धन्य तुळजापूर सुंदर । माता नांदे घरोघर । तेहेतीस कोटी सुरवर । उभे असती त्या ठाया । । १ यात्रा येतसे अपार । उदो बोलाचा गजर । गोंधळ पोत निरंतर । चमत्कार पावती । । २ तेथे येता रामदास । श्रीराम चरणी दृढ़ विश्वास । अंतरी धरोनी आस । रामध्यान करीतसे । । ३ रामरूपी देवी जाली । शिवशक्ती आकारली । नामे अंतरी निवाली । लक्ष पायी ठेविल्या । । ४ म्हणावा जयजय राम !तुळजापुर नगर खरोखरच सुंदर आहे कारण तेथे तुळजाभवानीचा वास आहे .तीच सर्वत्र नांदते आहे .तिच्या ठिकाणी तेहेतीस कोटी देव गण आहेत अशी कल्पना केली आहे .तुळजापुरच्या यात्रेत देवीचा,तुळजापुरच्या भवानी चा उदो चाललेला असतो ,एकच गोंधळ ,तिचा पोत नाचवणे ,चालू असते ।समर्थ रामदास जेव्हा तुळजापूर ला आले ,तेव्हा त्यांना तेथे ही रामरायांचे दर्शन हवे होते .तीच इच्छा मनात धरून त्यांनी राम रायांचे ध्यान केले .आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रामराय तेथे प्रगट झाले .देवी रामरूपी झाली .जणू काही शिव आणि शक्तीचा एकत्र संगम झाला .तिच्या पायाशी लक्ष दिल्यावर तिचे ध्यान करून देवी अंतरातून निवाली .शांत झाली .
धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान । पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १ वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर । करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २ कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती । पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३ भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय । भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४ म्हणावा जयजय राम !शंकरांचे वसतिस्थान जेथे आहे त्या शिखराला कैलास असे म्हणतात .ते पांढ-या स्फटिकांचे शिखर आहे .तेथे शंकर श्रीरामांचे ध्यान करत असतात .सिंहासनावर बसून अत्यंत प्रेमाने गणपतीचे नृत्य पहातात .जो कोणी शंकरांचे नाम घेत असतो ,त्याला शंकर महा वर देऊन पातकांचा संहार करतात .सिंहासनावर बसलेले असताना गिरिजा म्हणजे पार्वती त्यांच्या अंकावर म्हणजे मांडीवर बसलेली शोभून दिसते .कृष्णा ,गोदा आणि भागीरथी या नद्या शंकरांच्या जटेतून निघून पृथ्वी वर लोकांसाठी ,लोकांची तहान भागवण्या साठी आल्या आहेत ,पृथ्वी वरील लोकांना पावन करण्या साठी आल्या आहेत .शंकरांचे भैरवादी समुदाय सतत राम नामाचे नित्य गायन करतात .त्याने सर्व भ्रम नाहीसे होतात .शंकरांच्या पायावर लक्ष ठेवले तर सगळे भ्रम नाहीसे होतात .
नाम जेजुरीगड सुंदर । तेथे नांदे म्हाळसावर ।संगे भैरवगण अपार । पूर्ण अवतार शिवाचा । । १ पीत अश्वावरी स्वार । हाती घेऊनी तलवार । करी मणिमल्ल संहार । करी उध्दार जगाचा । । २ चंपाषश्ठीचा उत्सव थोर । यात्रा मिळती अपार । येळकोट नामाचा गजर । भक्त आनंदे करिताती । । ३ दास म्हणे रामराव । राम तोचि खंडेराव । जेथे भाव तेथे देव । लक्ष पायी जडलिया । । ४ म्हणावा जयजय राम !सुंदर जेजुरी गडावर म्हाळसापति खंडेराव नांदतो आहे .तो शिवाचा अवतार असल्यामुळे शिव शंकरांचे भैरव गण ही बरोबर आहेत .पिवळ्या घोड्यावर स्वार होउन ,हातात तलवार घेऊन मणिमल्लाचा राक्षसाचा संहार करून त्याच्या पासून लोकांचे रक्षण केले .जगाचा उध्दार केला ।कृत युगात दैत्य उन्मत्त झाले .त्यांनी मुनींवर हल्ले चढवले .सर्व देवांनी शंकरांकडे धाव घेतली .महादेवांनी मल्हारी मार्तंडाचे अक्राळ विक्राळ रूप घेतले .मणी दैत्या बरोबर युध्द पुकारले .मणीच्या छातीवर त्रिशूलाचा प्रहार केला .तो मूर्छित पडला ,सावध झाला व पुन्हा युध्द करू लागला .महादेवांनी शक्तिशाली ब्रह्मास्त्र फेकून त्याला मूर्छित केले। त्रिशूल फेकले आणि भूमीवर पाडले .मणी दैत्य शरण आला .आणि मला जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे .मला मुक्ती दे । असा वर मागुन घेतला .देवाने तथास्तु म्हटले .मणीचा पुतळा आजही खंडेरायाच्या मूळ देवळा समोर हात जोडून उभा आहे .मणी चा भाऊ मल्लासूर भावाच्या वधाच्या सूडाने पेटला .त्याने जोरात युध्दाला सुरुवात केली .मार्तंडाने त्रिशूल फेकून त्याला धरणीवर पाडले .मल्लासूर नतमस्तक झाला .त्याने प्रभूंना विनंती केली - तुमच्या आधी माझे नाव यावे .देव तथास्तु म्हणाले .तेव्हा पासून मार्तंडाला मल्हारी मार्तंड म्हणतात ।चंपाषष्ठी चा खूप मोठा उत्सव जेजुरी गडावर भरतो ,खुप मोठी यात्रा भरते .येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर होतो .समर्थ रामदास म्हणतात की श्रीराम म्हणजेच खंडेराव आहे .समर्थांना सर्वत्र श्रीराम च दिसत असल्यामुळे खंडोबा ठिकाणी श्रीरामच आहेत असे समर्थ म्हणतात .जेव्हा दैवताच्या ठिकाणी मन जड़लेले असते तेव्हा जो भाव असतो तसा देव आपल्याला भेटतो .
हरी गिरीपरी ठाण । बळे चालिले फुराण । वरी घेतले किराण । अंतराळ जातसे । । १ कपी लागवेगे धावे । मागे लांगुळ हेलावे । वैरसमंध आठवे । वज्र दाढा खातसे । । २ मनोवेगे झेंपावाला । द्रोणागिरीस पावला । हात घाली औषधीला । आटघाट होतसे । । ३ गिरी उत्पाटिला बळे । सळे बांधिला लांगुळे । मागे फिरे अंतराळे । लंकेवरी येतसे । । ४ म्हणावा जयजय राम !लंकेवर श्रीराम जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा रावणाच्या बाणाने लक्ष्मण बेशुध्द पडला तेव्हा द्रोणागिरी वरील औषधी आणण्याला सांगितले तेव्हा हनुमंताने ते काम हाताशी धरले .अंतराळातून मनोवेगाने द्रोणागिरी पर्वताकडे जाण्यास निघाला .त्याची शेपुट मागे हलत होती .रावणाने लक्ष्मणाला बेशुध्द पाडले हे आठवून हनुमंताने दातओठ खाल्ले आणि औषधी आणायला मनाच्या वेगाने निघाला .द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला .त्या पर्वतावर अनेक औषधी होत्या .कोणती घ्यावी अशी त्याला खात्री नव्हती .म्हणून त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला .औषधी घेतल्यावर पुन्हा परत तेथे नेऊन ठेवला .पुन्हा लंकेवर आला .
नाम श्रीराम सुंदर । ध्याती उमामहेश्वर ।सिंहासनी रघुवीर । अंकी सीता शोभली । । १ लक्ष्मण महावीर । भरत शत्रुघ्न धीर ।हनुमंत जोड़ी कर । देवर्षी गायिला । । २ ज्याचे ध्यानी रामदास । तेच ध्यान कल्याणास । बंधू दत्तात्रयास । रामप्रेमा लाधला । । ३ वर्णू राघवाचे यश । श्रीगुरुचा नामघोष । पूर्वपुण्य हे विशेष । लक्ष पायी ठेविला । । ४श्रीराम हे सुंदर नाम आहे .श्रीरामांचे ध्यान उमा महेश्वर करतात .कारण समुद्र मंथनात निर्माण झालेले विष शंकरांनी प्राशन केले .त्याचा दाह गंगेला मस्तकावर धारण करून ,चंद्राला मस्तकावर धारण करून ,नाग गळयावर धारण करूनही थांबला नाही .तो श्रीरामांचा नामस्मरण करून दाह थांबला.रघुवीर सिंहासनावर बसले असताना त्यांच्या मांडीवर सीता शोभून दिसते .लक्ष्मण महावीर आहे .भरत शत्रुघ्न हे दोन्ही धीराचे आहे .भारताने १४ वर्ष श्रीरामांची वाट पाहिली .हनुमंत रामांच्या समोर हात जोडून उभा आहे .त्या हनुमंताचे वर्णन देवर्षी नारदांनी केले आहे .ज्या कल्याणाला रामदासांचे ध्यान आहे ,त्या रामदास स्वामींना श्रीरामांचे ध्यान आहे .समर्थ रामदासांच्या बंधू दत्तात्रयांना रामाचे प्रेम लाभले आहे .राघवाचे यश वर्णन करायचे तर श्रीगुरुंचा म्हणजे श्रीरामांचे नामाचा नामघोष करायला हवा ,पूर्व पुण्य असेल तरच श्रीरामांचे नाम स्मरण करण्याची ,इच्छा होते .
नयनी पाहता हनुमंत । ज्यासी वर्णिती महंत । ज्याचा महिमा अनंत । मुख्य प्राण रामाचा । । १ स्वामी रामाचे वहन । केले लंकेचे दहन । त्याची कीर्ती गहन । बलभीम नामाचा । । २ सदा बांधुनिया माज । करी रामाचे निजकाज । ज्याचे शिरी रघुराज । सेवक पूर्णकामाचा । । ३ सर्व देवांचा वरिष्ठ । वारी दासाचे अरिष्ट । रामदास एकनिष्ठ । मारुती हा नेमाचा । । ४ म्हणावा जयजय राम !डोळ्यांनी हनुमंताला पाहताना हनुमंताचे वर्णन महंत करतात .हनुमंत महाबली आहे .प्राण दाता आहे .सौख्यकारी आहे ,दुःखहारी आहे ,भीमरूपी आहे म्हणजे महाभयंकराचा नाश करणारा आहे .त्याचा महिमा वर्णन करता न येणारा आहे .तो रामाचा जणू प्राणच आहे .सीता माईंना शोधायला आल्यावर त्याने लंकेचे दहन केले .रावण वधानंतर श्रीराम लक्ष्मण व सीतेसह अयोध्येला जायला निघाले तेव्हा मारूतीने त्यांना वाहून नेले .अशा मारुती रायाची कीर्ती खूप मोठी आहे .तो नावाप्रमाणे बलभीम आहे .त्याने द्रोणागिरी पर्वत औषधी साठी उचलून आणला आणि काम झाल्यावर पुन्हा नेऊन ठेवला .तो नेहमी रामाचेच काम करण्यात दंग असतो . तो सर्व देवांमध्ये वरिष्ठ आहे कारण सूर्याला पकड़ण्यासाठी जेव्हा उडी सर्व देवांनी त्याला अस्त्र भेट दिली .तो रामाच्या दासावरील संकट दूर करतो .समर्थ रामदास त्याचे एकनिष्ठ भक्त होते .
रामदूत वायूसूत भीमगर्भ जुत्पती । जो नरात वानरात । भक्तीप्रेम वित्पती ।। १ दासदक्ष स्वामीपक्ष नीजकाज सारथी वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती । । २ मारुती श्रीरामांचे दूत होते .रावणाकडे श्रीरामांचे दूत म्हणून मारुतीच गेले होते .सीतामाता शोधताना सापडल्यावर श्रीरामांनी दिलेली खुणेची अंगठी रामदूत या रूपातच सीता मातांना दिली .श्रीरामांच्या विजयाचा शुभ सन्देश सीतामातांना देण्यासाठी दूत म्हणून मारुती रायच आले होते । मारुती मरुत म्हणजे वायूचा पुत्र .मरुत म्हणजे वायूच्या औरस वीर्यापासून उत्पन्न झालेला म्हणून मारुती !भीमरूपी स्तोत्रात मारुतीला भीमरूपी म्हटले आहे .भीम म्हणजे भयंकर ! मारुतीला भयंकर या अर्थाने न म्हणता महाभयंकरापासून रक्षण करणारे म्हणून म्हटले आहे .अंजनी मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मारुती राय होते म्हणून भीमगर्भ जुत्पत्ती !ते दासदक्ष आहेत .श्रीरामांच्या दासांचे ते रक्षण करतात .श्री समर्थ रामदास स्वामींचे त्यांनी नेहमीच रक्षण केले .श्रीराम मारुती रायांचे स्वामी !श्रीरामांशिवाय अन्य कोणताही विचार त्यांच्या मनात नसे .ज्यात श्रीराम नाहीत ते काहीही त्यांना आवडत नसे .म्हणून रामांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस दिलेली मोत्याची माळ त्यांनी फोडून टाकली .कारण त्यात श्रीराम त्यांना दिसले नाहीत । मारुती राय बलशाली होते .त्यांनी सीतामाईंचा शोध वायूवेगाने शत योजने सागर ओलांडून लावला .हजारो योजने दूर असलेला द्रोणागिरी पर्वत घेउन आले .औषधी दिल्यावर पुन्हा पर्वत उचलून जागेवर ठेवला व मारुती हे नाव सार्थ केले .