सोमवार, 11 अप्रैल 2011

अंतर्भाव

समास ३

प्राप्त जाले ब्रह्मज्ञान | आंगी बाणले पाहिजे पूर्ण |

म्हणोनि हे निरुपण | सावध ऐका ||१||

कांहीच नेणे तो बध्द | समूळ क्रिया अबध्द |

भाव उठिला तो शुध्द | मुमुक्षु जाणावा ||२||

कर्मे तजून बाधक | शुध्द वर्ते तो साधक |

क्रिया पालटे विवेक | पाहे नीच नवा ||३||

तये क्रियेचे लक्षण | आधी स्वधर्म रक्षण |

पुढे अद्वैत श्रवण | केले पाहिजे ||४||

नित्य नेम दृढ चित्ती | तेणे शुध्द चीतोवृत्ती |

होउनिया भगवंती | मार्ग फुटे ||५||

नित्य नेमे भ्रांति फिटे | नित्य नेमे सदेह तुटे |

नित्य नेमे लिगटे | समाधान अंगी ||६||

नित्य नेमे अंतर शुध्द | नित्य नेमे वाढे बोध |

नित्य नेमे बहु खेद | प्रपंची नुठी ||७||

नित्य नेमे सत्व चढे | नित्य नेमे शांती वाढे |

नित्य नेमे मोडे | देहबुद्धी ||८||

नित्य नेमे दृढभाव | नित्य नेमे भेटे देव |

नित्य नेमे पुसे ठाव | अविद्येचा ||९||

नित्य नेम करू कोण | ऐसा शिष्ये केला प्रश्न |

केले पाहिजे श्रवण | प्रत्ययी स्वयें ||१०||

मानसपूजा जप ध्यान | येकाग्र करूनिया मन |

त्रिकाळ घ्यावे दर्शन | मारुती सूर्याचे ||११||

हरिकथा निरुपण | प्रत्यई करावे श्रवण |

निरूपणी उणखूण | केली पाहिजे ||१२ ||

संकटी श्रवण न घडे | बळात्कारे अंतर पडे |

तरी अंतरस्थिती मोडे | ऐसे न कीजे ||१३||

अंतरी पांच नामें | म्हणत जावी नित्य नेमे |

ऐसे वर्तता भ्रमे | बाधिजेना ||१४||

ऐसी साधकाची स्थिती | साधके राहावे ऐसिया रिती |

साधनेवीण ज्ञानप्राप्ती |होणार नाही ||१५||

तव शिष्य म्हणे जी ताता | जन्म गेला साधन करता |

कोण वेळ आता | पावो समाधान ||१६||

कैसे येईल सिद्धपण | केव्हा तुटेल साधन |

मुक्त दशा सुलक्षण | मज प्राप्त केवी ||१७||

आता याचे प्रत्योत्यर | श्रोती व्हावे सादर |

ऐका पुढे विस्तार | सांगिजेल ||१८||

इति श्री अंतर्भावं | जन्ममृत्यू समूळ वाव |

रामदासी गुरुराव |प्रसन्न जाला ||१९||

तुला ब्रह्मज्ञान तर झाले आहे पण ते अंगी मुरायला हवे .म्हणून हे शिष्या मी काय सांगतो ते नीट ऐक .ज्याला कांहीच कळत नाही तो बध्द असतो .त्यामुळे त्याच्या सर्वच क्रिया बध्दासारखे म्हणजे नेणतेपणाच्या असतात .पण जेव्हा बध्दाच्या ठिकाणी शुध्द भाव निर्माण होतो ,नको हा संसार ,नको ही दु:ख ,नको ही सुख असे वाटते ,आता फक्त परमेश्वर पाहिजे असे वाटू लागते तेव्हा बध्दाचा तो मुमुक्षु बनतो .

मुमुक्षु च्या विचारात खूप फरक पडतो .त्याला साधक काय ,बाधक काय हे कळू लागते तेव्हा त्याच्या अध्यात्मिक प्रगतीच्या आड येणारी सर्व कर्मे त्यागतो .शुध्द कर्मे करण्याचा निश्चय करतो .त्यामुळे क्रिया पालटे तत्काळ अशी अवस्था येते .

त्याच्या क्रिया कशा असतात ?

स्वधर्म रक्षण हे त्याचे पहिले कर्तव्य समजतो .स्वधर्माच्या रक्षण करण्या साठी तो समाजात स्वधर्म जागृती करतो ,धर्म सोडणा-यांना परावृत्त करतो .

दुसरी गोष्ट तो करतो ती ही की अद्वैताचे श्रवण तो करू लागतो .अद्वैताचे श्रवण करताना नित्य नेम करण्याचे दृढ निश्चय तो करतो .नित्य नेमाने चित्त वृत्ती शुध्द होतात .

नित्य नेमाने भ्रम नाहीसा होतो ,सदेह ,शंका संपतात. समाधानाची प्राप्ती होते .नित्य नेमाने अंत:करण शुध्द होते ,बोध वाढतो ,प्रपंचात अनुभवायला येणारे दु:ख कमी होते .त्याची तीव्रता कमी होते .नित्य नेमाने सत्व गुण वाढतो ,नित्य नेमाने शांती वाढते ,देहबुद्धी नाहीशी व्हायला लागते .नित्य नेमाने परमेश्वरा विषयी दृढ भाव निर्माण होतो .देवाची भेटी होते ..अविद्या ,अज्ञान नाहीसे होते .

नित्य नेमाने काय होते ते सांगितल्यावर शिष्य विचारतो ,नित्य नेम कोणता करू ?

समर्थ उत्तर देतात ,नित्य नेमाने श्रवण कर .मन एकाग्र करून मानसपूजा ,जप ध्यान कर .सूर्याचे त्रिकाळ दर्शन घे .दररोज हरिकथा श्रवण कर .निरुपण समजावून घे .सकट काळी श्रवण करता आले नाही तरी अंतरस्थिती मोडणार नाही याची काळजी घे .अनुसंधान सुटणार नाही याची काळजी घे .राम ,कृष्ण ,हरी ,गोविंद केशव नामे सतत घेत जावी .असे केल्याने भ्रम होणार नाही

अशी साधकाची स्थिती असावी .साधकाने असे रहावे .साधन केल्याशिवाय काही उपयोग नाही .

शिष्य म्हणतो ,महाराज ,साधन करता करता जन्म गेला .आता मला समाधान केव्हा मिळणार ? माझ्या अंगी सिद्धपण केव्हा येईल ?माझे साधन केव्हा सुटेल ? मला मुक्त दशा केव्हा प्राप्त होईल ?

याचे उत्तर श्रोत्यांनी आता ऐकावे .विस्ताराने सागतो .ह्या प्रश्नाने रामदासी गुरु प्रसन्न झाले आहेत .ते आता प्रश्नाचे उत्तर देत आहेत .

शुक्रवार, 18 मार्च 2011

अंतर्भाव

अंतर्भाव

समास २

ऐक शिष्या सावधान | सिद्ध असता निजबोध |

माईक हा देहसमंध | तुज बाधी ||१||

बद्धके कर्मे केली | ते पाहिजे भोगिली |

देह बुद्धी दृढ झाली |म्हणोनिया ||२||

मागे जे जे संचित केले |ते ते पाहिजे भोगिले |

शूद्रे सेत जरी टाकिले | तरी बाकी सुटेना ||३||

हा तो देहबुद्धीचा भाव | स्वस्वरूपी समूळ वाव |

परंतु प्राप्तीचा उपाव | सुचला पाहिजे ||४ ||

स्वरूप लंकापुरी | हेम इटा दुरीच्या दुरी |

देहबुद्धीचा सागरी | तरले पाहिजे ||५ ||

विषयमोळ्या बाहो सांडी | मग त्यास म्हणे कोण काबाडी |

तैसी पदार्थाची गोडी |सांडीत आत्मा || ६ ||

देहबुद्धीचे लक्षण | दिसेंदिस होता क्षीण |

तदुपरी बाणे खूण | आत्मयाची ||७||

सर्व आत्मा ऐसे बोलता |अंगी बाणे सर्वथा |

साधनेवीण ज्ञानवार्ता |बोलोची नये ||८||

दस-याचे सोने लुटले | तेणे काय हातासी आले |

कि राय विनोदे आणिले |सुखासन ||९||

तैसे शब्दी ब्रह्मज्ञान |बोलतां नव्हे समाधान |

म्हणोनिया आधी साधन |केले पाहिजे ||१० ||

शब्दी जेविता तृप्ती जाली |हे तो वार्ता नाही ऐकिली |

पाक निष्पत्ती पाहिजे केली |साक्षपे स्वयें ||११||

कांहीतरी येक कारण | कैसे घडे प्रेत्नेवीण |

मा हे ब्रह्मज्ञान परम कठीण | साधनेवीण केवी ||१२ ||

शिष्य म्हणे सद्गुरू |साधन तरी काय करू |

जेणे पाविजे पारू |माहा दु:खांचा ||१३||

आता पुढिलीये समासी | स्वामी सागती साधनासी |

सावध श्रोती कथेसी |अवधान द्यावे ||१४||

हे शिष्या ,सावधान होउन ऐक .अरे ,तू सिद्ध आहेस .तुला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे .तुला निजबोध झाला आहे .मग तुझी अशी अवस्था कशामुळे झाली आहे ? अरे ,मायिक असलेला असा तुझा देह्संग तुला बाधतो आहे .देह तर नश्वर आहेच .पण तोच तू खरा मानून चालला आहेस .तो तुला बाधतो आहे .तुझी देहबुद्धी दृढ झाली आहे त्यामुळे तू केलेल्या कर्माची फळे तुला भोगावी लागणार आहेत .कारण ती कर्मे मी केली अशा अहंकाराने केली आहेस .कर्ता मी आहे ,असा अहंकार तुझ्याजवळ आहे म्हणून तुला त्या कर्माची फळे तुला भोगावी लागणार आहेत

मागे तू केलेली कर्मे संचित रूपात फळे द्यायला तयार आहेत .

ही तुझी देहबुद्धी आहे .स्वस्वरूप प्राप्त करण्याच्या आड ही देहबुद्धी येते आहे .असे असले तरी स्वस्वरूपा पर्यंत पोहोचण्या साठी काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे .सोन्याच्या विटा असलेली लंका दूर असते तसे स्वस्वरूप ही खूप पल्याड आहे ..ते स्वस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी देहबुद्धीचा हा सागर पार करून जावाच लागेल .

विषयांच्या मोळ्या जो हातातून सांडून टाकतो , मग त्याला काबाडी ,कष्ट करणारा असे कोण म्हणेल ? तसा आत्मा पदार्थांची गोडी आत्मा काढून टाकतो .

जे जे देहबुद्धीचे लक्षण आहे ते ते दिवसेंदिवस क्षीण होत जाते .आणि आत्म्याची खूण मनाला पटत जाते .मनाला समाधान होते .सगळ्यामध्ये एकच आत्मा असे आपण नुसते बोलतो .पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आलेला नसतो .त्यामुळे साधना करणे खूप जरूरी असते .साधने शिवाय काहीही बोलणे योग्य नाही .

जसे दसयाचे सोने आपण लुटतो पण ते खरे सोने नसल्यामुळे आपल्याला खरे समाधान मिळत नाही .तसे शब्दाने नुसते आत्मज्ञान बोलले तरी त्याचा काही उपयोग नाही .त्याने समाधानाची प्राप्ती होत नाही .समाधानासाठी साधना करायलाच हवी .

नुसत्या शब्दाने पोट भरले असे होत नाही .त्यासाठी स्वत: स्वयंपाक करावाच लागतो .कोणतीही गोष्ट प्रयत्नांशिवाय प्राप्त होत नाही .ब्रह्मज्ञान तर सर्वात कठीण आहे . ब्रह्मज्ञान साधनेशिवाय कसे प्राप्त होणार ?

शिष्य गुरुंना विचारतो ,स्वामी ,मी साधना तरी कोणती करू ? ज्यामुळे हा भवसागर पार करून जाईन .

पुढच्या समासात गुरु साधना कोणती करायची ते सांगतात .



अंतर्भाव

समास १

जय जय सद्गुरू समर्था | जय जया पूर्ण मनोरथा |

चरणी ठेउनिया माथा | प्रार्थितसे ||१ ||

मी येक संसारी गुंतला | स्वामीपदी वियोग जाला |

तेणे गुणे आळ आला |मज मीपणाचा ||२||

इच्छाबंधने गुंतलो | तेणे गुणे अंतरलो |

आता तेथूनि सोडविलो | पाहिजे दातारे ||३ ||

प्रपंच संसार उद्वेगे |क्षणक्षण मानस भंगे |

कुळाभिमान म्हणे उगे | सामाधानासी ||४ ||

तेणे समाधान चळे | विवेक उडोनिया पळे |

बळेची वृत्ती ढांसाळे | संगदोषे ||५ ||

स्वामी प्रपंचाचे नि गुणे | परमार्थासी आले उणे |

ईश्वर आज्ञेप्रमाणे | क्रिया न घडे || ६ ||

याचिया दु:खे झोंका आदळे चित्ती | समाधान राखणे किती |

विक्षेप होता चितोवृत्ती | दंडळू लागे ||७||

प्रपंचे केले कासावीस | होउ नेदी उमस |

तेणे गुणे उपजे त्रास | सर्वत्राचा ||८ ||

आता असो हा संसार | जाले दु:खाचे डोंगर |

स्वामी अंतसार्क्ष विचार | सर्व हि जाणती ||९ ||

तरी आता काय जी करावे | कोण्या समाधाने असावे |

हे मज दातारे सांगावे | कृपा करावी ||१०||

ऐसी शिष्याची करुणा | ऐकोनी बोले गुरुराणा |

केली पाहिजे विचारणा | पुढिलीये समासी ||११||

शिष्य सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आहे की हे सद्गुरू नाथा आपण पूर्ण मनोरथ आहात ..मी आपल्या चरणी माथा ठेवून प्रार्थना करतो आहे की मी एक संसारी गुंतलेला बध्द आहे .त्यामुळे मला स्वामी चरणांचा वियोग सहन करावा लागतो आहे ..स्वामी चरणांपासून दूर झाल्या मुळे माझ्यामध्ये देहबुद्धी वाढली आहे .मीपणा ,अहंकार वाढला आहे .माझ्यामध्ये मीपणा वाढल्या मुळे माझ्या मध्ये वासना ,कामना ,कल्पना या सर्व गोष्टी वाढू लागल्या मुळे षडरिपू माझ्या मागे लागले . सत्व गुण मागे मागे हटू लागला ..पण मला यातून सुटायचे आहे .

प्रपंच संसार यांचा आता उद्वेग आला आहे .आता बास झाला संसार असे वाटते आहे क्षणक्षणाला असे वाटते आहे मनाचा निश्चय भग पावतो आहे .कुंळाभिमानाने माझे समाधान नाहीसे झाले आहे .माझ्यातला मी पणा वाढला आहे . विवेक नाहीसा झाला आहे .संगदोषाने वृत्ती ढांसाळली आहे .संग आहे विषयांचा , त्यामुळे समाधान नाहीसे झाले आहे .

स्वामी प्रपंचात रमल्यामुळे परमार्थ हातून होत नाही .नामस्मरण होत नाही ,अर्चन पूजन होत नाही .कांहीच होत नाही .ईश्वराची आज्ञा आहे त्याप्रमाणे कांहीच होत नाही .मन सहाजिकच सुख दु:खाच्या झोक्याबरोबर झुलत रहाते .मग समाधान तरी कसे राखणार ? काही मनाविरुध्द झाले की चित्त वृत्ती डळमळीत होउ लागतात ..

प्रपंचाने मला कासावीस केले आहे मला तुम्ही नाराज करू नका ,कारण त्यामुळे सगळी कडे त्रासच वाढेल .असो असा हा संसार म्हणजे दु:खाचा डोंगर झाला आहे .स्वामी अंतरसाक्षी आहेत .ते सर्व जाणतात ।

आता मी काय करावे ? मला समाधानाने कसे जगता येईल? हे स्वामींनी कृपा करून सांगावे.

अशी शिष्याची करुणापूर्ण वाचणे ऐकून गुरुराणा काय म्हणतात ते पुढच्या समासात पाहू .

शनिवार, 12 फ़रवरी 2011

आनंदवन भुवनी समर्थांचे पूर्ण झालेले स्वप्न

भक्तांसी रक्षिले मागे | आतां ही रक्षिते पहा |

भक्तांसी दिधले सर्वै | आनंदवनभुवनी ||४३ ||

आरोग्य जाहाली काया | वैभवे सांडिली सीमा |

सार सर्वस्व देवाचे | आनंदवनभुवनी ||४४ ||

देव सर्वस्व भक्तांचा | देव भक्त दुजे नसे |

संदेह तुटला मोठा | आनंदवनभुवनी ||४५ ||

देव भक्त येक जाले |मिळाले सर्व जीव ही |

संतोष पावले तेथे | आनंदवनभुवनी ||४६ ||

सामर्थ्ये यशकीर्तीची | प्रतापे सांडिली सीमा |

ब्रीदेंची दिधली सर्वे | आनंदवनभुवनी ||४७ ||

राम कर्ता राम भोक्ता | रामराज्य भूमंडळी |

सर्वस्व मीच देवांचा |माझा देव कसा म्हणों || ४८ ||

हेंच शोधूनी पहावे |राहावे निश्चळी सदा |

सार्थक श्रवणे होते | आनंदवनभुवनी ||४९ ||

वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |

कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

गीत सगीत सामर्थ्ये | वाद्य कल्लोळ उठिला |

मिळाले सर्व अर्थार्थी | आनंदवनभुवनी ||५१ ||

वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |

आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |

कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती |

सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |

ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |

पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |

काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी |

विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |

वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

जय जय रघुवीर समर्थ !

