शनिवार, 12 नवंबर 2016



समास ४
तंव शिष्य म्हणे जी गुरुमूर्ती |आत्यान्तिकाची कैसी स्थिती |
जेणे जन्ममृत्यू चुकती | प्राणीयाचे || १ ||
तेव्हा शिष्य म्हणतो ,गुरुराया अत्यान्तिकाची म्हणजे अतिपापी ,दुर्गुणी माणसाची स्थिती कशी असते ? ज्यामुळे त्या प्राण्याचे जन्म मृत्यू चुकतील ?
प्रलयी प्रपंच उडोनी तुटी | कैसी होय ब्रह्मा भेटी |
कोण्याप्रकारे उठाउठी | दृश्य लया जावे || २ ||
प्रलय होतो तेव्हा प्रपंच उडून जातो .मग त्याची ब्रह्माशी भेट कशी होणार ? काय कराव म्हणजे दृश्य लय पावेल ? नाहीसे होईल ?
ऐकोनी शिष्यांचे बोलणे | सद्गुरू म्हणती सावध होणे |
प्रलयाची पाच लक्षणे | शास्त्री निरोपावी || ३||
शिष्याचे बोलणे ऐकून सद्गुरू शिष्याला सावध व्हायला सांगतात . आणि प्रलयाची पाच लक्षणे सांगायला सुरुवात करतात .
एक निद्रा दुजे मरण | द्विविध पिंडीचे प्रळय जाण |
जनक्षय महालय हे खूण |ब्रह्मांड धामीची || ४ ||
पिंडाचे दोन प्रलय आहेत निद्रा आणि मृत्यू . तर ब्रह्मांडाचे दोन प्रलय आहेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या संख्येत घट व कल्पांच्या शेवटी जेव्हा संपूर्ण जगाचा प्रलय होतो ,हे दोन ब्रह्मांडाचे प्रलय आहेत .
परीयासी असे अवघी | येणे जन्म न चुके कधी |
म्हणोनी आत्यंतिक आधी | शोधिला पाहिजे ||५ ||
हे सर्व ऐक . पण याने जन्म चुकणार नाही . म्हणून आधी आत्यंतिक म्हणजे पापी शोधला पाहिजे .
ये-हवी संसाराचे काळी | महाशून्याचीये पोकळी |
दृश्य लया जाता समूळी | परी मागुते उभारे || ६ ||
महाप्रलय झाला ,सर्व दृश्य लयाला गेले तरी पुन्हा दृश्य विश्व निर्माण होते .ते निर्माण होते महाशून्यात म्हणजे आकाशाच्या पोकळीत .
जीव चैतन्याचा अंशू | परब्रह्म करी प्रवेशू |
परी लिंगदेह अज्ञानांशु |भंगला नाही || ७ ||
प्रत्येक प्राणीमात्रात असणारे चैतन्य म्हणजे जीव असतो त्यामध्ये परब्रहम प्रवेश करते . पण लिंगदेह म्हणजे सूक्ष्म देह जो अज्ञानाने भरलेला असतो तो तसाच असतो .त्यात बदल होत नाही .
म्हणोनी कल्पान्तिये आदिसी | कोंभ निघती वासना बीजासी |
कर्मानुसार प्राणीयासी | जन्म मृत्यू चुकेना || ८ ||
म्हणून कल्पांताच्या आधी वासनेच्या बीजाला कोंब येतात .त्यामुळे पुन्हा जेव्हा दृश्य विश्व निर्माण होते तेव्हा ती वासना ,वासना देह तसेच असतात .पूर्व कर्मानुसार प्राणी पुन्हा जन्माला येतो . जन्माला आल्यावर मृत्यू ठरलेला च आहे .पुन्हा जन्म मृत्यू चे चक्र चालूच राहते .
जीव वरपडे आशापाशा | पुनरावृत्ती न चुके वळसा |
ये विषयी दृष्टांत एक सहसा | सांगिजेल पा || ९ ||
जीवाला वरपडे म्हणजे प्राप्त ,व्याप्त आशा असतात . त्यामुळे सहजच वासना असतात म्हणून जन्म मृत्यू ची पुनरावृत्ती होते . जन्म मृत्यूचा वळसा चालूच राहतो .हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समर्थ एक दृष्टांत देतात .
समुद्र तोये सहस्र घटी | म्हणोनी तोंडी केली खिटी |
जळी बुडविता युगा चौपुटी |ऐक्यता न घडे || १० ||
समुद्राच्या जलामध्ये सहस्र घट निर्माण होतात .पण ते वेगळे नसतात कारण ते सर्व घट एकाच समुद्राच्या जळात विरून जातात . कल्पांत होतो तेव्हा चारही युगे असलेली ही सृष्टी जळात बुडते म्हणजेच पृथ्वी जळात बुडते . परंतु त्यांच्यात ऐक्यता दिसत नाही जेव्हा पुन्हा सृष्टीच्या निर्मितीचे कार्य होते .  
तेचि घट भंग जालिया हेळा | सहज ऐक्यता जळी जळां |
तेवी लिंगदेह अज्ञानमुळा | न खंडिता जन्म चुकेना || ११ ||
सागरातील पाण्याच्या घट फुटतात तेव्हा समुद्राच्या पाण्याशी एकरूप होतात . त्याप्रमाणे लिंगदेह जो वासनात्मक आहे ,जो अज्ञानाचे मूळ आहे ते कल्पांत होऊन पुन्हा सृष्टी निर्मिती झाली तरी जसाच्या तसा राहतो आणि त्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे चक्र जसेच्या तसे राहते . 
जवारी न तुटे लिंगबेडी | तव न चुके चौ-हांशी बांदवडी
जीवासी परब्रह्म  जोडी | सर्वथा नव्हे || १२ ||
जोपर्यंत लिंगबेडी तुटत नाही ,वासना शांत होत नाहीत ,तोपर्यंत चौ-यांशी लक्ष योनींचा बंदिवास [बांद्वाडी ] चुकत नाही .त्यामुळे जीव पराब्र्ह्माशी जोडला जाऊ शकत नाही .याला कारण असते अज्ञान . अज्ञानाने मी देह असे आपण मानतो . त्या देहाच्या सौख्यासाठी माणूस वाटेल ते कर्म करतो ,फलाची आपेक्षा ठेवतो .आणखीन आणखीन जन्म मरणाच्या बंधनात ,फे-यात अडकतो .
म्हणोनि सद्गुरू कृपावंत | चुकती जन्म मृत्यूचे आघात |
अनन्य भेटी सदोदित | ब्रह्मी करावी || १३ ||
माणसाने जन्म मृत्युच्या फे-यातून सुटावे यासाठी सद्गुरू असतात . म्हणून सद्गुरूंची भेट मिळण्याची तळमळ असायला हवी .
सद्गुरू कृपेचेनि प्रसादे | अद्वैतेक स्वानंदबोधे |
जीवन्मुक्तपण लाभ वेदे | निरोपिला असे || १४ ||
सद्गुरूच्या कृपाप्रसादाने अद्वैत साधते ,ते परब्रह्माशी अद्वैत साधते म्हणजे साधक ,सद्गुरुंचा सत्शिष्य परब्रह्माशी एकरूप होतो ,त्याच्यात लीन होतो . परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे त्यामुळे सहजच स्वानंद बोध साधतो . वेद तर म्हणतात सद्गुरू कृपेने जीवन्मुक्त पणाचा लाभ होतो . जीवन्मुक्त म्हणजे ज्ञानाने अविद्या नाश पावते ,विवेक बुद्धी उत्पन्न होते ,आणि पुरुष स्वस्वरुपाला जाणतो . पण प्रारब्धकर्मे शिल्लक असतात . तोपर्यंत जीवन्मुक्ताच्या अवस्थेत पुरुष राहतो . प्रारब्ध कर्मांचा भोग संपला की की देह पडतो व त्याला विदेह्मुक्ती प्राप्त होते .
प्रपंच असताची नाही | मिथ्या रज्जूसर्प पाही |
गंधर्व नगर गगन गेही | ईन्द्रजाल जैसे  || १५ ||
प्रपंचाला दोरीवर भासणारा साप सज्सा मिथ्या असतो तसा गंधर्व नगरे गगनात म्हणजे आकाशात असतात असे मानले आहे ,ईन्द्राच्या मायाजाला सारखे प्रपंचाचे स्वरूप असते .प्रत्यक्ष प्रपंच असतच नाही.तो माणसाचा भ्रम असतो . 
नाथिले विक्राळवाणे | झाड भासले भ्याले तेणे |
धान्य भाग्य हे उमजणे | बहुती थोडे || १६ ||
एखादे झाड रात्रीच्या अंधारात आक्राळ विक्राळ भासते .त्यामुळे भीती वाटते .तसेच या प्रपंचाचे आहे .प्रपंचात सतत संकटे येतच असतात .त्या संकटांची काही वेळेस भीती ही वाटते . पण हाच प्रपंच धन्यही करता येतो ,भाग्यवान ही होता येते .पण हे कोणाला समजत नाही . 
परी मायाजाळें बुडती | काही केल्या नुमजति|
आत्मसुख तयाप्रती | लाभेल कैसे || १७ ||
माणसे मायाजालात अडकतात .याचे मुख्य कारण असते त्यांची देहबुद्धी .देहबुद्धीने  विविध लोभांना बळी पडतात .षड्रिपू त्याना आपल्या कब्जात ओढतात .पण ही गोष्ट त्याना समजत नाही आणि समजली तरी त्यातून बाहेर पडायची इच्छा नसते . मग आत्मसुख त्याना कसे मिळेल ?
पय गोचीड येकेकांसी | परी लाभ जोडे  वत्सा धन्यासी |
तैसे भाविकेवीण आणिकासी | प्राप्त नाही || १८ ||
गायीचे दूध तिच्या वासरालाच मिळते .गोचीड तिच्या आचळातून रक्तच पिते .तद्वत खरा भाव असणा-यालाच  ह्ग्वंत भेटतो ,बाकीच्यांना नाही .
भगवद भजनेवीण कांही | शब्दज्ञाने सार्थक नाही |
ऐकोनि भाविक बोले लवलाही | आता कृपा करावी || १९ ||
भगवद भजनाशिवाय काही नाही .भगवद भजन केले तरच अंत:करणाची शुद्धी होते .स्वस्वरूपाचा अनुभव येतो .नुसत्या शब्द ज्ञानाने सार्थक होत नाही .कारण तेथे अनुभवाची कमतरता असते . असे स्वामी म्हटल्यावर भाविक लगेच म्हणतो की स्वामी आता कृपा करावी .  
जेणे घडे सार्थक वेळा | ते चि सांगावे अवलीळा |
ते पुढील समासी हेळा | फेडिजेल प्रश्न || २० ||
कोणत्या वेळेला जीवनाचे सार्थक होईल ते आपण सहजपणे सांगावे . पुढच्या समासात लगेच प्रश्नाचे उत्तर मिळेल असे समर्थ सांगतात .
इति श्री रामदास म्हणे | श्रवणे अनुभवसिद्धी बाणे |
समर्थ दाशरथीचे देणे | अगाध महिमा || २१ ||
समर्थ रामदास म्हणतात की श्रवणाने अनुभव येतो .अनुभवाने ज्ञानाची पक्के होते .दाशरथी रामानी दिलेले देणे खरोखरच अगाध आहे .

      


 
  




समास ३
ऐसे जीवन्मुक्त ज्ञानी | नित्य स्वरूप समाधानी |
देही प्रापंचिक जनी | परी तो विदेही || १ ||
असे जीवनमुक्त आणि ज्ञानी ,नेहमी स्वस्वरुपाशी अनुसंधान राखलेले असते .सामान्य प्रापंचिक देही असतात पण जीवनमुक्त मात्र विदेही असतो . जीवनमुक्त नेहमी ब्रह्ममय असतो .घरातले व बाहेरचे सर्व व्यवहार सांभाळतो .श्रवण मनन अशी साधने करून तो जगदोध्दार करतो . उत्तम अथवा अधम दोन्ही उपाधीत सम वागणारा सचेतन तो जीवन मुक्त असतो . असा जीवन मुक्त ज्ञानी सुध्दा असतो . ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी असतो .त्याचे स्वत :चे स्वरूप तो ओळखतो .   
नेहमी स्वस्वरुपाशी अनुसंधान साधलेला असतो . तो विदेही असतो .देहात असताना सुख दु:ख भोगावी लागतात ती त्याला भोगावी लागत नाही .त्याला देहाचा अहंकार नसल्यामुळे ,स्वरूपाशी अनुसंधान असल्यामुळे त्याला समाधानाची अवस्था तो भोगतो .
अनित्य सांडून नित्य विवरी | सारासार विचार करी |
जीव लवणरूप सागरी | मिसळोन गेला || २ ||
समाधानाची अवस्था तो भोगतो कारण तो अनित्याचा म्हणजे जे अशाश्वत आहे ,विकारी आहे ,नाशिवंत आहे त्याचा तो विचार करत नाही.समर्थांनी दासबोधात पहिल्या  दशकात नित्याचा विचार केला आहे. सारासार विचार करतो .सारासार म्हणजे केल्याचे वरचे साल म्हणजे असार तर आतले केळे म्हणजे सार .या दृश्य विश्वात जे दिसते ते नष्ट होते ते असार आणि जे दिसत नाही ,ते परब्रह्म ते सार ,सारासाराचा विचार म्हणजे त्या शाश्वत परब्रह्माचा विचार तो करतो .त्यामुळे समुद्रात ज्याप्रमाणे मीठ विरघळलेले असते ,त्यात भरून असते तसे या विश्वात परब्रह्म तत्व मिसळलेले असते . जीव भवसागरामध्ये मिसळून गेलेला असतो .

मग तो देहीच जीवन्मुक्त | अखंडैकरसी तृप्त |
लोकी निर्विकार निर्हेत | पण वागे || ३ ||
मग हा देहामध्ये असतानाच जीवन्मुक्त असतो . अखंडैकर म्हणजे एकरूप ,एकजीव असतो .कुणाशी एकरूप असतो ? तो एकरूप असतो त्या शाश्वताशी ,परब्रह्मतत्वाशी . त्यामुळेच तो तृप्त असतो .त्याला कोणतीही गोष्ट मागायची नसते ,मिळवायची नसते ,कशाचीही ईछा नसते . त्यामुळेच तो लोकांशी वागताना निर्विकार पणे वागतो कारण त्याला कोणापासूनही फायदा मिळवायचा नसतो . निर्हेतुक पणे वागतो .त्याचा असा कोणताही हेतू त्याच्या कोणत्याही कृतीमागे नसतो .

ब्रह्मज्ञान हात्ता चढे | तेणे सार वस्तू जोडे |
भवप्रपंच बाधक उडे | आत्मज्ञानाचे || ४ ||
असे होण्याचे कारण त्याला ब्रहमज्ञान झालेले असते . त्यामुळे तो सार वस्तू म्हणजे ब्रह्म जोडतो .ब्रह्मस्वरूपी लीन झालेला असल्यामुळे प्रपंच रुपी सागर त्याच्या साठी नसतोच कारण तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो . आत्मज्ञाना मुळे मी कोण हे त्याला कळलेले असते . प्रपंच तो भगवंताचा असे मानतो ,मी त्याचा राखणदार मानतो .प्रपंचाची बाधकता त्याला त्रास देत नाही .

अखंड स्वरूपी समाधान | ब्रह्मसाक्षात्कारी लीन |
सहज मावलोन अज्ञान | प्रपंच कार्य निरसे || ५ ||
तो अखंड स्वस्वरुपाशी अनुसंधान साधतो . त्यामुळे समाधानाची प्राप्ती त्याला झालेली असते ब्रह्मस्वरूपी लीन झालेला असतो .त्याला आत्मज्ञान झालेले असल्यामुळे त्याचे अज्ञान मावळते .ज्ञानाचा उदय झालेला असतो . प्रपंचाचा निरास झालेला असतो .म्हणजे प्रपंचातील मिथ्यत्व त्याला समजलेले असते .

संचित कर्म संशायादिक | विपरीत ज्ञान ते बाधक |
म्हणोनी भ्रांतीचे मूळ छेदक | ज्ञान खड़ग | ६ ||
कर्माचे प्रकार ३ .क्रियमाण कर्म ,संचित कर्म ,प्रारब्ध कर्म  .क्रियमाण कर्मे लगेच फळ देतात .काही कर्मे लगेच फळ न देता ते फळ मिळायला वेळ लागतो .ती कर्मे संचितात जमा होतात .जसे परीक्षा दिल्या बरोबर लगेच निकाल लागत नाही त्याला वेळ लागतो .त्याला संचित कर्मे म्हणतात . अशी अनेक संचित कर्मे या जन्माची ,मागच्या जन्माची फळ देण्यास उत्सुक असतात . त्यांची फळे कदाचित आपाल्याला त्रास देणारी असू शकतात . त्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो . भ्रांती ,भ्रम निर्माण होऊ शकतो . भ्रांती ,भीती चा नाश करणारे असते ज्ञानखड्ग .

एरवी सद्गुरूकृपेवीण | कैसेनि जोडे जीवन्मुक्तपण |
म्हणोनी ब्रह्मनिष्ठत्व खूण | विरूळा जाणे || ७ ||
ज्ञान खड्ग हे गुरुच्या हातात असते . सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय जीवन्मुक्त पण अनुभवायला येत नाही . जीवन मुक्ताला ओळखायचे असले तर त्याची ब्रह्मनिष्ठा ही त्याची खूण असते .

ब्रह्मनिष्ठ तोची सद्गुरू | येर अवघा भूतसंचारू |
मंत्रविद्या चमत्कारु | जन भुलविणे || ८ ||
 ब्रह्मनिष्ठा ज्याच्या जवळ असते तोच सद्गुरू असतो . नाही तर तो भूत संचारू असे समर्थ म्हणतात . समर्थांनी जे गुरूंचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत त्यातील जे सद्गुरू नाहीत ,चेटूक करणारे ,मंत्रतंत्र करणारे असतात ,लोकाना चमत्कार करून लोकाना भूलावतात .

उघडे सिद्धीचे भांडार | लोकी भासला चमत्कार |
लोटले अज्ञानाचे भार | शिष्य व्हावया || ९ ||
हे सर्व चमत्कार ,मंत्र तंत्र पाहून अनेक अज्ञांनी  लोक शिष्य होण्यासाठी लोटतात .
साभिमाने भुलले जन्न | नेणती शुध्द आत्मज्ञान |
तरी कैसेनी भवबंधन | तुटेल जाण || १० ||
अशा गुरुंचा अशा अज्ञानी लोकांना अभिमान असतो . पण त्यांना खरे गुरु कोणते ,दांभिक कोणते हे न कळल्यामुळे त्यांना शुध्द आत्मज्ञान जाणता येत नाही .आत्मज्ञान झाले नाही तर या संसार बंधन कसे तुटतील .

तरी सद्गुरुकृपेस्तव तत्वता | आत्मज्ञानाने जीवनमुक्तता |
अचळ साजोज्य हाता | लाभ चढे || ११ ||
सद्गुरुकृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते .आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे याचे ज्ञान होते . या चराचराचे मूळ जे शुध्द ,निर्मल स्वरूप आहे त्याचे ज्ञान होते .असे ज्ञान झाल्यावर साधक जीवन मुक्त होतो . अचळ असणारी सायोज्यमुक्ती प्राप्त होते .सायोज्य मुक्ती याचा अर्थ कधीही नाश न पावणारी ,अचळ असणरी कधीही स्वरूपापासून न ढळणारी मुक्ती प्राप्त होते .

आतां जीवन्मुक्त नाम | प्रकृती आंगीचा सुख संभ्रम |
त्रिपुटी रहित आत्माराम | संचला ठाईचा || १२ ||
सायोज्यता मुक्ती मिळते ,तेव्हा नाम परावाणीत जाते ,परावाणी म्हणजे ज्ञान .ज्ञान प्राप्त झाल्यावर कोणत्याही प्रकारची त्रिपुटी रहात नाही ,जसे अज्ञान ,ज्ञान ,विज्ञान .अशा त्रिपुटी पलीकडे  अवस्था येते . आणि आत्माराम सर्वत्र संचला आहे ,व्यापून राहिला आहे असा अनुभव येतो
दृश्यकर्पूर द्रष्टी अनळ | दर्शन तो प्रकाश बहळ |
विरोनी शून्याकार सकळ | होत संकल्पी || १३ ||
दृश्य कापूर आहे ,बघणारा अग्नी आहे ,मग जेव्हा त्या आत्मारामाचे दर्शन होते तेव्हा प्रगट होणारा प्रकाश खूप मोठा असतो . मोठा झगमगाट असतो .आत्मारामामध्ये म्हणजे संकल्पात तो मिसळतो तेव्हा शून्याकार असतो .
तेचि गुरुकृपेचे नि होते | दृश्य गिळोनी शून्यापरते |
स्वरूप न्याहाळीता जीवाते | जीवन्मुक्त पदवी || १४ ||
असेच जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा दृश्य शून्य वाटू लागते .साधकाला स्वरूपाची प्राप्ती होते पण जिवंत असताना जीवाला जीवन्मुक्त ही पदवी मिळते .
लटिके बंधन पावला स्वप्नी | ते मिथ्या जैसे जागेपणी |
जीवन्मुक्तपण निर्वाणी | ठावाची नसे || १५ ||
स्वप्नामध्ये पाहिलेल्या दृश्यामुळे आपल्यावर बंधन आहे असे वाटते ,पण ते खोटे असते .जसे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात ख-या होत नाहीत तसे जीवन मुक्तपण हे शेवटी ,निर्वाणी म्हणजे मृत्युच्या वेळेस खरे नसते .

नामरूप वाच्य वाचकता | हा प्रकृतीसंबंध चि आईता |
त्यागून जीवन्मुक्तत्व हातां | जरी चढले || १६ ||
नाम रूप बोलणे ,बोलणारा हा सर्व प्रकृती संबंध त्याग केला तर जीवन मुक्त प्रत्यक्षात अनुभवास येते
जेथे विवेकेसी मावळे बोध | तुटे मी तूं पानेसी संवाद |
जेथे जीवनमुक्तपण शब्द | उरेल कैंचा || १७ ||
जीवन्मुक्त ही अवस्था अशी असते की जेथे विवेकाने बोध मावळतो ,मी तू पणाचा संवाद संवाद संपतो . मग जीवन्मुक्त हा शब्द तरी तेथे कसा उरेल ?
ऐसा अनुभव ज्या आला | निर्वाणबोध हातां आला |
ऐसा साधू यया बोला | मानिजे सत्य || १८ ||
असा अनुभव ज्याला येतो त्याला निर्वाण बोध हातात येतो .निर्वाण  याचा अर्थ ब्रह्मज्ञान .जे एकमेव आहे .जे कळण्यास अवघड आहे 
देहभांव जी नाही जया | पापपुण्य कैसे त्या |
असोनि पुत्र मित्र जाया | निर्मुक्त कर्मी || १९ ||
ब्रह्मज्ञान झाले की त्याचा देहभाव रहात नाही . अहंकार नाही ,पापपुण्य रहात नाही .मग त्याला मुले ,मित्र ,पत्नी असली तरी तो मुक्त पाने कर्म करतो म्हणजे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत नाही .कर्म करून अकर्ता राहतो ,भोगून अभोक्ता राहतो .
गुणभूते बारा वाटे | विताळोनी कर्मतवा फाटे |
देहबुध्दीचा समंध तुटे | सहजचि ऐसा || २० ||
त्रिगुण आणि पंचमहाभूते आठ असली तरी जास्त वाटतात असे वाटते की जणू कर्म रुपी तवा वितळतो आहे आणि फाटतो आहे .
आता देह संमधाचे खितपणे | ते सहजची जाले वायाणे |
पावता आत्यंतिक खुणे | असोनी नाही || २१ ||
जीवन्मुक्त देह आहे म्हणून जगात असतो .वास्तविक त्याची देहबुद्धी झाडून गेल्यामुळे सुख दु:ख ,राग लोभ काहीच उरलेले नसते .त्याच्या दृष्टीने ते आयुष्य व्यर्थ असते ,तो असून नसल्यासारखा असतो .याच्या खुणा त्याला मिळतच असतात .
 इति श्री रामदास कवी | पापपंकशोषक रवी |
साधू दर्शने ब्रह्मपदवी | माहा पुण्य लाभ || २२ ||
रामदास कवी पापशोषण करणारा रवी म्हणजे सूर्य आहेत . साधूच्या दर्शनांने अतिशय  पुण्य लाभ होतो कारण ब्रह्मपदवी प्राप्त होते .