शुक्रवार, 21 जून 2013

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||
स्नान संध्या टीळे माळा | अंतर्निष्ठ उपासना |
नित्यानित्य विवेकाने |धन्य संसार होतसे || १ ||
मर्यादा न्यायनीतीची | अन्याय न घडे कदा |
सन्मार्ग योग देवाचा | धन्य संसार होतसे || २ ||
देवालये सिखरे रम्ये | धर्मशाळा परोपरी |
परत्र साधकां लोकां | धन्य संसार होतसे || ३ ||
आन्नोदक वस्त्रे दाने | धन्य धन्य ब्राह्मणी भजे |
उदास वृत्तीने लोकी | धन्य संसार होतसे || ४ ||
बावी सरोवरे टांकी | मठ वृक्ष परोपरी |
उपकार समस्ती लोका | धन्य संसार होतसे || ५ ||
पराचे जीवीचे जाणे | अस्ती नास्ति विचारणा |
आत्यंत सर्व भूतांसी | धन्य संसार होतसे || ६ ||
होम याग पुरश्चरणे | निरुपणे हरिकथा |
ब्रहम संतर्पणे यात्रा | धन्य संसार होतसे || ७ ||
वेद पारायणे चर्चा | पुराणे माहात्मे शुभे |
नित्य उछाव देवाचा | धन्य संसार होतसे ||८ ||
नवविधा भक्ती देवाची | मुख्य कोण विचारणे |
आध्यात्म शोधिता सर्वे | धन्य संसार होतसे || ९ ||
पंचीकरणे माहांवाक्ये | श्रवणे मनने सदा |
सत्संगे निसंग होता | धन्य संसार होतसे || १० ||
दासाचे बोलणे ऐसे | सर्वज्ञ जाणते तुम्ही |
आह्मी तुम्ही विचारावे | धन्य संसार होतसे || ११ ||
शब्देची लाभती रत्ने | शब्द रत्ने आमोल्यकी |
कोंदणामाजी ते सोने | तैसा  अर्थ प्रचितीचा || १२ ||

स्नान संध्या केली ,टीळे लावले माळा घालून फक्त उपयोगी नाही तर आंतर्निष्ठा पाहिजे आंतर्निष्ठा म्हणजे ज्याच्या मनात कोणाविषयी मत्सर नाही ,सज्जनांना आवडतो ,ईश्वरानुभावाची पूर्ण निष्ठा असते .असा भक्त तो नित्यानित्य विवेकाने वागतो म्हणजे नेहमीच आहेच ते नित्य आणि जे कायम न टिकणारे आहे ते अनित्य हे जो समजतो तो तो नित्या नित्य विवेक करतो .म्हणजे आत्मा नित्य आहे ,देह अनित्य म्हणजे नाशिवंत आहे असे जो जाणतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो न्याय नीतीने वागतो ,न्याय आणि अन्यायाची मर्यादा जो जाणतो ,त्याच्याकडून अन्याय होत नाही ,जो सन्मार्ग धरतो ,देवाचा योग ज्याच्याबरोबर जोडला गेलेला असतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो सुंदर देवालये ,शिखरे ,देवालयाचे कळस बांधतो ,साधकांसाठी रहायला धर्मशाला बांधतो ,त्यांचा 
संसार धन्य होतो .
जो अन्नदान करतो ,वस्त्रे दान देतो ,ब्राम्हणांचे पूजन ,भजन करतो ,आणि मी करतो असा अभिमान न बाळगता उदासीन वृत्तीने राहतो त्याचे जीवन धन्य असते .
बावी म्हणजे विहीरी सरोवरे ,टाक्या ,बांधतो ,मठ बांधतो ,वेगवेगळे वृक्ष लावतो व हवा शुध्द ठेवायला हातभार लावतो ,अशी समाज उपयोगी कामे करून लोकांवर उपकार करतो तो धन्य होतो .
जो दुस-याच्या मनाचे जाणतो ,हवे नको ते विचारतो ,सर्व भूतांसी म्हणजे सर्व सजीव प्राण्यांची काळजी घेतो ,सर्वांवर प्रेम करतो जसे संत करतात .त्यांचा संसार धन्य होतो .जो होम याग करतो , पुरश्चरणे करतो ,हरिकथा करतो ,निरुपणे करतो ,यात्रा करतो ,ब्रहमपद मिळविण्यासाठी प्रयत्न साधना ,सत्संग ,गुरुपदेश घेतो ,गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळतो ,अशाचा संसार धन्य होतो .
जो वेदपठण करतो ,पुराणांचे महात्म्य समजतो व नित्य त्याचे पठण करतो ,शुभ असलेल्या पुराणांचे श्रवण करतो ,देवांचे उत्सव करतो ,त्यांचा संसार धन्य होतो .नवविधा भक्ती पैकी कोणती भक्ती श्रेष्ठ ते विचारतो .अध्यात्म म्हणजे काय ते समजावून घेऊन तसे वागतो .त्यांचा संसार धन्य होतो .
पंचमहाभूतांचे कर्दम म्हणजे एकत्र मिसळणे ,म्हणजे पंचीकरण समाजावून घेतो ,चार वेदांची चार महावाक्यांचे गुरुमुखातून श्रवण ,त्यांचे मनन करतो ,सत्संगात राहून होणा-या श्रवणाने जो नि:संग होतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
हे दासाचे म्हणजे श्रीरामांच्या दासाचे ,समर्थ रामदास स्वामींचे बोलणे आहे आपण सर्व सर्वज्ञ आहात .आपल्या सर्वज्ञपणाचा सर्वांना लाभ देतो त्यांचा संसार धन्य होतो .
शब्द हेच जणू रत्ने ,ही रत्ने अतिशय अमूल्य आहेत .ही शब्द रत्ने जणू कोंदणा मधिल जणू सोनेच .तीच प्रचीती .!


शुक्रवार, 24 मई 2013

फूट योग समास

फूट योग समास
नाना पदार्थ नाना काया | ते ते जगदेश्वराची माया |
मूळ मायेपासोनिया | खाणी परियेत || १||
पंचभूते तिनी गुण | अष्टधा प्रकृती हे खूण |
नाना पदार्थ दृष्यची संपूर्ण | माया जगदीशाची || २||
अवघी माया जगदीशाची | त्यामध्ये कांही एक जीवाची |
ऐसी रोकडी प्रचीतीची | गोष्ट आहे || ३ ||
मायेबाप बंधू बहिणी | कन्यापुत्र आणि नाती |
त्याची माया अंत:करणी | जीवासी आहे || ४ ||
सेतामळे वाडे घरे | संग्रही मनुष्य लहान थोरे |
धनधान्य नानाप्रकारे | माया जीवाची || ५ ||
नाना वस्त्रे अलंकार भूषणे | नाना पदार्थ मेळवीणे |
नाना पदार्थ कोणे | किती म्हणोन सांगावे || ६ ||
ऐसी हे माया जीवाची | अवघी माया जगदीशाची |
हे अनादी परी मिथ्याची | जाणोन घ्यावी || ७ ||
शास्वतपणे अनादी ब्रहम | नासिवंतपणे अनादी भ्रम |
अवघेची अनादी वर्म | कळले पाहिजे || ८ ||
पूर्ण अपूर्ण व्यापक संधी | तैसेची नाना जिनस अनादी |
निश्चळ करुनिया बुद्धी | शोधुनी पाहावे || ९ ||
स्मार्थ भागवत दोनी भेद | यासी म्हणिजे अनादी सिध |
नाना अनादी सीध विषद | करून घ्यावे || १० ||
स्मार्थ म्हणिजे सिवभक्त | भागवत म्हणिजे  विष्णूभक्त |
त्याहीमध्ये युक्तायुक्त | विचारणां आहे || ११ ||
महादेवाचे कैसे रूप | विष्णूचे कैसे स्वरूप |
रूप विवरायाचा साक्षेप | आधीं करावा || १२ ||
मुळीं संकल्प उठीला | हरी संकल्प म्हणिजे तयाला |
तोची हरी समजला | पाहिजे मुळी || १३ ||
परमार्थासी पाहिजे सत्वगुण | तेथे कामा नये तमोगुण |
आदी पशात विवरण | केले पाहिजे || १४ ||
हरी संकल्प षडगुण ईश्वर | याचा बरा पाहावा विचार |
सुक्षमंद दृष्टीने अंतर | कांहीच नाही || १५ ||
सृष्टीमध्ये उदंड भेद | त्या भेदास म्हणो नये अभेद |
या कारणे मुळीचा संवाद | केला पाहिजे || १६ ||
जगदीश्वर ,जगाचा ईश्वर त्याची माया म्हणजे सृष्टीत उत्पन्न झालेले नाना पदार्थ आणि नाना प्रकारच्या जीवयोनी ,त्यांनी धारण केलेले  देह .जगदेश्वराच्या मूळ संकल्पानेच म्हणजे मी एक आहे ,बहु व्हावे या संकल्पाने मूळमाया निर्माण झाली ..त्यातून सत्व ,रज तम हे त्रिगुण निर्माण करणारी गुणमाया ,त्यापासून अष्टधा प्रकृती ,त्यापासून चार खाणी [उद्भिज ,स्वेदज , अंडज ,जारज ] निर्माण झाल्या .त्रिगुणांतील तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली .ही पंचमहाभूते व त्रिगुणांपासून अष्टधा प्रकृती व त्यापासून वेगवेगळे पदार्थ आणि संपूर्ण दृश्य विश्व निर्माण झाले .हे दृश्य विश्व म्हणजेच त्या जगदीश्वराची मायाच .
जगदीश्वराची माया खूप व्यापक आहे .ती सर्वत्र आहे .त्यात जीवाची माया येते .जीव म्हणजे त्या परमात्मा परब्रह्माचा अंश जो  प्रत्येक देहात असतो ,त्या देहाला चालवतो .त्या देहाकडून सर्व कर्मे करवून घेतो .ही रोकडी प्रचीती रोजच्या जीवनातही आपल्याला येतेच .
आई वडील ,भाऊ ,बहिणी ,कन्या ,पुत्र ,नातवंड या सर्वांबद्दल प्रेम जीवाला असते .
शेत मळे ,वाडे ,घरे ,लहान थोर माणसे ,धनधान्य ,हे सगळे साठवणे जीवाच्या मायेनेच घडते . जीवाला या सगळ्यांचे प्रेम असते ,माया असते ,.त्यांच्या प्रेमापोटी अनेक प्रकारची वस्त्रे ,अलंकार ,भूषणे ,यांचा संग्रह माणूस करतो .
अशी ही जीवाची माया आणि जगदीशाची माया जाणावी असे समर्थ सांगतात .ही माया अनादी म्हणजे प्राचीन आहे परंतु मिथ्या आहे कारण हे दृश्य विश्वच माया निर्मित आहे .त्यातल्या वस्तू  मिथ्या आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित असणारे प्रेमही मिथ्या आहे .पण माणूस हे सर्व सत्य आहे असे धरून चालतो .आणि चुकतो .
प्राचीन ब्रहम शाश्वतपणे आहे आणि प्राचीन भ्रम नाशिवंत पणे आहे .ब्रहम प्राचीन आहे म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हे होते .आत्ता ही आहे ,सृष्टी चा अंत झाला तरीही राहील म्हणजेच ते अनादी आहेत .भ्रम सुध्द्दा अनादी आहे भ्रम आहे मी देह आहे याचा .त्यामुळेच देहावर ,स्थावर जंगमावर माणसाचे प्रेम आहे .पूर्ण ब्रहम
,अपूर्ण विश्व तसेच हे विश्व ज्यापासून निर्माण झाले ते सर्व अनादी म्हणजे प्राचीन आहे हे सर्व निश्चळ बुद्धीने समजावून घ्यावे .
शिव भक्तांना स्मार्थ म्हणतात .तर विष्णू भक्तांना भागवत म्हणतात .त्यात कोण योग्य कोण अयोग्य ह्याचा विचार करावा महादेवाचे रुप्प कसे आहे ,आणि विष्णूचे स्वरूप कसे आहे ते ओळखायला हवे .त्या रूपाचे विवरण करण्यासाठी आधी साक्षेप म्हणजे प्रयत्न करायला हवा .पराब्र्ह्मामध्ये जो मूळ संकल्प मी एकटा आहे ,अनेक व्हावे असा मूळ संकल्प उठला त्यालाच हरिसंकल्प म्हणतात .त्यालाच हरी  समजायला हवे असे समर्थ म्हणतात .परमार्थाला सत्वगुण असायला हवा .तमोगुण नको .हरी संकल्प  म्हणजे षड्गुण ईश्वर .यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सहा गुणांनी युक्त असणारा ईश्वर याचा विचार करावा .षड्गुनैश्व्र्र ईश्वर आणि हरिसंकल्प एकच आहेत ..समर्थ सांगतात की या सृष्टीमध्ये अनेक भेद आहेत . भेद उपाधीरूप आहेत ,८४ लक्ष जीव योनी आहेत .माणसात उच्च नीच ,काळे गोरे ,स्त्री पुरुष असे अनेक भेद आहेत .हे भेद आहेत पण त्यांच्यात आत्मा एकच आहे आत्मा त्या परब्रह्म परम तत्वाचा अंश आहे ,फरक आहेत पण एकच आहेत असे म्हणू नये त्यांचे अधिष्ठान जरी एकच असले तरी त्यांच्यात भेद आहे .त्यासाठी मुळापासून विचार करायला हवा .

कर्ममार्ग उपासना | वैष्णवांमध्ये विशेष जाण |
तार्किक विचार आंतकर्ण | बरा जाणावा || १७ ||
भेदास म्हणता अभेद | तेणे उदंड उडे खेद |
भेदाभेद हा विशद | मुळी होतो || १८ ||
सुक्ष्म सांडोनी गलबला केला | व्यर्थची खेद वाढविला |
साधक मनने सेवटासी केला | तोचि धन्य || १९ ||
निर्गुण ब्रहम मुळी तेथे | उडोनी जाती नाना मते |
तत्वझाडा प्रत्ययाते | आणून पहावा || २० ||
आईकोनी च विस्वास धरणे | हे मूर्खपणाची लक्षणे |
समजोनी प्रत्यये पाहाणे | हे उत्तमोत्तम || २१ ||
अबध मेळवोनी वाचिले | अक्षरे जुळीता पुरे जाले |
 अर्थांतर राहत गेले | सकळ काही || २२ ||
आंधी ग्रंथची चुको नये | मग वाचिता चुको नये |
त्या उपरी चुको नये | अर्थांतर प्रत्ययाचे || २३ ||
मुख्य प्रत्यये चुकत गेला | म्हणिजे निशेश बुडाला |
साधक समाधान पावला | कोण्याप्रकारे || २४ ||
जेथे नाही मुख्य प्रत्ययोग | जेथे कैसा असेल जयो |
वीतरेक  आणि अन्वयो |शोधूनी पाहावा || २५ ||
विवेक प्रलये शोधूनी पाहिले | तो तत्वे अवघे गेले |
या उपरी जे निर्गुण  उरले | त्यासी अनादी म्हणावे || २६ ||
अनादी म्हणिजे जे आदी नाही | परब्रह्मासी सीमा नाही |
सीमा वोलांडावी काही | अनादी म्हणावे || २७ ||
आत्मा म्हणिजे तत्वात आला | पंचीकर्ण प्रमई बोलिला |
चौथा देह निमाला | ब्रह्मांडींचा || २८ ||
त्या देहास होतो नाश | परब्रह्म ते अविनाश |
कोण विशेषा अविशेश | पाहोन घावे || २९ ||
येथे निवडिले सारासार | लक्षास पाहावा विचार |
येथून पुढे निरांतर | सहजचि जाले || ३० ||
पिंडीचा आत्मा निघोन जातो | म्हणोनि हा पिंड पडतो |
ब्र्ह्मांडीचा कैसा राहातो | सांगा ना का || ३१ ||
बरे हे त्या जाण त्याचे वर्म | नेणत्याचे खोटे कर्म |
सकळ काही धर्माधर्म | जाणतां जाणे || ३२ ||
|| इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना अनादी निरुपण नाम समास पहिला ||

वैष्णवात कर्ममार्ग आणि उपासना वैष्णवांमध्ये मुख्यत्वे चालते .उपाधी नुसार होणारे भेद अधिष्ठान एक असून ही अभेद होत नाही एक सारखे होत नाही जर एकच मानले तर खेद होतो सूक्ष्म सोडून जर गलबला केला ,गडबड केली तर खेद वाढतो .त्यासाठी साधकाला मनन करावे लागते .तरच त्याला शेवटाला पोहोचता येते .तरच निर्गुण निराकार परब्रह्मा पर्यंत पोहोचता येते .तत्वझाडा करत गेले की त्या परब्रह्माचा प्रत्यय  येतो ..नुसते ऐकून विश्वास करणे हे मूर्खाचे लक्षण आहे .म्हणून समजून घेऊन प्रत्यय घेतला तर ते उत्तमोत्तम आहे .अबध म्हणजे विस्कळीत ,विखुरलेला मिळवून वाचले ,अक्षर जुळवून वाचले तर असे वाटते की खूप झाले .पण तेव्हा अर्थ कळत नाही .
आधी ग्रंथ हाती घ्यावा .ग्रंथ वाचताना चुकू नये . त्याशिवाय अर्थ समजून घेण्यास चुकू नये .पण ब-याच वेळा प्रत्यय घेत नाही .तेव्हा माणूस पूर्ण बुडतो .मग साधकाला समाधान कसे मिळेल .?   
त्यासाठी विवेक प्रलय करायला समर्थ सांगतात .आपल्याला दृश्य विश्व खरे वाटते .पण विवेकाने दृश्य विश्व खरे नाही हे पटते त्याला विवेकक प्रलय म्हणतात .पिंडामधील अहंतेचा मृत्यू प्रलय म्हणजे विवेक प्रलय .तोच समर्थांनी दासबोधात सांगितला आहे .विवेक प्रलयाने ह्या देहातील तत्वांचा निरास करता येतो .मग जे उरते ते अनादी अनंत परब्रह्मच असते .अनादी म्हणजे जे आदी नाही .परब्रह्मास ही सीमा नाही .त्यामुळे तो तत्वात बसत नाही .त्याला पंचीकर्ण समजावून सांगताना सांगता येतो .तो ब्रह्मांडाचा चौथा देह आहे .त्या ब्रह्मांडा च्या देहाचा नाश होतो .पण परब्रह्म अविनाशी आहे .मग ब्रह्मांड आणि परब्रह्म यात कोण विशेश आहे ते पाहून घ्यावे .मग आता सारासार विचार करावा .
पिंडाचा आत्मा निघून जातो .म्हणून पिंड पडतो .मग ब्रह्मांडाचा आत्मा कसा राहतो .हे  सर्व तू समजून घे .जर नेणता अज्ञानी राहशील तर ते चुकीचे होईल . जो जाणता असतो त्याला सर्व काही ,धर्म म्हणजे काय ,अधर्म म्हणजे काय ते कळते .




शनिवार, 11 मई 2013




लिहिता वाचिता येना | व्यासंग करितां नये |
जड संसार टाकेना | चालीला सर्व सांडूनी || १||
स्वदेश राहिला मागे | विदेश लागला पुढे |
आचार राखणे आधी | स्नान संध्या  हरिकथा || २ ||
अचूक शुध लिहावे | वाचावे नेटके |
साकल्य अर्थ सांगाया | येथा तथ्ये प्रचीतीने || ३ ||
बोलावे न्याय नीतीने | मर्यादा राखणे जनीं |
आभ्यास करावा आधी | ताळबंद पाठांतरे || ४ ||
प्रसंगमान जाणावे | बाणावे बहुतांपरी |
भक्तीभाव असों द्यावा | घालावा भार ईश्वरी || ५ ||
प्रत्यई मागणे भिक्षा | मिळाली न मिळे तरी |
नित्य नूतन हिंडावे | धुंडावे भक्त प्रेमळ || ६ ||
कथा ते करावी आधी | बाधी ते दुराशा नको |
उपाधी उतळावेना | जावे ना उपाधी वैभवाकडे || ७ ||
सर्वत्र लोक शोधावे | बोधावे भक्तीच्या गुणे |
राहावे दुर्बळाचेथे | देवालयी कां नदीतीरी || ८ ||
पर्वती उदकापासी | सनीधनी येकीकडे |
फार येकांत सेवावा | आभ्यास नित्य नुतनु || ९ ||
साहावी शीत उष्णादि | पाहावी रम्यसी स्थळे |
करावे आपण कष्ट | बांधावावी ते हळूहळू || १० ||
वोळखी कराव्या दाटा | येके गई थीरो नये |
वादवेवाद तो खोटा | दाटावा मद मछरू || ११ ||
उद्धट बोलणे खोटे | बोलावी ते मृदोतरें |
नेटकी पाहिजे दीक्षा | रक्षावी भक्ती आदरे || १२ ||
वर्णावी भक्ती देवाची | आदभूत बहुतांपरी |
प्रबंद जाड बोलावे | चालावे लोकमानसें || १३ ||

लिहीता वाचता येत नाही  ,व्यासंग ,अभ्यास करता येत नाही ,जड ,नश्वर असा संसार टाकता येत नाही ,त्यांचा लोभ मनात आहे ,सर्व सोडून चालला आहेस तेव्हा तू कसे वागावेस त्यांचा उपदेश मी करतो  आहे  असे समर्थ म्हणतात .स्वदेश सोडून आता दुस-या देशात म्हणजे दुस-या राज्यात चालला आहेस ,तू सर्वात प्रथम तुझा आचार ,तुझी वागणूक नीट ठेवायला हवीस .स्नान संध्या आणि हरिकथा सांगायला हवीस .अचूक शुध्द लिहायला हवेस .नीट नेटके वाचायला हवेस कारण तुला जे वाचणार आहेस त्यांचा प्रचीतीने अर्थ सांगता आला पाहिजे नीती न्यायाने बोलता येण्यासाठी तुझे ज्ञान तू वाढवायला हवेस .लोक तुला मानायला लागली ,की तू वाटेल तसा वागून चालणार नाही .मार्यादेनेच तुला वागायला हवे .योग्य तो अभ्यास करून ,पाठांतर करून बोलायला हवेस .
प्रसंग काय आहे ते लक्षात घेऊन बोलायला हवे ज्यामुळे तू अनेकांच्या मनात तुझे स्थान निर्माण करशील .जेव्हा तुझ्या मनात भक्तीभाव असेल ,ईश्वराचे अधिष्ठान असेल ,मी कर्ता असे न म्हणता राम कर्ता म्हणशील तेव्हाच तुझे लोकांच्या मनातले स्थान पक्के होईल ..मिळाली आणि मिळाली नाही तरी दररोज भिक्षा माग.दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जा .कुणी प्रेमळ भक्त मिळाले तर त्यांचा शोध घे . नित्य नूतन कथा कर .पण दुराशा मात्र ठेवू नकोस म्हणजे कथेतून धनाची प्राप्ती होईल अशी आशा मात्र ठेवू नकोस कारण महंताला अशी उपाधी ठेवणे बाधक होते .म्हणून उपाधी वैभवाकडे जाऊ नकोस .
सगळीकडे होतकरू लोक शोध .त्यांना भक्तीचा बोध कर .तुझ्या आचरणातून भक्तीचे आचरण कसे करायचे याचा बोध दे. दुर्बलाच्या घरी मुक्काम कर त्याची प्रगती कशी साधता येईल याचा विचार करून त्याला मार्गदर्शन कर .नाहीतर एखाद्या देवालयात किंवा नदीतीरी रहा .एकांतात पर्वतावर ,जळाच्या जवळ रहा .एकांतात राहून चाळणा कर .नित्य नूतन अभ्यास करावा .थंडी ,उन सहन करावे .रम्य ठिकाणे पाहून तेथे रहावे ..रम्य ठिकाणी आपण कष्ट करून नवीन जागा बांधाव्या . खूप ओळखी करून घ्याव्या .पण एकां ठिकाणी राहू नये .नित्य नूतन हिंडावे .वादविवाद करू नये .मद ,मत्सर दाबून टाकावा .उद्धटपणे बोलू नको .मृदू ,नम्र पणे बोल ..दीक्षा देताना नेमकी द्यावी .योग्य प्रकारे प्रबोधन करावे .सर्व गोष्टी करताना भक्ती तुझ्या कृतीतून ,विचारातून दिसावी पांडित्य पूर्ण गीत म्हणावे ,ज्यातून भक्ती प्रगट होईल .लोकांच्या मनाप्रमाणे कृती करावी .


भक्तीज्ञान असो द्यावे | शुध वैराग्य नेटके |
धरावी कीर्तीची द्वारे | तारावी  भाविके बहु || १४ ||
तगावे बहुतां गई | उपाधी नसता बरें |
सद्गुण सार ते द्यावे | नेद्यावे आवगुण ते ||१५ ||
भक्तीस लोक लावाचे |  पावावे पर् पार ते |
उपाधी पाहातां नाही | पाहों जाता उदंडहि || १६||
परंतु सर्व देवाचे | आपले काही नसे |
मनात वावरे देव | देव देव चहुकडे || १७ ||
अत्यंत साक्षपि व्हावे | न व्हावे आळसी कदा |
द्यावया देवाचा लाहो | जायांचे हे म्हणोनिया || १८ ||
मरोनी कीर्ती उरवावी | नुरावावी अपकीर्ती ती |
धन्य धन्य म्हणे लोकू | सक्रीया करितां बरी || १९ ||
पुण्यमार्ग प्रतिष्ठावा | लावावी धर्मवासना |
देवाळयें करावी मोठी | वापी कूप सरोवरे || २० ||
वाटिका वृक्ष लावावे | पुष्पे फळे परोपरी |
कपाटे वरवर टाकीं | भुयेरी विवरे गव्या || २१||
वृंदावने दीपमाळा |धर्मशाळा बहुविधा |
पाई-या वोव-या वोटे | धबकायात्रा हरिकथा || २२ ||
सावधु सकळांगई | न्यायनीती चळों नये |
सकळांसी सौख्य राखावे | वर्तावे ते मनोगते || २३ ||
वैभवे सर्व देवांची | वाद्ये छत्रे परोपरी |
किती म्हणोनि सांगावे | सांभाळावे परोपरी || २४ ||
दास्य ते करावे येसे | या मध्ये घडेल तसे |
देव तो कवी सर्वे | भावार्थ पाहिजे बरा || २५ ||
|| इति श्री फूट योग समास ||

भक्ती ज्ञान तुझ्याकडे असले पाहिजे वैराग्य खरे असावे .ते नैराश्यातून , स्मशान वैराग्य नसावे .खरे वैराग्य असावे .अशा शुध्द वैराग्यातून कीर्तीची दारे उघडतात .त्यातूनच भाविक घडवता येतात .उपाधी नसेल तर टिकून राहता येते .सर्व गुणांचे सार असणारे सद्गुण द्यावे सद्गुण व अवगुणांची लोकांना ओळख करून देउन सद्गुण  अंगी बाणल्यामुळे होणारे फायदेही लोकांना समजावून द्यावे .सद्गुणांच्या प्राप्तीतूनच भक्ती कशी  साकार होते ते आपल्यां आचरणाने लोकांना पटवून द्यावे .महंती एक उपाधीच आहे .पण पहायला गेले तर ती उपाधी नाही जर ती निरपेक्षपणे ते काम तू करशील तर .तू हे काम देवाचे आहे असे समजून केलेस तर ती उपाधी नाही .माझे समजून केलेस तर ती उपाधी आहे .
अत्यंत साक्षेपी म्हणजे प्रयत्न करणारे हवे .आळस कधी करू नये .देवाचा लाभ जर लोकांना करून द्यायचा असेल तर प्रयत्न तर करायलाच हवेत .असे प्रयत्न जर केलेस तर मारून सुध्दा तुझी कीर्ती राहील . आपल्या वागण्याने अपकीर्ती होऊ नये असेच वागावे .तर च लोक तुला धन्य धन्य म्हणतील .त्यासाठी पुण्यमार्ग अनुसरावा .धर्मवासना असू द्यावी .देवालायांचे महत्व वाढवावे . विहिरी ,सरोवरे  बांधावी .बागा तयार कराव्या .त्यात वेली ,व्रुक्ष लावावे ,वेगवेगळी फुलझाडे ,फळझाडे लावावी .वृंदावने ,दीपमाळा बांधाव्या .घाटांना पाय-या बांधाव्या .सर्व अंगांनी सावध असावे .चौफेर नजर असावी .न्याय नीती सोडू नये .सगळ्यांना सौख्य होईल असे वागावे ..सर्वानाचे मनोगत असेल त्याप्रमाणे वागावे .सर्व देवांचे वैभव सांभाळावे ,वाढवावे ,अशा प्रकारे दास्य करावे .



रविवार, 28 अप्रैल 2013

सामान्य देव ते केले | अंतरात्मा विशेष तो |
परंतु शेवटी जातो | धन्य देव निरंजनू ||१||
चळेना ढळेना देवो |रुळेना मळेना कदा |
तुटेना फुटेना काही | आदी अंती जसा तसा ||२||
दोनी पुरुष ये लोकी | क्षराक्षरचि बोलिजे |
क्षर ही तो सर्वही दिसे | साक्षी कूटस्थ अक्षर ||३ ||
उत्तम ईश  तो अन्यू |परमात्मा चि बोलिजे तया |
नाम रूपे  नसे तेथे  | निर्विकार गुणातीतु || ४ ||
छेदिना छेदिता येतो | जळेना पावके कदा |
उदकाने काळबेना तो | सोशेना वात लागतां ||५ ||
भूमी ना आप ना वन्ही | वायो चंचळ तो नव्हे |
भुते गुणे अंतरात्मा | त्याहूनही वेगळा आसे || ६ ||
देहे चत्वारी ब्रह्मांडी | पंचीकारंची बोलिजे |
तो देहे निर्शता कैसे | कोण ते काय उरले || ७ ||
निर्गुणी ते गाठी घालावी | त्रिगुणी ते बरे नसे |
गुणातीत परब्रह्म |संत्संगेची पाविजे || ८ ||
सारासार विचारावे |नित्यानित्य विवेक हा |
दृश्य ते नासते जाते | क्षणक्षणा काळांतरीं || ९||
अदृश्य दृश्य हे दोन्ही |  निराभासी न भासती |
दृष्टी भासित तो भासी | कल्पना ते कळहोवरी|| १०||
निर्विकल्प परब्रह्मी | कल्पना पाहता नसे |
कळेना आकळेना ते | आनुर्वाच्य म्हणोनिया ||११ ||
जाणसी तितुका मी या | सांगसी तितुके नव्हे |
सर्व संग परीत्यागे | वृत्ती शून्य महामुनी ||१२ ||
निवृत्ति उन्मनीमध्ये | काये वाच्यांशे बोलिजे |
लक्षाश कल्पना लक्षी | निर्विकल्पी असेचिना || १३ ||
पंचीकर्ण महावाक्ये | देहे चात्वारे निराशाने |
अहं सोहं नुरे जेथे | मुख्य स्थिती बरी पाहा ||१४ |\
पाहावे बोलणे कोणे | साधकू गुप्त जाहला |
बोलिजे कळाया साटी | कळतां कळणे नसे || १५ ||
जड ते जाणती सर्वै | कोण्ही ते चंचलाकडे |




निश्चळी लक्ष लावी सा | विरुळा पाहातां जनी || १६ ||
उत्तमु प्रत्ययी ज्ञानी | मध्यमू शास्त्र निर्णया |
आधमू लोक धाटीचा | पाषांडी अधमोधमु || १७ ||
उत्तमु कल्पनातीत | मध्यामू शब्द बोलिका |
अधमु नेणता गर्वी | पापात्मा अधामाधमू || १८ ||
उत्तमु मुख्य ज्ञानी तो | मध्यमू तो उपासकू |
अधमु संशई कर्मी | कर्मभ्रष्ट तो अधमोधमु || १९ ||
धन्य तो सर्व हि जाणे | सार शोधूनि घेतसे |
प्रत्ययेवीण मानेना |तो ज्ञाता दुर्लभु जनी || २० ||
इति श्री फूट योग समास समाप्त ||


सामान्य माणसे दगड गोट्यांना शेंदूर फासून देव बनवतात  अंतरात्मा आपल्या
शरीरात असणारा देव असतो .तो देह चालवणारा असतो ,तो आपल्याकडून विचार
करवतो ,वेगवेगळ्या हालचाली घडवून आणतो .परंतू हा अंतरात्मा चंचळ आहे .त्याही
पेक्षा निरंजन असणारा देव श्रेष्ठ आहे . हा श्रेष्ठ देव चळत नाही ,त्याच्या स्थिती
पासून ढळत नाही ,मळत नाही ,तुटत नाही ,फुटत नाही ,शेवट पर्यंत जसाच्या तसा
राहतो .या सृष्टी पूर्वी जसा होता ,आता तसाच आहे ,तसाच सृष्टी प्रलय झाला तरी
तसाच राहणार आहे .
गीतेत अर्जुनाने भगवंताला आठव्या अध्यायात विचारले आहे की ब्रहम म्हणजे काय
तेव्हा भगवंतांनी सांगितले की अक्षर म्हणजे ब्रहम आहे .,जे अविनाशी आहे .त्याउलट
क्षर म्हणजे नाशिवंत आहे .क्षर म्हणजे द्वंदातमक स्थिती .अक्षर म्हणजे निर्द्वंद
स्थिती .जिथे निर्द्वंद अवस्था आहे ,सगळ्या द्वंद्वावर मात केलेली आहे ,चित्तात
समत्व आहे त्याला अक्षर म्हणायचे .क्षर म्हणजे पंचभूतिक ,सगुण ,नाशिवांत आहे
.तर अक्षर साक्षी आहे ,कूटस्थ आहे त्याहूनही वरच्या पातळीला असणारा परमात्मा
आहे. तो निर्विकार ,गुणातीत आहे .पाण्याने भिजवता येत नाही ,त्याचे छेद करता येत
नाहीत , अग्नीने जाळता येत नाही ,तो भूमी नाही ,पाणी नाही चंचळ वायू नाही
,अंतरात्मा याहून वेगळा आहे .पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार देहांचे निरसन केले तर
कोण आणि काय उरेल ? तेव्हा निर्गुण परमात्मा उरेल .त्या निर्गुणाशी गाठ पडेल
,निर्गुणाची अनुभूती येईल .ही अनुभूती येण्यासाठी त्रिगुणात्मक असलेल्या अष्टदा
प्रकृतीचा निरास करून सत्संगाने गुणातीत असलेले परब्रह्म प्राप्त होईल .
  सारासार विचाराने व नित्यानित्य विवेकाने दृश्य नासून जाईल ,नाहीसे होईल
सारासार विचार म्हणजे सार कोणते व असार कोणते याचा विचार .म्हणजे हे दृश्य





विश्व जे नाशिवंत आहे ,ते असार आहे ,हे ओळखणे .नित्यानित्य विवेक म्हणजे नित्य
म्हणजे कायम टिकणारे व अनित्य म्हणजे नाश पावणारे हे ओळखणे .त्यावरून दृश्य
असणारे विश्व आपल्याला होणारा भास आहे ,ती कल्पना आहे असे ओळखणे .परब्रह्म
निर्विकल्प आहे .कल्पना पराब्र्ह्मापर्यंत पोहोचू शकत नाही .त्याचे वर्णन करता येत
नाही म्हणून तिला अनुर्वाच्य म्हणतात .
मी या परब्रह्माला जाणतो ,तितके मी सांगितले नाही सर्व संग त्याग करणारा
वृत्तिशून्य महामुनीच ते सांगेल .जेव्हा वृत्ती निवृत्त होते ,कोणत्याही वृत्ती उरत
नाहीत तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते .तेव्हा बोलणे खुंटते ,तेव्हा वाचेने काय
बोलायाचे ? तेव्हा वाच्यांश आणि लक्षान्श दोन्ही नाहीसे होते .
पंचीकरण आणि महावाक्यांचा अभ्यास ,चार देहांचे निरसन केले अहं सोहं कांहीच उरत
नाही .पंचीकरण म्हणजे पंचमहाभूते एकमेकात मिसळलेली आहेत ,ती कशी नाशिवंत
आहेत ,ती पंचमहाभूते म्हणजे मी नाही हे समजावून घेणे .महावाक्यांचा अर्थ
समजावून घेऊन चारी देहांचा निरास केल्याने अहं आणि सोहं उरत नाही .पण हे सर्व
कोणी पहावे व कोणी बोलावे ? साधक तर गुप्त झाला कारण त्याला परब्रह्माचा
अनुभव आला तर तो बोलायला शिल्लक उरत नाही .
जड सर्व जाणतात ,कोणी चंचलाकडे धावतात .पण निश्चळा कडे ,त्या पराब्र्ह्माकडे
लक्ष देणारे विरळाच असतात .
येथे समर्थ माणसांचे प्रकार सांगतात .:उत्तम ,मध्यम .अधम ,अधमाधम .ज्याला
प्रत्ययाचे ज्ञान असते तो उत्तम असतो .जो शास्त्राच्या निर्णयाप्रमाणे चालतो तो
मध्यम असतो . जो लोक धाटीचा असतो तो अधम असतो .धाटी म्हणजे अविचारी
किंवा फूस .जो अविचारी पणाने वागतो ,लोक धाटी चा म्हणजे लोक म्हणतील तसे
वागणारा असतो तो अधम असतो .जो पाषांडी म्हणजे नास्तिक असतो तो अधामोधम
असतो .
उत्तम कल्पनातीत असतो ,ज्ञानी ,स्वस्वरूप जाणणारा ,असतो .मध्यम शब्द बोलणारा
आलेला अनुभव बोलून दाखवणारा असतो .अधम नेणता अज्ञानी असतो तरीही त्याला
,गर्व असतो .अधमाधम पापी असतो
उत्तम ज्ञानी असतो ,मध्यम उपासक असतो ,अधम त्याने केलेल्या साधनेत ,कर्मात
संशय घेणारा असतो .तर अधामोधाम कर्मभ्रष्ट असतो .    
जो सर्वच जाणतो तो धन्य असतो .तो सार असेल ते घेतो .प्रत्यायाशिवाय जो
कोणतीच गोष्ट मानत नाही ,तो ज्ञाता या जगात खरोखरच दुर्लभ आहे .