समास ४
तंव शिष्य म्हणे जी गुरुमूर्ती
|आत्यान्तिकाची कैसी स्थिती |
जेणे जन्ममृत्यू चुकती |
प्राणीयाचे || १ ||
तेव्हा शिष्य म्हणतो ,गुरुराया
अत्यान्तिकाची म्हणजे अतिपापी ,दुर्गुणी माणसाची स्थिती कशी असते ? ज्यामुळे त्या
प्राण्याचे जन्म मृत्यू चुकतील ?
प्रलयी प्रपंच उडोनी तुटी | कैसी
होय ब्रह्मा भेटी |
कोण्याप्रकारे उठाउठी | दृश्य लया
जावे || २ ||
प्रलय होतो तेव्हा प्रपंच उडून
जातो .मग त्याची ब्रह्माशी भेट कशी होणार ? काय कराव म्हणजे दृश्य लय पावेल ?
नाहीसे होईल ?
ऐकोनी शिष्यांचे बोलणे | सद्गुरू
म्हणती सावध होणे |
प्रलयाची पाच लक्षणे | शास्त्री
निरोपावी || ३||
शिष्याचे बोलणे ऐकून सद्गुरू
शिष्याला सावध व्हायला सांगतात . आणि प्रलयाची पाच लक्षणे सांगायला सुरुवात करतात
.
एक निद्रा दुजे मरण | द्विविध पिंडीचे
प्रळय जाण |
जनक्षय महालय हे खूण |ब्रह्मांड
धामीची || ४ ||
पिंडाचे दोन प्रलय आहेत निद्रा आणि
मृत्यू . तर ब्रह्मांडाचे दोन प्रलय आहेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या संख्येत घट व
कल्पांच्या शेवटी जेव्हा संपूर्ण जगाचा प्रलय होतो ,हे दोन ब्रह्मांडाचे प्रलय
आहेत .
परीयासी असे अवघी | येणे जन्म न
चुके कधी |
म्हणोनी आत्यंतिक आधी | शोधिला
पाहिजे ||५ ||
हे सर्व ऐक . पण याने जन्म चुकणार
नाही . म्हणून आधी आत्यंतिक म्हणजे पापी शोधला पाहिजे .
ये-हवी संसाराचे काळी |
महाशून्याचीये पोकळी |
दृश्य लया जाता समूळी | परी मागुते
उभारे || ६ ||
महाप्रलय झाला ,सर्व दृश्य लयाला
गेले तरी पुन्हा दृश्य विश्व निर्माण होते .ते निर्माण होते महाशून्यात म्हणजे
आकाशाच्या पोकळीत .
जीव चैतन्याचा अंशू | परब्रह्म करी
प्रवेशू |
परी लिंगदेह अज्ञानांशु |भंगला
नाही || ७ ||
प्रत्येक प्राणीमात्रात असणारे
चैतन्य म्हणजे जीव असतो त्यामध्ये परब्रहम प्रवेश करते . पण लिंगदेह म्हणजे
सूक्ष्म देह जो अज्ञानाने भरलेला असतो तो तसाच असतो .त्यात बदल होत नाही .
म्हणोनी कल्पान्तिये आदिसी | कोंभ
निघती वासना बीजासी |
कर्मानुसार प्राणीयासी | जन्म
मृत्यू चुकेना || ८ ||
म्हणून कल्पांताच्या आधी वासनेच्या
बीजाला कोंब येतात .त्यामुळे पुन्हा जेव्हा दृश्य विश्व निर्माण होते तेव्हा ती
वासना ,वासना देह तसेच असतात .पूर्व कर्मानुसार प्राणी पुन्हा जन्माला येतो .
जन्माला आल्यावर मृत्यू ठरलेला च आहे .पुन्हा जन्म मृत्यू चे चक्र चालूच राहते .
जीव वरपडे आशापाशा | पुनरावृत्ती न
चुके वळसा |
ये विषयी दृष्टांत एक सहसा |
सांगिजेल पा || ९ ||
जीवाला वरपडे म्हणजे प्राप्त ,व्याप्त
आशा असतात . त्यामुळे सहजच वासना असतात म्हणून जन्म मृत्यू ची पुनरावृत्ती होते .
जन्म मृत्यूचा वळसा चालूच राहतो .हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समर्थ एक दृष्टांत
देतात .
समुद्र तोये सहस्र घटी | म्हणोनी
तोंडी केली खिटी |
जळी बुडविता युगा चौपुटी |ऐक्यता न
घडे || १० ||
समुद्राच्या जलामध्ये सहस्र घट निर्माण
होतात .पण ते वेगळे नसतात कारण ते सर्व घट एकाच समुद्राच्या जळात विरून जातात . कल्पांत
होतो तेव्हा चारही युगे असलेली ही सृष्टी जळात बुडते म्हणजेच पृथ्वी जळात बुडते . परंतु
त्यांच्यात ऐक्यता दिसत नाही जेव्हा पुन्हा सृष्टीच्या निर्मितीचे कार्य होते .
तेचि घट भंग जालिया हेळा | सहज
ऐक्यता जळी जळां |
तेवी लिंगदेह अज्ञानमुळा | न
खंडिता जन्म चुकेना || ११ ||
सागरातील पाण्याच्या घट फुटतात
तेव्हा समुद्राच्या पाण्याशी एकरूप होतात . त्याप्रमाणे लिंगदेह जो वासनात्मक आहे
,जो अज्ञानाचे मूळ आहे ते कल्पांत होऊन पुन्हा सृष्टी निर्मिती झाली तरी जसाच्या
तसा राहतो आणि त्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे चक्र जसेच्या तसे राहते .
जवारी न तुटे लिंगबेडी | तव न चुके
चौ-हांशी बांदवडी
जीवासी परब्रह्म जोडी | सर्वथा नव्हे || १२ ||
जोपर्यंत लिंगबेडी तुटत नाही
,वासना शांत होत नाहीत ,तोपर्यंत चौ-यांशी लक्ष योनींचा बंदिवास [बांद्वाडी ] चुकत
नाही .त्यामुळे जीव पराब्र्ह्माशी जोडला जाऊ शकत नाही .याला कारण असते अज्ञान .
अज्ञानाने मी देह असे आपण मानतो . त्या देहाच्या सौख्यासाठी माणूस वाटेल ते कर्म करतो
,फलाची आपेक्षा ठेवतो .आणखीन आणखीन जन्म मरणाच्या बंधनात ,फे-यात अडकतो .
म्हणोनि सद्गुरू कृपावंत | चुकती
जन्म मृत्यूचे आघात |
अनन्य भेटी सदोदित | ब्रह्मी करावी
|| १३ ||
माणसाने जन्म मृत्युच्या फे-यातून
सुटावे यासाठी सद्गुरू असतात . म्हणून सद्गुरूंची भेट मिळण्याची तळमळ असायला हवी .
सद्गुरू कृपेचेनि प्रसादे |
अद्वैतेक स्वानंदबोधे |
जीवन्मुक्तपण लाभ वेदे | निरोपिला
असे || १४ ||
सद्गुरूच्या कृपाप्रसादाने अद्वैत
साधते ,ते परब्रह्माशी अद्वैत साधते म्हणजे साधक ,सद्गुरुंचा सत्शिष्य परब्रह्माशी
एकरूप होतो ,त्याच्यात लीन होतो . परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे त्यामुळे सहजच
स्वानंद बोध साधतो . वेद तर म्हणतात सद्गुरू कृपेने जीवन्मुक्त पणाचा लाभ होतो . जीवन्मुक्त
म्हणजे ज्ञानाने अविद्या नाश पावते ,विवेक बुद्धी उत्पन्न होते ,आणि पुरुष
स्वस्वरुपाला जाणतो . पण प्रारब्धकर्मे शिल्लक असतात . तोपर्यंत जीवन्मुक्ताच्या
अवस्थेत पुरुष राहतो . प्रारब्ध कर्मांचा भोग संपला की की देह पडतो व त्याला
विदेह्मुक्ती प्राप्त होते .
