मंगलवार, 4 फ़रवरी 2014

तुळजा भवानी स्तोत्र







देखिली तुळजामाता | निवालो अंतरी सुखे |
तुटली सर्वही चिंता | थोर आधार वाटला || १ ||
संसार पाहता मागे | पाळिले सर्वही कुळा |
प्रस्तुत प्रत्ययो आला | रक्षिते बहुतापरी || २ ||
पुर्विती कामना सर्वे | इच्छा पूर्ण मनोगते |
धन्य हा देव लोभाळू | सांभाळ करितो सदा || ३ ||
आघात संकटे वारी | निवारी दुष्ट दुर्जना |
संकटी भर्वसा मोठा | तत्काळ काम होतसे || ४ ||
लालची चुकती वेडे | कृपाळू जननी खरी |
लक्ष की कोटी अन्याये | बहुत क्षमिले खरे || ५ ||
वन्ही हो सर्प हो विंचू | बाळकू घेतसे बरे |
सर्वही चुकावी माता | पोर लाबाड नेणते || ६ ||
लोभाळू बायका माया | त्यामध्ये  मुख्य जन्ननी |
बाळका वाढवी माता | मातेला मुख्य जन्ननी || ७ ||
सर्वही बाळके जीची | त्रैलोक्य जननी पहा |
साक्षणी सर्व लोभाळू | मर्यादा कोण रे करी || ८ ||
अनंतरूपीणी माया | काया रक्षी परोपरी |
विचित्र महिमा आहे | कळला न वाचे कदा || ९ ||
सर्वांचे मूळ हे माया | मूळमाया म्हणोनिया |
सृष्टीची आदिशक्ती हे | आदिशक्ती म्हणोनिया || १० ||
राम उपासना आहे | हे रामवरदायिनी |
सख्य चालते सर्वै | प्रवृत्तीनिवृत्तीकडे || ११ ||


ह्या तुळजामातेला पाहून मनाला अत्यंत सुख झाले .सगळी चिंता तुटली .खूप मोठा आधार मिळाला  असे वाटले .वाडवडीलांचे पाहीले तर असे दिसून आले आमच्या सर्व कुलाला ह्या तुळजामातेने तारून नेले आहे .आमचे रक्षण केले आहे .असा प्रत्यय आला आहे .सगळ्या इच्छा देवीने पूर्ण केल्या आहेत .रामवरदायिनी स्तोत्रात आपण पाहिले आहे की समर्थांनी पाहिलेले संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न देवीने पूर्ण केले .ही देवी लोभाळू ,भक्तांवर लोभ करणारी आहे .त्यामुळेच ती सर्वांचा सांभाळ करते .तिच्या कृपेनेच सर्व आघातांपासून ,संकटापासून रक्षण करते ,दुष्ट दुर्जनांचे निर्दालन करते .तिच्यावर भरवसा  ठेवला तर भक्तांचे काम तात्काळ होते .लालची ,हावरट लोक चुकतात पण ही तुळजा देवी इतकी कृपाळू आहे की  लक्ष लक्ष ,कोटी  अपराध ती क्षमा करते .अग्नी ,साप ,विंचू यासारखी संकटे म्हणजे संसारातील सर्व संकटे आली तरी तिच्या कृपेने ती नाहीशी होतात .आपल्याला त्यांचा त्रास जाणवत नाही .लहान बाळाला ज्याप्रमाणे नेणते पणे म्हणजे अज्ञाना मुळे ,न समजल्यामुळे संकटे आली तर त्याची माता त्याला उचलून घेते आणि रक्षण करते ,तशी तुळजा भवानी भक्तांचा सर्व संकटातून बाहेर काढते .
बायका सर्व साधारण पणे लोभाळू असतात ,त्याप्रमाणे ही जगजननी असते .ती या त्रेलोक्याची आई आहे .सर्व सजीव प्राणी ,तिचीच लेकरे असतात .ती अनंत रूपात येऊन रक्षण करते .तिचा महिमा अगाध आहे .तो कोणालाही अजून समजला नाही.
ती सर्वांचे मूळ आहे म्हणून तिला मूळमाया म्हणतात .कारण या सृष्टीची ती आदिशक्ती आहे .हे दृश्य विश्व आकारात येण्यास तीच कारण आहे .
हे रामवरदायिनी , माझी राम उपासना चालते .प्रवृत्ती ,निवृत्ति कडे सर्वत्र उपासना चालते .









सोमवार, 27 जनवरी 2014

तुळजाभवानी स्तोत्र

प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुळदेवता |
नेणता ऐकले होते जाणतां स्मरले मनी || १ ||
श्रेष्ठाची कामना होती पुरविली मनकामना |
नवस जो नवसिला होता तो त्यापासोन चुकला || २ ||
पुत्र जो  घेतला त्यांचा जोगी करून सोडीला |
ख्याती ते ऐकिली मोठी न्यायनीती चुकेचना || ३ ||
वैराग्य घेतले पूर्ण सर्व संसार सोडीला |
तुझिया दर्शना आळो कृपादृष्टी विलोकीजे || ४ ||
तुझ्या कृपे वाचलो हे महंत म्हणती तया |
तुझेची सर्वही देणे सर्वही तुजपासुनी || ५ ||
संसारी मोकळे केले आनंदी ठाव दिधला |
सांडिली सर्वही चिंता माता तू सत्य जाहले || ६ ||
पूर्वील काय मी सांगू इच्छा पूर्ण परोपरी |
मागील आठवेना की आश्चर्य वाटते मनी || ७ ||
सदानंदी उदय जाला सुख संतोष पावलो |
पर आधीनता गेली सत्ता उदंड चालली || ८ ||
उदंड ऐकिले होते रामासी वरू दिधला |
दास मी रघुनाथाचा मज ही वरदायिनी || ९ ||
श्रेष्ठांचा नवस जो होता फेडिला तोचि मी म्हणे |
पुष्प देऊनी उतराई ऐसे हे कल्पिले मनी || १० ||
तुळजापूर टाकोनी चालिली पश्चिमेकडे |
पाराघाटी जगन्माता सध्या येउनी राहिली || ११ ||
ऐसे हे ऐकिले होते एथेची पातले |
पुष्पाची कल्पना होती पुष्प तेथेची वाहिले || १२ ||
ऐशी दयाळू माता तू त्वां हे पुष्प घेतले  |
संतुष्ट भक्तीभावाने त्रैलोक्यजननी पहा || १३ ||
थोड्याने श्लाघ्यता मोठी थोर संतोष पावलो |
तुझेची तुजला दिल्हे आणिले सांग कोठुनी || १४  ||
रक्षिता देव देवांचा त्यांचा ईच्छला |
संकटे वारिली नाना रक्षिला बहुतापरी || १५ ||
जीवीचे जाणती माता तू माता मज रोकडी |
लोकांची चुकती माता अचूक जननी मला || १६ ||
एकाची मागणे आता द्यावे ते मज कारणे |
तुझाची वाढवी राजा सीघ्र आम्हांसी देखता || १७ ||
दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकिले |
परंतू रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी || १८ ||
देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहीसी किती |
भक्तांसी वाढती वेगी ईच्छा पूर्णचि ते करी || १९ ||
रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे |
क्षमावे तुळजे माते ईच्छा पूर्ण परोपरी || २० ||


या प्रपंचात आमची कुळदेवता तुळजाभवानी आहे असे मी लहान असताना ऐकले होते .जाणता झाल्यावर आता त्याचे स्मरण झाले .मोठ्या माणसांची म्हणजे आईची ईच्छा होती की पुत्र व्हावा म्हणून मातापूरच्या देवीला नवस केला होता की सुवर्ण पुष्प वाहीन .तो  त्यांच्या हातून फिटला नाही .म्हणून देवीने त्याचे स्मरण अंगावर नायटा उठवून दिले .पण मातापूर पर्यंत कोण जाणार ? तेव्हा वेणू बाईंनी प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या देवीजवळ जाऊन नवस फेडावा असे सुचवले .समर्थांनी एक तोळा सोन्याचे सुवर्ण पुष्प तयार करून घेतले .ते पुष्प कुठे वाहावे असा प्रश्न समर्थांना पडला कारण देवी दागिन्यांनी मढलेली होती .तेव्हा मस्तकावरील बिंदी बाजूला सारून तेथे पुष्प वाहावे असे देवीने सुचवले .समर्थांना देवीने वर मागण्यास सांगितले .तेव्हा समर्थांनी उत्तर दिले मी एक जोगी आहे .मला काही नको .जे द्यायचे आहे ते शिवबाला दे .मी संपूर्ण वैराग्य धारण केले आहे .तुझ्या दर्शनाला आलो आहे. माझ्यावर कृपादृष्टी ठेव .तुझ्यामुळेच मी आज जो आहे तो आणि तसा आहे .तू मला संसारातून मोकळे केलेस .मला आनंदाचा ठाव ठिकाणा मिळाला . सगळ्या चिंता नाहीशा झाल्या ही गोष्ट खरोखरच झाली आहे .
आनंदाचा उदय झाला .,सुख संतोष मिळाला .पारतंत्र्य गेले उदंड सत्ता मिळाली .
मी ऐकले होते की तू श्रीरामांना वर दिलास. मी रघुनाथाचा दास आहे .तू मलाही वरदायिनी झालीस .मोठ्यांनी केलेला नवस आज फेडला .पुष्प देऊन उतराई व्हावे अशी मनीची आस होती .
तुळजापूरवर अफझल खानाने हल्ला करून मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून पश्चिमेकडे माता पारघाटला जगन्माता येऊन राहिली आहे असे ऐकले होते कारण मूर्ती वाचवण्याचा लोकांचा हेतू सफल झाला होता .
अशी तू दयाळू माता आहेस .तू हे पुष्प घेतलेस .तुझेच तुला मी दिले .मी कोठून आणणार ? अशा ह्या दयाळू त्रैलोक्यजननी कडे पहा .देवांचा देव तो सर्व देवांचा रक्षणकर्ता आहे .त्या प्रभू श्रीरामांचा उत्सव करण्याची ईच्छा केली .अनेक संकटे आली पण त्यांचे निवारण केले ,अनेक प्रकारे रक्षण केलेस .हे माता ,आपण माझ्या जीवीचे जाणता .मला सहज प्राप्त झालीस .माझे आता एकच मागणे आहे ,तू शिवबा राजांना मोठा कर .तू मागे दुष्टांचा संहार केलास असे ऐकले होते आता तू तुझे सामर्थ्य प्रत्यक्ष दाखव .हे माते आता अंत पाहू नको .भक्तांची इच्छा लवकर पूर्ण कर रामदास म्हणतात माझे सर्व बोलणे मनापासून आहे .म्हणून हे तुळजामाते ,माझी इच्छा पूर्ण कर .



























सोमवार, 20 जनवरी 2014

देवी स्तोत्र
कालिका कालरात्री तें | काळा काळा संहारची |
कुमारी दैत्य मारी ते | कुळदेव्या भूमंडळी || १ ||
खेचरां खेळवी लेकां | खड्ग खेटक धारिणी |
खुंटला यत्न खोळंबे | ते काळी रक्षिते बळे || २ ||
गोंदली नाचती गाती | गुंतला लोक उगवे |
गंगा भागीरती माता | गांजिता धांवते बळे || ३ ||
हो हो हो दैत्य होता हे | अघोरा घोररूपिणी |
घुमारे घुमाविताहे | घोरसे घोण करणी || ४ ||
चंचळा चपळा देव्या | चमके सचराचरी |
चुकवी लक्ष चौ-हांसी चालते पुरुषाकृती || ५ ||
चुकतां घालिते किती | तुछे राजे महांबळी |
काकुस्थ वरदा देव्या | ईच्छीले पुरवीतसे || ६ ||
जननी जान्हवी माता | जुनाट जगदेश्वरी |
जुंझार जुंझता मोडी | पादिते संकटी खळा || ७ ||
झंटाळा दाखवी झोले | तरिते बहुतांपरी |
त्रैलोक्य झुलाविताहे | झीलटे नेणती मुढें || ८ ||
काळा रंग संहाराचा आहे .कालीमाता कालरात्री संहार करते .कुमारी दैत्य मारते .त्या कुलदेवी म्हंणून या भूमंडळी पूजिल्या जातात .खेचर म्हणाजे गाढव किंवा पक्षाप्रमाणे उडणारे ,या सर्वांना ती खेळवते .जेव्हा प्रयत्न खुंटतो तेव्हा ती रक्षण करते .
गोंदली म्हणजे शेवाळे ,गवताची पाती नाचतात ,गाणे गातात .त्यांच्यामध्ये गुंतलेले लोक उलगडतात .याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये येणा-या सुख दु:खामध्ये लोक इतके गुंतलेले असतात की त्यातून त्यांना बाहेर येता येत नाही .या देवीच्या भक्तांना मात्र ती गुंतणूक सोडवता येते .गंगा ,भागीरथी माता आपल्या भक्तांसाठी धावून येते .हे दैत्य अघोर ,त्रासदायक ,दुष्ट प्रवृत्तीचे ,मायेचा पिशाच्च पिसारा फिरवणारे ,अतिशय वाईट करणी असणारे आहेत त्यांच्या पासून रक्षण करण्यासाठी ही देवी सतत जागृत असते .
ही देवी चंचळ ,चपळ भासते .ती या चराचर प्रकृती चमकवते .म्हणजे सर्व चराचर विश्वात भरून आहे .ती चौ-याशी लक्ष योनींचे फेरे चुकवते .अनेक राजे ,महाराजे जे करू शकणार नाहीत ते ही वरदायिनी देवी देते .जे जे ईच्छा करू त्याची पूर्तता करते .अशी ही सर्वांची माय ,आई ,नदी प्रमाणे जी जगदेश्वरी आहे ,दुष्टांच्या वाईट कर्मा मुळे ती दुष्टांना संकटात टाकते .



तुळजा कुमारी चे रूप | अथवा बायकांचे रूप |
नाना प्रकारी स्वरूप भक्तालागी दावितो || १ ||
भक्ता प्रसंन्नचि होतो | अथवा ख्यानाची लावितो
प्रचीत रोकडी दावितो | भक्तीभावे सारिखी || २ ||
दास म्हणे चुको नये | देवापाशी उणे काये |
 तूते आपाये उपाये | दोनी सित्ध असती || ३  ||
तुळजा कुमारी स्वत:चे रूप कुमारी रूपात किंवा बायकांच्या रूपात दाखवते . अनेक रूपात ती  भक्तांना भेटते .भक्तांना प्रसन्न होते आणि अभक्तांची ,तिच्यावर विश्वास  नसणा-या अभक्तांची हानी करते ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचीती येते .समर्थ रामदास स्वामी म्हणतात की देवीची भक्ती करण्यास चुकू नये .कारण देवाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते .देवीची कृपा आणी तिची अवकृपा दोन्ही सिध्दच आहे .






भवानीदेवी


 भवानी देवी

कामाने सारिखी वाचा | गोविती बहुतांपरी |
तुष्टता तुळजा माता | पुरती मनकामना ||१७ ||
चुकतां दाविते साक्षी | कोण्हीयेके चुको नये |
बालका  जननी पाळी | तैसी ते पाळीती जना || १८ ||
कृपाळू जननी मोठी | अन्याय क्षमणे बहू |
मागीणी जोगिणी पत्रे | कुमारी स्वासिणी ब-या || १९ ||
गोंधळ भोग घालावे | बोलिले ते चुको नये |
असोनी वचणे खोटे | अभावे बुडती घरे || २० ||
वौंशची बुडती लोकी | ऐशा उदंड ख्यानती |
देऊ जाणे घेऊ जाणे | भक्ती ते पाहिजे बरी || २१ ||
सीवकळा सीध देव्हारे | तेथे पुसोन पाहाणे |
चुकले पडते ठाई | सद्य प्रचीत रोकडी || २२ ||
आनंद वाढवी लोकी | आनंदी याच कारणे |
तुळजा वोळवी घ्यावी | पुजावी बहुतांपरी || २३ ||
वेसणी घालिती नाकी | जावळी जट राखती |
लेकुरे वाहाती देवा | वैभवी बहुतांपरी || २४ ||
पूजिता तुळजा माता | तेणे सुखची होतसे |
विध्योक्त होम विधाने | नौरात्र घटस्थापना || २५ ||
मेहुणे पूजिती भावे | नाना पदार्थ देऊनी |
संतुष्ट कुमारी कीजे | तेणे संतुष्ट होतसे || २६ ||
बोलके नेटके पक्षी | नाना रंगे नाना गुणी |
तैसीच स्वापदे नाना | देवालई परोपरी || २७ ||
कुमरी कुमर द्रव्ये | नाना अलंकार नेटके |
नाना रंगे नाना वस्त्रे | आमोल्ये बहुजिनसी || २८ ||
विलास भोग देवाचे | किती म्हणोन सांगणे |
संगीत गीत वाद्येते | सुगंध बहुतापरी || २९ ||
तांबोल भोजने नाना | नाना पुष्पे फळे बहु |
उत्तम सहायाने याने | वैभवा तुळणा नसे || ३०  ||
रामदास म्हणे माझी | माता हे जगदीश्वरी
ऐश्वर्य सर्व शक्तीचे | विवेके प्रत्यये पाहा || ३१ ||
शक्तीने मिळते सर्वै | शक्तीने भोग होतसे |
पूजिली बत्तीसा श्लोकी | आदिशक्ती नारायणी || ३२ ||
ईछेप्रमाणे बोलणे असेल ती सगळ्यांना समाविष्ट करून घेते तुळजामाता संतुष्ट झाली मनातील ईच्छा पूर्ण होतात .चुकार लोकांना सुधारते .
चुकार लोकांना साक्ष दाखवते .चुकार म्हणजे नवस बोलणारे ,पण नवस न फेडणारे ,अशा लोकांना नवस फेडला तर काय होते ते दाखवणारी आहे .
ही जननी अतिशय कृपाळू आहे .अन्याय क्षमा करते .लोकांना सुधारण्यासाठी संधी देते .तिचा गोंधाळ घालावा .जो नवस बोलाल तो फेडायला चुकू नये .खोटं बोलू नका .तुमच्या मनात तिच्याबद्दल भाव नसेल तर उपयोग होणार नाही .घरे बुडतात .घराणी नाश पावतात .अशी तिची ख्याती आहे .ते आपल्याला देते पण कबुल केले असेल तर तिला ते द्यावे ही लागते .शिसवी चा सुंदर तयार देव्हारा तुम्हाला दिसेल .त्या देवळात तुमचे तुम्हाला चुकलेले कळेल .त्याची रोकडी प्रचीती तुम्हाला येईल .लोकांमध्ये ती आनंद वाढवते .त्या तुळजाभवानी ला ओळखा .तिचे पूजन करा .नाका मध्ये वेसणी घाला .मुलांना तिला वाहतात ,मग खूप वैभवाला मिळतात .तुळजामातेचे पूजन केले तर सुख मिळते .विधीपूर्वक होम हावने केली तर नवरात्रात घट स्थापना केली .कुमारिकांचे पूजन केले तर तुळजामाता संतुष्ट होते .बोलके ,छान नाना रंगाचे ,नाना गुणांचे पक्षी पाळले तर तुळजा भवानी संतुष्ट होते .त्याप्रमाणे निरनिराळी श्वापदे देवालयात ठेवले तरी तुळजाभवानी संतुष्ट होते .तिला फळे ,फुले द्रव्य अर्पण करा .अनेक अलंकार ,अनेक रंगाची वस्त्रे ,अमूल्य वेगवेगळ्या वस्तू अर्पण करा .अनेक प्रकारच्या सुख देणा-या गोष्टी ह्या देवाचा भोग आहेत . संगीत ,गाणे ,वाद्ये ,अनेक प्रकारचे सुगंध हे सर्व देवांचे भोग आहेत .विडा ,भोजन ,अनेक प्रकारची उत्तम भोजने ,अनेक प्रकारची फुले ,फळे ,उत्तम बिछाने ,उत्तम वाहने ,यामुळे त्यांच्या वैभवाला तुलना नसते .समर्थ रामदास म्हणतात ही तुळजामाता ह्या जगदाची ईश्वरी आहे ती सर्व शक्तींचे ऐश्वर्य आहे .याचा तुम्ही वाचकहो ,विवेकाने ,विचाराने प्रत्यय घ्या .शक्तीने सर्व मिळते .शक्ती असेल तर आपोआप सर्व गोष्टी मना सारख्या होतात .तुळजाभवानी शक्ती आहे .म्हणून ह्या ३२ श्लोकात आदिशक्ती नारायणी ची पूजा केली आहे

 






शनिवार, 14 सितंबर 2013

तुळजा भवानी स्तोत्र



 तुळजाभवानी स्तोत्र

सर्वांरंभी मुळारंभी | वंदिजे गणनायकू |
विद्या सुबुधी देता हे | सर्वत्र तो भूमंडळी || १ ||
चतुर्भुजा वेदमाता | वीणापुस्तकधारिणी |
वंदिता अंतरी वाढे | स्फुर्तीरूपे प्रकाशते || २ ||
मुळीची मूळमाया ते | आदिशक्ती परमेश्वरी |
आमुची कुळदैव्या ते | म्हैसासुरासी मर्दिनी || ३ ||
शक्तिरूपे जगन्माता | वर्तते जगदांतरी |
त्रिलोकी जितुके  प्राणी | शक्तीवीर वृथा वृथा || ४ ||
प्रसिध तुळजामाता | श्रीराम वरदायिनी |
कुळासी पाळिले मुळी | आतां आम्हासी पाळिते || ५ ||
चुकता शक्ती नेता हे | सामर्थ्ये ते कैचे पुढे |
कृपाळू जन्ननी वोळे | तत्काळ मनकामना || ६ ||
बहुतांचे कुळी आहे |  पाहा प्रचीती रोकडी |
कृपेने रंक ते राजे | सामर्थ्ये वर्तती जनी || ७ ||
चुकता क्षोभते नेटे | राजे रंक करी पून्हा |
आरोग्या रोग लाविता | फोडी सर्वांग खांडके || ८ ||
धबधबा गळती काया | वोल्या कुष्टेंचि नासती |
शुभ्र सर्वांग होता हे | नायटे फुटती बळे || ९ ||
हात जाती पाय जाती | जींव्हां जाती फुटोनिया |
बोलता तुळजा माता | पुन्हां सर्वांग नेटके || १० ||
श्रोत्र जाती नेत्र जाती | वाचा जाती न बोलवे |
उदंड रोग व्याधी त्या | किती म्हणोनी सांगणे || ११ ||
धडासी विघडी रागे | दयेने नीट होतसे |
संपन्न मागती भिक्षा | चालेना तिज वेगळे || १२ ||
बोलिले चुकती प्राणी | त्यासी दंड परोपरी |
पिशाच्ये खेळती अंगी | फेंफरे भरती बळे || १३ ||
प्रचीत ये चमत्कारे | तोषतां टे  जगदेश्वरी |
नेसते निबार किती | यती टे लोटांगणी || १४ |
बगाडे खेळती निसें | जिव्हा कापून वाहाती |
कुलुपे घालती तोंडी | येक ते सिर वाहाती || १५ ||
पून्हा ते लागती सीरे | जिव्हा येती करांगुळ्या |
सामर्थ्ये जागते मोठे | जागती जगज्योती हे || १६ ||
 सर्वात आरंभी मुळारंभ करताना गणनायकाला वंदन करू . गण म्हणाजे माया ,प्रकृती शारदा ,तिला चेतवणारा तो गणेश .शिवगणांचा किंवा ईंद्रियगणांचा अधिष , परब्रह्मा मध्ये निर्माण झालेला प्रथम संकल्प म्हणाजे मूळमाया . मूळमायेचा प्रथम प्रारंभ झाला ,तेथून जगदरचनेचा प्रारंभ झाला म्हणून त्याला मुळारंभ म्हणतात .असा हा गणेश सर्वांना विद्या ,सुविद्या देतो .मूळमाया म्हणजे गणेश आणि शारदा .
शारदा चतुर्भुज रूपात असते . ती वेदांची माता म्हणजेच वेदांची उत्पती  करणारी ,वेद निर्माण करणारी आहे .तिने वीणा पुस्तक धारण केलेले असते . तिला वंदन केले की परमार्थाची साधना करणा-या साधकाला आत्मचिंतनाची कला शिकवते .तिच्या कर्तुत्वानेच परा ,पश्यंती ,मध्यमा या तीन वाणीं मध्ये जे स्फुरण पावते ते वैखरीच्या सहाय्याने शब्दात प्रगट होते .तीन लोक असलेले हे विश्व तीच निर्माण करते व  तीच मोडून ही टाकते .शारदा ईश्वराची निवांत ,निश्चळ ,निर्मळ अवस्था आहे .त्यामुळेच ती योग्यांना ध्यान लावायला मदत करते .तिच्या मदती शिवाय भगवंताचे स्तवन ,भजन  ,भक्ती करता येत नाही .ती सतरावी जीवनकला आहे त्यामुळे तिच्या कृपेने स्फूर्ती प्राप्त होते .
मुळारंभ झाला तेव्हा मूळमाया म्हणजेच शारदा तीच तुळजाभवानी ! तीच आमच्या कुलाची कुलदेवता आहे .तीच आदिशक्ती आहे ,तीच परमेश्वरी आहे .तीच
महिशासुरमर्दिनी आहे .
तीच शक्तीरुपिनी आहे .जगन्माता आहे .तीच या जगात राहते .तीच विचारवंताला विचार करायला लावते .ती अखंड स्फूर्ती देते .योग्यांना ध्यान करण्याची ,साधकांना अनुसंधानात राहण्याची ,सिध्दांना समाधीत स्थिर राहण्याची शक्ती तिच्यापासूनच मिळते .ती जगातील सौंदर्याचे मूळ आहे अशी शारदा जगाचे पालन करते .
तुळजामाता प्रसिध्द आहे .तीनेच श्रीरामांना वरदान दिले आहे ,म्हणूनच तिला रामवरदायिनी म्हणतात .तिने आमच्या कुलाचे पालन केले आहे .आता ती आमचे पालन करत आहे असे समर्थ म्हणतात .
चुकले तर शक्ती मिळत नाही ,सामर्थ्य ही मिळत नाही . पण तुळजा भवानी आई प्रेमळ आहे .ती आपल्या ईच्छा पूर्ण करते .ती पुष्कळ कुलांची कुलदेवता आहे .तिच्या कृपेने भिकारी राजे झालेले आहेत याची प्रत्यक्ष प्रचीती येते .पण तिचे करण्यात चूक झाली तर राजेही भिकारी झालेले पहायला मिळतात .निरोगी माणसाच्या अंगावर गळू उठतात .ओला कुष्ट रोग होतो .अंगातून ,कुष्ट थबथबा गळायला लागते . अंग शुभ्र होते .अंगावर नायटे उठतात . हात ,पाय जातात ,जीभ फुटतात .पण तुळजामातेला नवस बोलले तर सर्वांग नीट होते . कान जातात ,डोळे जातात .बोलता येत नाही .अनेक रोग ,व्याधी होतात .
तिच्या रागाने चांगले चालू असेल तर ते बिघडते .तिच्या दयेने मात्र सर्व चांगले होते .तिच्या दारी भिक्षा मागावीच लागते . संपन्न ,श्रीमंत माणूसही भिक्षा मागतो .
तिला लोक नवस बोलतात पण तो फेडत नाहीत ,त्यांना ती दंड करते .ती अंगात पिशाच्च खेळवते ,अंगात फेफरे येतात .
लिंबाचा पाला नेसून ,किंवा लोटांगणे घालत तिच्या दर्शन घेतले तर तिला आनंद होतो .काही लोक तिला विचित्र नवस बोलतात .खांबाला टांगून हेलकावे घेतात ,जीभ कापून देतात ,तोंडाला कुलूप लावतात ,कोणी डोके कापून वाहतात .पण तिचे सामर्थ्य असे की डोके पून्हा जागेवर बसते ,जिभेला करंगळ्या फुटतात .तिचे सामर्थ्य असे जागृत आणि मोठे आहे


















शुक्रवार, 23 अगस्त 2013

तुळजाकुमारीचे रूप



तुळजा कुमारी चे रूप | अथवा बायकांचे रूप |
नाना प्रकारी स्वरूप भक्तालागी दावितो || १ ||
भक्ता प्रसंन्नचि होतो | अथवा ख्यानाची लावितो
प्रचीत रोकडी दावितो | भक्तीभावे सारिखी || २ ||
दास म्हणे चुको नये | देवापाशी उणे काये |
 तूते आपाये उपाये | दोनी सित्ध असती || ३  ||
तुळजा कुमारी स्वत:चे रूप कुमारी रूपात किंवा बायकांच्या रूपात दाखवते . अनेक रूपात ती  भक्तांना भेटते .भक्तांना प्रसन्न होते आणि अभक्तांची ,तिच्यावर विश्वास  नसणा-या अभक्तांची हानी करते ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचीती येते .समर्थ रामदास स्वामी म्हणतात की देवीची भक्ती करण्यास चुकू नये .कारण देवाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते .देवीची कृपा आणी तिची अवकृपा दोन्ही सिध्दच आहे .






तुकाई यमाई  नमूं चेडाबाई
जाखाई जोखाई सखाई ते ||१||
सखाई जगदंबा आदिशक्ती अंबा |
तुम्ही त्या स्वयंभा दाखवावे || २ ||
दाखवावे तुम्हां सर्वां पैलीकडे |
देखतांच घडे मोक्षपद || ३ ||
मोक्षपद घडे मोक्षासी पाहतां |
तद्रूपचि होता दास म्हणे || ४ ||
तुकाई यमाई चंडी जाखाई जोखाई सखाई जगदंबा आदिशक्ती अंबा या सर्व एकाच शक्तीची अनेक रूपे ,ती स्वयंभू रूपे मला दाखवावी असे समर्थ म्हणतात .तुमच्या पलीकडे ही असलेले स्वस्वरूप मला दाखवा अशी समर्थ विनंती करतात .स्वस्वरूप दर्शनाने मोक्षपद मिळेल. मोक्षपद मिळण्यासाठी त्या स्वस्वरुपाशी एकरूप मात्र व्हावे लागते ,तरच मोक्ष मिळतो त्यासाठी भक्ती करावी लागते .भक्ती अशी की कोणत्याही कारणाने भक्त विभक्त होणार नाही .
    



रविवार, 21 जुलाई 2013

जगज्जोती जगदेश्वरी | धन्य लीला परमेश्वरी || धृ ||



जगज्जोती जगदेश्वरी | धन्य लीला परमेश्वरी || धृ ||
गावत नाचत बिकट बीराजत | बाज्जत गाज्जत धमक चाले |
सुरत पाख गुनी गन पाख | अकल पाख भली ||२ ||
परब्र्ह्मात जे स्फुरण झाले ,तीच मूळमाया .परब्रह्माच्या निश्चळ स्वरूपातील हालचाल म्हणजे वायू .वायूतील शुध्द जाणीव म्हणजे जगज्योती . वायू ,जाणीव ,जगज्योती यांच्या मेळ्याला मूळमाया म्हणतात .पुरुष आणि प्रकृती ही मूळमायेची नावे .वायूला प्रकृती आणि जगज्योती ला म्हणतात पुरुष .जाणीवेने म्हणजेच जगज्योतीने सजीव देहाचे रक्षण करतात .आपल्यावरचे संकट ओळखतात .आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात . म्हणूनच तिला जगदेश्वरी म्हणतात .त्या परमेश्वरीची लीळा अगाध आहे . अशा ह्या जगज्योतीला ह्या परमेश्वरीला वाजत गाजत घेऊन चला सुंदर अशा पाळण्यात तिला बसवा .





वोळली जगन्माता | काय उणे रे आता |
वैभव जात जाता | भक्त हाणती लाता || धृ ||
बोलले भूमंडळ | परिपूर्ण पाहतां |
राम आणि वरदायिनी | दोन्ही एकची पाहतां || १ ||
मनामाजी कळो आले | तेणे तुटली चिंता |
रामरूप त्रिभुवनी | चाले सर्वही सत्ता || २ ||
रामदास म्हणे माझे | जीणे सार्थक जाले |
देवोदेवी ओळखीता | रूप प्रत्यया आले || ३ ||
जगन्माता प्रसन्न झाली मग आता काय कमी आहे ? वैभव नाहीसे झाले ,इतरांनी ठोकरले ,तरी आता जगन्माता प्रसन्न झाल्यावर काय कमी ? सर्व भूमंडळातील लोक सर्व दृष्टीने विचार करून म्हणतात की राम आणि वरदायिनी एकच आहेत पुरुष आणि प्रकृती एकाच मूळमायेची दोन अंगे आहेत त्यांनाच गणेश आणि शारदा म्हणतात .गणेश ज्ञानमय तर शारदा शक्तिरूप आहे पण शेवटी ती परमेश्वराचीच शक्ती आहे . वरदायिनी त्या आदिमायेचेच रूप  आहे .म्हणूनच राम आणि वरदायिनी एकरूपच आहेत .  ईश्वर आणि शक्ती एकच असल्याचे ज्ञान झाले ,शंका नाहीशा झाल्या . मग आता कोणतीही रुखरुख .शंका नाही .हे सर्व मनाला पटले आहे त्यामुळे सर्व चिंता संपली आहे . त्या राम रुपाचीच सर्व सत्ता आहे या त्रिभुवनात श्रीरामांचीच सत्ता आहे .
श्री समर्थ रामदास म्हणतात माझ्या जीवनाचे सार्थक झाले .देव देवी यांचे स्वरूप ओळखताना पटले की दोन्ही एकच आहेत त्यांचे खरे स्वरूप प्रत्ययाला आले आहे नि:संदेह ज्ञान झाले .रामवरदायिनी ने माझ्यावर कृपा केल्याने माझा जन्म सार्थकी लागला असे समर्थ म्हणतात .