आदीमाया आदिशक्ती भक्तांचे सतत रक्षण करते तसे ती आताही करेल असा विश्वास समर्थांना वाटतो .शक्तीच्या उपासनेने शारीरिक आरोग्य तर मिळतेच ,त्याबरोबर वैभवही मिळते .आदिमाया आदिशक्ती देवाचे सार सर्वस्व आहे कारण तिच्यामुळेच हे प्रचंड विश्व उभारता आले .

देव भक्तांचा सर्वस्व असतो कारण देव आणि भक्त एकच असतात .त्यांच्या मध्ये भिन्नत्व नसतेच .देवांचे सामर्थ्य ,वैभव भक्तांना मिळते .त्यांच्या एकत्वाविषयी संशय नसतो .

जसे देव भक्तात ऐक्य असते तसे भक्त भक्तात ही ऐक्य असते .एकाच देवाची भक्ती करणा-या भक्तांत ही ऐक्य असते .आपले जिवलग भेटल्याचा आनंद वाटतो .

भक्ता भाक्तांतील ऐक्यात सामर्थ्य निर्माण होते .जीवाला जीव देणारे भक्त असतात .त्यामुळे ते संतुष्ट होतात

देव भक्त आणि भक्त भक्त यांच्या ऐक्यामुळे सामर्थ्य ,यश ,कीर्ती ,प्रताप निर्माण होतो .आणि मग अवर्णनीय पराक्रम निर्माण होतो .भक्त यश कीर्ती पराक्रम प्राप्त करून घेतात ,त्या ऐक्यातून महाशक्ती निर्माण होते व देव कार्य समर्थ पणे चालू राहते .

भगवंत षडगुणैश्वर्य संपन्न आहे कारण त्याला दुष्टांचा विनाश ,सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना ही तीन कार्य करायची असतात .

तीन कार्य करणाराही तोच आहे आणि त्या कार्याचे फळ भोगणारा ही तोच आहे .देव ,भक्त ,भक्त आणि भक्त हे सर्व एकरूप झाले की रामराज्य येते अशी समर्थांची कल्पना होती .असे रामराज्य शिवराय देतील अशी त्यांना खात्री होती .कारण लोकसंग्रह शिवरायांनी केला .अठरा पगड जातींमधून माणसे गोळा केली आणि स्वराज्य स्थापनेची ईर्षा त्यांनी निर्माण केली .देव देश आणि धर्म याविषयी अभिमान लोकांमध्ये निर्माण केला .

पूजा अर्चा फक्त करणे ,कर्मठपणे वागणे ही भक्ती नाही हां विचार समर्थांनी मांडला .निश्चल अविनाशी रामाच्या ठिकाणी मन निश्चल ठेवणे म्हणजे भक्ती असे समर्थ सांगतात .

गुरुवार, 3 फ़रवरी 2011

आनंदवन भुवनी

आनंदवनभुवनी

देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |

मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||२६ ||

कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |

कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||२७||

बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |

अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी || २८||

पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |

कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||२९ ||

त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |

कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||३०||

भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |

लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||३१ ||

येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |

संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||३२ ||

बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |

मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी || ३३ ||

बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |

ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||३४ ||

गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |

निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||३५ ||

उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |

जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||३६ ||

नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |

गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||३७||

लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |

चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |

राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||३९||

देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |

पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |

मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||

प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |

नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी || ४२ ||

देवांच्या व सीतेच्या मुक्ततेसाठी श्रीरामांनी रावणाशी युध्द केले ,तसेच युध्द श्रीरामांनी भारतवर्षातील जनतेला दुष्ट यवनांच्या तावडीतून सोडविण्यासाठी करावं असं समर्थांना वाटत असावं. रावणाने तप:श्चर्या केली .भोळा सांब त्याच्या तप:श्चर्येस भुलला व त्याला वर दिला .रावणाने त्याच वराने सर्व देवांना बंदिवासात टाकले .सीताहरण केले .त्यामुळे भोळा सांब क्षोभित झाला .

जेव्हा शिवरायांसारख्या धर्म वीरांनी म्लेंछ संहार करण्याचा प्रयत्न केला,तेव्हा कल्पांतासारखां प्रलय झाला .तेव्हा देवांनी धर्मवीरांची बाजू घेतली .आणि मुख्य देव जो श्रीराम ,तो उठला ,त्याने धर्मवीरांच्या लढ्याला आशीर्वाद दिले .

मुख्य देव धर्मवीरां च्या पाठीशी उभा राहिल्याने सगळे अभक्त ,सर्व पापी बुडाले .हिंदुस्थान बळावले ,असे समर्थ म्हणतात .त्याअर्थी संपूर्ण हिंदूस्थान या पापी यवनांच्या जोखडातून मुक्त व्हावे असा भविष्यकाळ समर्थ पहात असावे .

पूर्वी रामरावण युध्दात जे दैत्य मारले गेले होते तेच आता पून्हा प्रबळ होउन लोकांना त्रास देत आहेत अशी कल्पना समर्थ करतात .म्हणून देवांचा देव श्रीराम पून्हा कोपले आहेत आणि पून्हा संहार करणार आहे असा विश्वास समर्थांना वाटत आहे .

रामायण काळी दैत्यांनी त्रैलोक्य गाजले होते .श्रीरामांनी तेव्हा त्रैलोक्याला रावणाच्या तावडीतून सोडवले होते ,तसे आता परत श्रीराम पून्हा सोडवणार आहेत अशी समर्थांना खात्री आहे .

श्रीरामांनी आपला भीमरूपी महारुद्र मारुती लंकेत पाठवले होते मग श्रीराम चढाई करून गेले त्याप्रमाणे वीर पुरुषाचे सैनिक शत्रूवर चढाई करून जात आहेत .,शत्रूच्या फौजांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करत आहेत .

याचा परिणाम म्हणून धर्म वाढला आहे ,धर्म संस्थापना झाली आहे .रामाधर्म म्हणजे ल्क्ष्मी चे वैभव वाढले आहे .त्यामुळे सर्वत्र सुख ,समाधान वाढले आहे .

सर्वात महत्वाची गोष्ट समर्थ सांगत आहेत की पापी औरंग्या बुडाला आहे .त्याचा नायनाट झाला आहे ..त्यामुळे त्याने नष्ट केलेली देवस्थाने पून्हा उभारली गेली आहेत

माणसामाणसातील भेदभाव ,जातीचे ,धर्माचे ,उच्च नीच असे भेदभाव बुडाले होते .नष्ट चांडाळ ,पातकी मारले गेले .

ते गळाले ,पळाले ,देशोधडीला लागले .त्यामुळे दुष्ट लोकांचा पृथ्वीवरील भार नाहीसा झाला .पृथ्वी निर्मळ झाली .मोडलेली क्षेत्रे पून्हा बांधली ,लोक संध्या स्नान निर्भर होउन करू लागले ,त्यामुळे उदंड पाणी झाले असे समर्थ म्हणतात .जप तपात कोणताही अडथळा नव्हता .वेगवेगळी तपे ,अनुष्ठाने ,पुरश्चरणे लोक आनंदाने करू लागले .लिहिल्या प्रमाणे घडलं त्याचा प्रत्यय आला .

म्लेंछाचे बंड मोडून काढल्यामुळे सर्वांना सारखे ज्ञान देणारे अध्यात्म ज्ञान वाढीला लागले .

सर्वत्र दीपमाळा झळकत आहेत .विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी देव आणि देवालये सजली आहेत .ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी युध्दाची आवश्यकता होती तो युध्दाचा प्रसंग समर्थांच्या डोळ्यासमोर येतो आहे ,

राम रावण युध्दात ज्या मातेने श्रीरामांना वर दिला तीच आता स्वत: शस्त्र घेउन उठली आहे .नष्ट ,चांडाळ पापी लोकांना खाण्या करीता चालली आहे ..

मंगलवार, 25 जनवरी 2011

आनंदवन भुवनी


स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

त्रैलोक्य चालिले तेथे | देव गंधर्व मानवी |ऋशी मुनी महायोगी |आनंदवनभुवनी ||१६||

आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदविमोचने |मोहीम मांडली मोठी | आनंदवनभुवनी ||१८ |\

