गुरुवार, 21 जून 2012

कल्याण स्वामींचे उत्तर


कल्याण स्वामींचे उत्तर
सुखरूप जाहलो स्वामी तुमचिया पादसेवे  |
कल्याण माझे जाले रंगलो सोहंभावे ||धृ ||
चित्त ही वृत्ती माझी चैतन्यी मुराली |
संतोष स्वात्मसुख अनुभव किल्ली दिल्ही |
निर्विकल्पी वास जाहला अनुभव बोलूं बोली |
विश्व हें नाही  अवघे श्रीराम स्वरूप पाही ||१||
कनक हे पूर्णपणी नगास ठाव कोठें |
चैतन्य मृत्तिका येसी वाया हे घटमठे |
नाही हा दृश्याभास अनुभव यैसा स्पष्ट |
पूर्ण ब्रह्म सनातन सद्गुरू  येकनिष्ठ ||२||
पावलो धालो देवा तुझिया सेवा बळे |
वेदांत श्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले |
ते मी स्वयंभ जालो हे शब्द मावळले |
मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले ||३||
रामविण वृत्ती माझी आणिक जाये कोठे |
जिकडे तिकडे पाहे श्रीराम माझा भेटे |
कल्याण म्हणे सकळ द्वैत्पण जेथे आटे |
रामदास स्वामी जईं आनंदघन भेटे ||४ ||
स्वामींच्या पादसेवेने मी सुखरूप झालो .मी सोहं भावाने रंगलो .मी तोच आहे या भावाने रंगून गेलो आहे .माझे कल्याण झाले .
माझ्या चित्त वृत्ती चैतन्याशी एकरूप झाल्या .मला आपण संतोष ,स्वात्म सुखाच्या  अनुभवाची किल्ली दिली .स्वात्म सुख म्हणजे आत्मस्वरूपी लीन कसे व्हायचे ते आपण मला शिकवलंत ..निर्विकाल्पचा वास जाहलो .निर्विकल्पात म्हणजे कल्पनाही करता येणार नाही अशा परब्र्ह्माशी लीन कसे व्हायचे ,त्याच्याशी एकरूप कसे व्हायचे ते शिकवले .त्यामुळे मी ब्रह्म पहायला गेलो आणि ब्रह्मची झालो .तिथे काय अनुभव आला ते सांगतो .महाराज ,हे दृश्य विश्व नाहीच ,तेथे सगळीकडे श्रीरामच मला दिसत आहेत .हे माझे अनुभवाचे बोल आहेत .  
हे केवळ कनक आहे ,सोने आहे पण तेथे दागिन्यांना वाव नाही .सर्व एकजिनसी ब्रह्मस्वरूप आहे त्यात भेद नाही .मातीचे घट मठ हे सुध्दा दिसत नाहीत .कारण सर्वत्र चैतन्य आहे .मला बाकी काही दिसत नाही ..नेहमी दिसणारे दृश्य दिसत नाही ,त्यांचा आभासही होत नाही ,कारण सर्वत्र रामरूप दिसते आहे .सनातन ,प्राचीन असणारे पूर्णब्रहम सर्वत्र आहे .याचे कारण सद्गुरुंवरची एकनिष्ठ असणे .सद्गुरूंच्या वचनावर असणारा विश्वास ! 
देवा ,गुरुराया तुमच्या सेवेने मी भरून पावलो .वेदांत ,श्रुती ज्याला निर्विकल्प बोलतात ,,कल्पनेच्या पलीकडील म्हणतात ,ते मी स्वत:च झालो असे शब्दच नाहीसे झाले कारण देव पहाया गेलो आणि देवची होऊनि ठेलो अशी अवस्था माझी झाली आहे .माझे सगळे मी तूपण नाहीसे झाले माझी देहबुद्धी नाहीशी झाली ,आत्मबुद्धी त तिचे परिवर्तन झाले .
रामेविण माझे विचार आणखीन कोठे जात नाही .माझा श्रीराम मला जिकडे तिकडे भेटतो .त्यामुळे कल्याण स्वामी म्हणतात जेथे मी तू पण आटते ,द्वैत नाहीसे होते ,तेथे महाराज आनंदघन परमात्म स्वरूप मला भेटतो

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें