जय जगदंब सौख्यदानी । लक्ष्मीमाय जगज्जननी । जय करवीरवासिनी । नारायणी भगवती । । १ मूळमाया वैष्णवी । अनंत ब्रह्मांडे नाचवी । नाना नाटके लाघवी । परब्रह्मशक्ती २ शास्त्रे पुराणे वेद्स्मृती । अखंड जियेचे स्तवन करिती । अव्यक्त पुरुषाची व्यक्ती । चिद्रूपिणी । । ३ विस्तारे वाढली इच्छाशक्ती । चराचरी जियेची व्याप्ती । प्राणी मात्रांची ज्ञानज्योती । जगन्माता । । ४ रामदासाचा किंकर । सदा झाडी महाद्वार । रामनाम अलंकार । कंठी हर्षे नाचतो । । ५ जगदंबेची सवायी करताना समर्थ जगदंबेला सौख्यदायी म्हणजे सौख्यदेणारी म्हणतात .ती लक्ष्मी आहे ,सर्वांची माता आहे ,जगताची माता आहे , करवीर म्हणजे कोल्हापूरला राहणारी आहे .नारायणी ,भगवान नारायणांची पत्नी आहे .ती मूळमाया आहे ,म्हणजे परब्रह्माचा मूळ संकल्प आहे .विष्णू पत्नी वैष्णवी आहे .ती परब्रह्माची ईश्वराची शक्ती असल्यामुळे ती अनंत ब्रह्मांडे निर्माण करते ,त्यांचा नाश करते .अनेक नाटके ती रचते.तीचे स्वरुप न समजण्यासारखे असल्या मुळे तिचे वर्णन शास्त्रे ,पुराणे ,वेद ,स्मृती करतात .कारण ती अव्यक्त पुरुषाची म्हणजे परब्रह्माची छाया असते ,जी शेवटी परब्रह्मात विलीन होते .तिच्या इच्छेने ती या दृश्य विश्वाचा विस्तार करते ,सांभाळ करते आणि नाशही करते .प्राणी मात्रांना ज्ञान देणारी ती जगन्माता आहे .म्हणून समर्थ म्हणतात की रामाचा दास तिचे महाद्वार झाडतो आहे .आणि रामनाम कंठात घेऊन नाचतो आहे .
सारासार नीति न्याय । मुख्य भक्तीचा उपाय । संतसंगेवीण काय । वाया जाय सर्वही । । १ आधी कर्माचा प्रसंग । शुध्द उपासना मार्ग । ज्ञाने उध्दरती जन । येथे संदेह नाही । । २ देहे निरसन करावे । महावाक्य विवरावे ।
तेणे संसारी तरावे । काळ नासतो आहे । । ३ ज्यास नाही येणे जाणे । नाही जन्म ना मरणे ।
सदय पाविजे श्रवणे । दास म्हणे हे सही । । ४ म्हणावा जयजय राम !दिसेल ते नासेल । आणि येईल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२ जे दिसेल ते नासते ,जे येते ते जाते ते असार असते .त्याउलट जे कायम असतेच ते सार असते ,असे जाणणे म्हणजे सारासार विचार आहे .हा सारासार विचार करणे , नीतिने ,न्यायाने वागणे ,हे भक्तीने वागणे असते .असे केले तरी संत्संग हवाच .सत्संगाशिवाय सर्व वाया जाते .कर्म करत असताना शुध्द कर्मे केली पाहिजेत .शुध्द उपासनेचा मार्ग धरला पाहिजे ,जो संत संगतीनेच मिळतो .त्यातूनच भक्ती वाढत जाते ,ज्ञान वाढते ,ज्ञानाने उध्दार होतो .याविषयी शंका रहात नाही ।ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रथम देहाचे निरसन करायला समर्थ सांगतात .देहाचे निरसन करायचे म्हणजे देहातील प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे ओळखायचे .असे करता करता हा देह म्हणजे मी नाही हे ओळखायचे .महावाक्यांचे विवरण करायचे .तेव्हा हा देह म्हणजे मी नाही हे मनावर ठसते .मग संसारातून आपण तरून जातो .ज्याला जाणे व येणे अशा येरझारा घालायच्या नसतील ,जन्म मृत्यु नको असेल तर आता तुम्ही श्रवण करा असे समर्थ सांगतात .
नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।
गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला । । १
चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।
दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला । । २
तेथे येता रामदास । दृढ़ श्रीरामी विश्वास ।
रूप पालटोनी त्यास । रामरूपी भेटला । । ३
पुन्हा विठ्ठल रूप । राम विठ्ठल येकरूप ।
पूर्व पुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
विठ्ठल ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन गुणांच्या स्वामींचा सुंदर मिलाफ आहे .तुकाराम महाराज म्हणतात :
तो हा उभा विटेवरी ,शंखचक्र गदा पद्म सहित हरी असे वर्णन केले आहे .विठ्ठल विष्णूचे रूप आहे .त्याच्या मस्तकावर शिवशंकर आहेत .अशा गुणातीत ,गुणांच्या पलिकडे असणा-या ,निर्विकार अशा विठ्ठलाचे वर्णन शुक मुनींनी केले आहे .चन्द्रभागेच्या रम्य तीरावर कमरेवर हात ठेवून आई वडीलांची सेवा करणा-या पुंडलिकाची वाट बघत विटेवर उभा आहे .त्याच्या दर्शनाला येणा-या भक्तांची वाट तो एकादशीला पहात असतो .आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तेथे खूप मोठी यात्रा भरते तेव्हा दिंड्या येतात .भक्तीरसाचा डोंब उसळतो .भक्त भक्तीरसात चिंब भिजतात ।
समर्थ रामदास तेथे आले तेव्हा त्यांनी विठ्ठलात रामरूप बघितले .तेव्हा समर्थ म्हणतात :येथे उभा का श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा । काय केली सीताबाई । येथे राही रखुमाबाई । काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी । काय केली शरयु गंगा । येथे आली चंद्रभागा । काय केले वानरदळ । येथे जमविले गोपाळ । श्रीपंढरीनाथ ही रामरूप । दिसले । विठ्ठल रामरूपात दिसले ,पुन्हा विठ्ठल रूपात दिसले असे सर्व देव एकच हा संदेश श्री समर्थांनी दिला .
धन्य तुळजापूर सुंदर । माता नांदे घरोघर । तेहेतीस कोटी सुरवर । उभे असती त्या ठाया । । १ यात्रा येतसे अपार । उदो बोलाचा गजर । गोंधळ पोत निरंतर । चमत्कार पावती । । २ तेथे येता रामदास । श्रीराम चरणी दृढ़ विश्वास । अंतरी धरोनी आस । रामध्यान करीतसे । । ३ रामरूपी देवी जाली । शिवशक्ती आकारली । नामे अंतरी निवाली । लक्ष पायी ठेविल्या । । ४ म्हणावा जयजय राम !तुळजापुर नगर खरोखरच सुंदर आहे कारण तेथे तुळजाभवानीचा वास आहे .तीच सर्वत्र नांदते आहे .तिच्या ठिकाणी तेहेतीस कोटी देव गण आहेत अशी कल्पना केली आहे .तुळजापुरच्या यात्रेत देवीचा,तुळजापुरच्या भवानी चा उदो चाललेला असतो ,एकच गोंधळ ,तिचा पोत नाचवणे ,चालू असते ।समर्थ रामदास जेव्हा तुळजापूर ला आले ,तेव्हा त्यांना तेथे ही रामरायांचे दर्शन हवे होते .तीच इच्छा मनात धरून त्यांनी राम रायांचे ध्यान केले .आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रामराय तेथे प्रगट झाले .देवी रामरूपी झाली .जणू काही शिव आणि शक्तीचा एकत्र संगम झाला .तिच्या पायाशी लक्ष दिल्यावर तिचे ध्यान करून देवी अंतरातून निवाली .शांत झाली .
धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान । पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १ वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर । करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २ कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती । पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३ भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय । भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४ म्हणावा जयजय राम !शंकरांचे वसतिस्थान जेथे आहे त्या शिखराला कैलास असे म्हणतात .ते पांढ-या स्फटिकांचे शिखर आहे .तेथे शंकर श्रीरामांचे ध्यान करत असतात .सिंहासनावर बसून अत्यंत प्रेमाने गणपतीचे नृत्य पहातात .जो कोणी शंकरांचे नाम घेत असतो ,त्याला शंकर महा वर देऊन पातकांचा संहार करतात .सिंहासनावर बसलेले असताना गिरिजा म्हणजे पार्वती त्यांच्या अंकावर म्हणजे मांडीवर बसलेली शोभून दिसते .कृष्णा ,गोदा आणि भागीरथी या नद्या शंकरांच्या जटेतून निघून पृथ्वी वर लोकांसाठी ,लोकांची तहान भागवण्या साठी आल्या आहेत ,पृथ्वी वरील लोकांना पावन करण्या साठी आल्या आहेत .शंकरांचे भैरवादी समुदाय सतत राम नामाचे नित्य गायन करतात .त्याने सर्व भ्रम नाहीसे होतात .शंकरांच्या पायावर लक्ष ठेवले तर सगळे भ्रम नाहीसे होतात .
नाम जेजुरीगड सुंदर । तेथे नांदे म्हाळसावर ।संगे भैरवगण अपार । पूर्ण अवतार शिवाचा । । १ पीत अश्वावरी स्वार । हाती घेऊनी तलवार । करी मणिमल्ल संहार । करी उध्दार जगाचा । । २ चंपाषश्ठीचा उत्सव थोर । यात्रा मिळती अपार । येळकोट नामाचा गजर । भक्त आनंदे करिताती । । ३ दास म्हणे रामराव । राम तोचि खंडेराव । जेथे भाव तेथे देव । लक्ष पायी जडलिया । । ४ म्हणावा जयजय राम !सुंदर जेजुरी गडावर म्हाळसापति खंडेराव नांदतो आहे .तो शिवाचा अवतार असल्यामुळे शिव शंकरांचे भैरव गण ही बरोबर आहेत .पिवळ्या घोड्यावर स्वार होउन ,हातात तलवार घेऊन मणिमल्लाचा राक्षसाचा संहार करून त्याच्या पासून लोकांचे रक्षण केले .जगाचा उध्दार केला ।कृत युगात दैत्य उन्मत्त झाले .त्यांनी मुनींवर हल्ले चढवले .सर्व देवांनी शंकरांकडे धाव घेतली .महादेवांनी मल्हारी मार्तंडाचे अक्राळ विक्राळ रूप घेतले .मणी दैत्या बरोबर युध्द पुकारले .मणीच्या छातीवर त्रिशूलाचा प्रहार केला .तो मूर्छित पडला ,सावध झाला व पुन्हा युध्द करू लागला .महादेवांनी शक्तिशाली ब्रह्मास्त्र फेकून त्याला मूर्छित केले। त्रिशूल फेकले आणि भूमीवर पाडले .मणी दैत्य शरण आला .आणि मला जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे .मला मुक्ती दे । असा वर मागुन घेतला .देवाने तथास्तु म्हटले .मणीचा पुतळा आजही खंडेरायाच्या मूळ देवळा समोर हात जोडून उभा आहे .मणी चा भाऊ मल्लासूर भावाच्या वधाच्या सूडाने पेटला .त्याने जोरात युध्दाला सुरुवात केली .मार्तंडाने त्रिशूल फेकून त्याला धरणीवर पाडले .मल्लासूर नतमस्तक झाला .त्याने प्रभूंना विनंती केली - तुमच्या आधी माझे नाव यावे .देव तथास्तु म्हणाले .तेव्हा पासून मार्तंडाला मल्हारी मार्तंड म्हणतात ।चंपाषष्ठी चा खूप मोठा उत्सव जेजुरी गडावर भरतो ,खुप मोठी यात्रा भरते .येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर होतो .समर्थ रामदास म्हणतात की श्रीराम म्हणजेच खंडेराव आहे .समर्थांना सर्वत्र श्रीराम च दिसत असल्यामुळे खंडोबा ठिकाणी श्रीरामच आहेत असे समर्थ म्हणतात .जेव्हा दैवताच्या ठिकाणी मन जड़लेले असते तेव्हा जो भाव असतो तसा देव आपल्याला भेटतो .
हरी गिरीपरी ठाण । बळे चालिले फुराण । वरी घेतले किराण । अंतराळ जातसे । । १ कपी लागवेगे धावे । मागे लांगुळ हेलावे । वैरसमंध आठवे । वज्र दाढा खातसे । । २ मनोवेगे झेंपावाला । द्रोणागिरीस पावला । हात घाली औषधीला । आटघाट होतसे । । ३ गिरी उत्पाटिला बळे । सळे बांधिला लांगुळे । मागे फिरे अंतराळे । लंकेवरी येतसे । । ४ म्हणावा जयजय राम !लंकेवर श्रीराम जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा रावणाच्या बाणाने लक्ष्मण बेशुध्द पडला तेव्हा द्रोणागिरी वरील औषधी आणण्याला सांगितले तेव्हा हनुमंताने ते काम हाताशी धरले .अंतराळातून मनोवेगाने द्रोणागिरी पर्वताकडे जाण्यास निघाला .त्याची शेपुट मागे हलत होती .रावणाने लक्ष्मणाला बेशुध्द पाडले हे आठवून हनुमंताने दातओठ खाल्ले आणि औषधी आणायला मनाच्या वेगाने निघाला .द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला .त्या पर्वतावर अनेक औषधी होत्या .कोणती घ्यावी अशी त्याला खात्री नव्हती .म्हणून त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला .औषधी घेतल्यावर पुन्हा परत तेथे नेऊन ठेवला .पुन्हा लंकेवर आला .