रविवार, 7 जुलाई 2013

आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे



आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे
आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे |
सर्व काही हे तुझी करणी रे |
कळो आली तत्व विवरणी रे |
त्रिगुणी हे अवतार मांडणी र्रे |
शक्तिवीण कोणाची काया चाले रे |
शक्तिवीण शरीर कैसे हाले रे |
शक्तिवीण वाचन कोण बोले रे |
शक्तिवीण सकळ थोर जाले रे || १ ||
परा पश्यंती मध्यमा वैखरी रे |
जयाचेनी उठती वाचा चारी रे |
शक्तिवीण बापुडा देहधारी रे |
शक्तिवीण तो कांहीच न करी रे || २ ||
मुळारंभी तयेचा उदो जाला रे |
संत साधू विचारी प्रवर्तली रे |
रात्रंदिवस मायेचा ळो लागला रे |
सदानंदी आनंद मोठा जाला रे || ३  ||
सर्व शक्ती आहे विस्तारली रे |
देव दैत्य उदंड ख्याती जाली रे |
संत साधू विचारी प्रवर्तली रे |
मूलाकडे पाहतां गुप्त जाली रे || ४||
दास म्हणे हे तिचे चि करणे रे |
काही येक चालेना तिजवीण रे |
प्रचीतीने पाहावे निरुपण रे |
लोक व्यर्थ बुडताती मीपणे रे ||५||
हे आदिशक्ती ,तू त्या परब्रह्मा तून उत्पन्न झालेल्या मूळ संकल्पाचे शक्तीमय रूप आहेस ,तूच या सृष्टीची निर्माती ,पालनकर्ती ,संहारककर्ती आहेस .तूच नारायणी ,परमेश्वरी आहेस .तुझ्यातूनच त्रिगुण [सत्व ,रज ,तम ]निर्माण झाले .त्या त्रिगुणांचे स्वामी विष्णू ,ब्रह्मा ,आणि महेश निर्माण केलेस . रजो गुणाचे स्वामी ब्रह्मदेव ,त्यांच्याकडून तू सृष्टी रचना घडवून घेतलीस . भगवान विष्णू जे सत्व गुणांचे स्वामी आहेत ते या सृष्टीचे पालन करतात .महेश म्हणजे शिव प्रलय काळी या सृष्टीचा संहार करतात . तूच तत्वांची स्वामिनी आहेस तुझ्या कृपेनेच तत्व विवरण करता येते साधक तत्वांचा निरास करून शेवटी परम वस्तूची प्राप्ती करवून घेतात .
तू शक्तिरूप आहेस तुझ्यामुळेच ही काया ,हे शरीर चालते ,अनेक क्रिया करते ,तूच या देहाला बोलण्याची शक्ती देतेस ,शक्ती असेल ,म्हणजेच तू असशील तर या देहाचे सार्थक होते .ध्येय गाठता येते .
तूच परा ,पश्यंती ,मध्यमा आणि वैखरी या चार वाचांच्या रूपात या शरीरात वास करतेस .पण तू नसलीस तर हा देह बापुडा ,हीन दीन होतो .तो काहीही करू शकत नाही .त्याला दैन्यवाणे ,पराधीन जिणे जगावे लागते .
परब्र्ह्मात उत्पन्न झालेला मूळ संकल्प म्हणजे मूळमाया .त्या मूळमायेची दोन अंगे ज्ञानरूप व शक्तिरूप .तू शक्तिरूप अंग .तुझ्यातूनच सत्व ,रज तम हे त्रिगुण निर्माण झाले तामोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते व त्रिगुण या अष्टधा प्रकृतीतून  सृष्टी ची निर्मिती झाली .रात्रंदिवस तुझा ,या शक्तीचा ,मायेचा लळा लागला .तुझे स्वरूप कळल्यामुळे मोठा आनंद झाला .
सर्वत्र तूच विस्तारिली आहेस .तूच सर्व करते आहेस .देव ,दैत्य ,सर्व तुझेच गुणगान गातात .तुलाच मिळवण्याचा प्रयत्न करतात .संत साधूंना तू विचाराने भेटतेस ,पण ते जेव्हा ते मूळ स्वरूपा कडे लीन होतात तेव्हा तू गुप्त झालेली असतेस तू त्या परब्रह्मात विलीन झालेली असतेस .
समर्थ म्हणतात हे सर्व तिचेच करणे आहे .तिच्याशिवाय कोणाचे ही काहीही चालत नाही .तीच सर्व घडवते ,तीच मोडते ,तीच संहार करते .तीच आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी आपल्या कडून घडवते .पण माणसाला मी कर्ता असा अभिमान असतो ,अहंकार असतो .त्यामुळे माणूस वाया जातो   




शुक्रवार, 5 जुलाई 2013

तुळजाभवानी स्तोत्र



अनंत युगाची जननी |
तुळजा रामवरदायिनी ||
तिचे स्वरूप उमजोनी |
राहे तो ज्ञाता || धृ ||
शक्तिवीण कोण आहे |
हे तो विचारोनी पाहे |
शक्ती विरहित न राहे |
येश कीर्ती प्रताप ||१ ||
शिवशक्तीचा विचारू |
अर्धनारी नटेश्वरू |
दास म्हणे हा विचारू |
तत्वज्ञानी जाणती || २ ||
तुळजा देवी ही अनंत युगांची जननी आहे .अनंत युगे तिने निर्माण केली आहेत .निर्गुण निराकार परब्रह्माला एकदा मी एकटा आहे ,अनेक व्हावे अशी ईच्छा झाली ,हा संकल्प निर्माण झाला . तो संकल्प म्हणजे मूळमाया असे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात .त्या मूळ मायेची दोन अंगे एक ज्ञानमय ,दुसरे शक्तीमय .म्हणजेच गणेश आणि शारदा .त्या शक्तीमय अंगांची विविध रूपे कोल्हापूर ची अंबाबाई ,सप्तशृंगी ,रेणुकामाता ,तुळजा माता ई .
या तुळजाभवानी ला रामवरदायिनी का म्हणतात त्याची एक गोष्ट आहे ,श्रीराम सीतामाईला शोधत असताना शोक करत होते ,विलाप करत होते ,तेव्हा शंकर व सती [ दक्ष कन्या ]तेथून जात असताना शंकरांनी श्रीरामांना वंदन केले .तेव्हा सतीला आश्चर्य वाटले .ह्याला शंकर का वंदन करत आहेत असे तिला वाटले .हा कसला देव असे तिला वाटले .तिने श्रीरामांची परीक्षा घ्यायचे ठरवले .ती सीतेचा वेश घेऊन रामांसमोर आली पण श्रीरामांनी तिला ओळखले .व हात जोडून विचारले देवी आपण येथे कशा ? आणि आमचे आराध्य शंकर महाराज कोठे आहेत ?
तेव्हा  सतीचा भ्रमनिरास झाला .तिने रामांना आशीर्वाद दिला .तू रावणाचा वध करशील असा आशीर्वाद दिला .तू  ळ जा तू तळ जा असे सांगितले म्हणजे दक्षिणे कडे जा असे सांगितले . म्हणून तुळजा भवानी .अशी ही रामवरदायिनी  तुळजाभवानी श्री समर्थ रामदासांची आराध्य देवता होती समर्थ म्हणतात :
सर्वांचे मूळ हे माया | मूळमाया म्हणोनिया |
सृष्टीची आदिशक्ती हे | आदिशक्ती म्हणोनिया ||
तुळजाभवानी आदिशक्ती आहे कारण तिने सृष्टी निर्माण केली .


शुक्रवार, 21 जून 2013

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||
स्नान संध्या टीळे माळा | अंतर्निष्ठ उपासना |
नित्यानित्य विवेकाने |धन्य संसार होतसे || १ ||
मर्यादा न्यायनीतीची | अन्याय न घडे कदा |
सन्मार्ग योग देवाचा | धन्य संसार होतसे || २ ||
देवालये सिखरे रम्ये | धर्मशाळा परोपरी |
परत्र साधकां लोकां | धन्य संसार होतसे || ३ ||
आन्नोदक वस्त्रे दाने | धन्य धन्य ब्राह्मणी भजे |
उदास वृत्तीने लोकी | धन्य संसार होतसे || ४ ||
बावी सरोवरे टांकी | मठ वृक्ष परोपरी |
उपकार समस्ती लोका | धन्य संसार होतसे || ५ ||
पराचे जीवीचे जाणे | अस्ती नास्ति विचारणा |
आत्यंत सर्व भूतांसी | धन्य संसार होतसे || ६ ||
होम याग पुरश्चरणे | निरुपणे हरिकथा |
ब्रहम संतर्पणे यात्रा | धन्य संसार होतसे || ७ ||
वेद पारायणे चर्चा | पुराणे माहात्मे शुभे |
नित्य उछाव देवाचा | धन्य संसार होतसे ||८ ||
नवविधा भक्ती देवाची | मुख्य कोण विचारणे |
आध्यात्म शोधिता सर्वे | धन्य संसार होतसे || ९ ||
पंचीकरणे माहांवाक्ये | श्रवणे मनने सदा |
सत्संगे निसंग होता | धन्य संसार होतसे || १० ||
दासाचे बोलणे ऐसे | सर्वज्ञ जाणते तुम्ही |
आह्मी तुम्ही विचारावे | धन्य संसार होतसे || ११ ||
शब्देची लाभती रत्ने | शब्द रत्ने आमोल्यकी |
कोंदणामाजी ते सोने | तैसा  अर्थ प्रचितीचा || १२ ||

स्नान संध्या केली ,टीळे लावले माळा घालून फक्त उपयोगी नाही तर आंतर्निष्ठा पाहिजे आंतर्निष्ठा म्हणजे ज्याच्या मनात कोणाविषयी मत्सर नाही ,सज्जनांना आवडतो ,ईश्वरानुभावाची पूर्ण निष्ठा असते .असा भक्त तो नित्यानित्य विवेकाने वागतो म्हणजे नेहमीच आहेच ते नित्य आणि जे कायम न टिकणारे आहे ते अनित्य हे जो समजतो तो तो नित्या नित्य विवेक करतो .म्हणजे आत्मा नित्य आहे ,देह अनित्य म्हणजे नाशिवंत आहे असे जो जाणतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो न्याय नीतीने वागतो ,न्याय आणि अन्यायाची मर्यादा जो जाणतो ,त्याच्याकडून अन्याय होत नाही ,जो सन्मार्ग धरतो ,देवाचा योग ज्याच्याबरोबर जोडला गेलेला असतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो सुंदर देवालये ,शिखरे ,देवालयाचे कळस बांधतो ,साधकांसाठी रहायला धर्मशाला बांधतो ,त्यांचा 
संसार धन्य होतो .
जो अन्नदान करतो ,वस्त्रे दान देतो ,ब्राम्हणांचे पूजन ,भजन करतो ,आणि मी करतो असा अभिमान न बाळगता उदासीन वृत्तीने राहतो त्याचे जीवन धन्य असते .
बावी म्हणजे विहीरी सरोवरे ,टाक्या ,बांधतो ,मठ बांधतो ,वेगवेगळे वृक्ष लावतो व हवा शुध्द ठेवायला हातभार लावतो ,अशी समाज उपयोगी कामे करून लोकांवर उपकार करतो तो धन्य होतो .
जो दुस-याच्या मनाचे जाणतो ,हवे नको ते विचारतो ,सर्व भूतांसी म्हणजे सर्व सजीव प्राण्यांची काळजी घेतो ,सर्वांवर प्रेम करतो जसे संत करतात .त्यांचा संसार धन्य होतो .जो होम याग करतो , पुरश्चरणे करतो ,हरिकथा करतो ,निरुपणे करतो ,यात्रा करतो ,ब्रहमपद मिळविण्यासाठी प्रयत्न साधना ,सत्संग ,गुरुपदेश घेतो ,गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळतो ,अशाचा संसार धन्य होतो .
जो वेदपठण करतो ,पुराणांचे महात्म्य समजतो व नित्य त्याचे पठण करतो ,शुभ असलेल्या पुराणांचे श्रवण करतो ,देवांचे उत्सव करतो ,त्यांचा संसार धन्य होतो .नवविधा भक्ती पैकी कोणती भक्ती श्रेष्ठ ते विचारतो .अध्यात्म म्हणजे काय ते समजावून घेऊन तसे वागतो .त्यांचा संसार धन्य होतो .
पंचमहाभूतांचे कर्दम म्हणजे एकत्र मिसळणे ,म्हणजे पंचीकरण समाजावून घेतो ,चार वेदांची चार महावाक्यांचे गुरुमुखातून श्रवण ,त्यांचे मनन करतो ,सत्संगात राहून होणा-या श्रवणाने जो नि:संग होतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
हे दासाचे म्हणजे श्रीरामांच्या दासाचे ,समर्थ रामदास स्वामींचे बोलणे आहे आपण सर्व सर्वज्ञ आहात .आपल्या सर्वज्ञपणाचा सर्वांना लाभ देतो त्यांचा संसार धन्य होतो .
शब्द हेच जणू रत्ने ,ही रत्ने अतिशय अमूल्य आहेत .ही शब्द रत्ने जणू कोंदणा मधिल जणू सोनेच .तीच प्रचीती .!


शुक्रवार, 24 मई 2013

फूट योग समास

फूट योग समास
नाना पदार्थ नाना काया | ते ते जगदेश्वराची माया |
मूळ मायेपासोनिया | खाणी परियेत || १||
पंचभूते तिनी गुण | अष्टधा प्रकृती हे खूण |
नाना पदार्थ दृष्यची संपूर्ण | माया जगदीशाची || २||
अवघी माया जगदीशाची | त्यामध्ये कांही एक जीवाची |
ऐसी रोकडी प्रचीतीची | गोष्ट आहे || ३ ||
मायेबाप बंधू बहिणी | कन्यापुत्र आणि नाती |
त्याची माया अंत:करणी | जीवासी आहे || ४ ||
सेतामळे वाडे घरे | संग्रही मनुष्य लहान थोरे |
धनधान्य नानाप्रकारे | माया जीवाची || ५ ||
नाना वस्त्रे अलंकार भूषणे | नाना पदार्थ मेळवीणे |
नाना पदार्थ कोणे | किती म्हणोन सांगावे || ६ ||
ऐसी हे माया जीवाची | अवघी माया जगदीशाची |
हे अनादी परी मिथ्याची | जाणोन घ्यावी || ७ ||
शास्वतपणे अनादी ब्रहम | नासिवंतपणे अनादी भ्रम |
अवघेची अनादी वर्म | कळले पाहिजे || ८ ||
पूर्ण अपूर्ण व्यापक संधी | तैसेची नाना जिनस अनादी |
निश्चळ करुनिया बुद्धी | शोधुनी पाहावे || ९ ||
स्मार्थ भागवत दोनी भेद | यासी म्हणिजे अनादी सिध |
नाना अनादी सीध विषद | करून घ्यावे || १० ||
स्मार्थ म्हणिजे सिवभक्त | भागवत म्हणिजे  विष्णूभक्त |
त्याहीमध्ये युक्तायुक्त | विचारणां आहे || ११ ||
महादेवाचे कैसे रूप | विष्णूचे कैसे स्वरूप |
रूप विवरायाचा साक्षेप | आधीं करावा || १२ ||
मुळीं संकल्प उठीला | हरी संकल्प म्हणिजे तयाला |
तोची हरी समजला | पाहिजे मुळी || १३ ||
परमार्थासी पाहिजे सत्वगुण | तेथे कामा नये तमोगुण |
आदी पशात विवरण | केले पाहिजे || १४ ||
हरी संकल्प षडगुण ईश्वर | याचा बरा पाहावा विचार |
सुक्षमंद दृष्टीने अंतर | कांहीच नाही || १५ ||
सृष्टीमध्ये उदंड भेद | त्या भेदास म्हणो नये अभेद |
या कारणे मुळीचा संवाद | केला पाहिजे || १६ ||
जगदीश्वर ,जगाचा ईश्वर त्याची माया म्हणजे सृष्टीत उत्पन्न झालेले नाना पदार्थ आणि नाना प्रकारच्या जीवयोनी ,त्यांनी धारण केलेले  देह .जगदेश्वराच्या मूळ संकल्पानेच म्हणजे मी एक आहे ,बहु व्हावे या संकल्पाने मूळमाया निर्माण झाली ..त्यातून सत्व ,रज तम हे त्रिगुण निर्माण करणारी गुणमाया ,त्यापासून अष्टधा प्रकृती ,त्यापासून चार खाणी [उद्भिज ,स्वेदज , अंडज ,जारज ] निर्माण झाल्या .त्रिगुणांतील तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली .ही पंचमहाभूते व त्रिगुणांपासून अष्टधा प्रकृती व त्यापासून वेगवेगळे पदार्थ आणि संपूर्ण दृश्य विश्व निर्माण झाले .हे दृश्य विश्व म्हणजेच त्या जगदीश्वराची मायाच .
जगदीश्वराची माया खूप व्यापक आहे .ती सर्वत्र आहे .त्यात जीवाची माया येते .जीव म्हणजे त्या परमात्मा परब्रह्माचा अंश जो  प्रत्येक देहात असतो ,त्या देहाला चालवतो .त्या देहाकडून सर्व कर्मे करवून घेतो .ही रोकडी प्रचीती रोजच्या जीवनातही आपल्याला येतेच .
आई वडील ,भाऊ ,बहिणी ,कन्या ,पुत्र ,नातवंड या सर्वांबद्दल प्रेम जीवाला असते .
शेत मळे ,वाडे ,घरे ,लहान थोर माणसे ,धनधान्य ,हे सगळे साठवणे जीवाच्या मायेनेच घडते . जीवाला या सगळ्यांचे प्रेम असते ,माया असते ,.त्यांच्या प्रेमापोटी अनेक प्रकारची वस्त्रे ,अलंकार ,भूषणे ,यांचा संग्रह माणूस करतो .
अशी ही जीवाची माया आणि जगदीशाची माया जाणावी असे समर्थ सांगतात .ही माया अनादी म्हणजे प्राचीन आहे परंतु मिथ्या आहे कारण हे दृश्य विश्वच माया निर्मित आहे .त्यातल्या वस्तू  मिथ्या आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित असणारे प्रेमही मिथ्या आहे .पण माणूस हे सर्व सत्य आहे असे धरून चालतो .आणि चुकतो .
प्राचीन ब्रहम शाश्वतपणे आहे आणि प्राचीन भ्रम नाशिवंत पणे आहे .ब्रहम प्राचीन आहे म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हे होते .आत्ता ही आहे ,सृष्टी चा अंत झाला तरीही राहील म्हणजेच ते अनादी आहेत .भ्रम सुध्द्दा अनादी आहे भ्रम आहे मी देह आहे याचा .त्यामुळेच देहावर ,स्थावर जंगमावर माणसाचे प्रेम आहे .पूर्ण ब्रहम
,अपूर्ण विश्व तसेच हे विश्व ज्यापासून निर्माण झाले ते सर्व अनादी म्हणजे प्राचीन आहे हे सर्व निश्चळ बुद्धीने समजावून घ्यावे .
शिव भक्तांना स्मार्थ म्हणतात .तर विष्णू भक्तांना भागवत म्हणतात .त्यात कोण योग्य कोण अयोग्य ह्याचा विचार करावा महादेवाचे रुप्प कसे आहे ,आणि विष्णूचे स्वरूप कसे आहे ते ओळखायला हवे .त्या रूपाचे विवरण करण्यासाठी आधी साक्षेप म्हणजे प्रयत्न करायला हवा .पराब्र्ह्मामध्ये जो मूळ संकल्प मी एकटा आहे ,अनेक व्हावे असा मूळ संकल्प उठला त्यालाच हरिसंकल्प म्हणतात .त्यालाच हरी  समजायला हवे असे समर्थ म्हणतात .परमार्थाला सत्वगुण असायला हवा .तमोगुण नको .हरी संकल्प  म्हणजे षड्गुण ईश्वर .यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सहा गुणांनी युक्त असणारा ईश्वर याचा विचार करावा .षड्गुनैश्व्र्र ईश्वर आणि हरिसंकल्प एकच आहेत ..समर्थ सांगतात की या सृष्टीमध्ये अनेक भेद आहेत . भेद उपाधीरूप आहेत ,८४ लक्ष जीव योनी आहेत .माणसात उच्च नीच ,काळे गोरे ,स्त्री पुरुष असे अनेक भेद आहेत .हे भेद आहेत पण त्यांच्यात आत्मा एकच आहे आत्मा त्या परब्रह्म परम तत्वाचा अंश आहे ,फरक आहेत पण एकच आहेत असे म्हणू नये त्यांचे अधिष्ठान जरी एकच असले तरी त्यांच्यात भेद आहे .त्यासाठी मुळापासून विचार करायला हवा .

कर्ममार्ग उपासना | वैष्णवांमध्ये विशेष जाण |
तार्किक विचार आंतकर्ण | बरा जाणावा || १७ ||
भेदास म्हणता अभेद | तेणे उदंड उडे खेद |
भेदाभेद हा विशद | मुळी होतो || १८ ||
सुक्ष्म सांडोनी गलबला केला | व्यर्थची खेद वाढविला |
साधक मनने सेवटासी केला | तोचि धन्य || १९ ||
निर्गुण ब्रहम मुळी तेथे | उडोनी जाती नाना मते |
तत्वझाडा प्रत्ययाते | आणून पहावा || २० ||
आईकोनी च विस्वास धरणे | हे मूर्खपणाची लक्षणे |
समजोनी प्रत्यये पाहाणे | हे उत्तमोत्तम || २१ ||
अबध मेळवोनी वाचिले | अक्षरे जुळीता पुरे जाले |
 अर्थांतर राहत गेले | सकळ काही || २२ ||
आंधी ग्रंथची चुको नये | मग वाचिता चुको नये |
त्या उपरी चुको नये | अर्थांतर प्रत्ययाचे || २३ ||
मुख्य प्रत्यये चुकत गेला | म्हणिजे निशेश बुडाला |
साधक समाधान पावला | कोण्याप्रकारे || २४ ||
जेथे नाही मुख्य प्रत्ययोग | जेथे कैसा असेल जयो |
वीतरेक  आणि अन्वयो |शोधूनी पाहावा || २५ ||
विवेक प्रलये शोधूनी पाहिले | तो तत्वे अवघे गेले |
या उपरी जे निर्गुण  उरले | त्यासी अनादी म्हणावे || २६ ||
अनादी म्हणिजे जे आदी नाही | परब्रह्मासी सीमा नाही |
सीमा वोलांडावी काही | अनादी म्हणावे || २७ ||
आत्मा म्हणिजे तत्वात आला | पंचीकर्ण प्रमई बोलिला |
चौथा देह निमाला | ब्रह्मांडींचा || २८ ||
त्या देहास होतो नाश | परब्रह्म ते अविनाश |
कोण विशेषा अविशेश | पाहोन घावे || २९ ||
येथे निवडिले सारासार | लक्षास पाहावा विचार |
येथून पुढे निरांतर | सहजचि जाले || ३० ||
पिंडीचा आत्मा निघोन जातो | म्हणोनि हा पिंड पडतो |
ब्र्ह्मांडीचा कैसा राहातो | सांगा ना का || ३१ ||
बरे हे त्या जाण त्याचे वर्म | नेणत्याचे खोटे कर्म |
सकळ काही धर्माधर्म | जाणतां जाणे || ३२ ||
|| इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना अनादी निरुपण नाम समास पहिला ||

वैष्णवात कर्ममार्ग आणि उपासना वैष्णवांमध्ये मुख्यत्वे चालते .उपाधी नुसार होणारे भेद अधिष्ठान एक असून ही अभेद होत नाही एक सारखे होत नाही जर एकच मानले तर खेद होतो सूक्ष्म सोडून जर गलबला केला ,गडबड केली तर खेद वाढतो .त्यासाठी साधकाला मनन करावे लागते .तरच त्याला शेवटाला पोहोचता येते .तरच निर्गुण निराकार परब्रह्मा पर्यंत पोहोचता येते .तत्वझाडा करत गेले की त्या परब्रह्माचा प्रत्यय  येतो ..नुसते ऐकून विश्वास करणे हे मूर्खाचे लक्षण आहे .म्हणून समजून घेऊन प्रत्यय घेतला तर ते उत्तमोत्तम आहे .अबध म्हणजे विस्कळीत ,विखुरलेला मिळवून वाचले ,अक्षर जुळवून वाचले तर असे वाटते की खूप झाले .पण तेव्हा अर्थ कळत नाही .
आधी ग्रंथ हाती घ्यावा .ग्रंथ वाचताना चुकू नये . त्याशिवाय अर्थ समजून घेण्यास चुकू नये .पण ब-याच वेळा प्रत्यय घेत नाही .तेव्हा माणूस पूर्ण बुडतो .मग साधकाला समाधान कसे मिळेल .?   
त्यासाठी विवेक प्रलय करायला समर्थ सांगतात .आपल्याला दृश्य विश्व खरे वाटते .पण विवेकाने दृश्य विश्व खरे नाही हे पटते त्याला विवेकक प्रलय म्हणतात .पिंडामधील अहंतेचा मृत्यू प्रलय म्हणजे विवेक प्रलय .तोच समर्थांनी दासबोधात सांगितला आहे .विवेक प्रलयाने ह्या देहातील तत्वांचा निरास करता येतो .मग जे उरते ते अनादी अनंत परब्रह्मच असते .अनादी म्हणजे जे आदी नाही .परब्रह्मास ही सीमा नाही .त्यामुळे तो तत्वात बसत नाही .त्याला पंचीकर्ण समजावून सांगताना सांगता येतो .तो ब्रह्मांडाचा चौथा देह आहे .त्या ब्रह्मांडा च्या देहाचा नाश होतो .पण परब्रह्म अविनाशी आहे .मग ब्रह्मांड आणि परब्रह्म यात कोण विशेश आहे ते पाहून घ्यावे .मग आता सारासार विचार करावा .
पिंडाचा आत्मा निघून जातो .म्हणून पिंड पडतो .मग ब्रह्मांडाचा आत्मा कसा राहतो .हे  सर्व तू समजून घे .जर नेणता अज्ञानी राहशील तर ते चुकीचे होईल . जो जाणता असतो त्याला सर्व काही ,धर्म म्हणजे काय ,अधर्म म्हणजे काय ते कळते .




शनिवार, 11 मई 2013




लिहिता वाचिता येना | व्यासंग करितां नये |
जड संसार टाकेना | चालीला सर्व सांडूनी || १||
स्वदेश राहिला मागे | विदेश लागला पुढे |
आचार राखणे आधी | स्नान संध्या  हरिकथा || २ ||
अचूक शुध लिहावे | वाचावे नेटके |
साकल्य अर्थ सांगाया | येथा तथ्ये प्रचीतीने || ३ ||
बोलावे न्याय नीतीने | मर्यादा राखणे जनीं |
आभ्यास करावा आधी | ताळबंद पाठांतरे || ४ ||
प्रसंगमान जाणावे | बाणावे बहुतांपरी |
भक्तीभाव असों द्यावा | घालावा भार ईश्वरी || ५ ||
प्रत्यई मागणे भिक्षा | मिळाली न मिळे तरी |
नित्य नूतन हिंडावे | धुंडावे भक्त प्रेमळ || ६ ||
कथा ते करावी आधी | बाधी ते दुराशा नको |
उपाधी उतळावेना | जावे ना उपाधी वैभवाकडे || ७ ||
सर्वत्र लोक शोधावे | बोधावे भक्तीच्या गुणे |
राहावे दुर्बळाचेथे | देवालयी कां नदीतीरी || ८ ||
पर्वती उदकापासी | सनीधनी येकीकडे |
फार येकांत सेवावा | आभ्यास नित्य नुतनु || ९ ||
साहावी शीत उष्णादि | पाहावी रम्यसी स्थळे |
करावे आपण कष्ट | बांधावावी ते हळूहळू || १० ||
वोळखी कराव्या दाटा | येके गई थीरो नये |
वादवेवाद तो खोटा | दाटावा मद मछरू || ११ ||
उद्धट बोलणे खोटे | बोलावी ते मृदोतरें |
नेटकी पाहिजे दीक्षा | रक्षावी भक्ती आदरे || १२ ||
वर्णावी भक्ती देवाची | आदभूत बहुतांपरी |
प्रबंद जाड बोलावे | चालावे लोकमानसें || १३ ||

लिहीता वाचता येत नाही  ,व्यासंग ,अभ्यास करता येत नाही ,जड ,नश्वर असा संसार टाकता येत नाही ,त्यांचा लोभ मनात आहे ,सर्व सोडून चालला आहेस तेव्हा तू कसे वागावेस त्यांचा उपदेश मी करतो  आहे  असे समर्थ म्हणतात .स्वदेश सोडून आता दुस-या देशात म्हणजे दुस-या राज्यात चालला आहेस ,तू सर्वात प्रथम तुझा आचार ,तुझी वागणूक नीट ठेवायला हवीस .स्नान संध्या आणि हरिकथा सांगायला हवीस .अचूक शुध्द लिहायला हवेस .नीट नेटके वाचायला हवेस कारण तुला जे वाचणार आहेस त्यांचा प्रचीतीने अर्थ सांगता आला पाहिजे नीती न्यायाने बोलता येण्यासाठी तुझे ज्ञान तू वाढवायला हवेस .लोक तुला मानायला लागली ,की तू वाटेल तसा वागून चालणार नाही .मार्यादेनेच तुला वागायला हवे .योग्य तो अभ्यास करून ,पाठांतर करून बोलायला हवेस .
प्रसंग काय आहे ते लक्षात घेऊन बोलायला हवे ज्यामुळे तू अनेकांच्या मनात तुझे स्थान निर्माण करशील .जेव्हा तुझ्या मनात भक्तीभाव असेल ,ईश्वराचे अधिष्ठान असेल ,मी कर्ता असे न म्हणता राम कर्ता म्हणशील तेव्हाच तुझे लोकांच्या मनातले स्थान पक्के होईल ..मिळाली आणि मिळाली नाही तरी दररोज भिक्षा माग.दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जा .कुणी प्रेमळ भक्त मिळाले तर त्यांचा शोध घे . नित्य नूतन कथा कर .पण दुराशा मात्र ठेवू नकोस म्हणजे कथेतून धनाची प्राप्ती होईल अशी आशा मात्र ठेवू नकोस कारण महंताला अशी उपाधी ठेवणे बाधक होते .म्हणून उपाधी वैभवाकडे जाऊ नकोस .
सगळीकडे होतकरू लोक शोध .त्यांना भक्तीचा बोध कर .तुझ्या आचरणातून भक्तीचे आचरण कसे करायचे याचा बोध दे. दुर्बलाच्या घरी मुक्काम कर त्याची प्रगती कशी साधता येईल याचा विचार करून त्याला मार्गदर्शन कर .नाहीतर एखाद्या देवालयात किंवा नदीतीरी रहा .एकांतात पर्वतावर ,जळाच्या जवळ रहा .एकांतात राहून चाळणा कर .नित्य नूतन अभ्यास करावा .थंडी ,उन सहन करावे .रम्य ठिकाणे पाहून तेथे रहावे ..रम्य ठिकाणी आपण कष्ट करून नवीन जागा बांधाव्या . खूप ओळखी करून घ्याव्या .पण एकां ठिकाणी राहू नये .नित्य नूतन हिंडावे .वादविवाद करू नये .मद ,मत्सर दाबून टाकावा .उद्धटपणे बोलू नको .मृदू ,नम्र पणे बोल ..दीक्षा देताना नेमकी द्यावी .योग्य प्रकारे प्रबोधन करावे .सर्व गोष्टी करताना भक्ती तुझ्या कृतीतून ,विचारातून दिसावी पांडित्य पूर्ण गीत म्हणावे ,ज्यातून भक्ती प्रगट होईल .लोकांच्या मनाप्रमाणे कृती करावी .


भक्तीज्ञान असो द्यावे | शुध वैराग्य नेटके |
धरावी कीर्तीची द्वारे | तारावी  भाविके बहु || १४ ||
तगावे बहुतां गई | उपाधी नसता बरें |
सद्गुण सार ते द्यावे | नेद्यावे आवगुण ते ||१५ ||
भक्तीस लोक लावाचे |  पावावे पर् पार ते |
उपाधी पाहातां नाही | पाहों जाता उदंडहि || १६||
परंतु सर्व देवाचे | आपले काही नसे |
मनात वावरे देव | देव देव चहुकडे || १७ ||
अत्यंत साक्षपि व्हावे | न व्हावे आळसी कदा |
द्यावया देवाचा लाहो | जायांचे हे म्हणोनिया || १८ ||
मरोनी कीर्ती उरवावी | नुरावावी अपकीर्ती ती |
धन्य धन्य म्हणे लोकू | सक्रीया करितां बरी || १९ ||
पुण्यमार्ग प्रतिष्ठावा | लावावी धर्मवासना |
देवाळयें करावी मोठी | वापी कूप सरोवरे || २० ||
वाटिका वृक्ष लावावे | पुष्पे फळे परोपरी |
कपाटे वरवर टाकीं | भुयेरी विवरे गव्या || २१||
वृंदावने दीपमाळा |धर्मशाळा बहुविधा |
पाई-या वोव-या वोटे | धबकायात्रा हरिकथा || २२ ||
सावधु सकळांगई | न्यायनीती चळों नये |
सकळांसी सौख्य राखावे | वर्तावे ते मनोगते || २३ ||
वैभवे सर्व देवांची | वाद्ये छत्रे परोपरी |
किती म्हणोनि सांगावे | सांभाळावे परोपरी || २४ ||
दास्य ते करावे येसे | या मध्ये घडेल तसे |
देव तो कवी सर्वे | भावार्थ पाहिजे बरा || २५ ||
|| इति श्री फूट योग समास ||

भक्ती ज्ञान तुझ्याकडे असले पाहिजे वैराग्य खरे असावे .ते नैराश्यातून , स्मशान वैराग्य नसावे .खरे वैराग्य असावे .अशा शुध्द वैराग्यातून कीर्तीची दारे उघडतात .त्यातूनच भाविक घडवता येतात .उपाधी नसेल तर टिकून राहता येते .सर्व गुणांचे सार असणारे सद्गुण द्यावे सद्गुण व अवगुणांची लोकांना ओळख करून देउन सद्गुण  अंगी बाणल्यामुळे होणारे फायदेही लोकांना समजावून द्यावे .सद्गुणांच्या प्राप्तीतूनच भक्ती कशी  साकार होते ते आपल्यां आचरणाने लोकांना पटवून द्यावे .महंती एक उपाधीच आहे .पण पहायला गेले तर ती उपाधी नाही जर ती निरपेक्षपणे ते काम तू करशील तर .तू हे काम देवाचे आहे असे समजून केलेस तर ती उपाधी नाही .माझे समजून केलेस तर ती उपाधी आहे .
अत्यंत साक्षेपी म्हणजे प्रयत्न करणारे हवे .आळस कधी करू नये .देवाचा लाभ जर लोकांना करून द्यायचा असेल तर प्रयत्न तर करायलाच हवेत .असे प्रयत्न जर केलेस तर मारून सुध्दा तुझी कीर्ती राहील . आपल्या वागण्याने अपकीर्ती होऊ नये असेच वागावे .तर च लोक तुला धन्य धन्य म्हणतील .त्यासाठी पुण्यमार्ग अनुसरावा .धर्मवासना असू द्यावी .देवालायांचे महत्व वाढवावे . विहिरी ,सरोवरे  बांधावी .बागा तयार कराव्या .त्यात वेली ,व्रुक्ष लावावे ,वेगवेगळी फुलझाडे ,फळझाडे लावावी .वृंदावने ,दीपमाळा बांधाव्या .घाटांना पाय-या बांधाव्या .सर्व अंगांनी सावध असावे .चौफेर नजर असावी .न्याय नीती सोडू नये .सगळ्यांना सौख्य होईल असे वागावे ..सर्वानाचे मनोगत असेल त्याप्रमाणे वागावे .सर्व देवांचे वैभव सांभाळावे ,वाढवावे ,अशा प्रकारे दास्य करावे .