सुरेश उठिला आंगे |सुरसेना परोपरी |विकटे कर्कशे याने |आनंदवनभुवनी ||१९ ||

देव देव बहु देव |नाना देव परोपरी |दाटणी जाहाली मोठी |आनंदवनभुवनी ||२०||

दिग्पती चालिले सर्वै |नाना सेना परोपरी |वेष्टित चालिले सकळी| आनंदवनभुवनी ||२१ ||

मंगळ वाजती वाद्ये |माहांगणा समागमे |आरंभी चालीला पुढे | आनंदवनभुवनी ||२२||

राश्भे राखिली मागे |तेणे रागेची चालिल्या |सर्वत्र पाठीसी फौजा |आनंदवनभुवनी ||२३ ||

आनेक वाजती वाद्ये | ध्वनीकल्लोळ उठिला |छेबीने डोलती ढाला | आनंदवनभुवनी ||२४ ||

वीजई दिस जो आहे | ते दिसी सर्व उठती |अनर्थ मांडला मोठा |आनंदवनभुवनी ||२५ ||

काशीला महत्व येण्याचे कारण म्हणजे ते गंगेच्या काठी आहे ।गंगेने येथे धनुष्याकार धारण केला आहे .धर्मग्रंथात पूर्वी या नदीचे वर्णन रामगंगा ,महागांगा ,गुप्तगंगा असे केले आहे तिच्या पाण्यात मोठे मोठे प्राणी प्रत्यक्ष दिसतात .ही ओवी एक रूपक आहे दासबोधात ११ -७ या समासात वर्णन केलेले मायेचे रूपक यात सागितले आहे .ही माया नदी सर्व देवाची साक्षी आहे .माया ही मूळ प्रकृती आहे ,मायेच्या उपाधीने युक्त महेश्वर व सर्व सगुण देव आहेत .म्हणून या माया नदीत स्नान करून ,तिला समजून दर्शन घेउन माणसाला सुख मिळते .म्हणून एकदा तरी तिच्यात स्नान केले पाहिजे असे समर्थ म्हणतात .त्रेलोक्यातले लोक येथे येतात .याचा अर्थ उत्तरेच्या उंच प्रदेशात राहणारे देवलोक ,सखल प्रदेशात राहणारे मानव ,गांधार देशातील लोक ,मुनी ,महायोगी सर्व येथे येतात .

अकरा आकडा का महत्वाचा आहे ते अनंतदास रामदासी आत्मानुभाव या ग्रंथात सांगतात :

येकी येक ऐक्य ब्रह्म | गुरुशिष्य दोनी परब्रह्म | येकादेश हे अंकवर्ण | सहजसमाधी सांगितले || एकावर एक अशा दोन आकड्यांचे जसे ऐक्य झाले तसे गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मचं आहे .स्वामी सेवक ,देव भक्त ,पुरुष प्रकृती अशा जोड्या एकावर एक अकरा प्रमाणे एकरूप आहेत .समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे अकरावे महारुद्र आहेत म्हणून समर्थांना अकरा हा आकडा प्रिय आहे .

रामायण काळाप्रमाणे आताही युध्द व्हावे असे दिव्य स्वप्न समर्थांच्या दिव्य चक्षुला समोर दिसले . म्हणूनच पुढील ओवीत समर्थ वर्णन करतात की देवांना सज्जनांना जनतेला बंधमुक्त करण्यासाठी देव मस्तकी धरून हलकल्लोळ करत आहेत असे स्वप्न समर्थ पहात आहेत .

दैत्यांवर चालून जाणा-या देवांच्या सैन्यात पुष्कळ शस्त्रे धारण करणारे देवांप्रमाणे तेजस्वी व पराक्रमी पुरुषांची सैन्यात दाटी झाली होती .देवांचा राजा ईंद्र याच्या अधिपत्याखाली फौजा चालल्या होत्या दैत्य सैन्याला चारही बाजूंनी वेढा देत देत चालल्या होत्या .विजयाची मंगल वाद्ये वाजत होती .युध्दाच्या आरंभी निर्विघ्नता सूचक गणपती पुढे चालला होता .रामाच्या वेळेस गणपतीला रावणाने गाढवे चारायला लावली होती तो राग गणपतीच्या मनात होता .या दैत्यांचा सूड घेण्याच्या ईच्छेने क्रोधित झालेला गणपती देवसेनेला विजय मिळवून देण्याच्या ईच्छेने मंगल वाद्ये घेउन पुढे चालला होता .अनेक रणवाद्ये वाजत होती .

विजयादशमीच्या मंगल दिवशी सर्व देव सेना दैत्यांवर चालून जात आहे आणि दैत्यांचा संहार मांडला आहे असे भविष्यकालीन दृश्य समर्थांच्या दृष्टी समोर तरळत आहे

शुक्रवार, 21 जनवरी 2011

आनंदवनभुवनी -समर्थांनी पाहिलेले एक स्वप्न



आनंदवनभुवनी

समर्थांनी पाहिलेले एक स्वप्न

जन्म दु:खे जरा दुखे |नित्य दुखे पुन्ह्पुन्हा |

ससार त्यागणे |आनंदवनभुवना ||१||

वेधले चित्त जाणावे |रामवेधी निरंतरी |

रागे हो वीतरागे हो |आनंदवनभुवना ||२ ||

संसार वोढीता दुखे |ज्याचे त्यासीच ठाउके |

परंतू येकदा जावे |आनंदवनभुवना ||३||

न सोसे दुख ते होते | दुख शोक परोपरी |

येकाकी येकदा जावे |आनंद्वनभुवना ||४||

कष्टलो कष्टलो देवा |पुरे संसार जाहाला |

देहत्यागासी येणे हो | आनंदवनभुवना ||५||

जन्म ते सोसिले मोठे | अपाय बहुतांपरी |

उपाये धाडिले देवे | आनंदवनभुवना ||६ ||

स्वप्नी जे देखिले रात्री | तें तें तैसेची होतसे |

हिंडता फिरता गेलो |आनंदवनभुवना ||७|

जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|

विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली |

लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||९ ||

विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला |

धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||१०||

हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |

हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||११ ||

खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |

कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||१२ ||

हिंदुस्थानच्या चारही दिशांना बारा वर्षे भ्रमण करून समर्थ काशीच्या रामगंगेच्या तीरावर बसले असताना भावी हिंदुस्थानचे भव्य चित्र उभे राहिले .त्याचे चित्रण या काव्यात केले आहे .हे काव्य अनुष्ट्रूप छदात आहे .हे महाराष्ट्राचे राष्ट्रगीत आहे असे पांगारकर म्हणतात .

या श्लोकाचे पहिले सहा श्लोक ,संसाराला कंटाळून ,वैराग्य आलेल्या प्रापंचिकाने देहत्यागा करीता काशीक्षेत्राला केलेले गमन सांगणारे आहेत ।

गीतेच्या १३ व्या अध्यायात ज्ञानाची जी लक्षणे सांगितली आहेत त्यावरून पहिली ओवी आहे .चित्ताला रामाचा ध्यास लागला की त्याच्या प्रेमाने वैराग्याने काशीला जावे .संसारात काबाडकष्ट असले तरी एकदा काशीला जावे असे समर्थ सांगतात .संसारात येणारी दुखे खूप असली तरी एकदा तरी काशी यात्रेला जावे .संसाराचे कष्ट उपसून जरी थकलो ,तरी देह काशी क्षेत्री पडावा म्हणून काशीला जावे .अनेक जन्म मी कष्ट सोसले तरी जन्म मृत्युच्या चक्रातून सुटण्यासाठी एकदा काशीला जावे .

समर्थांनी स्वप्नात पाहिल्या प्रमाणे ते खरोखरच काशीत आले होते .भारता बद्दल विचार करत असताना त्यांच्या मनात कल्पनेचे कल्लोळ माजले होते .त्याचे वर्णन त्यांनी ७ ते १२ या श्लोकांत केले आहे विघ्नहर्ता गजाननाला प्रार्थना करून तीर्थ यात्रेला समर्थ निघाले .काशी क्षेत्रात आल्यावर पाहिलेले स्वप्न खरे झाले अशी खात्री पटली .सर्व हिंदुस्थान फिरल्यावर त्यांच्या मनात उठलेले कल्लोळ असताना भविष्यात जे व्हावे असे वाटले ते प्रत्यक्ष घडते आहे असे दृश्य दिसू लागले .स्वधर्माचरण करताना येणारी विघ्ने देवाने कुटून लाटले .विघ्नाची डोके भुई सपाट केली .हिंदुस्थान मधील फौजा परधर्मी लोकांवर चालून गेल्या .भीमपराक्रमी लोकांनी शत्रूंचा पराभव केला .विघ्नांच्या फौजा हाकलवून लावल्या .असा अद्भूत पराक्रम बघून विघ्न हर्त्या फौजांमध्ये गोंधळ उडाला .त्या फौजांची कत्तल करायला सुरवात झाली कारण अनेक वर्षे लोक अन्याय सहन करत होते .त्यांच्या बाजूने आता भीमकाय मारुती वा मुख्य देव म्हणजे श्री रामराय उभे ठाकले होते .