मंगलवार, 25 जनवरी 2011

आनंदवन भुवनी


स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

त्रैलोक्य चालिले तेथे | देव गंधर्व मानवी |ऋशी मुनी महायोगी |आनंदवनभुवनी ||१६||

आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदविमोचने |मोहीम मांडली मोठी | आनंदवनभुवनी ||१८ |\

सुरेश उठिला आंगे |सुरसेना परोपरी |विकटे कर्कशे याने |आनंदवनभुवनी ||१९ ||

देव देव बहु देव |नाना देव परोपरी |दाटणी जाहाली मोठी |आनंदवनभुवनी ||२०||

दिग्पती चालिले सर्वै |नाना सेना परोपरी |वेष्टित चालिले सकळी| आनंदवनभुवनी ||२१ ||

मंगळ वाजती वाद्ये |माहांगणा समागमे |आरंभी चालीला पुढे | आनंदवनभुवनी ||२२||

राश्भे राखिली मागे |तेणे रागेची चालिल्या |सर्वत्र पाठीसी फौजा |आनंदवनभुवनी ||२३ ||

आनेक वाजती वाद्ये | ध्वनीकल्लोळ उठिला |छेबीने डोलती ढाला | आनंदवनभुवनी ||२४ ||

वीजई दिस जो आहे | ते दिसी सर्व उठती |अनर्थ मांडला मोठा |आनंदवनभुवनी ||२५ ||

काशीला महत्व येण्याचे कारण म्हणजे ते गंगेच्या काठी आहे ।गंगेने येथे धनुष्याकार धारण केला आहे .धर्मग्रंथात पूर्वी या नदीचे वर्णन रामगंगा ,महागांगा ,गुप्तगंगा असे केले आहे तिच्या पाण्यात मोठे मोठे प्राणी प्रत्यक्ष दिसतात .ही ओवी एक रूपक आहे दासबोधात ११ -७ या समासात वर्णन केलेले मायेचे रूपक यात सागितले आहे .ही माया नदी सर्व देवाची साक्षी आहे .माया ही मूळ प्रकृती आहे ,मायेच्या उपाधीने युक्त महेश्वर व सर्व सगुण देव आहेत .म्हणून या माया नदीत स्नान करून ,तिला समजून दर्शन घेउन माणसाला सुख मिळते .म्हणून एकदा तरी तिच्यात स्नान केले पाहिजे असे समर्थ म्हणतात .त्रेलोक्यातले लोक येथे येतात .याचा अर्थ उत्तरेच्या उंच प्रदेशात राहणारे देवलोक ,सखल प्रदेशात राहणारे मानव ,गांधार देशातील लोक ,मुनी ,महायोगी सर्व येथे येतात .

अकरा आकडा का महत्वाचा आहे ते अनंतदास रामदासी आत्मानुभाव या ग्रंथात सांगतात :

येकी येक ऐक्य ब्रह्म | गुरुशिष्य दोनी परब्रह्म | येकादेश हे अंकवर्ण | सहजसमाधी सांगितले || एकावर एक अशा दोन आकड्यांचे जसे ऐक्य झाले तसे गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मचं आहे .स्वामी सेवक ,देव भक्त ,पुरुष प्रकृती अशा जोड्या एकावर एक अकरा प्रमाणे एकरूप आहेत .समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे अकरावे महारुद्र आहेत म्हणून समर्थांना अकरा हा आकडा प्रिय आहे .

रामायण काळाप्रमाणे आताही युध्द व्हावे असे दिव्य स्वप्न समर्थांच्या दिव्य चक्षुला समोर दिसले . म्हणूनच पुढील ओवीत समर्थ वर्णन करतात की देवांना सज्जनांना जनतेला बंधमुक्त करण्यासाठी देव मस्तकी धरून हलकल्लोळ करत आहेत असे स्वप्न समर्थ पहात आहेत .

दैत्यांवर चालून जाणा-या देवांच्या सैन्यात पुष्कळ शस्त्रे धारण करणारे देवांप्रमाणे तेजस्वी व पराक्रमी पुरुषांची सैन्यात दाटी झाली होती .देवांचा राजा ईंद्र याच्या अधिपत्याखाली फौजा चालल्या होत्या दैत्य सैन्याला चारही बाजूंनी वेढा देत देत चालल्या होत्या .विजयाची मंगल वाद्ये वाजत होती .युध्दाच्या आरंभी निर्विघ्नता सूचक गणपती पुढे चालला होता .रामाच्या वेळेस गणपतीला रावणाने गाढवे चारायला लावली होती तो राग गणपतीच्या मनात होता .या दैत्यांचा सूड घेण्याच्या ईच्छेने क्रोधित झालेला गणपती देवसेनेला विजय मिळवून देण्याच्या ईच्छेने मंगल वाद्ये घेउन पुढे चालला होता .अनेक रणवाद्ये वाजत होती .

विजयादशमीच्या मंगल दिवशी सर्व देव सेना दैत्यांवर चालून जात आहे आणि दैत्यांचा संहार मांडला आहे असे भविष्यकालीन दृश्य समर्थांच्या दृष्टी समोर तरळत आहे

शुक्रवार, 21 जनवरी 2011

आनंदवनभुवनी -समर्थांनी पाहिलेले एक स्वप्न



आनंदवनभुवनी

समर्थांनी पाहिलेले एक स्वप्न

जन्म दु:खे जरा दुखे |नित्य दुखे पुन्ह्पुन्हा |

ससार त्यागणे |आनंदवनभुवना ||१||

वेधले चित्त जाणावे |रामवेधी निरंतरी |

रागे हो वीतरागे हो |आनंदवनभुवना ||२ ||

संसार वोढीता दुखे |ज्याचे त्यासीच ठाउके |

परंतू येकदा जावे |आनंदवनभुवना ||३||

न सोसे दुख ते होते | दुख शोक परोपरी |

येकाकी येकदा जावे |आनंद्वनभुवना ||४||

कष्टलो कष्टलो देवा |पुरे संसार जाहाला |

देहत्यागासी येणे हो | आनंदवनभुवना ||५||

जन्म ते सोसिले मोठे | अपाय बहुतांपरी |

उपाये धाडिले देवे | आनंदवनभुवना ||६ ||

स्वप्नी जे देखिले रात्री | तें तें तैसेची होतसे |

हिंडता फिरता गेलो |आनंदवनभुवना ||७|

जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|

विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली |

लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||९ ||

विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला |

धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||१०||

हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |

हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||११ ||

खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |

कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||१२ ||

हिंदुस्थानच्या चारही दिशांना बारा वर्षे भ्रमण करून समर्थ काशीच्या रामगंगेच्या तीरावर बसले असताना भावी हिंदुस्थानचे भव्य चित्र उभे राहिले .त्याचे चित्रण या काव्यात केले आहे .हे काव्य अनुष्ट्रूप छदात आहे .हे महाराष्ट्राचे राष्ट्रगीत आहे असे पांगारकर म्हणतात .

या श्लोकाचे पहिले सहा श्लोक ,संसाराला कंटाळून ,वैराग्य आलेल्या प्रापंचिकाने देहत्यागा करीता काशीक्षेत्राला केलेले गमन सांगणारे आहेत ।

गीतेच्या १३ व्या अध्यायात ज्ञानाची जी लक्षणे सांगितली आहेत त्यावरून पहिली ओवी आहे .चित्ताला रामाचा ध्यास लागला की त्याच्या प्रेमाने वैराग्याने काशीला जावे .संसारात काबाडकष्ट असले तरी एकदा काशीला जावे असे समर्थ सांगतात .संसारात येणारी दुखे खूप असली तरी एकदा तरी काशी यात्रेला जावे .संसाराचे कष्ट उपसून जरी थकलो ,तरी देह काशी क्षेत्री पडावा म्हणून काशीला जावे .अनेक जन्म मी कष्ट सोसले तरी जन्म मृत्युच्या चक्रातून सुटण्यासाठी एकदा काशीला जावे .

समर्थांनी स्वप्नात पाहिल्या प्रमाणे ते खरोखरच काशीत आले होते .भारता बद्दल विचार करत असताना त्यांच्या मनात कल्पनेचे कल्लोळ माजले होते .त्याचे वर्णन त्यांनी ७ ते १२ या श्लोकांत केले आहे विघ्नहर्ता गजाननाला प्रार्थना करून तीर्थ यात्रेला समर्थ निघाले .काशी क्षेत्रात आल्यावर पाहिलेले स्वप्न खरे झाले अशी खात्री पटली .सर्व हिंदुस्थान फिरल्यावर त्यांच्या मनात उठलेले कल्लोळ असताना भविष्यात जे व्हावे असे वाटले ते प्रत्यक्ष घडते आहे असे दृश्य दिसू लागले .स्वधर्माचरण करताना येणारी विघ्ने देवाने कुटून लाटले .विघ्नाची डोके भुई सपाट केली .हिंदुस्थान मधील फौजा परधर्मी लोकांवर चालून गेल्या .भीमपराक्रमी लोकांनी शत्रूंचा पराभव केला .विघ्नांच्या फौजा हाकलवून लावल्या .असा अद्भूत पराक्रम बघून विघ्न हर्त्या फौजांमध्ये गोंधळ उडाला .त्या फौजांची कत्तल करायला सुरवात झाली कारण अनेक वर्षे लोक अन्याय सहन करत होते .त्यांच्या बाजूने आता भीमकाय मारुती वा मुख्य देव म्हणजे श्री रामराय उभे ठाकले होते .



मंगलवार, 12 अक्टूबर 2010

शिवथर घळीची सवायी

काय वानू शिवथर ग्रामी । जेथे पातले समर्थ स्वामी ।
स्फुरणा लागी योग्य भूमी । देखोनिया स्थिरावले । । १
सवे लेखकू योगिराज । मायभूमीला चढला साज ।
निर्माण झाले ग्रंथराज । शोभे नामे दासबोध । । २
मनालागी केला बोध । आपला आपण घ्यावा शोध ।
आवरावा काम क्रोध । दीक्षा महान बोलले । । ३
गुरु कृपेचिने जाणे । पुण्य भूमीचे दर्शने ।
उल्हासिल्या अंत :करणे । सीता वंदी पुन : पुन : । । ४
या शिवथर घळीचे महत्त्व काय वर्णन करू ?इथे समर्थ रामदास येऊन राहिले .दासबोध हा ग्रंथ लिहिण्यासाठी स्फुरण होण्यासाठी निवांत ,सुंदर ,निसर्ग सौंदर्याने युक्त अशी योग्य भूमी त्यांना मीळाली .तेथे दासबोध ग्रंथाची रचना करण्याचे निश्चित केले .त्यांच्या बरोबर लेखनिक म्हणून कल्याण स्वामी दौत ,लेखणी घेऊन ग्रंथ लिहिण्यास तत्पर होते ।
दासबोध ग्रंथात समर्थांनी साधकांना मनाला बोध करायला सांगितले आहे .मी कोण आहे याचा शोध घेणे हे मानवी जन्माचे उत्तम ध्येय आहे .ते कसे साधायाचे तेही समर्थांनी या ग्रंथात सांगितले आहे .त्याची दीक्षाच समर्थांनी या ग्रंथात दिली आहे .कवयित्री सीता म्हणते की या पुण्य भूमीच्या दर्शनाने माझे अंत :करण आनंदित झाले आहे .मी पुन्हा पुन्हा या स्थानाला वंदन करते .

गुरुवार, 30 सितंबर 2010

शुक्रवार ची सवायी

जय जगदंब सौख्यदानी । लक्ष्मीमाय जगज्जननी ।
जय करवीरवासिनी । नारायणी भगवती । । १
मूळमाया वैष्णवी । अनंत ब्रह्मांडे नाचवी ।
नाना नाटके लाघवी । परब्रह्मशक्ती २
शास्त्रे पुराणे वेद्स्मृती । अखंड जियेचे स्तवन करिती ।
अव्यक्त पुरुषाची व्यक्ती । चिद्रूपिणी । । ३
विस्तारे वाढली इच्छाशक्ती । चराचरी जियेची व्याप्ती ।
प्राणी मात्रांची ज्ञानज्योती । जगन्माता । । ४
रामदासाचा किंकर । सदा झाडी महाद्वार ।
रामनाम अलंकार । कंठी हर्षे नाचतो । । ५
जगदंबेची सवायी करताना समर्थ जगदंबेला सौख्यदायी म्हणजे सौख्यदेणारी म्हणतात .ती लक्ष्मी आहे ,सर्वांची माता आहे ,जगताची माता आहे , करवीर म्हणजे कोल्हापूरला राहणारी आहे .नारायणी ,भगवान नारायणांची पत्नी आहे .ती मूळमाया आहे ,म्हणजे परब्रह्माचा मूळ संकल्प आहे .विष्णू पत्नी वैष्णवी आहे .ती परब्रह्माची ईश्वराची शक्ती असल्यामुळे ती अनंत ब्रह्मांडे निर्माण करते ,त्यांचा नाश करते .अनेक नाटके ती रचते.तीचे स्वरुप न समजण्यासारखे असल्या मुळे तिचे वर्णन शास्त्रे ,पुराणे ,वेद ,स्मृती करतात .कारण ती अव्यक्त पुरुषाची म्हणजे परब्रह्माची छाया असते ,जी शेवटी परब्रह्मात विलीन होते .तिच्या इच्छेने ती या दृश्य विश्वाचा विस्तार करते ,सांभाळ करते आणि नाशही करते .प्राणी मात्रांना ज्ञान देणारी ती जगन्माता आहे .म्हणून समर्थ म्हणतात की रामाचा दास तिचे महाद्वार झाडतो आहे .आणि रामनाम कंठात घेऊन नाचतो आहे .

मंगलवार, 21 सितंबर 2010

दत्तांची सवायी

सारासार नीति न्याय । मुख्य भक्तीचा उपाय ।
संतसंगेवीण काय । वाया जाय सर्वही । । १
आधी कर्माचा प्रसंग । शुध्द उपासना मार्ग ।
ज्ञाने उध्दरती जन । येथे संदेह नाही । । २
देहे निरसन करावे । महावाक्य विवरावे ।
तेणे संसारी तरावे । काळ नासतो आहे । । ३
ज्यास नाही येणे जाणे । नाही जन्म ना मरणे ।
सदय पाविजे श्रवणे । दास म्हणे हे सही । । ४
म्हणावा जयजय राम !
दिसेल ते नासेल । आणि येईल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२
जे दिसेल ते नासते ,जे येते ते जाते ते असार असते .त्याउलट जे कायम असतेच ते सार असते ,असे जाणणे म्हणजे सारासार विचार आहे .हा सारासार विचार करणे , नीतिने ,न्यायाने वागणे ,हे भक्तीने वागणे असते .असे केले तरी संत्संग हवाच .सत्संगाशिवाय सर्व वाया जाते .कर्म करत असताना शुध्द कर्मे केली पाहिजेत .शुध्द उपासनेचा मार्ग धरला पाहिजे ,जो संत संगतीनेच मिळतो .त्यातूनच भक्ती वाढत जाते ,ज्ञान वाढते ,ज्ञानाने उध्दार होतो .याविषयी शंका रहात नाही ।
ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रथम देहाचे निरसन करायला समर्थ सांगतात .देहाचे निरसन करायचे म्हणजे देहातील प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे ओळखायचे .असे करता करता हा देह म्हणजे मी नाही हे ओळखायचे .महावाक्यांचे विवरण करायचे .तेव्हा हा देह म्हणजे मी नाही हे मनावर ठसते .मग संसारातून आपण तरून जातो .ज्याला जाणे व येणे अशा येरझारा घालायच्या नसतील ,जन्म मृत्यु नको असेल तर आता तुम्ही श्रवण करा असे समर्थ सांगतात .

सोमवार, 20 सितंबर 2010

विठ्ठलाची सवायी

नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।
गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला । । १
चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।
दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला । । २
तेथे येता रामदास । दृढ़ श्रीरामी विश्वास ।
रूप पालटोनी त्यास । रामरूपी भेटला । । ३
पुन्हा विठ्ठल रूप । राम विठ्ठल येकरूप ।
पूर्व पुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
विठ्ठल ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन गुणांच्या स्वामींचा सुंदर मिलाफ आहे .तुकाराम महाराज म्हणतात :
तो हा उभा विटेवरी ,शंखचक्र गदा पद्म सहित हरी असे वर्णन केले आहे .विठ्ठल विष्णूचे रूप आहे .त्याच्या मस्तकावर शिवशंकर आहेत .अशा गुणातीत ,गुणांच्या पलिकडे असणा-या ,निर्विकार अशा विठ्ठलाचे वर्णन शुक मुनींनी केले आहे .चन्द्रभागेच्या रम्य तीरावर कमरेवर हात ठेवून आई वडीलांची सेवा करणा-या पुंडलिकाची वाट बघत विटेवर उभा आहे .त्याच्या दर्शनाला येणा-या भक्तांची वाट तो एकादशीला पहात असतो .आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तेथे खूप मोठी यात्रा भरते तेव्हा दिंड्या येतात .भक्तीरसाचा डोंब उसळतो .भक्त भक्तीरसात चिंब भिजतात ।
समर्थ रामदास तेथे आले तेव्हा त्यांनी विठ्ठलात रामरूप बघितले .तेव्हा समर्थ म्हणतात :

येथे उभा का श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।
काय केली सीताबाई । येथे राही रखुमाबाई ।
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ।
काय केली शरयु गंगा । येथे आली चंद्रभागा ।
काय केले वानरदळ । येथे जमविले गोपाळ ।
श्रीपंढरीनाथ ही रामरूप । दिसले ।
विठ्ठल रामरूपात दिसले ,पुन्हा विठ्ठल रूपात दिसले असे सर्व देव एकच हा संदेश श्री समर्थांनी दिला .

देवीची सवायी

धन्य तुळजापूर सुंदर । माता नांदे घरोघर ।
तेहेतीस कोटी सुरवर । उभे असती त्या ठाया । । १
यात्रा येतसे अपार । उदो बोलाचा गजर ।
गोंधळ पोत निरंतर । चमत्कार पावती । । २
तेथे येता रामदास । श्रीराम चरणी दृढ़ विश्वास ।
अंतरी धरोनी आस । रामध्यान करीतसे । । ३
रामरूपी देवी जाली । शिवशक्ती आकारली ।
नामे अंतरी निवाली । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
तुळजापुर नगर खरोखरच सुंदर आहे कारण तेथे तुळजाभवानीचा वास आहे .तीच सर्वत्र नांदते आहे .तिच्या ठिकाणी तेहेतीस कोटी देव गण आहेत अशी कल्पना केली आहे .तुळजापुरच्या यात्रेत देवीचा,तुळजापुरच्या भवानी चा उदो चाललेला असतो ,एकच गोंधळ ,तिचा पोत नाचवणे ,चालू असते ।
समर्थ रामदास जेव्हा तुळजापूर ला आले ,तेव्हा त्यांना तेथे ही रामरायांचे दर्शन हवे होते .तीच इच्छा मनात धरून त्यांनी राम रायांचे ध्यान केले .आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रामराय तेथे प्रगट झाले .देवी रामरूपी झाली .जणू काही शिव आणि शक्तीचा एकत्र संगम झाला .तिच्या पायाशी लक्ष दिल्यावर तिचे ध्यान करून देवी अंतरातून निवाली .शांत झाली .