बुधवार, 25 नवंबर 2015



समास ३
ऐसे जीवन्मुक्त ज्ञानी | नित्य स्वरूप समाधानी |
देही प्रापंचिक जनी | परी तो विदेही || १ ||
असे जीवनमुक्त आणि ज्ञानी ,नेहमी स्वस्वरुपाशी अनुसंधान राखलेले असते .सामान्य प्रापंचिक देही असतात पण जीवनमुक्त मात्र विदेही असतो . जीवनमुक्त नेहमी ब्रह्ममय असतो .घरातले व बाहेरचे सर्व व्यवहार सांभाळतो .श्रवण मनन अशी साधने करून तो जगदोध्दार करतो . उत्तम अथवा अधम दोन्ही उपाधीत सम वागणारा सचेतन तो जीवन मुक्त असतो . असा जीवन मुक्त ज्ञानी सुध्दा असतो . ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी असतो .त्याचे स्वत :चे स्वरूप तो ओळखतो .   
नेहमी स्वस्वरुपाशी अनुसंधान साधलेला असतो . तो विदेही असतो .देहात असताना सुख दु:ख भोगावी लागतात ती त्याला भोगावी लागत नाही .त्याला देहाचा अहंकार नसल्यामुळे ,स्वरूपाशी अनुसंधान असल्यामुळे त्याला समाधानाची अवस्था तो भोगतो .
अनित्य सांडून नित्य विवरी | सारासार विचार करी |
जीव लवणरूप सागरी | मिसळोन गेला || २ ||
समाधानाची अवस्था तो भोगतो कारण तो अनित्याचा म्हणजे जे अशाश्वत आहे ,विकारी आहे ,नाशिवंत आहे त्याचा तो विचार करत नाही.समर्थांनी दासबोधात पहिल्या  दशकात नित्याचा विचार केला आहे. सारासार विचार करतो .सारासार म्हणजे केल्याचे वरचे साल म्हणजे असार तर आतले केळे म्हणजे सार .या दृश्य विश्वात जे दिसते ते नष्ट होते ते असार आणि जे दिसत नाही ,ते परब्रह्म ते सार ,सारासाराचा विचार म्हणजे त्या शाश्वत परब्रह्माचा विचार तो करतो .त्यामुळे समुद्रात ज्याप्रमाणे मीठ विरघळलेले असते ,त्यात भरून असते तसे या विश्वात परब्रह्म तत्व मिसळलेले असते . जीव भवसागरामध्ये मिसळून गेलेला असतो .

मग तो देहीच जीवन्मुक्त | अखंडैकरसी तृप्त |
लोकी निर्विकार निर्हेत | पण वागे || ३ ||
मग हा देहामध्ये असतानाच जीवन्मुक्त असतो . अखंडैकर म्हणजे एकरूप ,एकजीव असतो .कुणाशी एकरूप असतो ? तो एकरूप असतो त्या शाश्वताशी ,परब्रह्मतत्वाशी . त्यामुळेच तो तृप्त असतो .त्याला कोणतीही गोष्ट मागायची नसते ,मिळवायची नसते ,कशाचीही ईछा नसते . त्यामुळेच तो लोकांशी वागताना निर्विकार पणे वागतो कारण त्याला कोणापासूनही फायदा मिळवायचा नसतो . निर्हेतुक पणे वागतो .त्याचा असा कोणताही हेतू त्याच्या कोणत्याही कृतीमागे नसतो .

ब्रह्मज्ञान हात्ता चढे | तेणे सार वस्तू जोडे |
भवप्रपंच बाधक उडे | आत्मज्ञानाचे || ४ ||
असे होण्याचे कारण त्याला ब्रहमज्ञान झालेले असते . त्यामुळे तो सार वस्तू म्हणजे ब्रह्म जोडतो .ब्रह्मस्वरूपी लीन झालेला असल्यामुळे प्रपंच रुपी सागर त्याच्या साठी नसतोच कारण तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो . आत्मज्ञाना मुळे मी कोण हे त्याला कळलेले असते . प्रपंच तो भगवंताचा असे मानतो ,मी त्याचा राखणदार मानतो .प्रपंचाची बाधकता त्याला त्रास देत नाही .

अखंड स्वरूपी समाधान | ब्रह्मसाक्षात्कारी लीन |
सहज मावलोन अज्ञान | प्रपंच कार्य निरसे || ५ ||
तो अखंड स्वस्वरुपाशी अनुसंधान साधतो . त्यामुळे समाधानाची प्राप्ती त्याला झालेली असते ब्रह्मस्वरूपी लीन झालेला असतो .त्याला आत्मज्ञान झालेले असल्यामुळे त्याचे अज्ञान मावळते .ज्ञानाचा उदय झालेला असतो . प्रपंचाचा निरास झालेला असतो .म्हणजे प्रपंचातील मिथ्यत्व त्याला समजलेले असते .

संचित कर्म संशायादिक | विपरीत ज्ञान ते बाधक |
म्हणोनी भ्रांतीचे मूळ छेदक | ज्ञान खड़ग | ६ ||
कर्माचे प्रकार ३ .क्रियमाण कर्म ,संचित कर्म ,प्रारब्ध कर्म  .क्रियमाण कर्मे लगेच फळ देतात .काही कर्मे लगेच फळ न देता ते फळ मिळायला वेळ लागतो .ती कर्मे संचितात जमा होतात .जसे परीक्षा दिल्या बरोबर लगेच निकाल लागत नाही त्याला वेळ लागतो .त्याला संचित कर्मे म्हणतात . अशी अनेक संचित कर्मे या जन्माची ,मागच्या जन्माची फळ देण्यास उत्सुक असतात . त्यांची फळे कदाचित आपाल्याला त्रास देणारी असू शकतात . त्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो . भ्रांती ,भ्रम निर्माण होऊ शकतो . भ्रांती ,भीती चा नाश करणारे असते ज्ञानखड्ग .

एरवी सद्गुरूकृपेवीण | कैसेनि जोडे जीवन्मुक्तपण |
म्हणोनी ब्रह्मनिष्ठत्व खूण | विरूळा जाणे || ७ ||
ज्ञान खड्ग हे गुरुच्या हातात असते . सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय जीवन्मुक्त पण अनुभवायला येत नाही . जीवन मुक्ताला ओळखायचे असले तर त्याची ब्रह्मनिष्ठा ही त्याची खूण असते .

ब्रह्मनिष्ठ तोची सद्गुरू | येर अवघा भूतसंचारू |
मंत्रविद्या चमत्कारु | जन भुलविणे || ८ ||
 ब्रह्मनिष्ठा ज्याच्या जवळ असते तोच सद्गुरू असतो . नाही तर तो भूत संचारू असे समर्थ म्हणतात . समर्थांनी जे गुरूंचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत त्यातील जे सद्गुरू नाहीत ,चेटूक करणारे ,मंत्रतंत्र करणारे असतात ,लोकाना चमत्कार करून लोकाना भूलावतात .

उघडे सिद्धीचे भांडार | लोकी भासला चमत्कार |
लोटले अज्ञानाचे भार | शिष्य व्हावया || ९ ||
हे सर्व चमत्कार ,मंत्र तंत्र पाहून अनेक अज्ञांनी  लोक शिष्य होण्यासाठी लोटतात .
साभिमाने भुलले जन्न | नेणती शुध्द आत्मज्ञान |
तरी कैसेनी भवबंधन | तुटेल जाण || १० ||
अशा गुरुंचा अशा अज्ञानी लोकांना अभिमान असतो . पण त्यांना खरे गुरु कोणते ,दांभिक कोणते हे न कळल्यामुळे त्यांना शुध्द आत्मज्ञान जाणता येत नाही .आत्मज्ञान झाले नाही तर या संसार बंधन कसे तुटतील .

तरी सद्गुरुकृपेस्तव तत्वता | आत्मज्ञानाने जीवनमुक्तता |
अचळ साजोज्य हाता | लाभ चढे || ११ ||
सद्गुरुकृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते .आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे याचे ज्ञान होते . या चराचराचे मूळ जे शुध्द ,निर्मल स्वरूप आहे त्याचे ज्ञान होते .असे ज्ञान झाल्यावर साधक जीवन मुक्त होतो . अचळ असणारी सायोज्यमुक्ती प्राप्त होते .सायोज्य मुक्ती याचा अर्थ कधीही नाश न पावणारी ,अचळ असणरी कधीही स्वरूपापासून न ढळणारी मुक्ती प्राप्त होते .

