हरी गिरीपरी ठाण । बळे चालिले फुराण । वरी घेतले किराण । अंतराळ जातसे । । १ कपी लागवेगे धावे । मागे लांगुळ हेलावे । वैरसमंध आठवे । वज्र दाढा खातसे । । २ मनोवेगे झेंपावाला । द्रोणागिरीस पावला । हात घाली औषधीला । आटघाट होतसे । । ३ गिरी उत्पाटिला बळे । सळे बांधिला लांगुळे । मागे फिरे अंतराळे । लंकेवरी येतसे । । ४ म्हणावा जयजय राम !लंकेवर श्रीराम जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा रावणाच्या बाणाने लक्ष्मण बेशुध्द पडला तेव्हा द्रोणागिरी वरील औषधी आणण्याला सांगितले तेव्हा हनुमंताने ते काम हाताशी धरले .अंतराळातून मनोवेगाने द्रोणागिरी पर्वताकडे जाण्यास निघाला .त्याची शेपुट मागे हलत होती .रावणाने लक्ष्मणाला बेशुध्द पाडले हे आठवून हनुमंताने दातओठ खाल्ले आणि औषधी आणायला मनाच्या वेगाने निघाला .द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला .त्या पर्वतावर अनेक औषधी होत्या .कोणती घ्यावी अशी त्याला खात्री नव्हती .म्हणून त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला .औषधी घेतल्यावर पुन्हा परत तेथे नेऊन ठेवला .पुन्हा लंकेवर आला .
नाम श्रीराम सुंदर । ध्याती उमामहेश्वर ।सिंहासनी रघुवीर । अंकी सीता शोभली । । १ लक्ष्मण महावीर । भरत शत्रुघ्न धीर ।हनुमंत जोड़ी कर । देवर्षी गायिला । । २ ज्याचे ध्यानी रामदास । तेच ध्यान कल्याणास । बंधू दत्तात्रयास । रामप्रेमा लाधला । । ३ वर्णू राघवाचे यश । श्रीगुरुचा नामघोष । पूर्वपुण्य हे विशेष । लक्ष पायी ठेविला । । ४श्रीराम हे सुंदर नाम आहे .श्रीरामांचे ध्यान उमा महेश्वर करतात .कारण समुद्र मंथनात निर्माण झालेले विष शंकरांनी प्राशन केले .त्याचा दाह गंगेला मस्तकावर धारण करून ,चंद्राला मस्तकावर धारण करून ,नाग गळयावर धारण करूनही थांबला नाही .तो श्रीरामांचा नामस्मरण करून दाह थांबला.रघुवीर सिंहासनावर बसले असताना त्यांच्या मांडीवर सीता शोभून दिसते .लक्ष्मण महावीर आहे .भरत शत्रुघ्न हे दोन्ही धीराचे आहे .भारताने १४ वर्ष श्रीरामांची वाट पाहिली .हनुमंत रामांच्या समोर हात जोडून उभा आहे .त्या हनुमंताचे वर्णन देवर्षी नारदांनी केले आहे .ज्या कल्याणाला रामदासांचे ध्यान आहे ,त्या रामदास स्वामींना श्रीरामांचे ध्यान आहे .समर्थ रामदासांच्या बंधू दत्तात्रयांना रामाचे प्रेम लाभले आहे .राघवाचे यश वर्णन करायचे तर श्रीगुरुंचा म्हणजे श्रीरामांचे नामाचा नामघोष करायला हवा ,पूर्व पुण्य असेल तरच श्रीरामांचे नाम स्मरण करण्याची ,इच्छा होते .
नयनी पाहता हनुमंत । ज्यासी वर्णिती महंत । ज्याचा महिमा अनंत । मुख्य प्राण रामाचा । । १ स्वामी रामाचे वहन । केले लंकेचे दहन । त्याची कीर्ती गहन । बलभीम नामाचा । । २ सदा बांधुनिया माज । करी रामाचे निजकाज । ज्याचे शिरी रघुराज । सेवक पूर्णकामाचा । । ३ सर्व देवांचा वरिष्ठ । वारी दासाचे अरिष्ट । रामदास एकनिष्ठ । मारुती हा नेमाचा । । ४ म्हणावा जयजय राम !डोळ्यांनी हनुमंताला पाहताना हनुमंताचे वर्णन महंत करतात .हनुमंत महाबली आहे .प्राण दाता आहे .सौख्यकारी आहे ,दुःखहारी आहे ,भीमरूपी आहे म्हणजे महाभयंकराचा नाश करणारा आहे .त्याचा महिमा वर्णन करता न येणारा आहे .तो रामाचा जणू प्राणच आहे .सीता माईंना शोधायला आल्यावर त्याने लंकेचे दहन केले .रावण वधानंतर श्रीराम लक्ष्मण व सीतेसह अयोध्येला जायला निघाले तेव्हा मारूतीने त्यांना वाहून नेले .अशा मारुती रायाची कीर्ती खूप मोठी आहे .तो नावाप्रमाणे बलभीम आहे .त्याने द्रोणागिरी पर्वत औषधी साठी उचलून आणला आणि काम झाल्यावर पुन्हा नेऊन ठेवला .तो नेहमी रामाचेच काम करण्यात दंग असतो . तो सर्व देवांमध्ये वरिष्ठ आहे कारण सूर्याला पकड़ण्यासाठी जेव्हा उडी सर्व देवांनी त्याला अस्त्र भेट दिली .तो रामाच्या दासावरील संकट दूर करतो .समर्थ रामदास त्याचे एकनिष्ठ भक्त होते .
रामदूत वायूसूत भीमगर्भ जुत्पती । जो नरात वानरात । भक्तीप्रेम वित्पती ।। १ दासदक्ष स्वामीपक्ष नीजकाज सारथी वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती । । २ मारुती श्रीरामांचे दूत होते .रावणाकडे श्रीरामांचे दूत म्हणून मारुतीच गेले होते .सीतामाता शोधताना सापडल्यावर श्रीरामांनी दिलेली खुणेची अंगठी रामदूत या रूपातच सीता मातांना दिली .श्रीरामांच्या विजयाचा शुभ सन्देश सीतामातांना देण्यासाठी दूत म्हणून मारुती रायच आले होते । मारुती मरुत म्हणजे वायूचा पुत्र .मरुत म्हणजे वायूच्या औरस वीर्यापासून उत्पन्न झालेला म्हणून मारुती !भीमरूपी स्तोत्रात मारुतीला भीमरूपी म्हटले आहे .भीम म्हणजे भयंकर ! मारुतीला भयंकर या अर्थाने न म्हणता महाभयंकरापासून रक्षण करणारे म्हणून म्हटले आहे .अंजनी मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मारुती राय होते म्हणून भीमगर्भ जुत्पत्ती !ते दासदक्ष आहेत .श्रीरामांच्या दासांचे ते रक्षण करतात .श्री समर्थ रामदास स्वामींचे त्यांनी नेहमीच रक्षण केले .श्रीराम मारुती रायांचे स्वामी !श्रीरामांशिवाय अन्य कोणताही विचार त्यांच्या मनात नसे .ज्यात श्रीराम नाहीत ते काहीही त्यांना आवडत नसे .म्हणून रामांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस दिलेली मोत्याची माळ त्यांनी फोडून टाकली .कारण त्यात श्रीराम त्यांना दिसले नाहीत । मारुती राय बलशाली होते .त्यांनी सीतामाईंचा शोध वायूवेगाने शत योजने सागर ओलांडून लावला .हजारो योजने दूर असलेला द्रोणागिरी पर्वत घेउन आले .औषधी दिल्यावर पुन्हा पर्वत उचलून जागेवर ठेवला व मारुती हे नाव सार्थ केले .
वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन । जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १राम राम राम । जन सज्जन विश्राम । साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २ अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास । बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३ धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर । सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४ म्हणावा जयजय राम !गजवदन म्हणजे गणपती ,जो संकट नाशक आहे .सुखाचे घर आहे .ज्याने मदनही जाळला अशा शिवशंकराला नेहमी मनात ठेवा .त्याचे स्मरण ठेवा .कारण शिवशंकर स्वत : श्रीरामांचे स्मरण करतात ।श्रीराम सज्जन लोकांचे विश्रांति चे स्थान आहे .साधकांचे निजधाम आहे .श्रीरामांचे सतत स्मरण करून आपले हित करून घ्या .अखंडित ध्यान करण्याचा अभ्यास करा .भागवातात व्यास मुनी हरिभजन करून हा भवसागर तरून जा असे सांगतात .कारण हरी ,श्रीराम यांचे गुण शंकर जाणतात .श्रीराम वरदायक आहेत .त्यांनी देवांना रावणाच्या तावडीतून सोडवले आहे .
सवाया हा एक काव्य प्रकार जो समर्थांनी नव्याने आणला .त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते .तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत .आपल्या धर्माची ओळख करून देत .सवाया खूप आवेशाने म्हटल्या जातात .ज्यामुळे लोकांमध्ये धर्म ,देश यासर्वांच्या विषयी प्रेम निर्माण होत असेल .सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते .ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते .समर्थ म्हणतात :तुझा भाट मी वर्णितो रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया । महाराज दे अंगीचे वस्त्र आता । बहु जीर्ण झाली देहेबुध्दी कंथा । । समर्थ म्हणतात ,की रामराया मी तुझा भाट आहे .मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे .नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे .लोकांना धर्माची ,देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे .
शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे या चरणात समर्थांची तुलना शुक मुनीँबरोबर केली आहे कारण शुक मुनी वैराग्याचे सागर होते .त्यांची एकदा जनक राजाची पत्नी सुनयना हिने परीक्षा घेण्याचे ठरवले .एकदा नारद मुनी व शुक मुनी जनक राजाच्या घरी झोपाळयावर बसलेले असताना सुनयना नटून थटून तेथे आली व दोघांच्या मध्ये बसली .नारद मुनींची चलबिचल झाली पण शुक मुनी मात्र शांत होते .म्हणून समर्थांना शुक मुनींची उपमा दिली आहे ।समर्थांना वसिष्ठ मुनींच्या ज्ञानाची उपमा दिली जाते .समर्थांचे ज्ञान वसिष्ठांसारखे आहे असे म्हटले जाते .वसिष्ठ ब्रह्मर्षी होते .ज्ञानी होते ।वाल्मिकी रामायणाची एका महाकाव्याची रचना करणारे महाकवी होते .तसेच श्री समर्थांचे प्रचंड साहित्य उपलब्ध्द आहे .म्हणून वाल्मिकी कवीं सारखे श्री समर्थ आहेत असे मानले जाते ।श्री समर्थांना राघवाचा म्हणजे श्रीरामांचा उपदेश प्राप्त झाला होता .समर्थ त्यांच्या वडील बंधूंना म्हणजे गंगाधर पंतांकडे अनुग्रह द्या अशी मागणी करत होते ,पण त्यांनी दिला नाही .म्हणून ते गावातल्या मारुती मंदीरात जाऊन बसले .त्यांची निष्ठा बघून मारुतीरायांनी श्रीरामांना समर्थांना अनुग्रह द्यायला सांगितला .त्यावेळेस समर्थांच्या हातात बाण, जपासाठी माळ, हुर्मुजी रंगाचे वस्त्र ,रामनामाँकित पत्र व त्रयोदशाक्षरी मंत्र दिला व आज्ञा केली की धर्मस्थापना करावी .ही घटना जांब मध्ये शके १५३८ मध्ये घडली ।साधनेच्या कालात समर्थांनी अनेक ग्रंथांचे श्रवण ,वाचन केले .त्यांचा उल्लेख समर्थांनी दासबोधाच्या दशक १ समास १ मध्ये केला आहे नारदा सारखे ते कीर्तन करायचे । कदर्यु नावाचा एक सदाचारी संपन्न ब्राह्मण .तो आल्या गेल्याचे व्यवस्थित स्वागत करत असे .त्याच्या कड़े सतत पैपाहुणे असत .तो खर्चाकडे न बघता खर्च करीत असे .असे करता करता तो कफल्लक झाला .त्याला लोक अपमानाने वागवू लागले .बायको मुले अपमान करू लागली .पण त्याची शांती नाहीशी झाली नाही .तो शांत असे .समर्थांना साधकावस्थेत खूप त्रास सोसावा लागला .पण त्यांनी त्यांची शांती कायम राखली ।नामस्मरणात ते शंकरान सारखे होते किंवा प्रल्हादा सारखे होते .शंकर सदैव श्रीरामांचे स्मरण करतात .प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा विरोध असूनही नारायणाचे नाम सतत घेत असे व आपल्या मित्रांना घ्यायला सांगत असे .तसे समर्थ सतत नामात असत .त्यांचे अर्चन ,भजन पृथु राजा सारखे होते .चकोर जसा चंद्राची वाट पहात असतो तसे समर्थ प्रभू रामांच्या दर्शनासाठी वाट पहात होते ।अशा सद्गुरु समर्थांना माझा नमस्कार असो .हाती घेतलेले हे काम त्यांनी माझ्याकडून तडीस न्यावे हीच प्रार्थना !