सोमवार, 23 जून 2014

श्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी

श्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी

सदा आनंदभरित | रंगसाहित्य संगीत || १ ||
जगदात्मा जगदेश्वरी | जगज्जोती जगदोध्दारी || २ ||
जिच्या वैभवाचे लोक | हरिहर ब्रह्मादिक || ३ ||
बहु राजे राजेश्वर | सर्व तुझेची किंकर ||  ४ ||
वसे आकाशी पाताळी | सर्वकाळी तिन्हीताळी || ५ ||
सर्व देह हालविते |  चालविते बोलविते || ६ ||
मूळमाया विस्तारली | सिद्धसाधकांची बोली || ७ ||
शक्ति सर्वांगे व्यापिली | शक्ती गेली काया मेली || ८ ||
होते कोठून उत्पत्ति | भगवति भगवति || ९ ||
सुख तीवाचूनि नाही | न लगे अनुमान काही || १० ||
जाली माता मायराणी | भोग नाही ती वाचुनि || ११ ||
भूमंडळींच्या वनिता | बाळ तारुण्य समस्ता || १२ ||
जगजीवनी मनमोहिनी | जिवलगाची त्रिभुवनी || १३ ||
रूप एकाहुनी एक | रम्य लावण्य नाटक || १४ ||
पाहा एकाची अवयव | भुलविले सकळ जीव || १५ ||
मन नयन चालवी | भगवती जग हालवी || १६ ||
भोग देते भूमंडळी | परि आपण वेगळी || १७ ||
योगी मुनिजन ध्यानी | सर्व लागले चिंतनी || १८ ||
भक्ती मुक्ती युक्ती दाती | आदिशक्ती सहज स्थिती || १९ ||
सतरावी जीवनकळा | सर्व जीवांचा जिव्हाळा || २० ||
मुळी रामवरदायिनी | रामदास ध्यातो मनी || २१ ||

नेहमी आनंदमय असणारी ,आनंद निर्माण करणारे साहित्य निर्माण करणारी ,परमेश्वरी जगाची ईश्वरी असणारी ,जगज्जोती आहे म्हणजे जगाला चालवणारी ,जगाला प्रकाश देणारी आहे .मूळमायेतील विकार म्हणजे जगज्जोती .ती मोठी विलक्षण आहे .सर्व जीवांच्या अंतर्यामी राहून सर्वांना चालवणारी आहे .तिला शुध्द सत्वगुण किंवा ज्ञानकला म्हणतात .ती जगाचा उध्दार करणारी आहे .मूळमायेत विकार होतो आणि त्रिगुण निर्माण होतात .त्या त्रिगुणांचे स्वामी ब्रह्मा ,विष्णू ,महेश निर्माण होतात म्हणजेच जगज्जोतीच हरी हरांना निर्माण करते .अनेक राजे राजेश्वर हे तिचीच निर्मिती आहेत .कारण जगज्जोती म्हणजेच अंतरात्मा आहे .अंतरात्मा स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये आहे .जली स्थळी काष्ठी पाषाणी आहे .सर्व काळी आहे .तीनही काळी म्हणजे भूतकाळ ,वर्तमानकाळ ,भविष्यकाळात ही आहे .तीच भवानी आहे .तीच सर्व देहांना चालवते ,बोलावते ,हालवते .मूळमाया विकारते ,विस्तार पावते ,तेव्हा शारदेच्या रुपाने सिद्ध साधकांची ती बोली होते .ती प्रत्येकात शक्ती रुपाने प्रत्येकात असते .देहातील शक्ती संपली की तो देह पडतो ,मृत्यू पावतो .या भगवती ची उत्पत्ती कोठून होते कोण जाणे ,पण तिच्या शिवाय सुख मिळत नाही .भवानीच मायाराणी आहे .तिच्या शिवाय भोग भोगता येत नाही .या पृथ्वी वरील स्त्रिया लहान ,तरूण आणि सर्व स्त्रिया या तिचीच रूपे आहेत .जगजीवनात या त्रिभुवनात ती जिवलगाची मनमोहिनी आहे . या स्त्रिया एकाहून एक रूपात ,लावण्यात सरस आहेत नाटकी आहेत .त्यांचे एकेक अवयव पाहून सगळे जीव हालवले जातात ,विचलीत होतात डोळ्याच्या मोहक हालचाली करून जशी स्त्री भुलवते त्याप्रमाणे भगवती नयन हालवते वं जग हालवते .या भूमंडळावर ती सुख दु:ख देते पण सर्वांपासून ती वेगळी राहते , योगी ,मुनी सर्व जण ध्यानात तिचेच ध्यान करतात .भक्ती ,मुक्ती ,ज्ञाती तीच आहे .आदिशक्तीची ही सहजस्थिती आहे .ती सतरावी जीवन कला आहे .पांच कर्मेंद्रिय ,५ ज्ञानेंद्रिय पंच प्राण ,मन ही जीवनविषयक १६ कला आहेत .त्यांच्या सहाय्याने आपण जीवन जगत असतो .तशी भवानी माता म्हणजेच शारदा सत्रावी जीवनकळा मानली आहे ..ती सर्व जीवांची जिव्हाळा आहे .तीच राम वरदायिनी आहे .तिचेच रामदास ध्यान करतो                                                              






कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें