपीणी माया | काया रक्षी परोपरी |
विचित्र महिमा आहे | कळला न वाचे कदा || ९ ||
सर्वांचे मूळ हे माया | मूळमाया म्हणोनिया |
सृष्टीची आदिशक्ती हे | आदिशक्ती म्हणोनिया || १० ||
राम उपासना आहे | हे रामवरदायिनी |
सख्य चालते सर्वै | प्रवृत्तीनिवृत्तीकडे || ११ ||


ह्या तुळजामातेला पाहून मनाला अत्यंत सुख झाले .सगळी चिंता तुटली .खूप मोठा आधार मिळाला  असे वाटले .वाडवडीलांचे पाहीले तर असे दिसून आले आमच्या सर्व कुलाला ह्या तुळजामातेने तारून नेले आहे .आमचे रक्षण केले आहे .असा प्रत्यय आला आहे .सगळ्या इच्छा देवीने पूर्ण केल्या आहेत .रामवरदायिनी स्तोत्रात आपण पाहिले आहे की समर्थांनी पाहिलेले संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न देवीने पूर्ण केले .ही देवी लोभाळू ,भक्तांवर लोभ करणारी आहे .त्यामुळेच ती सर्वांचा सांभाळ करते .तिच्या कृपेनेच सर्व आघातांपासून ,संकटापासून रक्षण करते ,दुष्ट दुर्जनांचे निर्दालन करते .तिच्यावर भरवसा  ठेवला तर भक्तांचे काम तात्काळ होते .लालची ,हावरट लोक चुकतात पण ही तुळजा देवी इतकी कृपाळू आहे की  लक्ष लक्ष ,कोटी  अपराध ती क्षमा करते .अग्नी ,साप ,विंचू यासारखी संकटे म्हणजे संसारातील सर्व संकटे आली तरी तिच्या कृपेने ती नाहीशी होतात .आपल्याला त्यांचा त्रास जाणवत नाही .लहान बाळाला ज्याप्रमाणे नेणते पणे म्हणजे अज्ञाना मुळे ,न समजल्यामुळे संकटे आली तर त्याची माता त्याला उचलून घेते आणि रक्षण करते ,तशी तुळजा भवानी भक्तांचा सर्व संकटातून बाहेर काढते .
बायका सर्व साधारण पणे लोभाळू असतात ,त्याप्रमाणे ही जगजननी असते .ती या त्रेलोक्याची आई आहे .सर्व सजीव प्राणी ,तिचीच लेकरे असतात .ती अनंत रूपात येऊन रक्षण करते .तिचा महिमा अगाध आहे .तो कोणालाही अजून समजला नाही.
ती सर्वांचे मूळ आहे म्हणून तिला मूळमाया म्हणतात .कारण या सृष्टीची ती आदिशक्ती आहे .हे दृश्य विश्व आकारात येण्यास तीच कारण आहे .
हे रामवरदायिनी , माझी राम उपासना चालते .प्रवृत्ती ,निवृत्ति कडे सर्वत्र उपासना चालते .