आतां जीवन्मुक्त नाम | प्रकृती आंगीचा सुख संभ्रम |
त्रिपुटी रहित आत्माराम | संचला ठाईचा || १२ ||
सायोज्यता मुक्ती मिळते ,तेव्हा नाम परावाणीत जाते ,परावाणी म्हणजे ज्ञान .ज्ञान प्राप्त झाल्यावर कोणत्याही प्रकारची त्रिपुटी रहात नाही ,जसे अज्ञान ,ज्ञान ,विज्ञान .अशा त्रिपुटी पलीकडे  अवस्था येते . आणि आत्माराम सर्वत्र संचला आहे ,व्यापून राहिला आहे असा अनुभव येतो
दृश्यकर्पूर द्रष्टी अनळ | दर्शन तो प्रकाश बहळ |
विरोनी शून्याकार सकळ | होत संकल्पी || १३ ||
दृश्य कापूर आहे ,बघणारा अग्नी आहे ,मग जेव्हा त्या आत्मारामाचे दर्शन होते तेव्हा प्रगट होणारा प्रकाश खूप मोठा असतो . मोठा झगमगाट असतो .आत्मारामामध्ये म्हणजे संकल्पात तो मिसळतो तेव्हा शून्याकार असतो .
तेचि गुरुकृपेचे नि होते | दृश्य गिळोनी शून्यापरते |
स्वरूप न्याहाळीता जीवाते | जीवन्मुक्त पदवी || १४ ||
असेच जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा दृश्य शून्य वाटू लागते .साधकाला स्वरूपाची प्राप्ती होते पण जिवंत असताना जीवाला जीवन्मुक्त ही पदवी मिळते .
लटिके बंधन पावला स्वप्नी | ते मिथ्या जैसे जागेपणी |
जीवन्मुक्तपण निर्वाणी | ठावाची नसे || १५ ||
स्वप्नामध्ये पाहिलेल्या दृश्यामुळे आपल्यावर बंधन आहे असे वाटते ,पण ते खोटे असते .जसे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात ख-या होत नाहीत तसे जीवन मुक्तपण हे शेवटी ,निर्वाणी म्हणजे मृत्युच्या वेळेस खरे नसते .

नामरूप वाच्य वाचकता | हा प्रकृतीसंबंध चि आईता |
त्यागून जीवन्मुक्तत्व हातां | जरी चढले || १६ ||
नाम रूप बोलणे ,बोलणारा हा सर्व प्रकृती संबंध त्याग केला तर जीवन मुक्त प्रत्यक्षात अनुभवास येते
जेथे विवेकेसी मावळे बोध | तुटे मी तूं पानेसी संवाद |
जेथे जीवनमुक्तपण शब्द | उरेल कैंचा || १७ ||
जीवन्मुक्त ही अवस्था अशी असते की जेथे विवेकाने बोध मावळतो ,मी तू पणाचा संवाद संवाद संपतो . मग जीवन्मुक्त हा शब्द तरी तेथे कसा उरेल ?
ऐसा अनुभव ज्या आला | निर्वाणबोध हातां आला |
ऐसा साधू यया बोला | मानिजे सत्य || १८ ||
असा अनुभव ज्याला येतो त्याला निर्वाण बोध हातात येतो .निर्वाण  याचा अर्थ ब्रह्मज्ञान .जे एकमेव आहे .जे कळण्यास अवघड आहे  
देहभांव जी नाही जया | पापपुण्य कैसे त्या |
असोनि पुत्र मित्र जाया | निर्मुक्त कर्मी || १९ ||
ब्रह्मज्ञान झाले की त्याचा देहभाव रहात नाही . अहंकार नाही ,पापपुण्य रहात नाही .मग त्याला मुले ,मित्र ,पत्नी असली तरी तो मुक्त पाने कर्म करतो म्हणजे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत नाही .कर्म करून अकर्ता राहतो ,भोगून अभोक्ता राहतो .
गुणभूते बारा वाटे | विताळोनी कर्मतवा फाटे |
देहबुध्दीचा समंध तुटे | सहजचि ऐसा || २० ||
त्रिगुण आणि पंचमहाभूते आठ असली तरी जास्त वाटतात असे वाटते की जणू कर्म रुपी तवा वितळतो आहे आणि फाटतो आहे .
आता देह संमधाचे खितपणे | ते सहजची जाले वायाणे |
पावता आत्यंतिक खुणे | असोनी नाही || २१ ||
जीवन्मुक्त देह आहे म्हणून जगात असतो .वास्तविक त्याची देहबुद्धी झाडून गेल्यामुळे सुख दु:ख ,राग लोभ काहीच उरलेले नसते .त्याच्या दृष्टीने ते आयुष्य व्यर्थ असते ,तो असून नसल्यासारखा असतो .याच्या खुणा त्याला मिळतच असतात .
 इति श्री रामदास कवी | पापपंकशोषक रवी |
साधू दर्शने ब्रह्मपदवी | माहा पुण्य लाभ || २२ ||
रामदास कवी पापशोषण करणारा रवी म्हणजे सूर्य आहेत . साधूच्या दर्शनांने अतिशय  पुण्य लाभ होतो कारण ब्रह्मपदवी प्राप्त होते .  






 
  



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें