सोमवार, 5 जनवरी 2015

चतु:समासी [समास १ ]



चतु:समासी दासबोध [ धुळे बाड ]
समास १
ॐ नमो जी गुरुनाथा | मोक्ष लक्ष्मीवंता समर्था |
देसी अर्थाचीया अर्था | शरणागत || १ ||
या समासाच्या प्रारंभी समर्थ प्रथम गुरुनाथांना म्हणजे श्रीराम प्रभूंना वंदन करतात . गुरु मोक्ष देणारे ,मोक्ष श्री मिळवून देणारे ,आहेत .समर्थ येथे श्रीरामांना समर्थ म्हणतात .तेच शब्दाचे अंतर फोडून सांगतात ,अर्थाला अर्थ देतात असे समर्थ म्हणतात .हे गुरुनाथा ,मी आपलयाला शरण आलो आहे .
जो शरणागत सद्गुरूमहिंद्रा | शुध्द भावे अक्षई मुद्रा |
प्राप्त होय जन्मदरिद्रा | पासूनि सुटे || २ ||
सद्गुरुंचा राजा [महिंद्र ] आहे ,ज्या सद्गुरू चरणी शिष्य लीन आहे ,शरणागत आहे , शरणागत सुध्दा शुध्द भावाने ,भक्तीने आहे ,त्या शिष्याला शुध्द भाव वं अक्षय शान्ती मिळते ,त्याची जन्म दारिद्र्या पासून सुटका होते .
सुटले जन्मदारिद्र | कोंवसा जोडला रामचंद्र |
देऊनी आपुले भद्र | अक्षै केले || ३ ||
समर्थ म्हणतात की माझे दारिद्र्य सुटले कारण मी श्रीराम चंद्रांचा आधार शोधला आहे . श्रीराम चंद्रांनी आपले भद्र [शुभ आशीर्वाद ] देऊन अक्षयी ,निरंतर केले .
होता मानवी कनिष्ठ |मी हा नव्हे कळले पष्ट |
येणे विचार वरिष्ठ | नि:संग पणे || ४ ||
अक्षयी केला गेलेला मी अत्यंत कनिष्ठ होतो .श्रीरामांच्या आधाराने अक्षयी ,निरंतर झालेला मी मुळचा मी नाही हे मला स्पष्ट कळले होते .पण आता मी अलिप्त ,संगरहित झालो .
नि:संगपणाचेनी योगे  | मीपण आले पाठीलागे |
ते निवारिले संतसंगे | स्वानुभवे करुनी || ५ ||
आता समर्थ संत संगाचा अनुभव सांगत आहेत . संत संगामुळे अलिप्तपणा आला जे मीपण माझ्या मध्ये होते ,ते संतांच्या सहवासाने निवारण झाले ,याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला .
बोलता न बोलता येकचि लाभ | हाणी न ये सुखा स्वयंभ |
हे सद्भाविकासी सुलभ |होये संत संगे || ६ ||
संतांच्या सहवासात बोलले ,नाही बोलले तरी एकच लाभ होतो ,हानी [हाणी ] होत नाही .सुखच प्राप्त होते .
भाविक प्रेमळ उदास | सदृढ वचनी विश्वास |
भगवंता परते जयास | अनुमात्र नावडे || ७ ||
भाव शब्द भू धातू पासून होतो भू म्हणजे होणे  किंवा असणे भाव म्हणजे अस्तित्व .भाविक म्हणजे ज्याला ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते . ज्याच्या मनात भाव असतो तो भाविक असतो .आणि भाव असून प्रेम असते तो भक्त असतो .तो प्रेमळ असतो .शुध्द अंत:करणाचा असतो त्यामुळे त्याला दुस-याच्या परिस्थिती शी दया येते ,प्रेमळ असतो .वचनाला तो पक्का असतो दिलेले वचन तो मोडत नाही .भगवंताशिवाय त्याला दुसरे काही आवडत नाही .
दु:ख होता प्रपंच संगे | क्षणक्षणा मानस भंगे |
तंव तंव अधिक रंगे | प्रेमा ईश्वरी || ८ ||
प्रपंचात राहून सतत सुख दु:खाचे प्रसंग अनुभवायला लागतात .क्षणक्षणा मानभंगाचे  प्रसंग येतात .अशा अनेक प्रसंगांना जेव्हा तोंड द्यावे लागते तेव्हा ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते आणि जास्तीत जास्त ते ईश्वराबाद्दल्चे प्रेम गहिरे होत जाते . गाढ विश्वास ईश्वरा बद्दल निर्माण होतो .
करितां सकळ संसार | ईश्वरी जयाचा भार |
जयासी ईश्वरची आधार | विश्वास बळे || ९ ||
प्रपंच करताना माणूस मी कर्ता मानतो त्यामुळे मनासारख्या न घडलेल्या गोष्टींमुळे दु: खी होतो .पण ज्याचा ईश्वरावर भार असतो ,म्हणजे ईश्वर करेल ते आपल्या हिताचेच आहे असा विश्वास ज्याचा असतो ,तो मनापासून ईश्वर आपला आधार आहे असे मानतो .ईश्वर आपले हिताचेच घडवून आणेल असे मानतो . तसा त्यांचा विश्वास असतो .
संसारी घातले जेणे | तयावीण कांहीच न नेणे |
संकटी ही वात पहाणे |एकां सर्वोत्तमाची || १० ||
ज्याने या संसारात आणले आहे ,या पृथ्वीतलावर जन्माला घातले आहे तोच सर्वत्र भरून आहे ,तयावीण रिता ठाव नाही अशी पक्की खात्री पटते ,तेव्हा संकट आले तर तो प्रयत्न करतो पण ते सुध्दा सर्वोत्तमाचे अधिष्ठान ठेवून जसे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी प्राणांची बाजी लावली पण भगवंतांचे अधिष्ठान होते .हे स्वराज्य व्हावे ही श्रीं  ची ईच्छा आहे असे म्हटले जात होते .तसा भगवंताचा भक्त असतो .
भगवंती जयाचा भाव | आघाती नुपजे अभाव |
तया भाविका देवराव |संकटी सांभाळी || ११ ||
ज्याचा भगवंतावर भाव असतो ,त्यांचा भाव थोड्याशा संकटांनी कमी होत नाही .तेव्हा तो भक्त म्हणतो की भगवंत माझी परीक्षा पाहतो आहे .आणि मग त्या भक्ताला भगवंत सांभाळतो .
समयो पडताही कठीण | पालटेना सत्वगुण |
तया भाविकाचा सीण | भगवंत वारी || १२ ||
कठीण काळ आला तर भगवंत मला मदत करत नाही असे म्हणून भगवंता वरची निष्ठा ज्याची कमी होत नाही ,त्यांचा सत्व गुण कमी होत नाही .त्या भाविकाचा ,भक्ताचा शीण भगवंत नाहीसा करतो .
कर्ता ईश्वर जाणती | विवेके तळमळ न करिती |
भार टाकीला भगवंती | सकलांचा देही || १३ ||
भगवंत अशा भक्ताचा पाठीराखा असतो कारण हा भक्त कर्ता ईश्वराला मानतो .सर्व काही ईश्वरच करणारा आहे असे मानतो .या विचाराने ,विवेकाने त्याची तळमळ होत नाही .त्याला चिंता वाटत नाही . कारण त्याने त्यांचा सर्व भार भगवंतावर टाकलेला असतो .तो त्यासाठी प्रयत्न जरूर करतो पण फलाची अपेक्षा करत नाही .
ऐसे भगवंती अनन्य | आणि अनंत जन्मीचे पुण्य |
उभे ठाके तरी धन्य | होईजे सत्संगे || १४ ||
असा तो भगवंताशी अनन्य असतो .अनन्य म्हणजे न अन्य भगवंत आणि तो एकरूपच झालेले असतात .त्यासाठी अनेक जन्माचे पुण्य कामी येते .सत्संगाने तो धन्य होतो .
सत्संगती आणि सत्शिष्य | तयासी न जोडे जगदीश |
सद्गुरू वचन पियुष | सेविती विश्वासे || १५ ||
सत्संगती मिळाली ,तो स्वत : सत्शिष्य असला तरी त्याला जगदीश्वर भेटत नाही .कारण त्याने सद्गुरू वचनाचे पियुष विश्वासाने प्यायलेले नसते .जेव्हा तो सद्गुरू वचन मनापासून ऐकतो ,
जो संसार दु:खे दुखावला |जो त्रिविध तापे पोळला |
तोचि येक अधिकारी जाला | परमार्थ विषयी || १६ ||
जो संसारात अध्यात्मिक ,आधिभौतिक आणि आधिदैविक तापामुळे दु :खी होतो ,तो परमार्थाचा अधिकारी होतो .
बहु दु:खे भोगिले जेणे | तयासीच परमार्थ जाणे |
संसारदु:खे धरणे | ईश्वरी घेतले || १७ ||
ज्याने पुष्कळ दु:ख भोगले त्याला या सृष्टीतील नश्वरता कळते ,मग तो परमार्थाचा अधिकारी होतो .संसारातील दु:खां मुळे ईश्वरा कडे मन लागते आणि संसारात दु:खी असणारा ईश्वर प्राप्तीची ईच्छा करतो कारण त्याची वाटचाल मुमुक्षुत्वा कडे जाते .एकदा ईश्वराकडे जाण्याची वाटचाल सुरु केली की आता हा संसार आता बास झाला असे वाटू लागते .
विकल्पाचा डाग पडे |तेणे गुणे विश्वास मोडे |
अविश्वासे प्राणी बुडे | माहा आवर्ती || १८ ||
जेव्हा ईश्वरावरचा विश्वास डळमळीत होतो ,म्हणजेच मनात विकल्प येतो ,तेव्हा ईश्वरावरचा विश्वास नाहीसा होतो मग ती व्यक्ती अविश्वासाने महा आवर्तनात बुडते .आवर्तने असतात जन्म मृत्युची .
जेथे सुदृढ विश्वास | तोचि जाणावा सत्शिष्य |
मोक्षाधिकारी विशेष | अग्रगण्य || १९ ||
ज्याचा ईश्वरावर दृढ विश्वास आहे , तोच सत्शिष्य असतो .सत्शिष्य मोक्षाधिकारी असतो .तो सत्शिष्य सर्वात अग्रगण्य म्हणजे सर्वात पुढे असतो .
अपार जन्मांतरीचे पुण्य | तरीच सत्शिष्य अग्रगण्य |
तया शरणांगता शरण | श्रीराम माझा ||२० ||
सत्शिष्य होणे हे अनंत जन्माचे पुण्य असते . असा शरणागत असणा-या सत्शिश्याला माझा श्रीराम शरण असतो .त्याच्या साठी श्रीराम काहीही करायला तयार असतात .कबीराचे शेले श्रीराम विणत .संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या च्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत काम करत .
जो कोंवसा निजभक्तांचा | साह्याकारी सुरवरांचा |
अजन्म अवतरोन भूमीचा | भार फेडिला || २१ ||
जो स्वत:च्या भक्तांचा कोंवसा म्हणजे आधार असतो . सुर वरांचा तो सहाय्यकारी असतो .रावणाने सर्व देवांना बंदिवान केले होते .त्यांना श्रीरामांनी सोडवले .अजन्म असणा-या श्रीरामांनी अनेक राक्षसांचा नाश करून या भूमीचा भार कमी केला .
नामे पाषाण तारिले | वाल्मिका ऐसे उद्धरीले |
मननसीळ केले | जीवन्मुक्त || २२ ||
नामाने पाषाण तरतात .प्रत्येक पाषाणावर श्रीराम हे नाव लिहून तो पाण्यात टाकल्यावर तो तरला .वाल्मिकी ज्याने अनंत पापे केली ,त्याला राम ,राम असे म्हणता येत नव्हते ,त्याने मरा मरा असा जप सुरु केला आणि मरा चे राम राम झाले .आणि त्यांचा उध्दार श्रीरामानी केला .जे मननसीळ होते त्यांना जीवन्मुक्त केले . 
रावणादि पराक्रमी | प्रतापी दंडोनी संग्रामी |
मुक्त करोनी स्वर्गधामी | अमर स्थापिले || २४ ||
रावणा सारख्या पराक्रमी प्रतापी वीराला शासन केले ,त्याला मरण दिले .स्वर्ग प्राप्ती करून दिली .
विकल्प सांडूनी अनन्यता | देखोनी होय प्रसन्नता |
म्हणोनि सत्संगती तत्वता | भावे वोळगावा || २५ ||
विकल्प सोडून अनन्यता आपल्या उपास्या वर श्रध्दा ठेउन ,उपास्याला पाहून प्रसन्नता ठेवली, भावाने उपास्य दैवत मिळवावे .त्यासाठी सत्संगती महत्वाची असते
जन्मा आलिया स्वहित | जे नामस्मरणी रंगले चित्त |
सद्गुरू भक्ती विकल्परहित | आचरे भावे || २६ ||
मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक करायचे असेल तर नामस्मरणात चित्त रंगून गेले पाहिजे सद्गुरुंवर कोणत्याही विकाल्पाशिवाय भक्ती करायला हवी जशी कल्याण स्वामींनी समर्थांच्यावर केली .फांदी तोडताना आपण विहिरीत पडणार आहोत हे माहीत असूनही समर्थांनी जसे बसून फांदी तोडायला सांगितली तशी तोडली .कल्याणा छाटी म्हटल्यावर विचार न करता सज्जन गडावरील एकां दरीत उडी मारली .
कर्म उपासना ज्ञान | सारासार करी मथन |
आत्मारामी अनुसंधान | विवेके लावी || २७ ||
कर्म ,उपासना आणि ज्ञान  या तीनही उपासना पद्धतीने सारासार विचारांचे मंथन करतो ,विवेक विचार करतो ,आत्मारामाशी अनुसंधान करतो .
इति श्री रामदास |पुढे विनवी श्रोतयास |
कर्ता दाशरथी सायास | कांहीच नाही || २८ ||
श्री समर्थ रामदास श्रोत्यांना विनवतात की या संपूर्ण सृष्टीत सर्व कर्मांचा कर्ता प्रभू श्रीराम आहेत असे समजून उपासना केली तर सगळा कर्ता श्रीरामच आहेत हे लक्षात येते मग कोणतेच कष्ट घ्यावे लागत नाहीत ,


 




मंगलवार, 2 दिसंबर 2014

सोलीव सुख
पारमार्थिक दृष्ट्या  सोलीव सुख
सोलीव सुख म्हणजे कल्याण कारक सुख
पारमार्थिक दृष्ट्या सोलीव सुख हे काव्य श्री समर्थांचे की कल्याणस्वामींचे या बद्दल मतभेद आहेत .पण पांगारकरांच्या दासबोधात हे काव्य समर्थ कृत सोलीव सुख असे म्हटले आहे .म्हणजे हे काव्य समर्थांनी लिहिले असावे .सोलीव सुख हे दासबोधाचे सार ,फलित आहे .
सद्गुरुंना वंदन करताना म्हटले आहे .
जयजयाजी सद्गुरुराजा | पूर्णब्रह्मा प्रतापसूर्या |
तुज नमोजी आचार्या | करुणासिंधो || १ ||
सद्गुरुंचा जयजयकार असो .तुम्ही पूर्ण ब्रहम आहात .प्रतापसूर्य आहात .आपल्या  सत्तेने सर्व व्यवहार चालतो .तुम्हाला कोणाची उपमा देता येत नाही .आपण माझे आराध्य आहात .करुणासागर आहात .आपण ज्ञानी लोकांना उद्धरून नेताच पण अज्ञानांनाही उद्धरून म्हणून शबरी सारख्या भिल्लिणी ना सुध्दा आपण पावन केलेत .आपल्याला अज्ञानी लोकांची करुणा येते .त्यांना संसाराच्या दलदलीतून बाहेर काढता .म्हणूनच पिंगले सारख्या वेश्येला सुध्दा तारून नेता .
आपण आचार्य आहात तत्वज्ञानाचे अधिष्ठान असलेले प्रस्थान त्रयी चा अभ्यास  करणारे आहात .
जे भवसमुद्री पोळले | विषयमदे अंध जाहले |
चौ-याशित वाहू लागले |  मार्ग सुचेना तयासी ||२ ||
या संसार रुपी भवसागरात जे पोळले ,विषयाचा मद ज्यांना चढला आहे आणि त्यामुळे जे अंध झाले आहेत .ज्यांना खरे खोटे ,सार असार कळत नाही ,चौ-यांशी लक्ष योनी ज्यांना फिराव्या लागतात ,मुक्तीचा मार्ग ज्यांना दिसत नाही ,त्यांचा उध्दार आपण करतात .
ऐसे विश्व बहुत बुडाले | मी जीव म्हणोनी धांवू लागले |
मुळीच स्मरण विसरले | मी कोण ऐसे || ३ ||
हे विश्व तुझ्याच सत्तेने चालते ,त्याचे तुम्ही पालनही करता ,पान त्या विश्वाचा लय ही करता ,त्या विश्वाचा लय ही आपणच करता .माणूस अज्ञानाने स्वत:ला जीव म्हणतो .जीव म्हणजे मी म्हणतो . अज्ञानाने धावू लागतो .  त्याच्यावर अज्ञानाचा पडदा येतो .त्यामुळे देह म्हणजे मी असे त्याला वाटते .त्यामुळे खरा मी कोण याचे त्याला विस्मरण होते .
तयासी मुक्त करावया पूर्ण | तूं बा उतरलासी ज्ञानघन |
रोगिया औषधी देऊन | भवमोचन करिसी || ४ ||
अशा देहबुद्धी असणा-या अज्ञानाला पूर्ण करायला हे दयाघना तू आला आहेस .तू ज्ञानरूप आहेस .त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती ही तू मला करून देशील .मी अज्ञानी असलो तरीही तू सर्व अज्ञानी जीवांचा उध्दार करणारा आहेस .गुरु गीतेत सांगितल्या म्हणल्या प्रमाणे भव व्याधी होती निर्मळ | व्याधी म्हणजे रोग येथे रोग या अर्थी रोगिया असा शब्द आहे ज्याप्रमाणे भवसागर तरून जाण्यासाठी मदत करतोस म्हणून मी अज्ञानी मी तुला शरण आलो आहे .
ऐसे औदार्य तुझे सघन | म्हणोनि आलो मी शरण |
दयार्णवा कृपा करून | मज दातारे तारावे || ५ ||
तू उदार आहेस .तुझे औदार्य महान आहे .मला तुझ्याजवळ आश्रय  देशील म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे .हे दयार्णवा ,दयेच्या सागरा ,कृपा कर .आणि मला बालकाला तरून ने .
सोलीव सुख हे प्रकरण गुरु शिष्यांचा संवाद आहे .शिष्याला गुरुंना विनंती करायची आहे .
आपण आपणा ते पावे | ऐसे माझे मनी बोलावे |
ते दातारे गोचर करावे | रोकडे ब्रहम || ६ ||
मी मला प्राप्त व्हावे म्हणजे मी स्वस्वरुपी असावे .तुम्ही मागू ते देणारे आहात .रोकडे ब्रहम माझ्या ईंद्रीयांना गोचर होऊ देत .मला परमेश्वर दाखवा आणि मला रोकडे ब्रहम प्रचीतीला येऊ द्यात या दोन्हीत फरक आहे .रोकडे ब्रहम प्रचीतीस येण्यासाठी सद्गुरू वं सत्शिष्य दोन्ही प्रचीतीचे असावे लागतात .रोकड्या ब्रह्माचे दर्शन होण्यासाठी सर्व सोडण्याची तयारी हवी .वैराग्य परीसीमेला पोचलेले असावे लागते .शंकराचार्यांच्या अष्ट काप्रमाणे व्यतिरेक वं अन्वया वागता आले तर ते गोचर होते .मला रोकडे ब्रहम दाखवा असे शिष्याने म्हणताच काय झाले ?
ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी |
ज्ञानाचे भरते आले | स्वामी लागोनि |
आसन सांडोनिया तये क्षणी | कडकडोन भेटले || ७ ||
शिष्याचा प्रश्न ऐकून सद्गुरुंना ज्ञानाचे भरते आले .आणि शिष्याला कोठे ठेवू आणि कोठे नको असे सद्गुरुंना झाले .आणि त्या आनंदाच्या भरात सद्गुरुंनी आपले आसन सोडले आणि शिष्याला कडकडून भेटले .
रे बाळका ,ऐक निर्धार | तुझा प्रश्न वाग्दोर |
माझे कंठी बैसला साचार | बरे घेई निजा वस्तू || ८ ||
अरे बाळका माझा निर्धार ऐक .तुझा प्रश्न म्हणजे माझा वाग्दोर आहे .म्हणजे लगाम आहे .तो माझ्या कंठी बसला आहे .त्या प्रश्नाने मी तुझ्याकडे ओढला गेलो आहे .चाळ तर ,तुला मी निजवस्तू ,ब्रहम देतो ते घे .

मग स्नेहाळे नवल केले | वोसांगाशी शिष्या घेतले |
अर्ध मात्रा रस काढिले | पूर्ण फुंकले कर्णरंध्री || ९ ||
गुरूंनी शिष्याला मांडीवर घेतले .अर्ध मात्रेचा रस काढला .एकनाथ महाराज म्हणतात : कानी जे पेरिले | नेत्री ते उगविले | कानात पेरला महावाक्याचा मंत्र .डोळ्यामध्ये शिष्याला आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला .स्नेहाळाने म्हणजे सद्गुरुंनी नवल केले ,आश्चर्य केले .गुरूंनी शिष्याला मांडीवर घेतले .ओंकाराच्या अर्धमात्रेचा रस काढला .ओंकाराच्या पहिल्या तीन मात्रा देहाच्या तीन अवस्थां बरोबर आहेत  ओंकाराच्या चार मात्रा अ ऊ म आणि अर्धमात्रा .या मात्रा समजून घेण्यासाठी देहाच्या चार अवस्था आहेत .अ काराची मात्रा म्हणजे जागृती अवस्था .ऊ काराची मात्रा म्हणजे स्वप्नावस्था वं म काराची मात्रा म्हणजे सुषुप्ती अवस्था .ओंकाराची अर्धमात्रा म्हणजे म्हणजे चंद्र आणि बिंदू .,म्हणजे तुरीय अवस्था . अर्धमात्रेचा अनुभव म्हणजे स्वरूपाचा अनुभव . स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी पहिल्या तीनही मात्रांना ओलांडून पुढे जावे लागते .मग त्याची विशालता ,विविधता ,नाद ,बिंदू ,चंद्राची कला ,वं ज्योती अशा प्रकारे ,अर्धमात्रेचा अनुभव येण्यासाठी तीनही मात्रा ओलांडून जावे लागते ,
अर्धमात्रेचा रस काढला म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतला .त्या सगळ्याचा रस ,अर्क काढला .तो पूर्ण अर्क शिष्याच्या कर्णरंध्रात फुंकला तो दिव्य रस कानातून डोळ्यात  गेला .
खडतर औषधी दिव्यरसायनी | नयनी झोंबले जाऊन |
डोळियाचा डोळा फोडून | चित्सूर्य भेदिले || १० ||
केनोपानिषदात २ या मंत्रात म्हटले आहे :: श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद |
वाचो हं वाचं स प्राणस्य प्राण : |
चक्षुस्च्क्षुरति मुच्य धीरा : |
प्रत्यास्माल्लोकाद् मृता भवन्ति |
परब्रह्म परमात्मा श्रोत्राचा श्रोत्र ,मनाचे मन डोळ्यांचा डोळा आहे .ज्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केले तो उपाधीने युक्त झाला .प्रकृती पुरुष रूप झाला .सगुण परमात्मा झाला प्रभू श्रीराम हे त्या परमात्म्याचे सगुण रूप तर आत्मा हे त्याचे निर्गुण रूप .तीच प्रत्येकात असलेली चैतन्य शक्ती आहे .या शक्तीचा आश्रय घेऊन चीत्सूर्याला भेदून टाकले आहे .
पूर्ण अंश गगनी भेदिला | अर्क तो पिंडी माजी उतरला |
त्रिकुट श्रीहाट चुराडा केला | सेखी भरला गगन गर्भी || ११ ||
कर्णरान्ध्रातून फुंकलेल्या ओंकाराच्या अर्ध मात्रेचा रस पूर्ण अंशाने गगनाला भेदला .पिंडामध्ये अंश रुपाने म्हणजे सोहं भाव राहिला .त्रिकुटाचा म्हणजे सत्व ,रज ,तमाचा चुराडा केला. सत्व ,रज ,तमोगुणां च्या पलीकडे गेला .
आज्ञा चक्र ,श्रीहाट ,वं गोल्हाट या तीन चक्रांचा एक त्रिकोण तयार होतो .यालाही त्रिकुट म्हणतात .या त्रीकुटावर सद्गुरूंची पावले उमटतात.
कुंडलीनी मार्गात कुंडलिनी जागृत होताना ज्या मार्गावरून जाते ते ते आज्ञाचक्र ते सहस्राधार चकरा पर्यंत पोहोचते .ती सरळ मार्गाने न जाता वाकड्या मार्गाने जाते .ही आज्ञाचक्र ,श्रीहाट ,गोल्हाट या मार्गाने जाते .ही चक्र शक्तीची स्थाने मानली तर सत्व ,रज तमो गुणांचा आपल्या शरीरात असतात .प्रत्येक क्षणी या त्रिगुणांची नवनवीन समिश्रणे तयार होतात .जेव्हा या त्रिगुणांचे खेळ बंद केले त्रिगुणांच्या पलीकडे नेले .श्रीहाट यात श्री म्हणजे प्रकृती ,हाट म्हणजे बाजार म्हणजे पंचमहाभूतांचा वं त्रिगुणांचा खेळ बंद केले योग मार्गात चित्त वृत्तीचा निरोध होतो आणि ईश्वराचा अनुभव येतो .                 
उग्रतेज लखलखाट | तेथे जाला चौदेहाचा आट |
भ्रांती पडली बळकट | तेव्हा बाळ निचेष्टित पडे || १२ ||
चार देहांचा म्हणजे स्थूळ ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण या चार देहांचा नाश होतो .मग जीव भाव संपतो ,अद्न्यानाची उपाधी संपली ,जीव भाव संपतो .हिरण्यगर्भा च्या तेजाशी याचा संबंध येतो .हे सर्व त्या शिष्याला झेपले नाही .म्हणून तो बेसावध झाला
ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ | पद्म्हस्त मस्तकी ठेवत |
वत्सा सावध त्वरित | निजरूप पहा आपुले || १३ ||
शिष्य बेसावध झाला असे पाहून आपला पद्म्हस्त सद्गुरुंनी शिष्याच्या मस्तकावर ठेवला आणि सद्गुरू म्हणाले वत्सा सावध हो . तू तुझे रूप स्वत : पहा .
जागृत  करोनी ते वेळी | अजपाची दोरी देऊनी जवळी |
विहंगम डोल्हारी तयेवेळी | अलक्ष्य लक्षी बैसविले || १४ ||
शिष्याला समर्थ जागृत करतात आणि म्हणतात मी तुला अजपाजपाची दोरी दिली आहे अजपाजप म्हणजे न जपता सहज होणारा सोहं जप श्वासोश्वासात एकवीस हजार सहाशे जप आहे याचा अर्थ एकवीस हजार सहाशे वेळा आपण श्वास उचावास करत असतो . अजपाजपाने अलक्ष्य असणारे परमात्मस्वरूप प्राप्त करून घेता येते . ,तत्वमसी आदी महावाक्यांच्या निरुपण सद्गुरू करतात .,ज्याचा वेध घेता येत नाही त्याच्या पर्यंत विहंगम मार्गाने स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचता येते .तसा तू पोहोचशील .धैर्याचे आसन बळकट | आणि इंद्रीये ओढुनी सघट |
धरे ऊर्ध्वपंथे वात नीट | अढळपदी लक्ष लावी || १५ ||
तुला योगप्राप्ती झाली तरी तू धैर्याने ,बळकट आसन घालून ,तुझ्या उद्देशापासून दूर न जाता त्यासाठी ईंद्रीये दमन करावे लागेल . असे सांगण्याचे कारण धैर्य आणि बळकट आसन या दोघांचा विचार केला नाही तर योगभ्रष्टता येते .असे होऊ नये म्हणून उद्धर्व मार्गाने जायचे आहे .त्यासाठी गुरूने सांगितलेल्या मार्गाने जायचे .गुरूने उपदेश करावा आणि शिष्याने त्या प्रमाणे वागावे .त्यासाठी धैर्य ,निर्विचारी ,निर्विकारी मन असावे .ईंद्रीय ओढून सघट म्हणजे ईंद्रीयांचे नियंत्रण करायचे .गुरु  शिष्याचा अधिकार जाणून त्याला दृष्टी स्पर्श या मार्गाने शिष्याला पुढे नेतात .
पुढे करोनिया जाणीव | मागे सारोनी नेणीव |
जे जे जाणीव अभिनव | ते तू नव्हेसी आता || १६ ||
विश्वात परामात्म्ररूपाने जाणीव भरली . सर्वदूर भरून राहिलेल्या जाणीवेला पुढे कर .अद्न्यानाला मागे कर . त्यासाठी दृष्टांत पातेल्याचा देता येईल . घासून पुसून स्वच्छ केलेले पातेले गरम केले  तर मसालेदार पदार्थाचा वास येतो .कारण त्यांचा संस्कार शिल्लक राहतो .तसे गुरु शिष्याला घासून पुसून स्वच्छ करतात .तसा अज्ञानाचा संस्कार गुरु पुसतात . शिष्याकडून गुरु साधना करवून घेतात .तेव्हा त्याला अनुभव यायला लागतात .तेव्हा गुरु सांगतात की की येणारे अनुभव दूर कर .त्यांच्या मध्ये अडकू नकोस .तू त्या अनुभवा पलीकडे आहेस .आलेले अनुभव हे ब्रह्मस्वरूप नाही हे लक्षात ठेव .
तै मार्गाची करू नव्हाळी | प्रथम घंटानादाची नवाळी |
दुसरी किंकिणीची मोवाळी | तिसरी अनुहात कोल्हाळ || १७ ||
नव्हाळी म्हणजे नवलाई . तुला अनुभवात प्रथम घंटानाद ऐकू येईल .किंकिण ऐकू येईल .पण या अनुभवात अडकू नकोस .पुढे जा .
आता अग्री लक्ष लावी | काय दिसेल ते न्याहाळी |
चंद्र ज्योती प्रकाशली | व्यूह बांधिला बळकट || १८ ||
आता तू लक्ष लाव तुझ्या ध्येयाकडे .तुला जे दिसेल ते तू न्याहाळ .सृष्टीच्या निर्मिती चा व्यूह ,गुंता दिसेल .सृष्टी कशी निर्माण झाली , त्यांचा व्यूह बळकट आहे कठीण आहे .कारण तुला ह्या सृष्टीच्या पलीकडे जायचे आहे .सृष्टीची निर्मिती ज्याच्या पासून झाली त्या तत्वांच्या पलीकडे तुला जायचे आहे .मी  तुला स्वरूपाचे सुख मिळाले ते अंतरी धर . मी तुला स्वरूपाचे सुख मिळाले ते अंतरी धार .तरी त्या स्वरूपाच्या अनुभवाची कोवळीक आहे ,नवेपणा आहे ,तुला पुढे  जायचे नाही स्वरूपानुसंधान सुखरूप ठेवून तुला पुढे जायचे आहे .
ते सुख अंतरी घेउनी | पुढे चाल करी संगमी |
तेथे विजू ऐसा कामिनी | चमकताती सुवर्णरंग || १९ ||
पुढे विजेचा लखलखाट आहे ,सोनेरी रंगाचा लखलखाट होईल .तो हिराण्यगर्भाचा ,जो सृष्टीचा मूळ अधिष्ठाता आहे .म्हणून ते ही मागे टाक .
तेहि जाणोनी मागे सारी | पुढे सूर्यबिंब अवधारी |
ज्वाळा निघती परोपरी | डंडळू नको कल्पांती || २० ||
ते सर्व मागे सारून सूर्यबिंब बघ .सूर्य उगरूपाने प्रकट झाला आहे . डडळ म्हणजे डळमळीत .सूर्य बिंबापासून जरी  ज्वाला निघत असल्या तरी तू डळमळीत होऊ नकोस .तू थांबू नकोस . कल्पांत झाला तरी घाबरु नकोस .
वायोमुख करोनी तेथे | गिळी वेगे सूर्यकिरणाते |
मग देखसी आनंद मार्तंडाते | तेजोमय ममपुत्रा || २१ ||
रे पुत्रा  आता तू तेजोमय झालास .हिरण्यगर्भाच्या पातळीवर तू आलास .तू आता आनंद सूर्य पाहशील .म्हणजेच सत् चित् आनंदाचा अनुभव घेशील .ब्रह्माच्या सर्व लक्षणाचा अनुभव घेशील .वायुमुख म्हणजे सुषुम्ना नाडी .या नादितून प्राणांचा प्रवास ऊर्ध्वगामी असतो .तेव्हा तू आनंद मार्तंडाचा अनुभव घेशील कारण तू आता तेजोमय झाला आहेस .
अनंतभानू तेज अद्भुत | खदिरांगार ज्वाला उसळत |
धारिष्ठ तेथे न निभत | दुर्घट व्यूह तेथीचा || २२ ||
अनंत सूर्यांचे अद्भूत तेज तुझ्यामध्ये आता आले आहे .मोठ्या मोठ्या ज्वाला आता उसळत आहेत .सूर्य वं चंद्र नाडी ह्या श्वासोच्छवासाच्या ठिकाणी आहेत सुषुम्ना नाडी जी पाठीच्या कण्यातून जाते ,त्यातून प्राणांना ऊर्ध्वमुख केले जाते .या सुषुम्ना नाडीला काकीमुख म्हणतात .सर्व प्रकारचे प्राण या सुषुम्ना नादितून वर् जातात ,ऊर्ध्वमुख होतात .मग तुला सत् चित् आनंद रूपाचा अनुभव येईल .
तेथे हुशारीचे काम | अग्री लक्ष लावोनी नेम |
तीरे लावोनी सुगम | मागे सारी सूर्याते || २३ ||
प्रणवाचे धनुस्ष्य कर .अर्धमात्रेचे धनुष्य झाले ,ब्रहम हे उद्दिष्ट ठेव .स्वरूपाच्या अखंड अनुसंधानासाठी जीवाचा तीर कर .
पुढे दिसेल ते नवल | ते पाही हंसमेळ |
चंद्रकिरण शीतल | पाहसी तू मम वत्सा || २४ ||
पुढे तुला एक नवल दिसेल .तू हंसमेळ पहा हंस म्हणजे स : अहं तो मी प्राण आहे .ही जाणीव श्वास घेताना ज्ञान आहे की मी जीव आहे .श्वास घेणे वं सोडणे या दोन क्रिया प्राण वं अपानाचा खेळ आहे .तोच हंसा मेल आहे .नाम्स्म्मरण करताना सुध्दा हंसा मेळ होतो .जेव्हा एकतानता होते तेव्हा ध्यान होते .जेव्हा त्रिगुण व्याक्तावस्थेत येतात ,पंचमहाभूते वं त्रिगुण यांची अष्टधा प्रकृती होते वं सृष्टीची निर्मिती होते .हंसामेळात ,ध्यानावस्थेत अहंकार सुटतो ,स्वरूपाचा अनुभव येतो . त्रिगुण सुटतात .चंद्राच्या शीतल चांदण्याची जाणीव होते .
तेव्हा मागील दाह क्षमेल | शीतळाई सर्वांग होईल |
चंद्राची प्रभा सुढाळ | फडफडीत चांदणे || २५ ||
त्रिगुणांना ओलांडून पुढे गेले की दाह शमतो . सर्वांगावर शीतळाई येईल . चंद्राची प्रभा फाकेल .सर्वत्र चंद्र प्रकाश पसरेल . फडफडीत चांदणे पडेल तुझ्या देहात तुला अनुभव येईल .
तेचि डोळियांचा डोळा पाही | देहातीत वर्म विदेही |
चिन्मय सुखाची बवाई | भोगी आपुले की गा || २६ ||
देहाच्या अतीत असण्याचे वर्म तुला कळेल तू विदेही होशील .चिन्मय सुखाची प्राप्ती तुला होईल .चित् चे अनुभव तू घेशील .चिन्मय म्हणजे चित् + मय .मय म्हणजे विपुल .त्याचे चित् जगात भरून राहिलेले आहे अशी जाणीव तुला होईल .तू सर्व व्यापी होशील . बावाई म्हणजे बहुवाई म्हणजे तू बहुत होशील .सर्वांमध्ये समरस होशील .तूच सर्व होशील . तुझ्या चिन्मय रूपाचा ,मूळ स्वरूपाचा अनुभव घे . महत् जाणीवेचा अनुभव घे ,भोग घे .
अनुभवाची शीग भरली | आग्रापरी उसळली |
भूमंडळी प्रभा पडली | कर्पूर वर्ण नभ जाहले || २७ ||
तू आता निर्गुणा पर्यंत चा अनुभव घेतलास . अनुभवाचे मापन करता येते पण तुझा अनुभव मापना पलीकडे गेला आहे .आग्रा परी उसळी म्हणजे जणू काही तुझ्या पासून अनुभव प्रगट झाला आहे . अनुभव देणारा वं घेणारा एकच आहे द्वैत संपले आहे .अद्वैत झाले आहे .मुळात आकाश काळे आहे .पण सूर्य प्रकाशाने ते निळे दिसते .पण तुझे अज्ञान म्हणजे काळेपणा संपला आहे म्हणून आता आकाशाची निळाई संपली आहे .सात रंग एकत्र आल्यावर पांढरा रंग दिसतो ,त्याच प्रमाणे तुझे अज्ञान संपल्या मुळे कर्पूरगौर वर्ण दिसतो आहे .
तया मध्यभागी सघन | अढळपद  दैदिप्यमान |
उर्वरित ब्रहम जाण | धृव बैसला अढळ ते || २८ ||
कर्पूर नभात तुझ्या अनुभवा पलीकडे तुझे स्वरूप आहे .तुझे ज्ञान ,तो मार्ग ,ती जाणीव आता शिल्लक रहात नाही .ध्रुवाला जसे अढळपद मिळाले तसा तू सुध्दा अढळपदी जाऊन बसणार आहेस .
ते तुझे स्वरूप नेटे वोटे | जेथे समस्त जाणणे आटे |
ऐके जालासी थिटे | बळकट पणे बलाढ्य || २९ ||
तू अशा रुपाला जाऊन पोहोचणार आहेस तेथे सर्व जाणणेही संपेल .अद्न्याची अवस्था तू पार केली आहेसच पण आता ज्ञानाची अवस्थाही तू पार केली आहेस .ह्याला कारण तू बलवान ,बलाढ्य आहेस .तू तुझी साधना कोणत्याही टप्यावर सोडली नाहीस .
ऐसे सुख योगिया लाधले | तेव्हा देहाचे  मरण गेले |
सांगणे ऐकणे मुराले | एकत्वपणे एकचि || ३० ||
असे सुख जेव्हा योग्याला मिळाले ,तेव्हा देहाचे मरण गेले कारण तू अशा अवस्थेत असशील की देह जगाला काय किंवा मेळा काय तुझ्या साठी सारखेच असेल .विदेही अवस्था तुला प्राप्त होईल . सांगणे ,ऐकणे ,सगळे तुझ्यासाठी सारखेच होईल .
शांती येथोनि माळ घाली | अलक्ष्य सेजे निजेली |
हंसपदे ऐक्य जाली | सुख सुखाते निमग्न || ३१ ||
तुला अखंड तृप्ती ची प्राप्ती होईल .काहीही मिळवायचे शिल्लक राहणार नाही .असे तुझे दर्शन लोकांना होईल .तू ब्रहमभावाला प्राप्त झालास अलक्ष्य म्हणजे ब्रहम ते तुझ्या जवळ निजेल म्हणजेच तुला ब्रहम पदाची प्राप्ती होईल .हंस पदे ऐक्य झाले म्हणजे स्वरूपाशी तू एकरूप झालास .तुला जगातून काही मिळवायचे शिल्लक राहणार नाही . कार्य करायला काही उरणार नाही .कारण तुला कोणताही संकल्प उरणार नाही .ह्यालाच शून्यता म्हणतात .तुझ्या रुपाने सुख सुखात निमग्न झाले .सुख तुला शोधात आले .
तेथील अनुभव घेऊनि | स्वानुभव पाहे कलटूनि | 
आला मार्ग ते क्षणी | दिसेनासा जाला की || ३२ ||
तू अंतीम शांततेचा अनुभव घेतलास .तू मागे वळून पाहिलास तर तुला मार्ग दिसेनासा होईल .
त्रिकुट श्रीहाट गोल्हाट | बुडाले ते औटपीठ |
इडा पिंगळा सुषुम्ना तट | विराले ते स्वात्मसुखे || ३३ ||   
कारण त्रिकुट म्हणजे त्रिगुण ,श्रीहाट म्हणजे प्रपंचाचा बाजार संपला .ईडा ,पिंगला ,सुषुम्ना ह्या सर्व नाड्या ही विराल्या आणि स्वात्म सुखाचा अनुभव तू घेतलास .
स्थूळ सूक्ष्म कारण | नेणो काय जाले महाकारण |
ईंद्रीय चुबकली जाण | धाव मोडली तयांची || ३४ ||
स्थूळ ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण ह्या देहाच्या अवस्था च्या पलीकडे तू गेलास .त्यामुळे तुझी इंद्रीये सुध्दा बुच्कुल्यात पडली ,त्यांची विषयांकडे जाणारी धाव ही संपली .
पंचभूतांचे खवले | तयांचे ठावाची पुसले |
अपरिमित आनंदले | निमग्न जाले सुखात || ३५ ||
खवले म्हणजे टरफल .पंचमहाभूतांची टरफले ,त्यांचे ठाव म्हणजे स्थानही संपले .तुला अपरिमित आनंद झाला .चैतन्य सुखात निमग्न झाले .देह पंचभूतिक राहिला नाही .आणि तुझ्यात ब्रह्मत्व प्रकट झाले .
सखोल भूमी ऐसे जाले | सुख सुखासी घोटले |
स्वये आत्मत्व प्रकटले | माझे देही रोकडे || ३६ ||
सुखाला सुखाने घोटले .एकजीव झाले .ज्याप्रमाणे कोणतेही होमिओपॅथिक ,आयुर्वेदीय औषध घोटले की एकजीव होते त्याप्रमाणे तू सुखाला सुखांने घोटलेस .मग देहात प्रत्यक्ष रोकडे ब्रहम प्रकट झाले .
मग सहजसमाधी जिरवून | शिष्य उठला घाबरा होऊन |
हे सद्गुरू देणे वरदान | काय उत्तीर्ण व्हावे म्या ||३७ ||
मग शिष्य सहजसमाधीतून बाहेर आला .सतत अनुसंधानात राहणे म्हणजे सहज समाधी .त्यातून शिष्य घाबरा घुबरा होऊन उठला .आणि म्हणतो ,गुरुदेवां ,आपण मला वरदान दिले .त्यातून मी कसा उतराई होऊ ?
जरी स्तुती तयाची करावी | माझी मती नाही बरवी |
अनिर्वाच्य गती बोलावी | परा वाचा कुंठीत || ३८ ||
आपली स्तुती मी कोणत्या शब्दात करू ? माझी बुद्धी ते करू शकत नाही कारण माझी परा वाचा सुध्दा कुंठीत झाली आहे .मला शब्द सुचत नाहीत . आपले वर्णन अनिर्वाच्य असेच करावे लागेल .
आता जी मी लडिवाळ पणे | तुमचे कृपेने करितो स्तवन |
सूर्यापुढे खद्योत जाण | तैशापरी बोल हे || ३९ ||
आता मी लडिवाळपणे तुमच्याच कृपेने तुमचे स्तवन करतो .सूर्यापुढे जसा काजवा तसा आपली स्तुती मी करणे आहे .
जयजयाजी करुणासिंधू | जयजयाजी भवरोग वैदू |
जयजयाजी बाळबोधु | कृपाघना समर्था || ४० ||
आपण करुणेचे सागर आहात .भवरोगा वरचे औषद देणारे वैद्य तुम्ही आहात .कृपेचा मेघ वर्षाव करणारे आहात .
जयजयाजी अविनाशा | जयजयाजी परेशा |
जयजयाजी अध्यक्षा | दयार्णवा || ४१ ||
आपण अविनाशी ,कधीही नाश न पावणारे आहात .आपण दयेचा सागर आहात .
जयजयाजी पूर्णचंद्रा | जयजयाजी अलक्ष्य विहारा |
जयजयाजी भवसिंधू भास्करा | आनंदप्रभू || ४२ ||
आपण पूर्ण चंद्रा सारखे आहात ,जो अलक्ष्यात लोक लवकर विहार करतात .
तुझी स्तुती करितां सांग | वेद्स्तुती जाले अव्यंग |
तेथे प्राकृत मी काय | वर्णावया योग्य नव्हे || ४३ ||
तुझी स्तुती करताना वेद ही शांत झाले कारण त्यांची वाणीही थकली .
कल्याण म्हणे जी रामदासा | माझा मुकेपणाचा ठसा |
ते मोडोनी वसोसा | मज आपणा ऐसे केले || ४४ ||
कल्याण स्वामी समर्थांना म्हणतात माझ्या मुकेपणाचा ठसा म्हणजे अज्ञान ते आपण मोडलत . वासोसा म्हणजे परिश्रम . परिश्रम करून तुम्ही माझे अज्ञान नाहीसे केले .सद्गुरू शिष्याला परीस करतात . परीस लोखंडाला सोने बनवते .पण ते सोने दुस-या लोखंडाला सोने बनवू  शकत नाही . पण सद्गुरूंचे तसे नसते .सद्गुरू शिष्याला त्यांच्या सारखेच बनवतात . शिष्य आपल्या सारखाच दुसरा शिष्य बनवतो .म्हणजेच परीस बनवतो .
ऐकोनी मृदुवचन | कुरुवाळीले तया लागून |
गुरु शिष्य हे बोलणे | उरले नाही ते वेळी || ४५ ||
असे मृदू वचन ऐकून गुरुंनी शिष्याला कुरवाळले .मग तेव्हा गुरु शिष्य वेगळे उरले नाहीत . त्यांचे बोलणे ही संपले नाही .
एकपण एकचि जाले | ऐक्य् रुपी  सम मिळाले |
करुनिया सुख उसळले | नाहीपण जाऊनि || ४६ ||
भक्ती प्रेमाचा ओलावा आहे .प्रेमभाव ब्रहमभावाने ब्रह्मांडात परमात्मा निवास करायला लागला .बहु नामरूपात आला .कारण सर्व जगाविषयी परमेश्वराचे प्रेम आहे .अद्वैत एकच झाले .व्यतिरेक संपला .अन्वय साधला .त्या भावाने सर्व एकरूप झाले .
सुगरिणीचा पाक जाला | नाथभाजनी वाढीला |
अक्षयपदी सुगरवाला | संत जेवती स्वानंदे || ४७ ||
सुगरीणी चा पाक झाला .हा दृष्टांत दिला आहे . सुगरण अनेक पदार्थ करते .अनेक पादार्थांचे चवीचे माधुर्य लोक खाताना अनुभवतात ,नभ व्यापक आहे .त्या व्यापक नभाच्या अंगणात भोजन आहे .सुरगावला म्हणजे रुची आली .रसाळ पण आले .ते भोजन गुरूने शिष्या करता बनवले ,त्या भोजनाची रुची अक्षय पदाला पोहोचली .अवीट असे सुख सद्गुरुंनी शिष्याला दिले . पण सर्व अक्षर बध्द केले सामान्यासाठी ,त्यांना आनंद देण्यासाठी .
अनिर्वाच्य बोल बोलिले | साधकाचे उपेगां आले |
सिद्ध तरी डोलो लागले | बध्द  मुमुक्षु होताती ||४८ ||
सिद्धांत अनुभवाची खूण पटली . अनिर्वाच्य असे अनुभव शब्द बध्द केले .ते ऐकून सिद्ध डोलायला लागले .बध्द मुमुक्षु झाले .
यापरते आन नाही बोला | श्रीराम दाशरथीची आण  |
एकपत्नी तो सुजाण | आपुले पद दे दास || ४९||
मी काहीही खोटे सांगितले नाही . मी दाशरथी श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो .
इति श्री दासबोध ग्रंथ | त्यातील हा सोलीव अर्थ |
श्रोते ऐकता यथार्थ | समाधिस्त होती || ५० ||
हा दासबोध ग्रंथाचा सोलीव अर्थ आहे .जे श्रोते यथार्थ म्हणजे अर्थ लक्षात घेऊन ऐकतील ते समाधी स्थिती अनुभवातील .