प्रपंच असताची नाही | मिथ्या
रज्जूसर्प पाही |
गंधर्व नगर गगन गेही | ईन्द्रजाल
जैसे || १५ ||
प्रपंचाला दोरीवर भासणारा साप
सज्सा मिथ्या असतो तसा गंधर्व नगरे गगनात म्हणजे आकाशात असतात असे मानले आहे
,ईन्द्राच्या मायाजाला सारखे प्रपंचाचे स्वरूप असते .प्रत्यक्ष प्रपंच असतच
नाही.तो माणसाचा भ्रम असतो .
नाथिले विक्राळवाणे | झाड भासले
भ्याले तेणे |
धान्य भाग्य हे उमजणे | बहुती थोडे
|| १६ ||
एखादे झाड रात्रीच्या अंधारात
आक्राळ विक्राळ भासते .त्यामुळे भीती वाटते .तसेच या प्रपंचाचे आहे .प्रपंचात सतत
संकटे येतच असतात .त्या संकटांची काही वेळेस भीती ही वाटते . पण हाच प्रपंच धन्यही
करता येतो ,भाग्यवान ही होता येते .पण हे कोणाला समजत नाही .
परी मायाजाळें बुडती | काही केल्या
नुमजति|
आत्मसुख तयाप्रती | लाभेल कैसे ||
१७ ||
माणसे मायाजालात अडकतात .याचे
मुख्य कारण असते त्यांची देहबुद्धी .देहबुद्धीने विविध लोभांना बळी पडतात .षड्रिपू त्याना आपल्या
कब्जात ओढतात .पण ही गोष्ट त्याना समजत नाही आणि समजली तरी त्यातून बाहेर पडायची
इच्छा नसते . मग आत्मसुख त्याना कसे मिळेल ?
पय गोचीड येकेकांसी | परी लाभ
जोडे वत्सा धन्यासी |
तैसे भाविकेवीण आणिकासी | प्राप्त
नाही || १८ ||
गायीचे दूध तिच्या वासरालाच मिळते
.गोचीड तिच्या आचळातून रक्तच पिते .तद्वत खरा भाव असणा-यालाच ह्ग्वंत भेटतो ,बाकीच्यांना नाही .
भगवद भजनेवीण कांही | शब्दज्ञाने
सार्थक नाही |
ऐकोनि भाविक बोले लवलाही | आता
कृपा करावी || १९ ||
भगवद भजनाशिवाय काही नाही .भगवद
भजन केले तरच अंत:करणाची शुद्धी होते .स्वस्वरूपाचा अनुभव येतो .नुसत्या शब्द ज्ञानाने
सार्थक होत नाही .कारण तेथे अनुभवाची कमतरता असते . असे स्वामी म्हटल्यावर भाविक
लगेच म्हणतो की स्वामी आता कृपा करावी .
जेणे घडे सार्थक वेळा | ते चि
सांगावे अवलीळा |
ते पुढील समासी हेळा | फेडिजेल
प्रश्न || २० ||
कोणत्या वेळेला जीवनाचे सार्थक
होईल ते आपण सहजपणे सांगावे . पुढच्या समासात लगेच प्रश्नाचे उत्तर मिळेल असे
समर्थ सांगतात .
इति श्री रामदास म्हणे | श्रवणे
अनुभवसिद्धी बाणे |
समर्थ दाशरथीचे देणे | अगाध महिमा
|| २१ ||
समर्थ रामदास म्हणतात की श्रवणाने
अनुभव येतो .अनुभवाने ज्ञानाची पक्के होते .दाशरथी रामानी दिलेले देणे खरोखरच अगाध
आहे .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें