शनिवार, 11 मई 2013




लिहिता वाचिता येना | व्यासंग करितां नये |
जड संसार टाकेना | चालीला सर्व सांडूनी || १||
स्वदेश राहिला मागे | विदेश लागला पुढे |
आचार राखणे आधी | स्नान संध्या  हरिकथा || २ ||
अचूक शुध लिहावे | वाचावे नेटके |
साकल्य अर्थ सांगाया | येथा तथ्ये प्रचीतीने || ३ ||
बोलावे न्याय नीतीने | मर्यादा राखणे जनीं |
आभ्यास करावा आधी | ताळबंद पाठांतरे || ४ ||
प्रसंगमान जाणावे | बाणावे बहुतांपरी |
भक्तीभाव असों द्यावा | घालावा भार ईश्वरी || ५ ||
प्रत्यई मागणे भिक्षा | मिळाली न मिळे तरी |
नित्य नूतन हिंडावे | धुंडावे भक्त प्रेमळ || ६ ||
कथा ते करावी आधी | बाधी ते दुराशा नको |
उपाधी उतळावेना | जावे ना उपाधी वैभवाकडे || ७ ||
सर्वत्र लोक शोधावे | बोधावे भक्तीच्या गुणे |
राहावे दुर्बळाचेथे | देवालयी कां नदीतीरी || ८ ||
पर्वती उदकापासी | सनीधनी येकीकडे |
फार येकांत सेवावा | आभ्यास नित्य नुतनु || ९ ||
साहावी शीत उष्णादि | पाहावी रम्यसी स्थळे |
करावे आपण कष्ट | बांधावावी ते हळूहळू || १० ||
वोळखी कराव्या दाटा | येके गई थीरो नये |
वादवेवाद तो खोटा | दाटावा मद मछरू || ११ ||
उद्धट बोलणे खोटे | बोलावी ते मृदोतरें |
नेटकी पाहिजे दीक्षा | रक्षावी भक्ती आदरे || १२ ||
वर्णावी भक्ती देवाची | आदभूत बहुतांपरी |
प्रबंद जाड बोलावे | चालावे लोकमानसें || १३ ||

लिहीता वाचता येत नाही  ,व्यासंग ,अभ्यास करता येत नाही ,जड ,नश्वर असा संसार टाकता येत नाही ,त्यांचा लोभ मनात आहे ,सर्व सोडून चालला आहेस तेव्हा तू कसे वागावेस त्यांचा उपदेश मी करतो  आहे  असे समर्थ म्हणतात .स्वदेश सोडून आता दुस-या देशात म्हणजे दुस-या राज्यात चालला आहेस ,तू सर्वात प्रथम तुझा आचार ,तुझी वागणूक नीट ठेवायला हवीस .स्नान संध्या आणि हरिकथा सांगायला हवीस .अचूक शुध्द लिहायला हवेस .नीट नेटके वाचायला हवेस कारण तुला जे वाचणार आहेस त्यांचा प्रचीतीने अर्थ सांगता आला पाहिजे नीती न्यायाने बोलता येण्यासाठी तुझे ज्ञान तू वाढवायला हवेस .लोक तुला मानायला लागली ,की तू वाटेल तसा वागून चालणार नाही .मार्यादेनेच तुला वागायला हवे .योग्य तो अभ्यास करून ,पाठांतर करून बोलायला हवेस .
प्रसंग काय आहे ते लक्षात घेऊन बोलायला हवे ज्यामुळे तू अनेकांच्या मनात तुझे स्थान निर्माण करशील .जेव्हा तुझ्या मनात भक्तीभाव असेल ,ईश्वराचे अधिष्ठान असेल ,मी कर्ता असे न म्हणता राम कर्ता म्हणशील तेव्हाच तुझे लोकांच्या मनातले स्थान पक्के होईल ..मिळाली आणि मिळाली नाही तरी दररोज भिक्षा माग.दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जा .कुणी प्रेमळ भक्त मिळाले तर त्यांचा शोध घे . नित्य नूतन कथा कर .पण दुराशा मात्र ठेवू नकोस म्हणजे कथेतून धनाची प्राप्ती होईल अशी आशा मात्र ठेवू नकोस कारण महंताला अशी उपाधी ठेवणे बाधक होते .म्हणून उपाधी वैभवाकडे जाऊ नकोस .
सगळीकडे होतकरू लोक शोध .त्यांना भक्तीचा बोध कर .तुझ्या आचरणातून भक्तीचे आचरण कसे करायचे याचा बोध दे. दुर्बलाच्या घरी मुक्काम कर त्याची प्रगती कशी साधता येईल याचा विचार करून त्याला मार्गदर्शन कर .नाहीतर एखाद्या देवालयात किंवा नदीतीरी रहा .एकांतात पर्वतावर ,जळाच्या जवळ रहा .एकांतात राहून चाळणा कर .नित्य नूतन अभ्यास करावा .थंडी ,उन सहन करावे .रम्य ठिकाणे पाहून तेथे रहावे ..रम्य ठिकाणी आपण कष्ट करून नवीन जागा बांधाव्या . खूप ओळखी करून घ्याव्या .पण एकां ठिकाणी राहू नये .नित्य नूतन हिंडावे .वादविवाद करू नये .मद ,मत्सर दाबून टाकावा .उद्धटपणे बोलू नको .मृदू ,नम्र पणे बोल ..दीक्षा देताना नेमकी द्यावी .योग्य प्रकारे प्रबोधन करावे .सर्व गोष्टी करताना भक्ती तुझ्या कृतीतून ,विचारातून दिसावी पांडित्य पूर्ण गीत म्हणावे ,ज्यातून भक्ती प्रगट होईल .लोकांच्या मनाप्रमाणे कृती करावी .


भक्तीज्ञान असो द्यावे | शुध वैराग्य नेटके |
धरावी कीर्तीची द्वारे | तारावी  भाविके बहु || १४ ||
तगावे बहुतां गई | उपाधी नसता बरें |
सद्गुण सार ते द्यावे | नेद्यावे आवगुण ते ||१५ ||
भक्तीस लोक लावाचे |  पावावे पर् पार ते |
उपाधी पाहातां नाही | पाहों जाता उदंडहि || १६||
परंतु सर्व देवाचे | आपले काही नसे |
मनात वावरे देव | देव देव चहुकडे || १७ ||
अत्यंत साक्षपि व्हावे | न व्हावे आळसी कदा |
द्यावया देवाचा लाहो | जायांचे हे म्हणोनिया || १८ ||
मरोनी कीर्ती उरवावी | नुरावावी अपकीर्ती ती |
धन्य धन्य म्हणे लोकू | सक्रीया करितां बरी || १९ ||
पुण्यमार्ग प्रतिष्ठावा | लावावी धर्मवासना |
देवाळयें करावी मोठी | वापी कूप सरोवरे || २० ||
वाटिका वृक्ष लावावे | पुष्पे फळे परोपरी |
कपाटे वरवर टाकीं | भुयेरी विवरे गव्या || २१||
वृंदावने दीपमाळा |धर्मशाळा बहुविधा |
पाई-या वोव-या वोटे | धबकायात्रा हरिकथा || २२ ||
सावधु सकळांगई | न्यायनीती चळों नये |
सकळांसी सौख्य राखावे | वर्तावे ते मनोगते || २३ ||
वैभवे सर्व देवांची | वाद्ये छत्रे परोपरी |
किती म्हणोनि सांगावे | सांभाळावे परोपरी || २४ ||
दास्य ते करावे येसे | या मध्ये घडेल तसे |
देव तो कवी सर्वे | भावार्थ पाहिजे बरा || २५ ||
|| इति श्री फूट योग समास ||

भक्ती ज्ञान तुझ्याकडे असले पाहिजे वैराग्य खरे असावे .ते नैराश्यातून , स्मशान वैराग्य नसावे .खरे वैराग्य असावे .अशा शुध्द वैराग्यातून कीर्तीची दारे उघडतात .त्यातूनच भाविक घडवता येतात .उपाधी नसेल तर टिकून राहता येते .सर्व गुणांचे सार असणारे सद्गुण द्यावे सद्गुण व अवगुणांची लोकांना ओळख करून देउन सद्गुण  अंगी बाणल्यामुळे होणारे फायदेही लोकांना समजावून द्यावे .सद्गुणांच्या प्राप्तीतूनच भक्ती कशी  साकार होते ते आपल्यां आचरणाने लोकांना पटवून द्यावे .महंती एक उपाधीच आहे .पण पहायला गेले तर ती उपाधी नाही जर ती निरपेक्षपणे ते काम तू करशील तर .तू हे काम देवाचे आहे असे समजून केलेस तर ती उपाधी नाही .माझे समजून केलेस तर ती उपाधी आहे .
अत्यंत साक्षेपी म्हणजे प्रयत्न करणारे हवे .आळस कधी करू नये .देवाचा लाभ जर लोकांना करून द्यायचा असेल तर प्रयत्न तर करायलाच हवेत .असे प्रयत्न जर केलेस तर मारून सुध्दा तुझी कीर्ती राहील . आपल्या वागण्याने अपकीर्ती होऊ नये असेच वागावे .तर च लोक तुला धन्य धन्य म्हणतील .त्यासाठी पुण्यमार्ग अनुसरावा .धर्मवासना असू द्यावी .देवालायांचे महत्व वाढवावे . विहिरी ,सरोवरे  बांधावी .बागा तयार कराव्या .त्यात वेली ,व्रुक्ष लावावे ,वेगवेगळी फुलझाडे ,फळझाडे लावावी .वृंदावने ,दीपमाळा बांधाव्या .घाटांना पाय-या बांधाव्या .सर्व अंगांनी सावध असावे .चौफेर नजर असावी .न्याय नीती सोडू नये .सगळ्यांना सौख्य होईल असे वागावे ..सर्वानाचे मनोगत असेल त्याप्रमाणे वागावे .सर्व देवांचे वैभव सांभाळावे ,वाढवावे ,अशा प्रकारे दास्य करावे .



रविवार, 28 अप्रैल 2013

सामान्य देव ते केले | अंतरात्मा विशेष तो |
परंतु शेवटी जातो | धन्य देव निरंजनू ||१||
चळेना ढळेना देवो |रुळेना मळेना कदा |
तुटेना फुटेना काही | आदी अंती जसा तसा ||२||
दोनी पुरुष ये लोकी | क्षराक्षरचि बोलिजे |
क्षर ही तो सर्वही दिसे | साक्षी कूटस्थ अक्षर ||३ ||
उत्तम ईश  तो अन्यू |परमात्मा चि बोलिजे तया |
नाम रूपे  नसे तेथे  | निर्विकार गुणातीतु || ४ ||
छेदिना छेदिता येतो | जळेना पावके कदा |
उदकाने काळबेना तो | सोशेना वात लागतां ||५ ||
भूमी ना आप ना वन्ही | वायो चंचळ तो नव्हे |
भुते गुणे अंतरात्मा | त्याहूनही वेगळा आसे || ६ ||
देहे चत्वारी ब्रह्मांडी | पंचीकारंची बोलिजे |
तो देहे निर्शता कैसे | कोण ते काय उरले || ७ ||
निर्गुणी ते गाठी घालावी | त्रिगुणी ते बरे नसे |
गुणातीत परब्रह्म |संत्संगेची पाविजे || ८ ||
सारासार विचारावे |नित्यानित्य विवेक हा |
दृश्य ते नासते जाते | क्षणक्षणा काळांतरीं || ९||
अदृश्य दृश्य हे दोन्ही |  निराभासी न भासती |
दृष्टी भासित तो भासी | कल्पना ते कळहोवरी|| १०||
निर्विकल्प परब्रह्मी | कल्पना पाहता नसे |
कळेना आकळेना ते | आनुर्वाच्य म्हणोनिया ||११ ||
जाणसी तितुका मी या | सांगसी तितुके नव्हे |
सर्व संग परीत्यागे | वृत्ती शून्य महामुनी ||१२ ||
निवृत्ति उन्मनीमध्ये | काये वाच्यांशे बोलिजे |
लक्षाश कल्पना लक्षी | निर्विकल्पी असेचिना || १३ ||
पंचीकर्ण महावाक्ये | देहे चात्वारे निराशाने |
अहं सोहं नुरे जेथे | मुख्य स्थिती बरी पाहा ||१४ |\
पाहावे बोलणे कोणे | साधकू गुप्त जाहला |
बोलिजे कळाया साटी | कळतां कळणे नसे || १५ ||
जड ते जाणती सर्वै | कोण्ही ते चंचलाकडे |




निश्चळी लक्ष लावी सा | विरुळा पाहातां जनी || १६ ||
उत्तमु प्रत्ययी ज्ञानी | मध्यमू शास्त्र निर्णया |
आधमू लोक धाटीचा | पाषांडी अधमोधमु || १७ ||
उत्तमु कल्पनातीत | मध्यामू शब्द बोलिका |
अधमु नेणता गर्वी | पापात्मा अधामाधमू || १८ ||
उत्तमु मुख्य ज्ञानी तो | मध्यमू तो उपासकू |
अधमु संशई कर्मी | कर्मभ्रष्ट तो अधमोधमु || १९ ||
धन्य तो सर्व हि जाणे | सार शोधूनि घेतसे |
प्रत्ययेवीण मानेना |तो ज्ञाता दुर्लभु जनी || २० ||
इति श्री फूट योग समास समाप्त ||


सामान्य माणसे दगड गोट्यांना शेंदूर फासून देव बनवतात  अंतरात्मा आपल्या
शरीरात असणारा देव असतो .तो देह चालवणारा असतो ,तो आपल्याकडून विचार
करवतो ,वेगवेगळ्या हालचाली घडवून आणतो .परंतू हा अंतरात्मा चंचळ आहे .त्याही
पेक्षा निरंजन असणारा देव श्रेष्ठ आहे . हा श्रेष्ठ देव चळत नाही ,त्याच्या स्थिती
पासून ढळत नाही ,मळत नाही ,तुटत नाही ,फुटत नाही ,शेवट पर्यंत जसाच्या तसा
राहतो .या सृष्टी पूर्वी जसा होता ,आता तसाच आहे ,तसाच सृष्टी प्रलय झाला तरी
तसाच राहणार आहे .
गीतेत अर्जुनाने भगवंताला आठव्या अध्यायात विचारले आहे की ब्रहम म्हणजे काय
तेव्हा भगवंतांनी सांगितले की अक्षर म्हणजे ब्रहम आहे .,जे अविनाशी आहे .त्याउलट
क्षर म्हणजे नाशिवंत आहे .क्षर म्हणजे द्वंदातमक स्थिती .अक्षर म्हणजे निर्द्वंद
स्थिती .जिथे निर्द्वंद अवस्था आहे ,सगळ्या द्वंद्वावर मात केलेली आहे ,चित्तात
समत्व आहे त्याला अक्षर म्हणायचे .क्षर म्हणजे पंचभूतिक ,सगुण ,नाशिवांत आहे
.तर अक्षर साक्षी आहे ,कूटस्थ आहे त्याहूनही वरच्या पातळीला असणारा परमात्मा
आहे. तो निर्विकार ,गुणातीत आहे .पाण्याने भिजवता येत नाही ,त्याचे छेद करता येत
नाहीत , अग्नीने जाळता येत नाही ,तो भूमी नाही ,पाणी नाही चंचळ वायू नाही
,अंतरात्मा याहून वेगळा आहे .पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार देहांचे निरसन केले तर
कोण आणि काय उरेल ? तेव्हा निर्गुण परमात्मा उरेल .त्या निर्गुणाशी गाठ पडेल
,निर्गुणाची अनुभूती येईल .ही अनुभूती येण्यासाठी त्रिगुणात्मक असलेल्या अष्टदा
प्रकृतीचा निरास करून सत्संगाने गुणातीत असलेले परब्रह्म प्राप्त होईल .
  सारासार विचाराने व नित्यानित्य विवेकाने दृश्य नासून जाईल ,नाहीसे होईल
सारासार विचार म्हणजे सार कोणते व असार कोणते याचा विचार .म्हणजे हे दृश्य





विश्व जे नाशिवंत आहे ,ते असार आहे ,हे ओळखणे .नित्यानित्य विवेक म्हणजे नित्य
म्हणजे कायम टिकणारे व अनित्य म्हणजे नाश पावणारे हे ओळखणे .त्यावरून दृश्य
असणारे विश्व आपल्याला होणारा भास आहे ,ती कल्पना आहे असे ओळखणे .परब्रह्म
निर्विकल्प आहे .कल्पना पराब्र्ह्मापर्यंत पोहोचू शकत नाही .त्याचे वर्णन करता येत
नाही म्हणून तिला अनुर्वाच्य म्हणतात .
मी या परब्रह्माला जाणतो ,तितके मी सांगितले नाही सर्व संग त्याग करणारा
वृत्तिशून्य महामुनीच ते सांगेल .जेव्हा वृत्ती निवृत्त होते ,कोणत्याही वृत्ती उरत
नाहीत तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते .तेव्हा बोलणे खुंटते ,तेव्हा वाचेने काय
बोलायाचे ? तेव्हा वाच्यांश आणि लक्षान्श दोन्ही नाहीसे होते .
पंचीकरण आणि महावाक्यांचा अभ्यास ,चार देहांचे निरसन केले अहं सोहं कांहीच उरत
नाही .पंचीकरण म्हणजे पंचमहाभूते एकमेकात मिसळलेली आहेत ,ती कशी नाशिवंत
आहेत ,ती पंचमहाभूते म्हणजे मी नाही हे समजावून घेणे .महावाक्यांचा अर्थ
समजावून घेऊन चारी देहांचा निरास केल्याने अहं आणि सोहं उरत नाही .पण हे सर्व
कोणी पहावे व कोणी बोलावे ? साधक तर गुप्त झाला कारण त्याला परब्रह्माचा
अनुभव आला तर तो बोलायला शिल्लक उरत नाही .
जड सर्व जाणतात ,कोणी चंचलाकडे धावतात .पण निश्चळा कडे ,त्या पराब्र्ह्माकडे
लक्ष देणारे विरळाच असतात .
येथे समर्थ माणसांचे प्रकार सांगतात .:उत्तम ,मध्यम .अधम ,अधमाधम .ज्याला
प्रत्ययाचे ज्ञान असते तो उत्तम असतो .जो शास्त्राच्या निर्णयाप्रमाणे चालतो तो
मध्यम असतो . जो लोक धाटीचा असतो तो अधम असतो .धाटी म्हणजे अविचारी
किंवा फूस .जो अविचारी पणाने वागतो ,लोक धाटी चा म्हणजे लोक म्हणतील तसे
वागणारा असतो तो अधम असतो .जो पाषांडी म्हणजे नास्तिक असतो तो अधामोधम
असतो .
उत्तम कल्पनातीत असतो ,ज्ञानी ,स्वस्वरूप जाणणारा ,असतो .मध्यम शब्द बोलणारा
आलेला अनुभव बोलून दाखवणारा असतो .अधम नेणता अज्ञानी असतो तरीही त्याला
,गर्व असतो .अधमाधम पापी असतो
उत्तम ज्ञानी असतो ,मध्यम उपासक असतो ,अधम त्याने केलेल्या साधनेत ,कर्मात
संशय घेणारा असतो .तर अधामोधाम कर्मभ्रष्ट असतो .    
जो सर्वच जाणतो तो धन्य असतो .तो सार असेल ते घेतो .प्रत्यायाशिवाय जो
कोणतीच गोष्ट मानत नाही ,तो ज्ञाता या जगात खरोखरच दुर्लभ आहे .



मंगलवार, 4 दिसंबर 2012

फूटयोग निरुपण



फूटयोग निरुपण


देहाचा भर्वसा नाही | वैभवाचा असेचिना |
देशकाळ वर्तमाने |सर्वही होत जातसे || १||
सांगती चालिले सर्वे | मागेपुढे हळूहळू |
 देखतां देखतां होते | कळता ण कळे कैसे || २ ||
देशोदेशीचे राजे | नाना श्रीमंत जाणावे |
किती आले किती गेले | कोण जाणे कळेचिना || ३||
संसार नेटका वाटे | सत्य नेमस्त आपुला |
 पाहातां पाहाता पुढे | कळतां कळता कळे || ४ ||
बोलता चालता जाते | सार आयुष्य वेचते |
कळेना भुलवी माया | माझे माझे वृथा वृथा || ५ ||
सोडिना सोडिना रे |कोण्हीही पाहातां जनी |
पुरता तूर्त चालावे | कोण्ही कोणी पुसो नये || ६ ||
असों हे चालते आता | माया हे चालते संवें |
धूर्त ते पावले खुणे | भ्रमिष्ट भुलली मनी || ७ ||
दिसते काय सांगावे | लोक जाती मरोनिया |
उपजले वाढले मेले | आले गेले किती किती || ८ ||
संसार नासका आहे | विटबे भलते सदा |
मन ते सांवरेना की | उभाउभी खडाखडी ||९ ||
यालागी मोकळी वृत्ती | आसीली पाहिजे सदां |
धन्य ते जाणते ज्ञानी | उदास गिरी कंदरे ||१० ||
अद्यापि या जनामध्ये | आरडा चिरडा निघे |
उदास वृत्तीचा योगी | न लिंपे असता जनी ||११ ||
||इति श्री फूटयोग निरुपण समास ||


या समासात समर्थांनी एकसुंदर विचार सांगितला आहे की ज्या देहाचा भरवसा नाही ,कारण हा देह नाशवंत आहे ,ज्या वैभवाचा भरवसा नाही कारण वैभव म्हणजे संपत्ती ,लक्ष्मी चंचळ आहे , ज्या देशाचा भरवसा नाही कारण जे उपजते ते नाश पावते ,जो काळ सतत बदलत असतो .आजचा वर्तमानकाळ उद्या भूतकाळ होतो हे सर्व नाशवंत आपण खरे ,टिकणारे मानतो .पण आज ना उद्या मागे पुढे हळू हळू ह्या सर्व गोष्टी नाश पावना-या असतात ,नाश पावतात .अनेक देशोदेशींचे राजे ,शूर ,बलवान ,वैभवसंपन्न असले तरी एक ना एक दिवस त्यांना काळाच्या पडद्याआड जावेच लागते .
आपल्या ला संसार नेटका वाटतो .सगळं कसं छान चालले आहे असे वाटते .परंतु पुढे पुढे कळते ,की खरा संसार कसा आहे ,नेटका आहे की फसवा आहे .आपण आपला सगळा वेळ बोलण्यात घालवतो .बोलणे ही खूप काही अर्थपूर्ण असते असे नाही .सगळे आयुष्य असेच जाते .कारण त्याच वेळी माया आपल्या बरोबर चालत असते .ती आपल्याला भुलवत असते .ती आपल्यामध्ये माझे माझे असे आपल्या मनी भ्रम निर्माण करते .हा माझा संसार ,माझी मुले ,माझी सगळी माणसे असा भ्रम निर्माण करते .
ह्या सर्व जनात जे धूर्त असतात ,जाणते असतात ,त्यांना मायेची ही करणी समजते .ते या मायेच्या बंधनात सांपडत नाहीत .ते  मायेच्या बंधनातून कसे सुटायचे ते जाणतात .अज्ञानी मात्र भ्रमिष्टासारखे मायेत अडकतात .दु:खी होतात ,सुख दु:खाच्या हिंदोळ्यात अडकतात ,सुख दु:खाचे झोके घेतात .हे सगळे बघितले  की लोक उपजत ,वाढतात ,मारतात .येतात जातात .जीवनाचे सार्थक न करताच आपला देहाचा त्याग करतात .पण मनाला सांवरत नाहीत मन या मोह्मायेतून बाजूला करण्याचा प्रयत्नही करत नाहीत .उलट समजते पण वळत नाही अशी त्यांची अवस्था असते .यावर उपाय म्हणजे मोकळी वृत्ती ठेवणे म्हणजे वृत्तींच्या मागे , प्रापंचिक विचारांच्या मागे न धावता त्या वृत्तींकडे त्रयस्थ पणे पाहणे ,असे पाहण्याची सवय लावून घेतली की त्या वृत्ती आपल्या मध्ये मुरतात
वृत्ती कडे पाहता वृत्ती आपणात चि मुरे | आपण चैतन्य मात्र केवळ परिपूर्ण उरे |
वृत्ती कडे त्रयस्थ पणे पाहिले की वृत्ती आपल्यात मुरतात म्हणजे ते विचाराचे तरंग योग्य की अयोग्य याचा निर्णय होतो आणि असे करता करता वृत्ती प्रमाणे कृती करणारा देह नसून करवून घेणारा आपल्यातला चैतन्य रुपी परमात्मा आहे हे कळते .असे ओळखणारे जाणते ,ज्ञानी उदासीन वृत्तीने राहतात ,गिरी कांदरात राहतात .सर्व वृत्तींपासून अलिप्त राह्तात .ते या मायेत लिप्त होत नाहीत .

गुरुवार, 29 नवंबर 2012

फूट योग समास



                               
                                 फूट योग समास 

नेणता जन्मती प्राणी | जाणता जन्म चुकती |
नेणता जन्म दरिद्री | जाणता भाग्य होतसे ||१||
जाणणे जाणत्यापाशी | नेणत्याला कैसे कळे |
सावधी  संग शोधावा | कळतां कळतां कळे ||२ ||
जाणणे नीती न्यायाचे | सत्य नेमस्त बोलणे |
येत्नाचा साक्षपी प्राणी | तो येक भाग्य मेळवी ||३ ||
बुधीने सर्वही होते | बुधी दाता नारायणु |
आधी तो आपला कीजे | लक्षुमी चरणी वसे ||४ ||
विष्णू तो  कोण तो कैसा | पाळीतो तो कवणेपरी |
त्रैलोक्य पाळकू येकू | धन्य लीळा न वर्णावे || ५ ||
देहाचा घेतल्या बुंधी | प्राणी मात्रासी वर्तवी |
कर्तुत्व दिसते डोळा | कर्ता कोठेची नाडळे ||६ ||
धन्य रेधान्य कर्ता तो | रंगरूप बहुगुणी |
केले ते पाहावे ना की | ऐकिले न वाचे कदा || ७ ||
कोण कोणें घटी कैसा | चालवी बोलवी पहा |
नाना विद्या कला युक्ती | स्वयें देवची जाणता ||८ ||
येकला पूर्वला कैसा | हेची येक अपूर्वता |
अनंत्भेद योनीचे | सांग भेद दाखवी ||९ ||
होय रे सूत्रधारी हा | नाना सूत्रे बहुविधे |
नाचवी खेळवी सर्वे | त्रैलोक्य सचराचरी || १० ||
तो देव वोळखा वा रे | लोक हो विसरू नका |
भक्त जो तोचि जाणावा | यदर्थी संशयो नसे ||११ ||
  ||इति श्री  फूट  योग समास ||
नेणता म्हणजे अज्ञानी त्याला जन्म येतो. जाणता म्हणजे  ज्ञानी तो जन्म मृत्युच्या चक्रातून सुटतो .त्याला  सुख दु:खाच्या यातनांतून सुटका मिळते .नेणत्याला म्हणजेच अज्ञानाला सुख दु:खाच्या यातना भोगाव्या लागतात म्हणून त्याला दरिद्री म्हटले आहे तर जाणता आत्मज्ञानी असल्यामुळे तो सुख दु:खाच्या पलीकडे गेलेला असतो .तो नित्य आनंद भोगत असतो . म्हणून तो भाग्य भोगतो असे म्हटले आहे .
जे जाणणे आहे ते जाणत्यापाशी आहे .जे ज्ञान आहे ते जाणत्या जवळ आहे .त्याच्या ज्ञानाचे स्वरूप नेणत्याला कळत नाही .म्हणून संग ,मैत्री करताना सावधपणे करावी .ज्ञानी नीती न्याय कसा असतो हे जाणतो .त्याचे बोलणेही सत्य व नेमस्त म्हणजे नेमके असते .त्याच्या जवळ केवळ नीती न्याय ,सत्य बोलणेच नसते तर तो त्याच्या कार्याच्या सिद्धीसाठी प्रयत्न करायलाही मागे पुढे पहात नाही .असा जाणताच भाग्य मिळवतो .
कोणतीही गोष्ट करताना आपण बुद्धीचा तर वापर करतोच पण एक लक्षात ठेवणे जरूर आहे की बुद्धिदाता नारायण च आहे .लक्ष्मी भगवान नारायणांचे पाय चेपत असते .म्हणजे नारायण जर आपल्याला प्रसन्न  असेल तर लक्ष्मी सुध्दा प्राप्त होईल .या नारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी विष्ण]] कसा आहे ,त्याचे स्वरूप काय आहे , स्वत: कसा आहे ह्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे ,विष्णू पालनकर्ता आहे .तो ह्यासृश्तीवरील जीव मात्रांचे पालन कसे करतो हे सुध्दा बघायला हवे अंत:करण म्हणजे विष्णू .,म्हणजे जाणीव .या जाणीवेने सर्व जीवांचे रक्षण होते जाणीवेने सर्व सजीव आपले उदरभरण करतात ,जाणिवेनेच धोक्याची घंटा त्याना ऐकू येते .स्वसंरक्षण करण्याची प्रेरणा मिळते लाजाळूची पाने नुसत्या स्पर्शाने मिटतात .जाणिवेनेच सर्प माणसाच्या चाहूलीने पळ काढतो .तर सर्पाच्या दिसण्याने माणूस  तेथून पळतो .असा सर्व सजीवांचा पालनकर्ता विष्णू आहे .त्रैलोक्याचा तो पालनकर्ता आहे .त्याच्या लीळा भागवतात खूप सुंदर वर्णन केल्या आहेत .
निरनिराळे देह त्याने निर्माण केले .तो त्या सर्व प्राणीमात्रांना चालवतो .त्याना जगण्यासाठी अन्न ,पिण्यासाठी पाणी ,देतो मनुष्य प्राण्यांना रहायला निवारा ,देहाला वस्त्र पुरवतो .हे सगळे त्याचे कर्तृत्व आपल्याला डोळ्याने दिसते पण  तो स्वत: मात्र दिसत नाही ही त्याची लीळा अगाध आहे .करून अकर्ता होतो .असा हा कर्ता खरोखरच धन्य आहे .
त्याची करणी कशी अगाध आहे पहा .त्याने केलेली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे .एक दुस-या सारखी नाही .तरीही तो ह्या सर्वाना चालवतो ,बोलावतो .त्याच्या कडून क्रिया करवून घेतो .
चौदा विद्या ,चौसष्ट कला आहेत .त्या त्याला माहीत आहेत .त्या त्याला एकट्याला माहीत आहेत ,त्याने या विश्वात त्याणे एकट्याने पुरवल्या आहेत ही खरोखरच अपूर्वाई ची गोष्ट आहे .चौ-याऐंशी लक्ष योनी मध्ये भेद दाखवत त्याना एकमेकांपासून वेगळे करतो आहे .ही सृष्टी नियमाने चालावी म्हणून त्याने केलेली सृष्टी रचना खरोखरच आश्चर्य चकित करणारी आहे .म्हणून च समर्थ त्याला सूत्रधार म्हणतात .या त्रेलोक्यातील  सर्व चराचर तो नाचवतो आहे ,खेळवतो आहे .जीवनात येणारी सुखदु:ख हा त्याचाच खेळ आहे .असा हा करून अकर्ता तोच खरा देव आहे ,त्याला ओळखा असे समर्थ सांगतात .त्या देवाला जो ओळखतो योच खरा भक्त आहे .यात संशय नाही

रविवार, 9 सितंबर 2012

नाम महिमा



नाम महिमा
नाम जपे चंद्रमौळी | नाम जपे वाल्हा कोळी |
नाम जपे हिमनगबाळी | हृदय समूळी वाहतसे || १ ||
नाम जपे अजामेळ | नाम जपे ध्रुवबाळ |
नाम जपे ते गोकुळ | आबालवृध्द सर्वहि || २||
नाम जपे अभिमन्यू | नाम जपे उपमन्यू |
नाम जपे तो ब्राह्मणु | पाहा दरिद्री सुदामा || ३ ||
नाम महिमा अगाध | नरनारी होती शुत्ध |
ठसावला पूर्ण बोध | रामदास अंतरी || ४ ||


नाम जपतसे धर्म |नाम जपतसे भीम |
तिजा अर्जुन उत्तम | नकुळ सहदेव पाचवा || १ ||
नाम जपतसे द्रौपदी | नामे यज्ञ जाली सित्धी |
नाम जपे ॠषीमांदी | नाम अनादी म्हणोनि || २||
नाम जपे ॠशीमेळी | नाम जपतसे बळी |
नाम प्रगट फणीकुळी | छंद सकळी लाविला || ३ ||
नाम जपाताती साधू | नामें झडे गर्वमदु |
नाम स्मरता आनंदू | न होय बोधू कल्पांतू || ४ ||
नाम आगळे सर्वात | नामे होय कृतकृत्य |
रामदास हा पुनीत | नामें करुनी जाहला || ५ ||




चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर ,ते रामनाम जपतात .जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा हलाहल विष बाहेर आले .त्या विषाने समस्त जगाला धोका निर्माण झाला असता म्हणून श्रीशंकरांनी ते विष प्यायले .त्याने घशाला अतिशय दाह झाला .तो गंगा मस्तकी घेऊन ,नागाला गळ्याभोवती गुंढाळून ही थांबला नाही .म्हणून त्यांनी श्रीरामांच्या नामाचा जप सुरु केला आणि दाह थांबला .
वाल्ह्या कोळी लूटमार करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असे . एकदा नारद मुनी जंगलातून जाय असताना नारदांनी वाल्ह्या कोळ्याला त्याच्या पापाचा वाटा घ्यायला कोणी तयार आहे का ते विचारायला सांगितले .तेव्हा कोणीच त्याच्या पापाचा वाटा घ्यायला तयार नव्हते .तेव्हा वाल्याला पश्चात्ताप झाला व त्याने नारदांच्या उपदेशानुसार नाम  घ्यायला सुरुवात केली .त्याला राम म्हणता यायचे नाही म्हणून त्याने मरा मरा असे उरफाटे नाम घ्यायला सुरुवात केली .त्या नामात इतका दंग झाला की त्याच्यावर वारूळ तयार झालेले त्याला कळले नाही .वारूळ म्हणजे वाल्मिक .म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला .
हिमनगबाळी म्हणजे पार्वती ! तिला भगवान शंकरानी राम महिमा आवडीने सांगितला आणि ती नाम घेऊन तिने तिचे मन श्रीराम चरणी वाहिले .
अजामेळ एक विद्वान ब्राह्मण .पण तो वाहवत गेला .त्याची अधोगती झाली .त्याच्या धाकट्या मुलाचे नाव नारायण होते .मृत्यू समयी त्याच्या तोंडात नारायणाचे नाव होते त्यामुळे यमदूत त्याचे प्राण न्यायाला आल्यावर विष्णुदूत मध्ये पडले .यमदूतांना त्याचे प्राण हरण करता आले नाहीत .
ध्रुवाला त्याच्या वडीलांच्या मांडीवरून त्याच्या सावत्र आईने उठवले म्हणून ध्रुवान अढळपद मिळवण्यासाठी नारदांच्या उपदेशावरून नाम घ्यायला सुरुवात केली .परमेश्वर प्रसन्न झाला .त्याने ध्रुवाला अढळपद दिले .
गोकुळ तर कृष्णमयचं झाल होते .गोपिकांना सर्वत्र कृष्णच दिसत होता .त्या कृष्णाच्या लीला आठवत होत्या .त्याचे गुणगान गात होत्या .त्याचे नामात दंग होत होत्या .गोपींची भक्ती तर इतकी पराकोटीची होती की ज्ञान शिकवायला गेलेल्या उद्धावाला त्यांनी प्रेमभक्ती शिकवली .
अभिमन्यू तर श्रीकृष्णांच्या बहिणीचा म्हणजे सुभद्रेचा मुलगा .तो श्रीकृष्णांच्या तालमीत तयार झाला .त्यांचे नाम तो घेतच होता .
उपमन्यू वसिष्ठ कुळातला एक मंत्र द्रष्टा ॠषी. लहानपणी तो त्याच्या मामाबरोबर एकां यज्ञात गेला होता . तेथे त्याला उत्तम गायीचे दूध प्यायला मिळाले .घरी परत आल्यावर त्याने आईजवळ दुधासाठी हट्ट धरला .आईने त्याला पाण्यात पीठ कालवून दिले .पण ख-या दुधाची चव कळलेली असल्यामुळे ,उपमन्यू ते दूध प्यायला तयार होईना .तेव्हा आईने सांगितले की बाळा ,आपण दूध देण्याएतके श्रीमंत नाही आहोत .तू देवाकडे दूध माग ,,त्याने भगवान शंकरांना उग्र तप:स्चार्येने प्रसन्न करून घेतले .भगवान शंकरांनी त्याला क्षीरसागर च भेट दिला ..
श्रीकृष्णांचा गुरुबंधू सुदामा एक गरीब ब्राम्हण होता तो सतत श्रीकृष्णांचे स्मरण करत असे नाम जपत असे .सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आला तेव्हा एकां मूठभर पोह्याच्या बदल्यात श्रीकृष्णांनी त्याची नगरी सुवर्णमय केली .
असा हा नामाचा महिमा अगाध आहे .नामाने सर्व शुध्दता येते ,समर्थ म्हणतात राम्दासाने हा बोध पूर्ण ठसावला आहे .





आता महाभारतातील उदाहरणे समर्थ देतात .धर्म ,भीम ,अर्जुन ,नकुळ ,सहदेव द्रौपदी ,जी यज्ञांतून उत्पन्न झाली ,ते सर्व सतत भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करत असत .ॠषीगण ,बळीराजा सर्व नाम जपत .साधूही नाम जपतात .नामाने गर्व झडतो .नामाने आनंद होतो ,जो कल्पांत आला तरी नाहीसा होत नाही .म्हणूनच समर्थ म्हणतात नाम आगळे आहे ,वेगळे आहे .नामाने कृतकृत्य होते . रामदास नामाने पुनीत ,पवित्र झाला असेही समर्थ म्हणतात