सोमवार, 28 अप्रैल 2014

अध्यात्म सार

अध्यात्मसार
दुखदारिद्र उद्वेगे | लोक सर्वत्र पीडिले |
मुळीची कुळदेव्या हे | संकटी रक्षिते बळे || १ ||
राम उपासना माझी | त्रैलोक्य सुख पावले |
सोडिले देव ईंद्रादी | तोडिली बंधने बळे || २ ||
कीर्तीसी तुळणा नाही | प्रतापे आगळा बहु |
न्याय नेमस्त हे लीळा | ण भूतो ण भविष्यती || ३ ||
उन्मत्त रावणे येणे | त्रैलोक्य पीडिले बळे |
देव ते घातले बंदी | कैपक्षी राम  पावला || ४ ||
रावणे चोरिली सीता | मावकापट्य साधिले |
धुंडिता धुंडिता सीता |शुद्धी कोठे न संपडे || ५ ||
रामसौमित्र हे बंधू | उदास धाकुटे वये |
श्रीमंत लक्षणे मोठी | दिसती मुख्य देवसे || ६ ||
मूर्ख ते नेणती चिन्ह | जाणत्या वेधू लागला |
दिसती थोर सामर्थ्ये | श्रीहरी भगवान ते || ७ ||
फिरती थोर अरण्ये | कर्कशे गिरीकंदरे |
कपाटे विवरे झाडी | झोतावे दर्कुटे कडे || ८ ||
आरण्य हिंडता तेथे | कुमारी देखिली वनी |
कुमारी बाळलीळा ते | दिसे त्रैलोक्य जननी || ९ ||
रूप ते नेटकी बाळा | लावण्य बाणले असे |
दैदिप्य खेचरी लीळा | पार्वती लक्षुमी जशी || १० ||
यक्षिणी अप्सरा देव्या | शेषगधर्वकुमरी |
काय की कोण की आहे | काही केल्या कळेचिना || ११ ||
चंचळा चमके नेटे | मोहनी मनमोहनी |
ते सूर्यवंशीचे राजे | विख्यात भुवनत्रयी || १२ ||
नेमस्त न्याय नीतीचे | करिती धर्मस्थापना |
परस्त्री नेणती दृष्टी | ब्रह्मचारी फणीवरू || १३ ||
येकांती त्या वनामध्ये | देखिले त्या कुमारीने |
कुमारी देखिली त्यांनी | बोलती ते परस्परे || १४ ||


कैची तू कोण तू काई | नाम ते कोण ते तुझे |
म्हणे रे मीच तुकाई | जा तुम्हा वरू दिधला || १५ ||
मनाच्या कामना होती | सीता शुधी करा तुम्ही |
सूर्यवौंशी माहाराजे | बोलती ते कुमारीसी || १६ ||
वरू त्वां दिधला आम्हां | सत्य कैसेनि जाणिजे |
येथून दाविसी लंका | तरीच वरू हा खरा || १७ ||


या काव्यात समर्थांनी त्या काळाची परिस्थिती सांगितली आहे .सर्वत्र लोक दु:खाने वं दारिद्र्याने त्रासले होते .पण तुळजाभवानी जी कुळदेवता आहे ती सर्वांचे संकटात रक्षण करते .समर्थ म्हणतात की टे राम उपासना करतात .त्या उपासनेने त्रैलोक्याचे सुख त्यांना मिळाले .कारण या श्रीरामांनीच ईंद्रादी देव ,ज्यांना रावणाने बंदी करून ठेवले होते त्यांना सोडवले .त्या श्रीरामांच्या कीर्तीला तुळणा  होत नाही .त्यांचा पराक्रम ही आगळा वेगळा आहे .त्यांनी केलेला न्याय सुध्दा न भूतो न भविष्यती आहे .लोक रंजनासाठी प्रत्यक्ष अग्निदिव्य केलेल्या शुध्द पत्नीचा त्याग केला .उन्मत्त रावणाने त्रैलोक्याला त्रास दिला ,देव ,ब्राम्हण सर्व सामान्य जनता कोणीच सुटले नाहीत त्याच्या त्रासापासून ! त्यांची त्रासातून सुटका करण्यासाठी श्रीराम धावून आला .रावणाने कपट करून ,साधूचे सोंग घेऊन [माव सोंग ] देवी सीतेचे हरण केले .श्रीराम वं लक्ष्मण तिला शोधत हिंडत होते पण सीतेचा शुधी [शोध ] लागत नव्हता .राम वं सौमित्र [लक्ष्मण] हे लहान वयाचे भाऊ हिंडत होते .वय लहान पण कीर्ती महान असते ना तसे ते देवतां प्रमाणे दिसत होते .मूर्खांना त्यांची सुचिन्ह दिसली नाहीत पण जे जाणते होते ते त्यांचे सामर्थ्य ओळखून होते .ते मोठ्या मोठ्या अरण्यात घोर पर्वंतातील गीरीकंदरात [गुहा ],त्यांनी सीतेला सर्वत्र शोधले डोंगरातील गुहा ,द-या कडे सर्वत्र शोधले .अरण्यात हिंडत असताना एक दिवस त्यांनी एक कुमारी बघितली .ती खरे तर त्रैलोक्य जननी होती .ती तिची बाळ लीलाच होती .तिचे रूप नेटके ,लावण्यवती  होती .ती खेचरीलीळा [आकाशात उडणा-या पक्ष्याच्या लीला ]करत  होती .ती पार्वती लक्ष्मी प्रमाणे भासत होती .ती यक्षिणी ,अप्सरा ,गंधर्व कुमारी ती कोण होती ते दोघा बंधूंना कळत नव्हते .ती चंचळ ,चमकणारी ,मोहिनी ,मनमोहिनी होती ,ते दोघे सूर्य वंशाचे राजे होते .सुर्यवंश त्रिभुवनात प्रख्यात होता .या वंशातील राजे न्याय नीति पाळणारे होते .परस्त्री दृष्टीला पडताच ते तिच्याकडे पहात नसत .त्या वनात एकांतात त्या कुमारीने त्यांच्याकडे पाहिले ,त्या दोघांनी ती कुमारी पाहिली .दोघे तिच्याशी बोलू लागले ,तू कोण आहेस तू इथे काय करतेस ? तुझे नाव काय आहे ? ती कुमारी म्हणते अरे मीच तुकाई .मी तुम्हाला वर देते .तुमच्या मनातील ईच्छा पूर्ण होतील .सीतेचा शोध घ्या .सूर्यवंशाचे राजे तिला म्हणतात तू आम्हाला वर दिलास ,पण तो खरा आहे की नाही ते कसे कळणार ? तू ईथून आम्हाला लंका दाखव .तर तुझा वर खरा असे आम्ही समजू .|| १७ ||



जगदिश जगदात्मा | जाणता जगजीवनू |
जुनाट कुमारी माता | अर्धनारी नटेश्वरू || १ ||
प्रकृती पुरुषे दोघे | अनादी येकरूप ती |
परात्पर परमात्मा | परेश परमेश्वरी || २ ||
मुळीची स्फुर्ती जे सत्ता | अहंता गुणक्षोभिणी |
देवत्रयांसी जे माता | ती नांव गुणक्षोभिणी || ३ ||
सत्वरज तमो गुणी | विष्णू ब्रह्मा महेश्वरु |
तयांचे अंगीची शक्ती | लक्ष्मु  सावित्री उमा || ४ ||
गणेश सीधी बुत्धी त्या | शारदा मुख्य कुमरी |
रागरंगी तानमाने | गीत नृत्य करी सदा || ५ ||
स्वर्गीचे देव ईंद्रादी | येम धर्म बृहस्पती |
नारद तुंबरुदिक | भक्तराज माहांभले || ६ ||
देवरुसी मुनी योगी | साधू सीध भले भले |
येक्ष किन्नर गन्धर्वी | विधाधरश्च चारणे || ७ ||
नाना गुणी लोक चौदा | गुहको अष्टनायका |
रंभा उर्वसी मुख्या | तीलोत्तमाची मेणीका || ८ ||
नाना स्वर्गस्ते कुटुंबे | आधीकारेंची राहिले |
त्रैलोक्य निर्मिले देवी | ब्रह्मा विष्णू महेश्वरी ||९ ||
स्वर्स्त मृत्य ये लोकी | सर्व येउनी राहिले |
हरीचे अंश हे नाना | सीवशक्ती बहुविधा || १० ||
दश आवतार  विष्णुचे | प्रगटे ठाउके जनी |
मार्तंड भैरवो देवो | तुळजा आष्टभैरवो || ११ ||
नौ चंडी काळिका काळी | कामाक्षा बनशंकरी |
चंडिका रेणुका माता | जाखमाता जोगेश्वरी || १२ ||
सीवशक्ती बहुरूपी |आनपूर्णा माहेश्वरी |
सर्वत्र देव तो देव्या | देवदास आनन्य तो || १३ ||
भक्त ते भक्तीने ध्याती |अभक्त वेगळे सदा |
आपलाली क्रीयासिद्धी याद्भावम् तद भविष्यती || १४ ||

 परब्रह्म परमात्मा जो  निर्गुण निराकार आहे ,त्यामध्ये जे प्रथम स्फुरण झाले ,एको हं बहुस्याम ,मी एकटा आहे ,बहु व्हावे ,तेव्हा त्या स्फुरणाला मूळमाया म्हणतात .समर्थ द ८ स ३ मध्ये म्हणतात ,
मूळमाया तोचि मूळपुरुष | तोचि सर्वांचा ईश | अनंतनामी जगदीश | तयासीची बोलिजे || ८-३-२० ||
मूळमाया आणि मूळपुरुष एकच आहेत तोच सर्वांचा नियंता आणि स्वामी ईश्वर आहे .मूळमाया म्हणजेच गणेश आणि शारदा यांचे रूप .गणेश आणि शारदा ,शिव आणि शक्ती ,प्रकृती आणि पुरुष ही सगळी एकच .मुल्मायेत जाणीव व वायू किवा ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती असे सूक्ष्म भेद आहेत यातील जाणीव म्हणजे गणेश आणि वायू म्हणजे शारदा .गणेश शारदेलाच प्रकृती पुरुष ,शिव शक्ती ,अर्धनारी नटेश्वर जगज्जोती अंतरात्मा परमेश्वर अशी नावे आहेत .तोच जगदीश आहे
आत्म्याचे चार प्रकार सांगितले आहेत .देहात राहणारा जीवात्मा ,जगात राहणारा जगदात्मा ,विश्वाच्या अंतर्यामी राहणारा विश्वात्मा ,सर्वात्मा किंवा अंतरात्मा जो अनेक रूपे घेऊन सर्वांना चालवतो .
हा जगदात्मा जाणता आहे म्हणजे त्याच्याजवळ जाणीव आहे ,ज्ञान आहे तो सर्वांना सांभाळणारा असल्याने तो जगजीवनू आहे .तुळजाभवानी जुनी पुराणी कुमारी माता आहे .तीच अर्धनारी नटेश्वर आहे. निर्गुण परब्रह्मात जो संकल्परूप गुणविकार निर्माण होतो त्यालाच षड्गुणैश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर म्हणतात .त्यांनाच प्रकृती पुरुष ही म्हणतात .म्हणजेच मूळमायेचीच ही सर्व नावे आहेत
पंचमहाभूते व त्रिगुण मिळून प्रकृती तयार होते .मूळमायेतील जाणीव म्हणजे पुरुष हे दोन्ही एकरूपच असतात .प्रकृती व पुरुष परात्पर परमात्मा आहेत .मुळीची स्फूर्ती म्हणजे मूळमाया तीच तुळजाभवानी तीच गुण क्षोभिणी आहे तीच तीन गुण निर्माण करते .तीन गुण आहेत सत्व ,रज ,तमोगुण . मग त्या त्रिगुणांचे स्वामी ब्रह्मा ,विष्णू ,महेश निर्माण होतात .त्या  तिघांबरोबर त्यांच्या शक्ती लक्ष्मी ,सावित्री ,उमा असतात.गणेश ,शारदा ताना धरतात व गणेश नेहमी नृत्य करतो .
स्वर्गातले सगळे देव ,यम धर्म ,बृहस्पती ,नारद ,तुंबर [स्वर्गातले गायक ],मुनी ,योगी ,साधू ,सिद्ध सगळे भले यक्ष ,किन्नर ,गंधर्व ,चौदा लोकातले ,निरनिराळ्या गुणांचे ,अति मानवी योनीतले ,अष्टनायका ,रंभा ,उर्वशी ,तिलोत्तमा ,मेनका ,अनेक स्वर्गात राहणारी कुटुंबे अधिकाराने  राहिले . ब्रह्मा विष्णू ,महेश्वरांनी त्रैलोक्य निर्माण केले .
 स्वर्गात राहणारे या मृत्युलोकावर येऊन राहिले ,हे सगळे हरीचे अंश आहेत .ते शिवशक्ती आहेत .विष्णूचे दहा अवतार लोकांमध्ये प्रगत झालेले आहेत .मार्तंड ,भैरव ,तुळजा ,अष्टभैरव ,तुळजा ,तिचे अष्टभैरव हे सगळे प्रगट झाले .नव चंडी ,कालीला काळी आहे ,कामाक्षा ,बनशंकरी ,चंडिका ,रेणुका माता जाखमाता ,जोगेश्वरी ,आहेत ती तुळजामाता शिवशक्ती अनेक रूपात आहे .अन्नपूर्णा ,माहेश्वरी या सगळ्या देव्यांमध्ये देव असतातच .या सगळ्यांना मानणारा देवदास अनन्य असतो .

भक्त नेहमी अनन्यतेने भक्ती करतो .अभक्त म्हणजे भक्त नाहीत ते नेहमी देवापासून वेगळे असतात .जसा भाव तसा देव असतो त्याप्रमाणे भक्त आपापाली कार्यसिद्धी प्राप्त करून घेतात .


बुधवार, 26 मार्च 2014

तुळजाभवानी स्तोत्र

बाळका वाढवी माता | जेथे तेथे परोपरी |
स्वभावे जीवीचे जाणे | अंतरी विवरे सदा || १ ||
बाळका बोलता येना | हित तेही कळेचिना |
हेकांड बावळे वेडे | मातेला प्रिय होतसे ||  २ ||
अन्याई अवगुणी खोडी | कुश्चीळ रडते सदा |
अतस्ते माय लोभाळू | लोभे गुणास वाढवी || ३ ||
नागीवे उघडे लोळे | हागे वोके आव्हास्वहा |
तैसाच नेटके दावी | लेववी नेसवी सदा || ४ ||
मातेचा कळवळा मोठा | लोभासी तुळणा नसे |
आळसेना विसंभेना | कंटाळेना कदापि ही || ५ ||
त्रैलोक्य बाळका पाळी | वाढवी शहाणी करी |
कुळेची पाळिली कीर्ती | कुळदेव्या म्हणोनिया || ६ ||
त्रिलोकी पुरली आहे |त्रैलोक्यजननी पहा |
तेचि हे तुळजामाता | भक्तांसी पाळिते सदा || ७ ||
वोळखी सांडिले बाळे | तिला तो सांडिता नये |
लोभेची पाळणे लागे | नाना देही भरोनिया || ८ ||
मात्रकुळ पित्रकुळ | सर्वांसी पाळिते सदा |
आद्यंत ठाउके आहे | कुळमुळाग्र सर्वही || ९ ||
उपजली वाढली कोठे | हिंडली फिरली किती |
भाग्यांचे करंटे जाले | मूर्ख वित्पन्न सर्वही || १० ||
विश्वाची साक्षिणी माता | विश्वमाता म्हणोनिया |
श्रीमंत करंटे तीने | रक्षिले पाळिले किती || ११ ||
तिचा लो लागला आहे | ज्ञाते हो समजा बरे |
शक्तीने चालतो देहो | शक्ती नस्ता देह पडे || १२ ||
जीणे तो लागले आहे | ज्ञाते हो समजा बरे |
शक्तीने चालतो देहो | शक्ती नस्ता देह पडे ||१३ ||
शक्ती ते सर्व शक्तीते | आदिशक्ती पुरातना |
दासासी पालटे लिला | ध्यानमूर्ती थासावली || १४ ||


सर्वत्र माता आपल्या बालकाला वाढवते .नुसतीच वाढवत नाही तर त्याच्या कल्याणासाठी अपरंपार कष्ट करते .त्याच्या हिताचे काय आहे याचाच विचार माता आपल्या मुलाबद्दल करत असते .
बालकाला बोलता येत नसते .त्याचे त्याला हित कशात आहे हे त्याला कळत नाही .हट्टी ,हेकेखोर असले ,बावळे असले तरी ते मातेला प्रियच असते .
ते बालक जरी अन्यायी ,अवगुणी ,खोडकर असले ,कुश्चीळ म्हणजे रोगट असले तरी तरी आई त्याचे सर्व दोष पोटात घेते .नागवे ,उघडे लोळले ,हागले ,ओकले ,तरी लोकांपुढे नेताना ती त्याला व्यवस्थितच नेते .मातेचा कळवळा वेगळाच असतो .तिच्या बालकाविषयीचा प्रेमाची तुलनाच नसते .तिला आळस नसतो ,ती दुस-या कोणावरही आपल्या बालकासाठी अवलंबून रहात नाही .ती त्या बालकाला कधीही कंटाळत नाही .
तसेच तुळजाभवानी चे आहे .त्रैलोक्य रुपी बालकाचे ती पालन करते .
त्यामुळेच अनेक कुलांची ती कुळदेवता आहे .ही त्रैलोक्य जननी त्रिलोकात भरून आहे ,ती सर्वांचे पालन करते आहे . तशीच ही तुळजामाता सर्वांचे पालन करते .
ज्याप्रमाणे मूल आईला विसरले तरी आई मुलाला विसरत नाही ,त्याप्रमाणे तुळजामाता आपल्या भक्तांना विसरत नाही .ती सर्वांचे प्रेमाने पालन करते .त्या भक्ताचे मातृकुल आणि पितृ कुळ सर्वांना उद्धरते . मातृकुळ पितृकूळ या सर्वांचे रक्षण करते .पितृ ,मातृ कुलातील सर्व लोक कोठे जन्मले ,कुठे वाढले ते तिला माहीत आहे .कुठे हिंडले आहेत ते तिला माहीत आहे .तीच  भाग्यवंतांना करंटे करते ,तर मूर्खांना विद्वानही बनवते .
ती विश्वमाता आहे .विश्वाकडे साक्षी भावाने पाहणारी माता आहे .तिचा लळा लागला आहे .हे ज्ञानी लोकांनो ही गोष्ट नीट समजून घ्या.
जन्म झाला म्हणजे जीवन जगावेच लागते पण ते जीवन जगण्यासाठी शक्ती लागते .ती शक्ती आदिशक्ती तुळजा माता आहे ती पुरातन आहे . ती अनेक प्रकारे तिच्या दासाला पाळते .ध्यानमूर्ती च्या रूपात समर्थ म्हणतात की तूळजा भवानी माझ्या मनात ठसली आहे .



शुक्रवार, 14 मार्च 2014

तुळजाभवानी स्तोत्र

प्रसन्न मुख सुंदरा | तुझेन हे वसुंधरा |
धराधरे फणिवरे |तुलाचि भाविले खरे || १ ||
कळेचिना तुझी कळा | श्रुती चतुर विकळा |
अनंत भाविनी लीळा | अगम्य तूचि निवळा || २ ||
तुझेनि सर्व बोलणे | तुझेनि सर्व चालणे |
तुझेनि योगधारणे | तुझेनि राजकारणे || ३ ||
तुझेच नावरूप हो | तुझे दिसे स्वरूप हो |
विधी भूगोळ चाळके | अनंत लोकपाळके || ४ ||
तुझीच चालते सत्ता  | बुझेल तोचि पुरता |
तुझी करून आस तो | फिरे उदास दास तो || ५
हे तुळजाभवानी,तुझे प्रसन्न सुंदर मुख आहे .तुझ्यामुळेच ही वसुंधरा ,पृथ्वी आहे .तिच्यावरील विविधता ,जीव ,प्राणी ,चार खाणी ,चार वाणी आहेत .तुझ्यामुळेच या पृथ्वीला फणीवराने म्हणजेच शेषाने ह्या पृथ्वीला उचलून धरले आहे .तुझी कळा ,लीला कळतच नाही .
तू अत्यंत चतुर ,ज्ञानी आहेस तू भावसंपन्न आहेस ,तू समजायला कठीण आहेस .तू निर्मळ आहेस .
हे सर्व बोलायला तुझ्यामुळेच आहे .सर्व चालणे तुझ्यामुळेच आहे .योगधारणा करण्यास तुझीच मदत आहे .राजकारणही तुझ्यामुळेच आहे .तूच राजकारण घडवून आणण्यास प्रेरणा देते .
हे दृश्य विश्व दिसते आहे ते तुझेच स्वरूप आहे . तुझेच नाव रूप आहे म्हणजे तूच सर्वत्र नटलेली आहेस विधीभूगोळ चाळके म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीची तू चालक आहेस म्हणजे तू या सृष्टीला चालवते आहेस . अनंत प्रकारच्या लोकांचे तू पालन करतेस .या सृष्टीवर तुझीच सत्ता चालते .तोच बुझेल म्हणजे घाबरेल जो  तुझी ईच्छा मनात धरून मागे फिरेल असा तुझा दास उदास झाला आहे .







शुक्रवार, 28 फ़रवरी 2014

तुळजाभवानी स्तोत्र



अघटी ते उदंड केले | विवंचिता ते समजोन गेले |
आता दया का नुपजे मनासी | तुळजे दयाळ दयाळ कैसी ||१ ||
दयाळ होसी करिसी कुढावा | समजोन गेला सामर्थ्ये यावा |
थोडे जीर्ण हे वेर्थ गेले | जगदेश्वरी त्वां सनाथ केले || २ ||
अन्याय माझे बहुसाल जाले | समजोनिया ते क्षमा चं केले |
अज्ञान ते बाळक काय जाणे | जननी करी ते कांहीच नेणे || ३ ||
संनिध माता परी वोळखेना | वदवितसे ते काही कळेना |
रडोच जाणे समजोची नेणे | मातेविन ते मग दैन्यवाणे || ४ ||
अनाथनाथे जगदैकनाथे | संसारकोडे उगवी समर्थे |
निवेदने मानस उगविले | भूमंडळीत्वा मज धन्य केले || ५ ||
मी काय फेडू उपकार तुझा | तुझिये दयेचा संसार माझा |
तुजवीण माझे कांहीच नाही | येथार्थ आहे समजोन पाही || ६ ||
जगदांतरी तू मदांतरी तू | जगत्रयी तू तू तू चि मी तू |
येहलोक तू तू परत्र तू तू | अगणित तू तू सायोज्यता तू तू || ७ ||
हे तुळजामाते ,तू खरोखरच उदंड केलेस .जो विचार करतो त्याला ते कळते .हे तुळजे भवानी आताच तुझ्या मनात दया का उत्पन्न होत नाही ?
तू दयाळू आहेस ,नेहमी भक्तांचे रक्षण करतेस , तुझ्या सामर्थ्याचा प्रत्यय आला जे जीर्ण ,सुकलेले सामर्थ्य हीन होते ते वाया गेले होते पण तू हे जगदेश्वरी आम्हाला सनाथ केलेस .आमच्या वर तू कृपा केलीस .
मी खूप अन्याय केले ,पण तू मला समजून घेतलेस आई काय आपल्या मुलांसाठी करते ते कदाचित अज्ञान बालकांना समजत नाहीत ,तसे तुळजाभवानीचे ही आहे .तुळजामाता जे काही करते ते आपल्याला कळत नाही .माता आपल्याला जवळ असलेली आपल्याला कळत नाही .तिला आपल्याला ओळखता येत नाही .आपल्याला फक्त रडू येते ,समजून घेता येत नाही .त्यामुळे आपण मातेशिवाय आपण दैन्यवाणे होतो ,अनाथ होतो .हे तुळजामाते ,तू अनाथांची नाथ आहेस ,या संपूर्ण जगाची नाथ आहेस ,या संसाराचे कोडे तू समर्थपणे सोडवायला मदत करतेस .तुला निवेद्न करून म्हणजे आत्मनिवेदन करून म्हणजे तुला पूर्ण समर्पित करून मी या भूलोकात मी धन्य झालो .मी तुझा उपकार कसा फेडू ? तुझ्या दयेने माझा संसार [समाजाचा ] झाला .तुझ्याशिवाय माझे कांहीच होणार नाही .ही गोष्ट खरीच आहे .हे तू समजून घे .तू या जगाच्या अंतरी आहेस ,माझ्यामध्ये ही तूच आहेस .तू या जगातच आहे .या ईहलोकी तू आहेस ,परत्री आहेस .तू अगणित आहेस ,तू सायोज्यता मुक्ती तू आहेस .




मंगलवार, 4 फ़रवरी 2014

तुळजा भवानी स्तोत्र







देखिली तुळजामाता | निवालो अंतरी सुखे |
तुटली सर्वही चिंता | थोर आधार वाटला || १ ||
संसार पाहता मागे | पाळिले सर्वही कुळा |
प्रस्तुत प्रत्ययो आला | रक्षिते बहुतापरी || २ ||
पुर्विती कामना सर्वे | इच्छा पूर्ण मनोगते |
धन्य हा देव लोभाळू | सांभाळ करितो सदा || ३ ||
आघात संकटे वारी | निवारी दुष्ट दुर्जना |
संकटी भर्वसा मोठा | तत्काळ काम होतसे || ४ ||
लालची चुकती वेडे | कृपाळू जननी खरी |
लक्ष की कोटी अन्याये | बहुत क्षमिले खरे || ५ ||
वन्ही हो सर्प हो विंचू | बाळकू घेतसे बरे |
सर्वही चुकावी माता | पोर लाबाड नेणते || ६ ||
लोभाळू बायका माया | त्यामध्ये  मुख्य जन्ननी |
बाळका वाढवी माता | मातेला मुख्य जन्ननी || ७ ||
सर्वही बाळके जीची | त्रैलोक्य जननी पहा |
साक्षणी सर्व लोभाळू | मर्यादा कोण रे करी || ८ ||
अनंतरूपीणी माया | काया रक्षी परोपरी |
विचित्र महिमा आहे | कळला न वाचे कदा || ९ ||
सर्वांचे मूळ हे माया | मूळमाया म्हणोनिया |
सृष्टीची आदिशक्ती हे | आदिशक्ती म्हणोनिया || १० ||
राम उपासना आहे | हे रामवरदायिनी |
सख्य चालते सर्वै | प्रवृत्तीनिवृत्तीकडे || ११ ||


ह्या तुळजामातेला पाहून मनाला अत्यंत सुख झाले .सगळी चिंता तुटली .खूप मोठा आधार मिळाला  असे वाटले .वाडवडीलांचे पाहीले तर असे दिसून आले आमच्या सर्व कुलाला ह्या तुळजामातेने तारून नेले आहे .आमचे रक्षण केले आहे .असा प्रत्यय आला आहे .सगळ्या इच्छा देवीने पूर्ण केल्या आहेत .रामवरदायिनी स्तोत्रात आपण पाहिले आहे की समर्थांनी पाहिलेले संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न देवीने पूर्ण केले .ही देवी लोभाळू ,भक्तांवर लोभ करणारी आहे .त्यामुळेच ती सर्वांचा सांभाळ करते .तिच्या कृपेनेच सर्व आघातांपासून ,संकटापासून रक्षण करते ,दुष्ट दुर्जनांचे निर्दालन करते .तिच्यावर भरवसा  ठेवला तर भक्तांचे काम तात्काळ होते .लालची ,हावरट लोक चुकतात पण ही तुळजा देवी इतकी कृपाळू आहे की  लक्ष लक्ष ,कोटी  अपराध ती क्षमा करते .अग्नी ,साप ,विंचू यासारखी संकटे म्हणजे संसारातील सर्व संकटे आली तरी तिच्या कृपेने ती नाहीशी होतात .आपल्याला त्यांचा त्रास जाणवत नाही .लहान बाळाला ज्याप्रमाणे नेणते पणे म्हणजे अज्ञाना मुळे ,न समजल्यामुळे संकटे आली तर त्याची माता त्याला उचलून घेते आणि रक्षण करते ,तशी तुळजा भवानी भक्तांचा सर्व संकटातून बाहेर काढते .
बायका सर्व साधारण पणे लोभाळू असतात ,त्याप्रमाणे ही जगजननी असते .ती या त्रेलोक्याची आई आहे .सर्व सजीव प्राणी ,तिचीच लेकरे असतात .ती अनंत रूपात येऊन रक्षण करते .तिचा महिमा अगाध आहे .तो कोणालाही अजून समजला नाही.
ती सर्वांचे मूळ आहे म्हणून तिला मूळमाया म्हणतात .कारण या सृष्टीची ती आदिशक्ती आहे .हे दृश्य विश्व आकारात येण्यास तीच कारण आहे .
हे रामवरदायिनी , माझी राम उपासना चालते .प्रवृत्ती ,निवृत्ति कडे सर्वत्र उपासना चालते .









सोमवार, 27 जनवरी 2014

तुळजाभवानी स्तोत्र

प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुळदेवता |
नेणता ऐकले होते जाणतां स्मरले मनी || १ ||
श्रेष्ठाची कामना होती पुरविली मनकामना |
नवस जो नवसिला होता तो त्यापासोन चुकला || २ ||
पुत्र जो  घेतला त्यांचा जोगी करून सोडीला |
ख्याती ते ऐकिली मोठी न्यायनीती चुकेचना || ३ ||
वैराग्य घेतले पूर्ण सर्व संसार सोडीला |
तुझिया दर्शना आळो कृपादृष्टी विलोकीजे || ४ ||
तुझ्या कृपे वाचलो हे महंत म्हणती तया |
तुझेची सर्वही देणे सर्वही तुजपासुनी || ५ ||
संसारी मोकळे केले आनंदी ठाव दिधला |
सांडिली सर्वही चिंता माता तू सत्य जाहले || ६ ||
पूर्वील काय मी सांगू इच्छा पूर्ण परोपरी |
मागील आठवेना की आश्चर्य वाटते मनी || ७ ||
सदानंदी उदय जाला सुख संतोष पावलो |
पर आधीनता गेली सत्ता उदंड चालली || ८ ||
उदंड ऐकिले होते रामासी वरू दिधला |
दास मी रघुनाथाचा मज ही वरदायिनी || ९ ||
श्रेष्ठांचा नवस जो होता फेडिला तोचि मी म्हणे |
पुष्प देऊनी उतराई ऐसे हे कल्पिले मनी || १० ||
तुळजापूर टाकोनी चालिली पश्चिमेकडे |
पाराघाटी जगन्माता सध्या येउनी राहिली || ११ ||
ऐसे हे ऐकिले होते एथेची पातले |
पुष्पाची कल्पना होती पुष्प तेथेची वाहिले || १२ ||
ऐशी दयाळू माता तू त्वां हे पुष्प घेतले  |
संतुष्ट भक्तीभावाने त्रैलोक्यजननी पहा || १३ ||
थोड्याने श्लाघ्यता मोठी थोर संतोष पावलो |
तुझेची तुजला दिल्हे आणिले सांग कोठुनी || १४  ||
रक्षिता देव देवांचा त्यांचा ईच्छला |
संकटे वारिली नाना रक्षिला बहुतापरी || १५ ||
जीवीचे जाणती माता तू माता मज रोकडी |
लोकांची चुकती माता अचूक जननी मला || १६ ||
एकाची मागणे आता द्यावे ते मज कारणे |
तुझाची वाढवी राजा सीघ्र आम्हांसी देखता || १७ ||
दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकिले |
परंतू रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी || १८ ||
देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहीसी किती |
भक्तांसी वाढती वेगी ईच्छा पूर्णचि ते करी || १९ ||
रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे |
क्षमावे तुळजे माते ईच्छा पूर्ण परोपरी || २० ||


या प्रपंचात आमची कुळदेवता तुळजाभवानी आहे असे मी लहान असताना ऐकले होते .जाणता झाल्यावर आता त्याचे स्मरण झाले .मोठ्या माणसांची म्हणजे आईची ईच्छा होती की पुत्र व्हावा म्हणून मातापूरच्या देवीला नवस केला होता की सुवर्ण पुष्प वाहीन .तो  त्यांच्या हातून फिटला नाही .म्हणून देवीने त्याचे स्मरण अंगावर नायटा उठवून दिले .पण मातापूर पर्यंत कोण जाणार ? तेव्हा वेणू बाईंनी प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या देवीजवळ जाऊन नवस फेडावा असे सुचवले .समर्थांनी एक तोळा सोन्याचे सुवर्ण पुष्प तयार करून घेतले .ते पुष्प कुठे वाहावे असा प्रश्न समर्थांना पडला कारण देवी दागिन्यांनी मढलेली होती .तेव्हा मस्तकावरील बिंदी बाजूला सारून तेथे पुष्प वाहावे असे देवीने सुचवले .समर्थांना देवीने वर मागण्यास सांगितले .तेव्हा समर्थांनी उत्तर दिले मी एक जोगी आहे .मला काही नको .जे द्यायचे आहे ते शिवबाला दे .मी संपूर्ण वैराग्य धारण केले आहे .तुझ्या दर्शनाला आलो आहे. माझ्यावर कृपादृष्टी ठेव .तुझ्यामुळेच मी आज जो आहे तो आणि तसा आहे .तू मला संसारातून मोकळे केलेस .मला आनंदाचा ठाव ठिकाणा मिळाला . सगळ्या चिंता नाहीशा झाल्या ही गोष्ट खरोखरच झाली आहे .
आनंदाचा उदय झाला .,सुख संतोष मिळाला .पारतंत्र्य गेले उदंड सत्ता मिळाली .
मी ऐकले होते की तू श्रीरामांना वर दिलास. मी रघुनाथाचा दास आहे .तू मलाही वरदायिनी झालीस .मोठ्यांनी केलेला नवस आज फेडला .पुष्प देऊन उतराई व्हावे अशी मनीची आस होती .
तुळजापूरवर अफझल खानाने हल्ला करून मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून पश्चिमेकडे माता पारघाटला जगन्माता येऊन राहिली आहे असे ऐकले होते कारण मूर्ती वाचवण्याचा लोकांचा हेतू सफल झाला होता .
अशी तू दयाळू माता आहेस .तू हे पुष्प घेतलेस .तुझेच तुला मी दिले .मी कोठून आणणार ? अशा ह्या दयाळू त्रैलोक्यजननी कडे पहा .देवांचा देव तो सर्व देवांचा रक्षणकर्ता आहे .त्या प्रभू श्रीरामांचा उत्सव करण्याची ईच्छा केली .अनेक संकटे आली पण त्यांचे निवारण केले ,अनेक प्रकारे रक्षण केलेस .हे माता ,आपण माझ्या जीवीचे जाणता .मला सहज प्राप्त झालीस .माझे आता एकच मागणे आहे ,तू शिवबा राजांना मोठा कर .तू मागे दुष्टांचा संहार केलास असे ऐकले होते आता तू तुझे सामर्थ्य प्रत्यक्ष दाखव .हे माते आता अंत पाहू नको .भक्तांची इच्छा लवकर पूर्ण कर रामदास म्हणतात माझे सर्व बोलणे मनापासून आहे .म्हणून हे तुळजामाते ,माझी इच्छा पूर्ण कर .