गुरुवार, 2 सितंबर 2010

रविवारची सवायी

नाम जेजुरीगड सुंदर । तेथे नांदे म्हाळसावर ।
संगे भैरवगण अपार । पूर्ण अवतार शिवाचा । । १
पीत अश्वावरी स्वार । हाती घेऊनी तलवार ।
करी मणिमल्ल संहार । करी उध्दार जगाचा । । २
चंपाषश्ठीचा उत्सव थोर । यात्रा मिळती अपार ।
येळकोट नामाचा गजर । भक्त आनंदे करिताती । । ३
दास म्हणे रामराव । राम तोचि खंडेराव ।
जेथे भाव तेथे देव । लक्ष पायी जडलिया । । ४
म्हणावा जयजय राम !
सुंदर जेजुरी गडावर म्हाळसापति खंडेराव नांदतो आहे .तो शिवाचा अवतार असल्यामुळे शिव शंकरांचे भैरव गण ही बरोबर आहेत .पिवळ्या घोड्यावर स्वार होउन ,हातात तलवार घेऊन मणिमल्लाचा राक्षसाचा संहार करून त्याच्या पासून लोकांचे रक्षण केले .जगाचा उध्दार केला ।
कृत युगात दैत्य उन्मत्त झाले .त्यांनी मुनींवर हल्ले चढवले .सर्व देवांनी शंकरांकडे धाव घेतली .महादेवांनी मल्हारी मार्तंडाचे अक्राळ विक्राळ रूप घेतले .मणी दैत्या बरोबर युध्द पुकारले .मणीच्या छातीवर त्रिशूलाचा प्रहार केला .तो मूर्छित पडला ,सावध झाला व पुन्हा युध्द करू लागला .महादेवांनी शक्तिशाली ब्रह्मास्त्र फेकून त्याला मूर्छित केले। त्रिशूल फेकले आणि भूमीवर पाडले .मणी दैत्य शरण आला .आणि मला जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे .मला मुक्ती दे । असा वर मागुन घेतला .देवाने तथास्तु म्हटले .मणीचा पुतळा आजही खंडेरायाच्या मूळ देवळा समोर हात जोडून उभा आहे .मणी चा भाऊ मल्लासूर भावाच्या वधाच्या सूडाने पेटला .त्याने जोरात युध्दाला सुरुवात केली .मार्तंडाने त्रिशूल फेकून त्याला धरणीवर पाडले .मल्लासूर नतमस्तक झाला .त्याने प्रभूंना विनंती केली - तुमच्या आधी माझे नाव यावे .देव तथास्तु म्हणाले .तेव्हा पासून मार्तंडाला मल्हारी मार्तंड म्हणतात ।
चंपाषष्ठी चा खूप मोठा उत्सव जेजुरी गडावर भरतो ,खुप मोठी यात्रा भरते .येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर होतो .समर्थ रामदास म्हणतात की श्रीराम म्हणजेच खंडेराव आहे .समर्थांना सर्वत्र श्रीराम च दिसत असल्यामुळे खंडोबा ठिकाणी श्रीरामच आहेत असे समर्थ म्हणतात .जेव्हा दैवताच्या ठिकाणी मन जड़लेले असते तेव्हा जो भाव असतो तसा देव आपल्याला भेटतो .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें