मंगलवार, 4 दिसंबर 2012

फूटयोग निरुपण



फूटयोग निरुपण


देहाचा भर्वसा नाही | वैभवाचा असेचिना |
देशकाळ वर्तमाने |सर्वही होत जातसे || १||
सांगती चालिले सर्वे | मागेपुढे हळूहळू |
 देखतां देखतां होते | कळता ण कळे कैसे || २ ||
देशोदेशीचे राजे | नाना श्रीमंत जाणावे |
किती आले किती गेले | कोण जाणे कळेचिना || ३||
संसार नेटका वाटे | सत्य नेमस्त आपुला |
 पाहातां पाहाता पुढे | कळतां कळता कळे || ४ ||
बोलता चालता जाते | सार आयुष्य वेचते |
कळेना भुलवी माया | माझे माझे वृथा वृथा || ५ ||
सोडिना सोडिना रे |कोण्हीही पाहातां जनी |
पुरता तूर्त चालावे | कोण्ही कोणी पुसो नये || ६ ||
असों हे चालते आता | माया हे चालते संवें |
धूर्त ते पावले खुणे | भ्रमिष्ट भुलली मनी || ७ ||
दिसते काय सांगावे | लोक जाती मरोनिया |
उपजले वाढले मेले | आले गेले किती किती || ८ ||
संसार नासका आहे | विटबे भलते सदा |
मन ते सांवरेना की | उभाउभी खडाखडी ||९ ||
यालागी मोकळी वृत्ती | आसीली पाहिजे सदां |
धन्य ते जाणते ज्ञानी | उदास गिरी कंदरे ||१० ||
अद्यापि या जनामध्ये | आरडा चिरडा निघे |
उदास वृत्तीचा योगी | न लिंपे असता जनी ||११ ||
||इति श्री फूटयोग निरुपण समास ||


या समासात समर्थांनी एकसुंदर विचार सांगितला आहे की ज्या देहाचा भरवसा नाही ,कारण हा देह नाशवंत आहे ,ज्या वैभवाचा भरवसा नाही कारण वैभव म्हणजे संपत्ती ,लक्ष्मी चंचळ आहे , ज्या देशाचा भरवसा नाही कारण जे उपजते ते नाश पावते ,जो काळ सतत बदलत असतो .आजचा वर्तमानकाळ उद्या भूतकाळ होतो हे सर्व नाशवंत आपण खरे ,टिकणारे मानतो .पण आज ना उद्या मागे पुढे हळू हळू ह्या सर्व गोष्टी नाश पावना-या असतात ,नाश पावतात .अनेक देशोदेशींचे राजे ,शूर ,बलवान ,वैभवसंपन्न असले तरी एक ना एक दिवस त्यांना काळाच्या पडद्याआड जावेच लागते .
आपल्या ला संसार नेटका वाटतो .सगळं कसं छान चालले आहे असे वाटते .परंतु पुढे पुढे कळते ,की खरा संसार कसा आहे ,नेटका आहे की फसवा आहे .आपण आपला सगळा वेळ बोलण्यात घालवतो .बोलणे ही खूप काही अर्थपूर्ण असते असे नाही .सगळे आयुष्य असेच जाते .कारण त्याच वेळी माया आपल्या बरोबर चालत असते .ती आपल्याला भुलवत असते .ती आपल्यामध्ये माझे माझे असे आपल्या मनी भ्रम निर्माण करते .हा माझा संसार ,माझी मुले ,माझी सगळी माणसे असा भ्रम निर्माण करते .
ह्या सर्व जनात जे धूर्त असतात ,जाणते असतात ,त्यांना मायेची ही करणी समजते .ते या मायेच्या बंधनात सांपडत नाहीत .ते  मायेच्या बंधनातून कसे सुटायचे ते जाणतात .अज्ञानी मात्र भ्रमिष्टासारखे मायेत अडकतात .दु:खी होतात ,सुख दु:खाच्या हिंदोळ्यात अडकतात ,सुख दु:खाचे झोके घेतात .हे सगळे बघितले  की लोक उपजत ,वाढतात ,मारतात .येतात जातात .जीवनाचे सार्थक न करताच आपला देहाचा त्याग करतात .पण मनाला सांवरत नाहीत मन या मोह्मायेतून बाजूला करण्याचा प्रयत्नही करत नाहीत .उलट समजते पण वळत नाही अशी त्यांची अवस्था असते .यावर उपाय म्हणजे मोकळी वृत्ती ठेवणे म्हणजे वृत्तींच्या मागे , प्रापंचिक विचारांच्या मागे न धावता त्या वृत्तींकडे त्रयस्थ पणे पाहणे ,असे पाहण्याची सवय लावून घेतली की त्या वृत्ती आपल्या मध्ये मुरतात
वृत्ती कडे पाहता वृत्ती आपणात चि मुरे | आपण चैतन्य मात्र केवळ परिपूर्ण उरे |
वृत्ती कडे त्रयस्थ पणे पाहिले की वृत्ती आपल्यात मुरतात म्हणजे ते विचाराचे तरंग योग्य की अयोग्य याचा निर्णय होतो आणि असे करता करता वृत्ती प्रमाणे कृती करणारा देह नसून करवून घेणारा आपल्यातला चैतन्य रुपी परमात्मा आहे हे कळते .असे ओळखणारे जाणते ,ज्ञानी उदासीन वृत्तीने राहतात ,गिरी कांदरात राहतात .सर्व वृत्तींपासून अलिप्त राह्तात .ते या मायेत लिप्त होत नाहीत .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें